संजय आवटेंना लिहिलेल्या पत्रात संशयित माओवादी सचिन माळीचे गंभीर आक्रमक आरोप
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
पत्रकार संजय आवटे यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना, “प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांशी डील केलं आहे.” असं म्हटल्याचे वृत्त होते.
युतीच्या वाटाघाटीत कॉंग्रेसशी मतभेद झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःची वेगळी वाट चालायचे ठरवले.
त्यानंतर अनेक कॉंग्रेससमर्थकांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीवर ‘भाजपची बी टीम’ असल्याचे आरोप केले आहेत, याच पार्श्वभूमीवर माओवादी संबंधांच्या आरोपावरून जामिनावर बाहेर असलेल्या सचिन माळी यांनी संजय आवटे यांना पत्र लिहिले आहे..
===
प्रिय संजय आवटे साहेब,
“मित्रांना जखमी करू नये” या मताचे आम्ही आहोत पण तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांवर बेछूट आरोप करून आम्हांला नाईलाजाने बोलायला भाग पाडले आहे. म्हणूनच हे खुलं पत्र तुमच्या नावे…
पत्रकारितेतील सन्माननीय नाव म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत होतो. पण लोकसभा तापू लागली आणि तुमचा तोल गेला. काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीबाबत जे कुजबुज तंत्र चालवलं आहे ते तुम्ही लीड करण्यासाठी पुढे सरसावला आहात.
प्रकाश आंबेडकरांनी BJP सोबत डील केलंय हे आरडून सांगू लागला आहात. असो.
आवटे साहेब, AC मध्ये बसून असले जावई शोध लावले म्हणून भविष्यात काँग्रेस एखादा पुरस्कार टाकेलही कदाचित तुमच्या झोळीत. पण कंबरेला गच गुंडाळलेली आणि चुरगाळलेली दहाची नोट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना देणारी आज्जीबाई आणि नवऱ्याला न विचारता बाळासाहेबांना गळ्यातील मंगळसूत्र काढून देणाऱ्या आया-बाया मात्र तुम्हाला माफ करणार नाहीत.
पदर खर्चानं उन्हा-तानात फिरणारे रात्रभर एस टी, वडाप, रेल्वे अशा मिळेलत्या वाहनाने प्रवास करणारे आणि दिवसा बैठका, सभा घेणारे कार्यकर्ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत.
सत्ताधाऱ्यांशी डील झाली असती तर हे सारं बोथट झालं असतं. साधनांचा सुकाळ झाला असता. हे ग्रासरुटवर येऊन बघा जरा. मग बोला की.
हेळवी, कैकाडी, होलार, डोंबारी, फासे पारधी, अशा असंख्य सत्तावंचित जाती आहेत ज्यांच्या मनात सत्ता संपादनाचं स्वप्न बाळासाहेबांनी पेरलंय. त्यातील क्रांतिकारिता, त्यातील पुरोगामीत्व तुम्हांला कळू नये हे अत्यंत खेदाचे आहे.
२०१४ ला BJP ला बिनशर्त पाठींबा देणारी राष्ट्रवादी, अहमदनगर मध्ये केवळ 14 नगरसेवक असताना BJP चा महापौर बनवणारी राष्ट्रवादी तुम्हाला धर्मनिरपेक्ष वाटते.
बेगुसराय मध्ये जेंव्हा काँग्रेस कन्हेय्या कुमारविरुद्ध RJD ला पुढं करते आणि कन्हेय्या कुमार पार्लमेंटमध्ये जाऊ नये म्हणून फिल्डिंग लावते.”तिथं डील झालं असावं ” असं तुमच्या सारख्या ज्ञानी पत्रकाराच्या मनात ही येऊ नये, हे आश्चर्यच !
गेली सत्तर वर्षे सत्तेच्या परिघाच्या बाहेर राहिलेल्या OBC, VJNT, SC आणि ST मधील जाती आता जाग्या होत आहेत. त्यांचा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी बनण्याच्या निर्धाराचा अंकुर जर तुमच्या डोळ्यांत खुपत असेल तर तुमची लोकशाहीच्या आणि संविधानाच्या गप्पा मारणारी YES WE CAN सारखी पुस्तकं मग काय पुजायची आहेत काय?
कोणताही पुरावा नसताना “बाळासाहेबांनी डील केलंय” ही भाषा तुम्हाला शोभत नाही आवटे साहेब. तुम्ही तर सांबीत पात्रा, साक्षी महाराज, उमा भारती जसं मुर्खता पूर्ण बोलतात तसंच अतार्किक आणि अविवेकी बोलून राहिले. बिनबुडाचे आरोप करून राहिले.
