Site icon InMarathi

बेपत्ता महिलेचे गूढ उकलले ५५ वर्षांनी.. घराच्या मागच्या अंगणातच सापडले शरीराचे अवशेष!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अमेरिकेतील पेनसल्व्हेनियामधील पिट्सबर्ग शहरात ही घटना घडली आहे. १९६४ साली मेरी अर्क्युरी नावाची छत्तीस वर्षीय महिला एक दिवस अचानक बेपत्ता झाली. आणि इतक्या वर्षात तिचा काहीही मागमूस नव्हता. ५५ वर्षांनी अचानक तिच्या शरीराचे अवशेष तिच्याच घराच्या मागच्या अंगणात सापडले.

मेरी बेपत्ता झालीये ह्यामुळे मेरीचा नवरा अल्बर्ट खूप व्यथित झाला होता. निदान पोलिसांना तरी त्याने तसेच दर्शवले होते.

पोलिसांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला कारण मेरी निघून जाताना आपल्याबरोबर आपले कपडे आणि इतर सामान बरोबर घेऊन निघून गेली होती असे प्रथमदर्शनी दिसत होते.

मेरी आपल्या दोन लहान मुलांनाही तसेच ठेवून एकटीच निघून गेली होती.

 

 

पण सत्य काय आहे हे आता जवळजवळ अर्ध्या शतकाने बाहेर आले. तेव्हा असे पुढे आले की मेरी हे कधी बेपत्ता झालीच नव्हती. ती घरातून निघून गेलीच नव्हती.

कदाचित तिच्या नवऱ्यानेच तिचा खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी मेरीचा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागच्या अंगणात पुरला. त्यानंतर एकाच वर्षात एका अपघातात अल्बर्टचाही मृत्यू झाला.

मेरी बेपत्ता आणि अल्बर्टचा मृत्यू झालेला, अश्या वेळी त्यांच्या घराचा ताबा एका दुसऱ्या कुटुंबाकडे गेला.

मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ह्या घरात काही बांधकाम करणाऱ्या लोकांना मागच्या अंगणात खोदकाम करताना अचानक मानवी शरीराचे अवशेष सापडले. ते अवशेष मेरीचेच होते. पुरावे असे सांगतात की मेरीच्या बेपत्ता होण्यामागे अल्बर्टचाच हात आहे.

आणि त्या ठिकाणी मेरीच्या शरीराचे अवशेष सापडण्यासाठी सुद्धा अल्बर्टच जबाबदार आहे.

 

 

 

द पिट्सबर्ग पोस्ट गॅझेटच्या रिपोर्टनुसार मेरी बेपत्ता झाली तेव्हा पोलीस तक्रार केली गेली नव्हती. तसेच हरवण्याची तक्रार सुद्धा केली गेली नव्हती. परंतु असे असताना देखील ही केस इतक्या वर्षांनी सुटली त्यामागे रिटायर्ड असिस्टंट चीफ थेरेसी रोको ह्या आहेत. थेरेसी ह्या मिसिंग पर्सन्स युनिटच्या प्रमुख होत्या तसेच मेरीच्या शेजारी सुद्धा होत्या.

चार्ल्स एसबर्ना हे मेरी अर्क्युरीसचे नातू (त्यांच्या भाचीचे पुत्र)आहेत. ते म्हणाले की,

“अखेरीस ही केस सुटली हे चांगले झाले. आम्ही इतकी वर्षे मेरीचा काहीतरी ठावठिकाणा कळावा ह्याची वाटच बघत होतो.”

 

dignitymemorial.com

थेरेसी ह्या मेरीच्या शेजारी तसेच मिसिंग पर्सन्स युनिटच्या प्रमुख तर होत्याच, शिवाय त्या मेरीच्या मुलीच्या गॉडमदर देखील होत्या.

“त्यावेळी मी अगदी लहान होते. एकी दिवस मेरी आपल्या बाळासह आमच्या घरी आल्या. आणि त्यांनी ते लहान बाळ माझ्याकडे दिले व त्या म्हणाल्या की तू माझ्या मुलीची गॉडमदर व्हावे अशी माझी इच्छा आहे”, असे थेरेसी सांगतात.

थेरेसी शेजारीच राहत असल्याने तसेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या बोलण्यातून थेरेसी ह्यांना कळले होते की मेरी व अल्बर्टच्या नात्यात खूप तणाव आहे. त्यांच्या नात्यात समस्या आहेत. अल्बर्ट मेरीवर विश्वासघात केल्याचे व बेईमान असल्याचे आरोप करीत असे. ह्याच काळात मेरी बेपत्ता झाली.

 

 

रोको ह्यांना मेरीच्या बेपत्ता होण्याचे कारण हेच वाटले की अल्बर्टच्या रोजच्या कटकटींना व भांडणांना कंटाळून मेरी घरातून निघून गेली असावी.

ह्याबाबत बोलताना थेरेसी सांगतात की,

“मला माहिती होते की त्यांच्या घरी खूप समस्या आहेत. पण मी म्हटले जाऊदे!आपल्याला काय करायचे आहे? पण मला कायम प्रश्न पडत असे की मेरीने कधीच आपल्या मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाही?ती निघून गेली पण मुलांसाठी तिने कधीच मागे वळून का बघितले नाही?”

चार्ल्स ह्यांना मात्र सुरुवातीपासूनच ह्यात काहीतरी वेगळीच शंका येत होती. त्यांच्या आईलाही मेरीची चिंता वाटत होती. मेरीवर कुठलेतरी भयानक संकट ओढवले आहे अशी चिंता त्यांच्या आईला कायम सतावत असे.

