Site icon InMarathi

भारतीय सेनेने केवळ ४० दिवसात बांधलेला पूल – या अचाट मोहिमेविषयी…

Leh Ladhak inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतीय सैन्याचे पराक्रम आपल्याला माहित आहेतच आणि आपल्या सैन्यात कसल्या प्रकारची शिस्त आहे हे सुद्धा आपण सगळेच खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे! आणि यात नौदल, वायुदल आणि आर्मी या तिघांचा मोलाचा सहभाग आहे!

भारतीय सैन्य दलाने आजवर अनेकदा अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. युद्धाच्या काळात असो अथवा शांततेचा काळ भारतीय सैन्य सदैव दक्ष राहिले असून शत्रू सैन्याची सक्षमपणे मुकाबला करत आहे. मात्र त्यांची कामगिरी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

भारतीय सैन्य काय फक्त सुरक्षेची किंवा शत्रूला मारण्याची काम करत नाही तर त्यांची रेजिमेंट जिथे असते तिकडचे स्थानिक प्रश्न, समस्या सोडवण्यात किंवा त्यावर चांगला तोडगा देण्यात सैन्यातले एक्स्पर्ट लोक हिरीरीने भाग घेतात!

रणभूमीवर लढत असताना स्थानिक प्रश्न देखील सोडवण्याचे कसब त्यांनी प्राप्त केले आहे.

त्याचे दाखले देखील वेळोवेळी जनसामान्यांपर्यंत येतच असतात. अशीच सैन्यदलाला साजेशी कामगिरी फायर अँड फ्यूरी या रेजिमेंटने बजावली आहे.

Youtube

यावेळेस भारतीय सैन्य आणि स्थानिकांच्या मदतीने एक पूल उभा राहिला आहे. अवघ्या ४० दिवसात भारतीय सैन्याचे फायर अँड फ्यूरी रेजिमेंटच्या अभियंत्यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

सिंधू नदीवर २६० फूट लांब “केबल सस्पेन्शन पूल” तयार करण्यात आला. हा लोखंडी पूल आहे.

.latestly.com/india/news

जम्मू-काश्मीरमधील लेह हा भाग तसा नेहमी चर्चेत राहणारा आहे.  मात्र याठिकाणी अनेक गावे दुर्गम ठिकाणी असून तिथे पोहोचणे सहज शक्य नसते.

आणि लेह लडाख भाग हा पर्यटकांसाठी सध्या आकर्षणाचे ठिकाण बनला आहे, कित्येक लोक इथे बाईक राइड्स देखील करायला येतात आणि त्यामुळेच तिथे रोजगार उप्लब्ध होतात आणि लोकांचा विकास होतो!

अशा वेळेस पायाभूत सुविधांची जाणवणारी उणीव लोकांच्या प्रगतीला मारक ठरत असते. यापैकीच समस्या असणाऱ्या चोगलमसर, स्टोक आणि चुछोत ही गावे मुख्य भागाशी जोडली न गेल्याने तेथील स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

त्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी बराच मोठा वळसा घालून जावे लागत असे. त्यामुळे अकारण होणारी पायपीट आणि बाजारपेठेच्या मुख्य गावापासून असलेले तुटलेपण यामुळे तेथील जनता त्रस्त होती.

हे पाहून स्थानिक प्रशासनाने भारतीय सैन्याला याठिकाणी वाहणाऱ्या सिंधू नदीवर पूल बांधण्याचा आग्रह केला होता.

या उपक्रमाला सैन्याने देखील सकारात्मक प्रतिसाद देत पूल बांधण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४० दिवसात हा पूल बांधून तयार झाला आहे.

 

swarajyamag.com

इतक्या कमी दिवसांत “सस्पेन्शन ब्रिज” निर्मिती करणे हा एक विक्रमच आहे. फायर अँड फ्यूरी या रेजिमेंटचे “साहस आणि योग्यता” हे बोधवाक्य या विक्रमी वेळेत पूर्ण केलेल्या कामामुळे किती समर्पक आहे हे लक्षात येते.

अजून एक महत्वाची बाब म्हणजे या पुलाचे उद्घाटन चोगलमसर या गावातील रहिवासी ८९ वर्षीय निवृत्त सैनिक असलेले नायक फुंचोक आंगदस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी झालेल्या छोटेखानी  उद्घाटन समारंभासाठी १९४७ पासून कारगिल युद्धापर्यंत लढलेल्या माजी सैनिकांना आमंत्रण देण्यात आले होते.

याप्रसंगी फायर अँड फ्यूरी टीमचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी, लेहच्या उपायुक्त अवनी लावासा तसेच भारतीय सैन्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल  युद्धाला आता वीस वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधत  या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.

newindianexpress.com

सिंधू नदीवर बनवण्यात आलेला हा पूल म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे. या पुलाला ”मैत्री ब्रिज” असे नाव देण्यात आले आहे.

१ एप्रिल रोजी या पुलाचे उद्घाटन झाले असून सर्वसामान्य जनतेसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनातील त्रास कमी झाला आहे. सामान्य लोकांनी यावेळी भारतीय सैन्याचे विशेष आभार मानत  समाधान व्यक्त केले आहे.

लेह – लडाख या भागात अनेक विकास कामे सध्या सुरू आहेत. प्रशासकीय विभाग सुरू करण्यापासून ते हिमाचल प्रदेश पासून कारगिल मार्गे लेह-लडाख पर्यंत जाणारा “ऑल वेदर रोड” ची निर्मिती आणि झोजिला बोगदा याची बांधणी देखील सुरू आहे.

हा आशियातील सर्वात मोठा बोगदा असेल. ही सर्व विकास कामे तेथील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त ठरतील.

IBTimes india

एकंदरीत भारतीय सैन्य विविध आघाड्यांवर किती सक्षम आहे याची प्रचिती या उदाहरणातून दिसून येते.  हा मैत्री पूल त्याचेच द्योतक आहे. संघर्षाची परिस्थिती असेल अथवा एखादे रचनात्मक काम भारतीय सैन्याने आपली भूमिका शिताफीने निभावलेली दिसून येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version