धाडसी पत्रकारिता, शोधपत्रकारिता असले काही शब्द आम्हीही ऐकून आहोत. त्या शब्दांना कलंक लावण्याचे काम करू नका ही विनंती.
RSS चे पालन पोषण ज्या काँग्रेसने केले त्या काँग्रेसवर खुप जीव आहे तुमचा. ती काँग्रेस जी RSS ला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा लेखी प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना देऊ शकली नाही. एवढी फुसकी धर्मनिरपेक्षता पाळते तुमची काँग्रेस !
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत वंचित बहुजन आघाडीने समझोता केला नाही म्हणून एवढं कशाला जीवाला लावून घेता? पुरोगामी असणं म्हणजे नव्या परिवर्तनाच्या बाजूने असणे. नव्या मूल्यव्यवस्थेच्या बाजूने असणे. उगवतीच्या बाजूने असणे. पण तुम्ही तर मावळतीच्या बाजूने दिसताय.
प्रस्थापित घराणेशाहीच्या, सरंजामी परिवारवादाच्या आणि भ्रष्ट भांडवलशाहीचे बटीक असणाऱ्यांच्या बाजूने दिसताय. हे सारं केवळ अंध सेक्युल्यारिझमसाठी तुम्ही करताय.
सेक्युल्यारिझम मध्ये राज्य आणि धर्म यांत पोलादी भिंत असावी अशी अपेक्षा असते. जानवं घालून राहुल गांधी सेक्युल्यारिझमची कंदुरी म्हणजे कत्तल करत असतात. हे दिसत नाही का तुम्हाला?
भांडवली-सरंजामी सत्ताधाऱ्यांचा पराभव करून शोषित-पीडित-वंचित जातींनी सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करणे यातलं पुरोगामीत्व पाहू न शकणाऱ्या विचारवंतांची कीव करावी वाटते.
“सौ में पावे पिछडे साठ” म्हणत गैर-काँग्रेसवादाची मांडणी करणारे राम मनोहर लोहियांनी कुणाशी डील केली होती हे ही जरूर सांगावे. याचा शोध घेण्यासाठी कुमार सप्तर्षी तुम्हाला मदत करतीलच !
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात स्वबळावर लढली तर मतविभाजन होते, मग 2019 च्या या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस UP सह 26 राज्यांत 354 जागांवर स्वबळावर लढते आहे तिथं मत विभाजन होत नाही का?
दिल्लीत केजरीवालांनी मैत्रीचा हात पुढं करूनही तो झिडकरण्याची हिम्मत काँग्रेस करते, तेंव्हा मत विभाजनाचा धोका नसतो का हो?
“काँग्रेस करते ते राजकारण असते आणि आम्ही करतो ते मतविभाजन असते.” या पूरोगामी सिद्धांतात आम्हांला जातिव्यवस्थेच्या विषमतावादी लक्षणांचाच वास येतो.
कारण शूद्रातिशूद्रांनी राज्यकर्ता होण्याचं स्वप्न बघणं हा गंभीर गुन्हा आहे हे आम्हाला मालूम आहे. तुम्हीही आमच्यापैकीच एक असले तरी तुम्ही मानसिकदृष्ट्या अजूनही स्वतंत्र झालेला नाही आहात असे तुमच्या भूमिकेवरून वाटते.
त्यामुळेच आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजनांनी सत्ता संपादनाचा केलेला निश्चय तुम्हाला समजूच शकणार नाही. असो.
संजय आवटे सर काँग्रेस-राष्ट्रवादीची हाडकं चघळत बसण्यापेक्षा सत्याशी बांधिलकी ठेवा.पुरावा असेल तर प्रकाश आंबेडकरांना खुशाल टार्गेट करा. नसेल तर माफी मागा. दिव्य मराठीकडून मिळणारा पगार हा साम टी.व्ही. मराठी या चॅनलकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी असेल तर तसं सांगा.
आम्हांला डील मध्ये मिळालेल्या घबाडातील एखादा खोका पाठवता येईल. म्हणजे तुमचा डोका नीट काम करेल. तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाला जास्त काय सांगू ?
“बाप दाखव न्हाई तर श्राद्ध घाल” अशी आमच्या गावाकडं एक म्हण आहे…
#सत्यशोधक
जय भीम! जय जोती !! जय साऊ !!!
आपला,
सचिन माळी
===
सचिन माळी यांच्या या पत्रानंतर पुरोगामी वर्तुळाट वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल असलेले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसते आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.