आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी साखर म्हंटल की जिभेवर गोडवा येतो. आपल्या दिवसाची सुरुवात होते ती साखरेने. आपले सणवारही साखरेशिवाय अपूर्णच. म्हणतात ना, साखरेचे खाणार त्याला देव देणार…
परंतु हल्ली ह्या वाक्यात जरा बदल करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
म्हणजे, “साखरेचे खाणार त्याला देव नेणार. चकित झालात ? अहो खरंच आहे हे.
आजकाल निरोगी माणसं अभावानेच आढळतात. आजार ही एक नकोशी असणारी तरी आयुष्यात कायम सोबत करणारी गोष्ट, आणि अशात हा आजार संपूर्णपणे बरा न होता आजन्म सोबत करणार असेल तर..?
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जगण्यावर मर्यादा येतात. सतत काळजी घ्यावी लागते, पथ्यपाणी करायला लागतं. अशावेळी वैद्यकशास्त्र आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका बजावतं. अशाच प्रकारचा एक आजार म्हणजे डायबेटीस ज्याला आपण मराठीत मधुमेह म्हणतो.
बोलीभाषेत साखरेचा रोग म्हणून प्रसिध्द आहे. ह्याचा अर्थ साखर खाल्ल्याने हा आजार होतो का ? नाही, साखर पचवण्यासाठी जे द्रव्य शरीरात असावं लागतं ते पुरेशा प्रमाणात बनत नसेल तर हा आजार होतो.
तुमच्या शरीरात जर एक आवश्यक घटक तयार होत नसेल तर हीच साखर तुमची वाट लावू शकते. जगभरात मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरलेला आहे.
असंख्य लोक ह्या आजाराने ग्रसित आहेत. उपलब्ध उपचारांवर आपले आयुष्य जगत आहेत. अशावेळी आधुनिक वैद्यकशास्त्राने त्यांचे आयुष्य सुकर केले आहे कसे ते बघूया.
तर मधुमेह ह्या आजारात साधारण दोन प्रकार असतात टाईप 1 आणि टाईप 2.
ह्यातल्या पहिल्या प्रकारच्या आजारात महत्वाची भूमिका असते इन्सुलीनची तर दुसऱ्या प्रकारात गोळ्यांचा वापर केला जातो परंतु गोळ्यांचा विशेष उपयोग होत नसेल तर मात्र, इन्सुलिन हाच एकमात्र उपाय असतो.
म्हणजे मधुमेहींसाठी इन्सुलिन संजीवनी सारखे काम करते. आता हे इन्सुलिन नेमके आहे तरी काय आणि ह्याचा शोध कसा लागला ह्याबद्दल जरा सविस्तर जणून घेऊया.
इन्सुलिनच्या शोधाचा हा इतिहास मोठा रंजक आहे.
इंसुलिनच्या ह्या शोधासाठी नोबेल पारितोषिकही देण्यात आले आहे पण त्याच सोबत ह्यावरून मोठा विवादही झाला होता कारण ह्यात एक नव्हे अनेक संशोधकांचे योगदान होते.
इन्सुलिनचा शोध लावताना अनेक वैज्ञानिकांनी त्यात आपले संपूर्ण आयुष्य लावले. मधुमेह हा आजार फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहे.
अनेक ठिकाणे ह्या आजाराचा उल्लेख आढळून आला आहे, सर्वप्रथम एका ग्रीक संशोधक सेल्सस ह्याने ह्या आजाराचा शोध लावला तेव्हा त्याने ह्या आजारात प्रचंड प्रमाणात लघवी लागते आणि झपाट्याने वजन कमी होते असे दोन ढोबळ निष्कर्ष काढले होते.
नंतर मेम्फाईटस ह्या संशोधकाने त्याला डायबेटीस हा शब्द वापरला. त्यावेळी हा आजार किडनीच्या बिघाडामुळे होतो असं मानल्या जात होतं. शरीरातले सगळे द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर पडणे असा ह्या शब्दाचा एकूण अर्थ.
