“विष्ठा खा नाहीतर आईबरोबर संग कर!”: वीटभट्टी कामगाराला मालकाची अमानवीय वागणूक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
कलियुगाचा महिमा म्हणत आपण आपल्या आजूबाजूच्या अनेक बारीकसारीक वाईट घटनांकडे दुर्लक्ष करीत असतो. जसा जसा माणूस आधुनिक होत चालला आहे तशी तशी त्याच्यातली माणुसकी संपत चालली आहे की काय असा संशय हल्ली येतो. तंत्रज्ञानाने जग जवळ तर आले पण माणूस मात्र एकमेकांपासून दुरावला.
आपण कुणाला आपल्याकडे मदतनीस म्हणून कामाला ठेवले तर ती व्यक्ती आपले काम करते व आपण त्या कामाचा मोबदला त्या व्यक्तीला देतो इतका साधा सोपा हा व्यवहार असायला हवा.
त्यात त्या व्यक्तीने आपल्या मदतनिसाशी माणुसकीने वागणे अपेक्षित असते. पण आपल्याकडे पैश्याचा आणि सत्तेचा माज आलेले हे “मालक” आपल्या मदतनिसांना तुच्छ लेखून जणू ते आपले गुलामच आहेत आणि आपण त्यांना पैसे देऊन त्यांच्यावर उपकारच करत आहोत, आपण त्यांना विकतच घेतले आहे असा माज करत त्या गरीब गरजू कामगारांवर अन्याय करतात.
मालक आणि नोकरातील नाते जर चांगले असेल, मालक जर आपल्या सर्व मदतनीसांची काळजी एखाद्या पालकाप्रमाणे घेत असेल तर सर्व मदतनीस सुद्धा मालकाला आपल्या देवाप्रमाणे मानून त्याचीही तितकीच काळजी करतात.
पण मदोन्मत्त झालेले हे मालक मात्र इतरांना गुलाम मानून त्यांच्यावर अन्याय करतात. अशीच घटना पुण्यात घडलेली आहे.
विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यात काही दिवसांपूर्वी एक अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आपण पैसे देऊन काम करवून घेतो म्हणजे आपण कामगारांना विकतच घेतले आहे असा माज असलेल्या एका वीटभट्टी मालकाने त्याच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगारावर अमानवीय अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे.
“आईशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर विष्ठा खा” असे दोन पर्याय ह्या मालकाने त्या गरीब बिचाऱ्या तरुण कामगाराला दिले.
आणि आपल्या संस्कृतीत आईला देवाचे स्थान देणाऱ्या आणि हेच संस्कार असलेल्या ह्या तरुणाने “आईबरोबर असे काही करण्यापेक्षा मी विष्ठा खाईन” असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून त्या भावनाशून्य मालकाने ह्या गरीब बिचाऱ्या तरुणाला खरंच जबरदस्तीने विष्ठा खाऊ घातली.
हा लांच्छनास्पद प्रकार करणाऱ्या त्या मालकाला अडवण्याची हिम्मत कुठल्याही कामगाराने दाखवली नाही. कदाचित आपण अडवले आणि आपल्याबरोबर सुद्धा असाच अन्याय झाला तर. .ह्या भीतीने ते सगळे गप्प बसले असावेत.
सुनील अनिल पवळे (२२) असे ह्या पीडित तरुणाचे नाव आहे.
तो व त्याचे आईवडील संदीप पवार (४२) ह्या जांभे गावात राहणाऱ्या वीटभट्टीमालकाकडे कामाला आहेत. पवार व त्याच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. पवळे कुटुंब हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा ह्या गावातील आहेत.
ते गेली अनेक वर्षे कामानिमित्त पुण्यात वास्तव्याला आहेत. गेली दोन वर्षे ते पवारकडे काम करीत आहेत. आणि कामाच्या ठिकाणीच लहानसे घर बांधून तिथे ते राहत आहेत.
ही घटना १३ मार्च, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. कामातून थोड्यावेळासाठी विश्रांती घेत पवळे कुटुंबीय सुनील, त्याची आई सविता व वडील अनिल पवळे आणि सुनीलचे आजी आजोबा हे सगळे त्यांच्या घरात दुपारचे जेवण घेत असताना तिथे पवार आला आणि त्याने अनिल पवळे ह्यांना शिवीगाळ करत काम करण्यासाठी येण्यास सांगितले.
तेव्हा सुनीलने मध्ये पडत “आम्ही येतो, पप्पा जेवण झाले की लगेच येतील” असे म्हणत मालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला असता पवारने त्यालाही शिवीगाळ व मारहाण केली.