“मी व माझी आई कायम ह्या घटनेबाबतीत चर्चा करत असू. माझ्या आईला तर पूर्ण खात्रीच होती की मेरीबरोबर काहीतरी भयंकर घडले आहे.” असे चार्ल्स म्हणतात.

 

cbc.com

खरे तर लोकांना तेव्हाच शंका यायला हवी होती जेव्हा अल्बर्टने मेरी बेपत्ता झाल्यानंतर लगेच मागच्या अंगणात सिमेंटचे फ्लोअरिंग करून घेतले. कुणालाही पुसटशी देखील शंका आली असती तर अल्बर्टचा गुन्हा जगापुढे आला असता. पण कुणालाही शंका आली नाही आणि हा गुन्हा ५५ वर्ष लपून राहिला.

हे घडले तेव्हा चार्ल्स पाच वर्षांचे होते. ते म्हणतात की “माझ्या कुटुंबियांना त्यावेळी शंका कशी आली नाही ह्याचेच मला आश्चर्य वाटते. ते तेव्हा नेमका काय विचार करीत होते हे मला कळत नाही. “

खरे तर नवऱ्याने बायकोला ठार मारून तिचा मृतदेह घरच्याच मागच्या अंगणात पुरला आणि नंतर पुरावे नष्ट करून टाकायचा प्रयत्न केला ह्याचा सज्जड पुरावा असताना देखील अल्बर्टवर कुणी शंका घेतली नाही.

चार्ल्स ह्यांच्या मते त्यांच्या आईने इतर नातेवाईकांसह पोलिसात मेरीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती पण पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही.

त्या काळी नवरा बायकोतील समस्यांमध्ये बाहेरची माणसे हस्तक्षेप करण्यास फारशी उत्सुक नसत. पोलिसांना देखील हे प्रकरण खाजगी वाटले असावे आणि बायको व्यभिचार करून, घर सोडून पळून गेली असावी असा विचार करून त्यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतले नाही.

“आत्ता जसे बेपत्ता होणे पोलीस गांभीर्याने घेतात, तेव्हा अशी नवरा -बायकोतली प्रकरणे फार गांभीर्याने घेतली जात नसत.”

एसबर्ना ह्यांनी असेही सांगितले की अल्बर्टला लहान मुले आवडत नसत. तो अतिशय विचित्र आणि दुष्ट होता. त्याने चार्ल्सचीही काही खेळणी अनेकदा मुद्दाम बाहेर फेकून दिली होती. पण ह्याबाबतीत थेरेसी मात्र उलटच सांगतात. त्यांच्या मते अल्बर्ट अतिशय सौम्य, प्रेमळ व चांगला माणूस होता.

 

daily mail.com

त्या म्हणतात,

“माझा अजूनही विश्वास बसत नाही की अल्बर्टसारखी व्यक्ती असे कसे वागू शकते?किंवा मेरीला कुणी मारून टाकण्याचे कारण काय हे मला कळत नाही. त्याने तिला मारून टाकून आपल्याच घरच्या अंगणात दफन केले आणि त्यानंतर तो आपल्या दोन मुलांसह तिथेच राहत होता ह्यावर विश्वासच बसत नाही. परंतु थोड्याच काळात त्याने स्वतःचेही आयुष्य संपवले. “

थेरेसी ह्यांनी सांगितले की १९६५ साली अल्बर्टच्या गाडीचा अपघात झाला आणि त्या अपघातातच अल्बर्टचा मृत्यू झाला. मेरी बेपत्ता झाल्यानंतर एकाच वर्षात अल्बर्टचाही मृत्यू झाला.

त्याने वेगात गाडी चालवली आणि शेव्हरोले कारच्या दुकानावर गाडी नेऊन आदळली. ह्या भयानक अपघातात त्याचा मृत्यू झाला.

ह्या घटनेबद्दल पिट्सबर्ग प्रेसने एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीत असे लिहिले होते की “अल्बर्ट अतिशय वेगात गाडी चालवत होता. जिथे त्याची गाडी धडकली तिथपासून २५० फुटांपर्यंत स्किड मार्क्स दिसत होते. त्यावरून असे लक्षात येते की ही धडक टाळता आली असती.”

मेरीच्या शरीराचे अवशेष प्रयोगशाळेत तपासले गेले. पण त्यावरून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. त्यामुळे कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

थेरेसी ह्यांच्यामुळेच मेरीची ओळख पटू शकली. त्यांनीच पोलिसांना एका बेपत्ता महिलेचे डेन्टल रेकॉर्ड देऊन मदत केली. त्या डेन्टल रेकॉर्डवरून हे स्पष्ट झाले की त्या महिलेचे डेन्टल रेकॉर्डस् हे मेरीच्या शरीराच्या अवशेषांशी जुळले नाहीत.

 

wpxi.com

तेव्हा थेरेसी ह्यांना आपल्या शेजारील महिला अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे आठवले. त्यामुळे तपासकर्त्यांनी मेरीच्या नातेवाईकांच्या डीएनएची चाचणी करताच ते डीएनए त्या सापडलेल्या अवशेषांच्या डीएनएबरोबर जुळले.

आणि अखेरीस हे मेरीच्या बेपत्ता होण्याचे गूढ ५५ वर्षांनी उकलले.

चार्ल्स म्हणतात की,”ही केस लवकर सुटली असती तर निदान माझ्या आई व आजीला तरी कळले असते की मेरी नेमकी कुठे आहे!”

ही केस सुटण्यास खूप उशीर झाला पण उशिरा का होईना मेरीच्या नातेवाईकांचा शोध संपला. पण मेरीचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढ मात्र कायम राहील कारण हा गुन्हा करणारी व्यक्तीच आता अस्तित्वात नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version