परंतु आपल्याकडे चरक आणि सुश्रुत ह्या वैद्यांनी ह्या आजाराचे निरीक्षण केल्यावर त्यांना एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ह्या आजाराने त्रस्त असलेल्या पेशंट्स च्या लघवीच्या थेम्बांभोवती मुंग्या गोळा होत, त्यावरून ह्या लघवीत साखरेचे प्रमाण असावे असा निष्कर्ष काढला गेला.
त्यानंतर चीनचे संशोधक चान्ग चोंग किंग ह्यांनी त्यावर शोध केला पुढे एविसेना नावाच्या अरेबियन डॉक्टरने ह्या आजाराची संपूर्ण माहिती एकत्र केली.
अशाप्रकारे इजिप्त, पर्शिया, चीन, भारत,ग्रीस, जपान आणि कोरिआ येथील अनेक संशोधक शर्थीने मधुमेहाची कारणमीमांसा करीत होते. पण, त्याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नव्हते.
अखेर १६८२ मध्ये इंग्लंडमधील जॉन बृनार यांनी एका कुत्र्यावर काही प्रयोग केले. त्यांनी असा अंदाज केला की हा आजार स्वादुपिंडाशी संबंधित असावा. त्यांनी त्या कुत्र्याच्या शरीरातील स्वादुपिंड काढून टाकले आणि त्याचे निरिक्षण केले.
आता त्या कुत्र्याला भरपूर लघवी होऊ लागली व तो सतत तहानलेला असे. यातूनपुढे संशोधनासाठी दिशा मिळाली.
भरपूर लाघवी होणार्या रुग्णाची नियमित तपासणी होऊ लागली, शिवाय त्यांची लाघवी गोडच आहे का ह्याकडेही लक्ष ठेवले जाऊ लागले.
त्या काळी तंत्रज्ञान इतके विकसित झाले नव्हते त्यामुळे लघवीच्या चाचणीसाठी प्रत्यक्ष चव घ्यावी लागतं असे, त्यामुळे दवाखान्यात अशी मनसे नेमण्यात आली होती.
वाचून याक्क वाटल तरी हे खरं आहे. मात्र १९व्या शतकाच्या शेवटी तंत्रज्ञान विकसित झाले. चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आणि नंतर लघवीतला हा घटक म्हणजे “ग्लुकोज” हा शोध लागला.
मधल्या काळात जर्मनीतील एक संशोधकपॉल लान्गर हान्स स्वादुपिंडाचा अभ्यासकरत होते. त्यात त्यांना एक पेशींचा पुंजका आढळला.
तो कशाचा बनलेला होता त्यात कसले द्रव्य होते ह्याची त्यांना काहीही कल्पना नव्हती परंतु हे फार महत्वाचे आपल्या हाती लागले आहे अशी त्यांची एकूण भावना झाली होती. पुढे अनेक संशोधकांनी १९१० ते १९२० च्या दरम्यान त्या पुंजाक्यातील द्रव्याच्या चाचण्या केल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने बुखारेस्टचे पोलेस्क्यू ह्यांनी एक अभिनव प्रयोग केला. त्यांनी प्राण्यांचे स्वादुपिंड काढून द्रव्य बनवले आणि ते द्रव्य जिवंत प्राण्यामध्ये इंजेक्शन द्वारे टोचले. त्याचा परिणाम लगेच दिसून आला.
प्राण्यांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झालेझाले होते. असे अनेक प्रयोग केल्यानंतर संशोधकांच्या लक्षात आले की हे द्रव्य हा एकमेव उपचार आहे ज्यामुळे मधुमेहात आराम पडू शकतो.
परंतु हे द्रव्य कच्च्या स्वरुपात असल्याने त्याचे इतर दुष्परिणाम रुग्णावर होत असत त्यामुळे त्या द्रव्यातील मधुमेहावर परिणाम करणारे मुख्य घटक वेगळे काढणे अत्यंत आवश्यक झाले होते.
ह्यातून मार्ग काढला फ्रेडरिक बंटींग ह्यांनी, ते हात धुवून ह्या शोधकार्याच्या मागे लागले. त्यात त्यांना प्राध्यापक जे जे आरमेक्लेओड ह्यांची मोलाची मदत झाली.
