' अतिरेक्यांना प्रत्यक्ष चकमकीत भिडणाऱ्या या हुतात्मा सैनिकाची शौर्यकथा अंगावर काटा आणते – InMarathi

अतिरेक्यांना प्रत्यक्ष चकमकीत भिडणाऱ्या या हुतात्मा सैनिकाची शौर्यकथा अंगावर काटा आणते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश- ए- मोहम्मद आणि इतर दहशतवादी  संघटनांच्या अतिरेक्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांचा खात्मा करण्याचा विडा भारतीय लष्कराने उचलला आहे. पुलवामा येथील दुर्दैवी हल्ल्यानंतर आतापर्यंत त्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहे.

अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान देखील घालण्यात आले आहे. मात्र या कारवाईदरम्यान आपले जवान देखील हौतात्म्य पत्करत आहेत.

असाच एक शूरवीर पोलीस अधिकारी रविवार दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ च्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडला.

जम्मू काश्मीर पोलीस दलात उपाधीक्षक असणारे अमन ठाकूर यांना दहशतवाद्यांशी चकमक करतांना वीरमरण आले.

२४ फेब्रुवारी ची दहशतवाद विरोधी मोहीम

२४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे काही अतिरेकी कुलगाम परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स, जम्मु काश्मीर पोलिसांच विशेष दल अर्थात स्पेशल टास्क फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी एक संयुक्त मोहीम आखली आणि कारवाईला सुरुवात केली.

 

kulgam-inmarathi
ddnews.com

माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कुलगाम परिसरात नाकाबंदी करून घराची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा स्थानिक लोकांनी अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या या कारवाईला विरोध करत सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली.

अशा वेळेस आधी सूचना देऊन जमावाला तिथून हटण्याचे आवाहन सुरक्षा दल मार्फत करण्यात आले.

मात्र तरीही जमाव हटत नसल्याचे पाहून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. याच वेळी या परिसरातील एका घरात दहशतवादी लपले होते, तिथून त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.

दुपारी जवळजवळ तीन वाजेच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. चकमक सुरू असताना सैन्य अधिकारी मेजर सुशील  सिंह यांनी आगेकूच करत घराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना गोळी लागली.

शिवाय त्यांच्यासोबत असलेले बलदेव राम, जसवीर सिंह हे जवान आणि हवालदार सोमवीर हेसुद्धा जखमी झाले.

या परिस्थितीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर जोरदार गोळीबार करत जखमी झालेल्या जवानांना तिथून काढण्याचे अभियान सुरू केले. इतर जवानांना काढण्यात यश मिळाले मात्र मेजर सुशिल सिंह हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने त्यांना तेथून हलवणे जोखमीचे झाले.

तेव्हा स्पेशल टास्क फोर्सचे अधिकारी पोलीस उपाधीक्षक अमन ठाकूर यांनी निडरपणे पुढे जात आपल्या प्राणाची पर्वा न करता मेजर सुशिल सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान दहशतवाद्यांनी अमन ठाकूर यांच्या दिशेने गोळीबार केला.

 

kulgam-inmarathi
hindustantimes.com

त्यांनी अंगावर गोळ्या झेलल्या मात्र मेजर सुशिल सिंह यांना वाचवण्यात ते यशस्वी ठरले. इतकेच नव्हे तर दहशतवादी त्यांच्यावर गोळ्या चालवत असताना त्यांनीही तितकेच कणखरपणे प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला.

जखमी झालेले जवान, तसेच मेजर सुशिल सिंह आणि पोलीस उपाधीक्षक अमन ठाकूर यांना तत्काळ श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र अमन ठाकूर आणि सैन्य दलातील हवलदार सोमवीर यांना तोवर मृत्यूने गाठले होते. 

चकमकीच्या ठिकाणी यादरम्यान, सुरक्षा दलांनी सुरू केलेली कारवाई देखील संपत आली होती. इतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत सुरक्षा दलांनी आपले अभियान यशस्वीपणे समाप्त केले. यावेळी तिथे शस्त्रास्त्र आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आला.

