‘मनसे’च्या गुंडांना लोकशाही, कायदा वगैरे गोष्टी काय असतात हे कळतं की नाही?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतात भाषणस्वातंत्र्य आहे ह्याचा बरेच लोक गैरवापर करत असतात. आता तर निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे सगळेच पक्ष एकमेकांवर दोषारोप करत सुटलेत. काही लोक पातळी राखून बोलतात तर काही लोक अगदी पातळी सोडून बोलतात.
सोशल मीडिया हे तर आपले विचार जाहीरपणे मांडण्याचे साधन मिळाले असल्याने लोक विविध विषयांवर आपली मते मोकळेपणाने मांडत असतात.
आपल्या गल्लीतल्या नगरसेवकापासून तर ट्रम्प तात्यापर्यंत सगळ्यांविषयीच लोक भरभरून बोलत असतात. कधी कौतुक करणारी पोस्ट असते तर कधी एखाद्या नेत्यावर टीका सुद्धा करतात.
आपण वाट्टेल तशी बेताल वक्तव्ये केली तरी चालतील, पण सामान्य माणसाने जर टीका केली, काही विधाने केली तर मग ते बोलणे ह्या नेत्यांना आणि त्यांच्या सैनिकांना सहन होत नाहीत आणि मग हे स्वघोषित सैनिक आपल्या साहेबांच्या विरुद्ध ज्यांनी वावगे उद्गार काढले असतात त्यांना मारहाण करतात, शिक्षा करतात.
हे लोक झुंडीने येऊन घरात घुसून मारहाण करायलाही कमी करत नाहीत. नको त्या ठिकाणी खळ खट्याक करण्यात हे “सैनिक” अगदी उत्साहाने पुढे असतात.
मनसैनिकांनी ह्या आधी सुद्धा हे प्रकार केले आहेत. मागे औरंगाबाद मध्ये एका डॉक्टरला अशीच मारहाण मारहाण केली होती.
त्यानंतर एका २०-२५ वर्षाच्या तरुणाला सुद्धा सोशल मीडियावर राज ठाकरेंबद्दल कमेंट केल्यामुळे घरातून पकडून आणून माफी मागायला लावली आणि उठाबशा काढायला लावल्या होत्या.
आताही परत असाच प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आणि ते त्याला चांगलेच भोवले. घाटकोपर पूर्व विभागातील मनसे सैनिकांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत आपल्या गुंडगिरीचे पुन्हा एकदा प्रदर्शन केले आहे.
मनसैनिकांनी त्याला “कुत्र्या…” वगैरे शिव्या घातल्या, “त्याला घरातून बाहेर काढा” असे म्हणत त्याला घरातून बाहेर ओढून काढले आणि मारहाण करत त्या व्यक्तीला राज ठाकरेंची माफी मागायला लावली.
संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावली, मनसैनिकांची माफी मागायला लावली. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कान धरून उठाबशा काढायला लावला. तसेच ह्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील काढला.
त्या व्यक्तीने खालच्या दर्जाचे विधान करणे जितके चूक आहे तितकीच ह्या मनसैनिकांची चूक नाही का? भारतात भाषणस्वातंत्र्य केवळ पैसेवाल्यांना आणि सत्ताधारकांनाच आहे का?
एखाद्या सामान्य माणसाने जर नेत्याला उद्देशून आक्षेपार्ह विधान केले तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करणे इथपर्यंत समजू शकतो पण त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या व्यक्तीची अशी मानहानी करणे, घरात घुसून त्या व्यक्तीच्या घरच्यांपुढे धमकावणे, मारहाण करणे हे योग्य आहे का?
तुमच्या नेत्याचा विरोध करणे हा गुन्हा आहे का? ह्या सैनिकांना मारहाण करण्याचा आणि “शिक्षा” देण्याचा हक्क ह्यांना कोणी दिला?
हे केवळ एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून झुंडीने येऊन एखाद्याला घरात घुसून मारहाण करण्याचा आणि निर्लज्जासारखा त्या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायरल करण्याचा हक्क ह्यांना कुणी दिला?
ह्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा घटनेत जास्त हक्क दिले आहेत का? केवळ आपल्या नेत्याच्या सत्तेच्या पुण्याईवर किंवा पोलिसांशी ओळख असते म्हणून हे लोक विरोध केला म्हणून वाटेल त्याला पकडून मारतात ह्याला काय अर्थ आहे?
ह्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की भाषणस्वातंत्र्याचा हक्क जसा तुम्हाला आहे, तुमच्या साहेबांना आहे तसाच तो सामान्य माणसालाही आहे आणि सामान्य माणूस त्याला एखाद्या नेत्याची एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणाने सांगूच शकतो. मतदार आहेत म्हणून तुम्ही आहात. मतदाराने पाठ फिरवली तर तुमचे आणि तुमच्या साहेबांचे भविष्य धोक्यात येणार.
सामान्य मतदारासाठी तुम्ही आहात. तुमच्यासाठी मतदार नाहियेत. आणि तुमचे जर काही चुकत असेल तर त्याला विरोध करण्याचा सामान्य माणसाला संपूर्ण हक्क आहे आणि तरीही त्याने जर खालच्या पातळीवर जाऊन काही विधान केले तर तुम्ही पोलीस कारवाई करा, त्याची पोलिसात तक्रार करा.
त्याला घरात घुसून मारणे, घरातून बाहेर आणून सर्वांसमक्ष उठाबशा काढायला लावणे, तुमच्या नेत्याची जाहीर माफी मागायला लावणे ह्या सगळ्याचा हक्क तुम्हाला घटनेने दिला नाही.
तुम्ही असे वागून कायद्याचे उल्लंघन करीत आहात आणि तुमच्या ताकदीचा गैरवापर करीत आहात हे लक्षात असू द्या!
तुम्हाला कुणी हक्क दिला दंडेलगिरी करण्याचा? खळखट्याक करत गुंडगिरी करण्याचा? असे वागून तुम्ही तुमच्याच पक्षाचे आणि नेत्याचे नाव मातीमोल करीत आहात.
सामान्य व्यक्तीच्या हातात फार काही नसते, सिस्टीम तुमच्या हातात असते हे दाखवून देऊन तुम्ही तुमच्या सत्तेचा आणि ताकदीचा गैरवापर करीत आहात. तुम्ही तावातावाने झुंडीत जाऊन त्या व्यक्तीला फरफटत आणता, तुमचा तो आवेश पाहून कुणाचीही मध्ये पडण्याची हिम्मत होत नाही कारण लहान मूल सुद्धा सांगेल की तुम्ही कायदा हातात घेऊन काहीही करू शकता.
मग त्या चुकलेल्या किंवा न चुकलेल्या असहाय्य व्यक्तीची मदत करायला भीतीमुळे कुणीच पुढे येत नाही. अश्या असहाय्य व्यक्तीला अशी वागणूक देणे हे आपल्या संस्कारांत बसत नाही.
विरोध करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आपल्या विरोधकाला सुद्धा सन्मानाने वागवण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वागताना भान ठेवले पाहिजे.
सामान्य माणसाशी तुम्ही जसे वागाल त्याचे चांगले वाईट फळ तुम्हाला लवकरच मिळेल. तुमच्या वागण्यामुळे तुमच्या साहेबांच्या मतांवर परिणाम होऊ नये इतका तरी विचार करा आणि कृपा करून कायद्याने वागा आणि कायद्याचे बोला!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.