अतिशय अर्वाच्य शिव्या देत संपूर्ण कुटुंबालाच त्याने शिवीगाळ केली. ह्यामुळे सुनिलनेही त्याच्या शिवीगाळीला उत्तर दिले.
ह्यावर चिडून पवारने सुनीलला कामाच्या ठिकाणी नेले. मारहाण देखील केली. ह्यापूर्वीही त्याने कामगारांना अनेकदा अशी अन्यायपूर्ण वागणूक दिली आहे पण ह्यावेळी मात्र त्याने नीचपणाचा कळस गाठत स्वतःच्या बायकोला घमेल्यात मानवी विष्ठा आणण्यास बजावले.
तिने त्याचे न ऐकल्यास तिला शेतीच्या अवजाराने मारण्याचीही धमकी त्याने स्वतःच्या बायकोला दिली. त्यामुळे घाबरून तिने पवारच्या आज्ञेचे पालन करत एका घमेल्यात मानवी विष्ठा आणून सुनीलपुढे ठेवली.
“आईशी शारीरिक संबंध ठेव,नाहीतर हे खा” अशी धमकी त्याने सुनीलला दिली. त्याने नंतर परत सुनीलला मारहाण केली. पण घाबरलेल्या सुनीलने दुसरा घाणेरडा प्रकार न करता विष्ठा खाईन असे सांगितले असता, स्वतःच्याच हाताने खा असे त्याच्या मालकाने सांगितले.
आणि सुनीलला जबरदस्तीने ती घाण खावी लागली. हा सर्व प्रकार घडताना इतर कामगार सुद्धा घाबरून जाऊन नुसते बघत होते पण कुणीही ह्या कुटुंबाच्या मदतीला आले नाही.
ह्या घटनेनंतर सुनीलची मानसिक अवस्था बिकट झाली. त्याला प्रचंड धास्ती वाटू लागली म्हणून तो वाकड येथे त्याच्या मावशीकडे आला. ह्या प्रकारची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून पवारने ह्या कुटुंबाला कुठेही जाऊ दिले नाही.
मालकाने सुनीलच्या वडिलांना अनिल पवळे ह्यांना दोन दिवस राबवून घेतले व फक्त पन्नास रुपये त्यांच्या हातावर टेकवले.
त्याच पैश्यांनी प्रवास करून सविता पवळे ह्या सुद्धा वाकडला आपल्या बहिणीकडे आल्या व नंतर त्यांचे नातेवाईक जाऊन अनिल पवळे ह्यांना सुद्धा आपल्याकडे घेऊन आले.
त्यानंतर त्यांनी न्याय मागण्यासाठी हिंजेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली पण तिथेही त्यांना सुरुवातीला दाद देण्यात आली नाही. पोलिसांनी सुरुवातीला एनसी दाखल करून घेतली.
पण नंतर ह्या घटनेची माहिती मिळतात हेल्प ऑफ पीपल ह्या संघटनेचे स्वप्नील जाधव ह्यांनी त्वरित हालचाल करत ह्या कुटुंबाला मदत केली आणि नंतर पोलिसांनी संदीप पवारच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेतली व त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली.
पवारने सुरुवातीला हे सर्व आरोप धुडकावून लावले आणि नंतर पवळे कुटुंबाला पैसे देऊन हे प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न केल्याचे सविता पवळे ह्यांनी सांगितले.
पवारने ह्या आधी सुद्धा कामगारांशी गैरवर्तन केले असल्याचे पवळे ह्यांनी सांगितले. तसेच तो पैसे सुद्धा वेळेवर देत नाही व टाळाटाळ करतो असेही ते म्हणाले.
पवळे कुटुंबाने पवारकडून काही कर्ज घेतले होते ते त्यांनी अर्धेअधिक फेडले असून देखील त्याने अशी अमानवी वागणूक दिल्याचे अनिल पवळे ह्यांनी सांगितले.
पवळे कुटुंबाला पवारचे पैसे नकोत, त्यांना फक्त न्याय हवा आहे. त्यांच्या मुलावर जो प्रसंग पवारमुळे ओढवला आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या संदीप पवारला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. पैसे आणि सत्ता आली म्हणजे आपण कुणालाही कसेही वागवू शकू, कायदा वाकवू शकू ह्या भ्रमात राहणाऱ्या ह्या मदोन्मत्त लोकांना चांगली कडक शिक्षा मिळणे आवश्यक आहे तरच भविष्यात असे काही वागण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.