त्यांनी आपला सहायक चार्ल्स बेस्ट ह्यालाही बंटींग ह्यांच्या मदतीसाठी नेमले. त्यांनी कुत्र्यांवर असंख्य प्रयोग केले. त्यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडापासून अर्क बनवला आणि त्याची चाचणीही कुत्र्यावरच घेतली.
शेवटी ते ह्या निष्कर्षाप्रत पोचले की त्या पुंजक्यांच्या अर्कातच एक औषधी द्रव्य आहे जे मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
त्या द्रव्याला त्यांनी‘आयलेटीन’ असे नाव दिले. ते एक ‘हॉर्मोन असल्याचे सिद्ध झाले. हाच प्रयोग इतर प्राण्यांवरही करण्यात आला. आता दुष्परिणाम टाळण्यासाठी हा अर्क जास्ती जास्त कसा शुध्द होईल ह्यावर संशोधन चालू होते.
त्यासाठी जे. कॉलीप ह्या जीव रसायन शास्त्रज्ञाने असंख्य प्रयोग केले आणि सरते शेवटी हे द्रव्य शुध्द स्वरुपात तयार झाले. त्यालाच पुढे ‘इन्सुलिन’ म्हंटले जाऊ लागले.
–
- हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील!
- एकाच वेळी वेगवेगळी औषधं घेणं धोकादायक असू शकतं – वाचा…
–
आता समस्या अशी होती की आज ह्याचा प्रयोग केवळ प्राण्यांवरच करण्यात आला होता, माणसांवर ह्याची चाचणी अद्याप झालेली नव्हती.
लवकरच अशी एक संधी चालून आली. टोरंटो येथे १४ वर्षांचा एक मुलगा मधुमेहाच्या आजाराने मरणासन्न अवस्थेत होता. त्याच्यावर या द्रव्याचा प्रयोग करण्यात आला आणि काय आश्चर्य, त्याच्या तब्बेतीत त्वरित सुधारणा दिसून आली.
ताबडतोब इतर मधुमेही रुग्णांवर हा प्रयोग रण्यात आला आणि त्यांच्यातही लक्षणीय सुधारणा दिसून आली आताइन्सुलिनच्या परिणामावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
तर असा लागला ह्या जीवनरक्षक “इन्सुलिनचा” शोध. त्यामागे असंख्य संशोधकांची अविरत मेहनत आहे त्यामुळे हा पुरस्कार नक्की किती जणांना ते द्यायचे यावर खूप वाद झाला.
स्वादुपिंडातील पुंजका शोधण्यापासून ते इन्सुलिन शुद्ध स्वरूपात मिळवण्यापर्यंत संशोधनाची प्रत्येक पायरी महत्वाची होती. त्यामुळे हे‘नोबेल’ कोणाला द्यायचे हा एक मोठा प्रश्न होता
अखेर बऱ्याच वाद्विवादानंतर हे पारितोषिक फ्रेडरिक बंटींग आणि जे जे आर मेक्लेओड यांना विभागून जाहीर झाले. त्यामध्ये Best चा समावेश न झाल्याने बंटींग खूप नाराज झाले. पण त्यांनी आपल्या वाट्याच्या बक्षिसाची निम्मी रकम बेस्टला दिली.
तसेच मेक्लेओडनी सुद्धा आपली निम्मी रकम कोलीप ह्यांना दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. फ्रेडरिक बंटींग आणि जे जे आर मेक्लेओड ह्या नोबेलमुळे अजरामर झाले.
आज संपूर्ण जगभरात असंख्य मधुमेही इन्सुलिन चा लाभ घेत आहेत. इन्सुलिन घेणे म्हणे काय तर ते इंजेक्शन द्वारे शरीरात टोचून घेणे. त्रासदायक वाटत असले तरी हे मधुमेहासाठी वरदान आहे.
अजून ह्यावर शोध सुरु आहेत. हे इन्सुलिन पचनसंस्थेत शोषले जाणे आवश्यक असते आणि हे केवळ इंजेक्शन द्वारेच होऊ शकते.
सध्या इन्सुलिन गोळीच्या स्वरुपात कसे आणता येईल ह्यावर संशोधन सुरु आहे. जर ह्यात यश आले तर मधुमेहींचा रोज रोज इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.