Site icon InMarathi

भारतात या देवळांमध्ये चक्क केली जाते ‘राक्षसांची’ पूजा – वाचा एक ‘अजब’ सत्य!

shakuni-mama-temple-in-kerala InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात अनेक धर्मांचे अनेक पंथांची माणसे प्राचीन काळापासून वास्तव्य करून आहेत. अनेक परकीय आक्रमणे आपल्या देशावर झाली. जगातील कानाकोपऱ्यांतून अनेक संस्कृतींची माणसे आपल्या देशात येऊन स्थायिक झाली आणि इथेच रुजली. त्यांनी आपली संस्कृती सुद्धा येथेच रुजवली.

आपल्या भारतात जो प्राचीन सनातन हिंदू धर्म आहे त्यात सुद्धा अनेक पंथ आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या देवतेची आपल्याला आवडेल त्या प्रकारे उपासना करण्याचा अधिकार आहे.

ज्याला सगुण साकार रूपाची पूजा करायची असेल त्या व्यक्तीलाही असंख्य पर्याय खुले आहेत, आणि ज्याला ईश्वराच्या निर्गुण निराकार रूपाची उपासना करायची असेल त्यालाही पर्याय उपलब्ध आहेत.

ज्याला देव, पूजा, उपासना ह्यांवर विश्वास ठेवायचा नाही त्यालाही नास्तिक म्हणून आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य सर्वसमावेशक हिंदू धर्माने दिले आहे.

तर अशी हिंदू धर्मात ३३ कोटी देवतांची पूजा केली जाते, ह्याशिवाय जे संतमाहात्म्ये होऊन गेले त्यांचीही आपण पूजा करतो. निसर्गाची व निसर्गातील पंचमहाभूतांची, ह्या ना त्या निमित्ताने सर्व सजीवांची आपण पूजा करून कृतज्ञता व्यक्त करत असतो.

 

wikimedia.org

पण कदाचित काही लोकांना हे ही कमी पडले की काय म्हणून भारतातल्या ह्या देवळांत चक्क राक्षसांची पूजा केली जाते. रामायण व महाभारतासारख्या अनेक धर्मग्रंथांत देवी-देवतांसह अनेक राक्षसांच्याही पूजेचे वर्णन केल्याचे आढळते.

आज आपण अश्याच काही वैशिष्टयपूर्ण देवळांबद्दल जाणून घेऊया जिथे आजही काही संप्रदायातील लोक राक्षसांची पूजा करतात आणि त्यांच्याबद्दल ते मनात श्रद्धा बाळगून आहेत.

१) उत्तर प्रदेशातील कानपुर येथील दशाननाचे मंदिर –

 

patrika.com

कानपूरच्या शिवला भागातील दशाननचे मंदिर हे १२५ वर्षे जुने आहे.हे मंदिर १८९० साली राजा गुरु प्रसाद शुक्ल ह्यांनी बांधले आहे. दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी भक्तांसाठी ह्या देवळाची दारे उघडली जातात.

हे मंदिर बांधले जाण्याचे कारण म्हणजे रावण हा राक्षस असला तरी एक ज्ञानी व विद्वान राजा होता. आणि तो भगवान शंकराचा मोठा भक्त होता.

म्हणूनच ह्या जिल्ह्यातील शिवला ह्या भागात भगवान शंकरांच्या देवळाच्या परिसरात हे दशानन मंदिर बांधण्यात आले होते.दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी ह्या देवळात भक्त आरती करतात आणि मातीचे दिवे (पणत्या) लावल्या जातात.

तसेच ह्या देवळात दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी धार्मिक अनुष्ठान सुद्धा केले जाते. दर वर्षी ह्या देवळात पंधरा हजार पेक्षाही जास्त भक्त पूजा करण्यासाठी श्रद्धेने येतात व त्यांची उपासना करतात.

२. केरळ येथील शकुनी मंदिर

 

india.com

महाभारतात वेळोवेळी आगीत तेल ओतून जाणूनबुजून महाभारताचे युद्ध घडवून आणणारे पात्र म्हणजे कौरवांचा मामा शकुनी मामा! कंस मामा व शकुनी मामा ह्यांनी मामाच्या नावावर कलंक लावला आहे.

