भारताने केलेल्या म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईकची “ही” पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
बालाकोट येथे झालेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर भारताने आपण दहशतवादाविरुद्ध खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले. यानंतर “सर्जिकल स्ट्राईक” ची खूप चर्चा झाली.
त्यातच ९ मार्च रोजी कर्नाटक मधील मंगळुरु येथे झालेल्या एका सभेत राजनाथ सिंह यांनी,
“तीन सर्जिकल स्ट्राइक झाले असून त्यापैकी दोन आपल्या सर्वांना माहीत आहे पण अजून झालेल्या एका सर्जिकल स्ट्राइक ची माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही”,
असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अनेक अंदाज व्यक्त करण्यात आले. ही तिसरी लक्ष्यभेदी कारवाई भारत-म्यानमार सीमेवर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्यानमारच्या सेनेसोबत ही एक संयुक्त कारवाई होती. तेव्हा सर्जिकल स्ट्राइक ३.० काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच होती.
या कारवाईसंदर्भात विशेष गुप्तता राखण्यात आली. मात्र आता या कारवाईतील काही घडामोडी समोर आल्या आहेत.
शत्रू कोण?
भारत – म्यानमार सीमेवर काही फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. ईशान्य भारतात अनेक मोठी विकासकामे सुरु असून त्यांना “लक्ष्य” करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती.
तेव्हा एका बाजूला पाक पुरस्कृत दहशतवादयांसोबत लढाई सुरु असतांना दुसऱ्या बाजूला या दहशतवाद्यांचा देखील बंदोबस्त केला गेला.
विशेष म्हणजे ही कारवाई १७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान चालली. थोडक्यात ही मोहीम १४ दिवस चालली. यांत पहिल्या टप्प्यात मणिपूर मधील दहशतवादी शिबिरांवर हल्ला केला गेला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्यानमार सीमेपलीकडे देखील कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे सीमेपलीकडे थोड्या अंतरावर नव्हे तर सीमेपासून बरीच आत ही कारवाई करण्यात आली. ही एक धाडसी मोहीम होती.
एकीकडे सर्व जगाचे पश्चिम सीमेवर लक्ष केंद्रित असतांना भारतीय सैन्य दलाने पूर्व सीमेवर ही कारवाई पार पाडली.
म्यानमार मध्ये असणारा तथाकथित अराकान आर्मी हा एक दहशतवादी गट असून त्यांना या कारवाईत लक्ष्य केले गेले, हा एक कट्टर दहशतवादी गट असून म्यानमार मधील काचिन प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. २००९ पासून हा गट सक्रिय आहे.
भारतीय आणि म्यानमार सैन्याने एक संयुक्त मोहीम याविरोधात सुरू केली. पहिल्या टप्प्यात मिझोरामच्या सीमेवर नवीन बांधलेल्या शिबिरांना लक्ष्य केले. तर दुसऱ्या टप्प्यात घातक नागा गट, एनएससीएन (के) लक्ष्य केले.
अरुणाचल प्रदेशच्या दिशेने १००० कि.मी. अंतरावर उत्तरेस असणारी त्यांची शिबिरे या कारवाई दरम्यान नष्ट झाली.
भारताला असलेला धोका
भारताचा ईशान्य भारताशी जोडणारा कालादान प्रकल्प हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प जो कोलकाता येथील हल्दिया बंदर आणि म्यानमार येथील सीट्वे बंदर यांना जोडणारा आहे.
या प्रकल्पामुळे कोलकाता ते मिझोरमपर्यंत सुमारे एक हजार किलोमीटर अंतर कमी होऊन चार दिवस प्रवास कमी होईल. ईशान्य भारताशी दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पातील मोठा भाग हा म्यानमार मध्ये आहे.
दहशतवादी गट असलेल्या अराकान आर्मीकडून या प्रकल्पाला धोका होता. त्यांचा या प्रकल्पाला विरोध होता.
शिवाय दुसरे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे हे दहशतवादी गट भारतातील मणिपूर येथे आपला कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यास प्रयत्नशील होते.
मणिपूर राज्यातील लवांगताला या जिल्ह्यात किमान ३००० जणांचा तळ निर्माण करण्याची त्यांची योजना होती.
चीनची फूस
यासंदर्भात अशीही माहिती मिळते की, या गटाला चीनची फूस आहे. गेल्या दोन वर्षांत चीनच्या जवळ म्यानमारच्या काचिन राज्यात अराकान आर्मीला प्रशिक्षण देणारी काचिन इंडिपेंडेंस आर्मी (केआयए) सुमारे ३००० जणांचे एक केडर तयार करत होती.
अराकान आर्मीचे मुख्यालय लाईझा येथे असून हे ठिकाण चीनच्या सीमावर्ती काचिन राज्यात आहे. जो भारत-चीन-म्यानमार या त्रिकोणावर वसलेला आहे.
या अराकान आर्मीची सुरुवात चीनच्या सीमेवर असलेल्या काचिन राज्यात झाली आणि गंमत म्हणजे हे अराकान प्रदेशात नाही. अराकान म्यानमारच्या राखाइन या प्रांतात येते. हे प्रामुख्याने म्यानमारमध्ये सक्रिय बौद्ध विद्रोही गट आहे.
उल्लेखनीय हे आहे की, चीन सीट्वे बंदराजवळच क्यौकिपू या बंदरावर विकास प्रकल्प चालवित आहे. अशावेळेस हा धोका दुर्लक्ष करता येण्यासारखा नव्हता.
अराकान आर्मी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस (आयईडी) चांगल्या प्रकारे हाताळण्यात प्रशिक्षित आहे आणि त्यामुळेच कालादान प्रकल्प आणि तेथील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही भारत आणि म्यानमारसाठी गंभीर चिंता होती.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे कालादान प्रकल्पामुळे ईशान्य भारताशी संपर्क वाढणार आहे.
“सिलिगुडी कॉरिडॉर” ला हा पर्यायी मार्ग निर्माण होत असल्याने चीनला यापासून असुरक्षित वाटत आहे. तेव्हा या प्रकल्पात खोडा घालण्यात त्यांना रस होता. तेव्हा चीनकडे बोट दाखवणे स्वाभाविक ठरते.
या मोहिमेसाठी तैनात करण्यात आलेली भारतीय सेना, आसाम रायफल्स आणि इतर इन्फंट्री युनिट्सचे विशेष दल समाविष्ट होते. दहशतवादी काही बंडखोर गट आणि त्यांच्या शिबिराचे अचूकपणे आकलन करण्यासाठी या मोहिमेदरम्यान हेलीकॉप्टर, ड्रोन आणि इतर पूरक साधने वापरली गेली.
ही मोहीम भारत आणि म्यानमार सैन्याने दोन महिन्यांपूर्वी संयुक्त कारवाईची योजना आखली होती, असे सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात मिझोराम येथील दहशतवादी तळ नष्ट केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्यानमार मधील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्या ठिकाणां वर म्यानमार सैन्याने कब्जा केला आहे. येथे कमीतकमी बारा शिबिरे नष्ट केली गेली आहेत.
या संयुक्त मोहिमेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे फोल ठरले आहेत. शिवाय या कारवाईचे अजून एक महत्व म्हणजे दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वीच त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या यशाला महत्व आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.