हुतात्मा अमन ठाकूर

भारत मातेचे रक्षण करण्यासाठी  तिच्या पुत्रांनी आजवर मोठे शौर्य गाजवले आहे आणि अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदानही दिले आहे.

अशाच एका वीराने आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले आहे. अमन ठाकूर यांच्यासाठी पोलीसाची नोकरी ही केवळ एक नोकरी नव्हती तर एक कर्तव्य होते.

देशसेवा करण्याचे माध्यम होते. म्हणूनच की काय, प्रथम समाज कल्याण विभाग आणि नंतर शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना देखील त्यांनी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केला होता.

 

aman inmarathi
thequint.com

त्यात ते यशस्वी देखील झाले आणि जम्मू काश्मीर पोलिसात दाखल होत एक वेगळा मार्ग पत्करला. २०११ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत. दोन वर्षापूर्वी त्यांची काश्‍मीर खोऱ्यात नियुक्ती झाली. सेवेत असताना त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा या ठिकाणी उमटवला.

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी बनवलेले स्पेशल टास्क फोर्स या विशेष पथकात ते सामील होते. जेव्हा जेव्हा भारतीय लष्कर आणि पोलीस यांच्याद्वारे संयुक्त मोहिमा राबवल्या जात त्या प्रत्येक मोहिमेत ते सामील असत.

आजपर्यंत त्यांनी अनेक मोहिमात सक्रिय सहभाग घेत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पोलिस सेवेत असताना त्यांनी जे कर्तुत्व गाजवले होते त्यासाठी गेल्या महिन्यातच त्यांना पोलिस महासंचालकांकडून दिला जाणारा “कमेंडेशन मेडल आणि प्रमाणपत्र” मिळाले होते.

त्यांनी दाखवलेले शौर्य आणि दहशतवाद विरोधी अभियानात सातत्याने जे साहस दाखवले होते त्यासाठी त्यांना “शेर ए कशमिर” या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

जम्मू येथील डोडा या परिसरातील ते रहिवासी  आहेत. तीन भावंडांपैकी सर्वात लहान असलेले अमन आपल्या हरहुन्नरी आणि सर्वांशी मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे ते परिसरात लोकप्रिय होते.

त्यांचे एक भाऊ प्राध्यापक असून दुसरे भाऊ जम्मू-काश्मीर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल आहेत. ते देखील सध्या काश्मीर खोर्‍यात तैनात आहेत. गेल्या सात वर्षापासून ते रेशमगड येथे त्यांची पत्नी आणि सहा वर्षाचा मुलगा आर्यन यांच्यासोबत घर भाड्याने घेऊन राहत असत.

अमन ठाकूर यांनी आपला मुलगा आर्यन याला मार्च महिन्यात परीक्षा झाल्यानंतर कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे वचन दिले होते.  मात्र लवकरच त्यांना मृत्यूने गाठले.

जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी जम्मू काश्मीर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली, तेव्हा त्यांच्या सहकार्‍यांसाठी देखील तो एक धक्काच होता. तसेच त्यांच्या घरापर्यंत ही बातमी कशी  पोहोचवावी ही देखील त्यांना समजत नव्हते.

 

thakur -inmarath
dnaindia.com

अखेरीस सहाय्यक पोलीस अधीक्षक  शिमा नबी यांच्यावर ही अवघड जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरली आणि सर्वत्र शोकाचे वातावरण निर्माण झाले. समाज माध्यमांद्वारे  ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठी गर्दी त्यांच्या राहत्या घरासमोर येऊ लागली.

पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी देखील अमन ठाकूर यांच्या घराकडे धाव घेत त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आठवणीत अमोल ठाकूर म्हणजे सदैव उत्साहाने भरलेला, अनेकांना मदत करणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही जबाबदारी धाडसाने पार पाडणारा असा कार्यक्षम अधिकारी होता.

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नांगी ठेवण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे.  मात्र यादरम्यान आपलेही वीर जवान बलिदान देत असतात. त्यांनी गाजवलेला शौर्य, त्यांचे साहस यांना नमन करावे तेवढे थोडे आहे.

असेच एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अमन ठाकूर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले.

अमन ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे बलिदान देश नेहमीच लक्षात ठेवेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?