तर अश्या ह्या शकुनी मामाचे मंदिर केरळ येथे आहे. शकुनी मामा द्युताच्या खेळात प्रवीण होते.

त्याच्या कपटामुळेच पांडव द्युताच्या खेळात हरले होते आणि पुढे महाभारत घडले. ह्याच कपटामुळे शकुनी मामा हा खलनायक किंवा असुरांमध्ये गणला जातो.

पण आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या शकुनीमामाचे मंदिर केरळच्या कोल्लम जिल्ह्यात आहे. हे अतिशय प्राचीन देऊळ आहे. ह्या देवळात भक्त शकुनीची पूजा नारळ व रेशमाचे कापड अर्पण करून करतात. तसेच ह्या देवळात काही तांत्रिक क्रिया सुद्धा चालतात.

३. उत्तर प्रदेशातील पूतनाचे मंदिर

 

punjabkesari.in

शकुनी मामाप्रमाणे मावशीच्या नावावर कलंक असलेल्या पुतनामावशी उर्फ पुतना राक्षसिणीचेही देऊळ भारतात आहे. बाळकृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक युक्त्या योजल्या. अनेक असुर गोकुळात बाळकृष्णास ठार मारण्यास पाठवले.

त्यातील एक होती ही पुतना राक्षसीण! हीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. आणि बाळकृष्णाला विष पाजून मारून टाकण्याची तिची योजना होती.

म्हणून तिने बाळकृष्णाला दूध पाजले. पण तिची ही योजना बाळकृष्णाने हाणून पाडली आणि तिचाच वध केला. तर अश्या ह्या पुतना मावशीचे मंदिर गोकुळच्या परिसरात आहे.

ह्या देवळात पुतना राक्षसिणीची बाळकृष्णाला दूध पाजतानाची प्रतिमा आहे. ह्या मंदिरात अशी मान्यता आहे की मारण्याच्या उद्देशाने का होईना पण पुतनाने श्रीकृष्णाला आईच्या रूपात दूध पाजले होते. म्हणून तिची ह्या देवळात पूजा केली जाते.

५) केरळ येथील दुर्योधनाचे मंदिर

 

keralamythology.blogspot.com

महाभारतातील मुख्य खलनायक आणि पांडवांचा मुख्य शत्रू, व कौरवांतील ज्येष्ठ अश्या दुर्योधनाचे मंदिर केरळ येथे शकुनी मंदिराच्या जवळच आहे. ह्या देवळाला मलंदा मंदिर असेही म्हटले जाते.

येथे दुर्योधनाची पूजा करताना त्याला सुपारी आणि लाल रंगाचे वस्त्र अर्पण केले जाते. दुर्योधनानेच औरस अनौरसाचा वाद उकरून काढला होता, आणि सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा पांडवांना देण्याचे नाकारले होते.

तसेच भरसभेत द्रौपदीची अवहेलना केली होती. त्यामुळे तो तर मोठाच खलनायक असून देखील ह्या मंदिरात त्याची पूजा केली जाते.

६) हिमाचल प्रदेश येथील हिडिंबेचे मंदिर

 

yatra.com

हिडिंबा ही जरी राक्षसकन्या असली तरी तिचा विवाह भीमाशी झाला होता. त्यांचा पुत्र घटोत्कच ह्याने महाभारत युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. हिडिंबेने एकटीनेच भीमाच्या अपरोक्ष घटोत्कचाचे पालनपोषण करून त्याला मोठे केले होते. म्हणूनच ती असुर कुळातील असली तरीही ती पूजनीय आहे.

हिमाचल प्रदेशातील रामपूर बुशहर जिल्ह्यात हिडिंबेचे देऊळ आहे. हे देऊळ बारा वर्षांतून एकदाच उघडले जाते आणि एखाद्या देवीप्रमाणे हिडिंबेची पूजा केली जाते.

तर अशी ही आगळीवेगळी देवळे आहेत जिथे राक्षसांची पूजा केली जाते. हिंदू धर्माचे हेच तर वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाला आपापल्या आवडत्या देवतेचे पूजन करण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version