Site icon InMarathi

शोषितांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग पेटवून, बाबासाहेबांच्या संयमाचे दर्शन घडवणारा सत्याग्रह

mahad satyagrah inmarathi

forward press

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी आपण परिचित आहोत. अत्यंत बुद्धीमान, कर्तृत्ववान आणि थोर विचारवंत म्हणून त्यांना जगमान्यता मिळाली.

त्यांचे कार्य, त्यांचा अभ्यास यांना कुठलेही कुंपण नाही.

ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी चहुबाजूने झेप घेतली तसेच अनेक क्षेत्रात कार्य करत त्यांनी आपले योगदान दिले.

अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न करत ते  दीन, दलित, शोषित लोकांचे भाग्यविधाता झाले.

आपले अवघड कार्य साध्य करण्यासाठी त्यांनी समाजसुधारकांचा मार्ग, पत्रकारितेचा मार्ग, राजकीय मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग आणि शेवटी धर्मांतराचा मार्ग असे विविध पर्याय निवडले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यांतून त्यांचे एक कुशल, प्रेरक आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व समाजापुढे आले. त्यांच्या या कल्पक नेतृत्वाची साक्ष देणारे एक आंदोलन म्हणजे महाड सत्याग्रह!

marathimati.comm

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.

त्याला महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तिसंग्राम म्हणून ही ओळखले जाते. यामुळेच भारतात २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.

पार्श्वभूमी

हिंदू धर्मात असलेल्या जातीव्यवस्थेमुळे स्वतःला उच्चजातीय म्हणवणारे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे वागवत असत. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास त्यांना परवानगी नव्हती.

ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला!

त्यानुसार सार्वजनिक खर्चाने बांधलेल्या आणि देखरेख होत असलेल्या किंवा सरकारने नेमलेल्या मंडळांकडून निर्माण केलेल्या सर्व सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, धर्मशाळा,

सार्वजनिक शाळा, न्यायालये, कचेऱ्या व दवाखाने यांवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना परवानगी असावी असे म्हटले गेले.

महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

thebudhhistcentre.com

अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून दि. १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.

‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले’ या नावाखाली हा सत्याग्रह करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

बाबासाहेबांचा असा प्रयत्न होता की या माध्यमातून अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी संघटितपणे लढण्याची प्रेरणा यांतून मिळेल.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २० मार्च रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन आपला माणुसकीचा आणि समतेचा हक्क सिद्ध करायाचा या निर्धाराने सर्वजण तळ्याकडे गेले!

आणि आधी बाबासाहेब आणि नंतर सर्वांनी पाणी प्राशन करत आपला समतेचा संदेश दिला.

स्पृश्य – अस्पृश्य एकी

तत्कालीन समाजात भेदभाव इतका होता की समाजहितासाठी काम करणारे देखील स्पृश्य आणि अस्पृश्य अशा गटात विभागले जात.

महाडचा सत्याग्रह यशस्वी होण्यासाठी अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्र गोविंद टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे यांचे चांगले सहकार्य लाभले.

forwardpress.com

याशिवाय काही तरुण देखील यांत मनापासून सहभागी झाले.

तसेच या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, रामचंद्र बाबाजी मोरे, शिवराम गोपाळ जाधव, केशवराव आणि गोविंद आद्रेकर या कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा होता.

स्पृश्य अस्पृश्य भेद संपवून सामाजिक समता निर्माण व्हावी असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच बोलून दाखवत.

सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार

मात्र सर्व काही सुरळीत होते असे नाही. यांमुळे सनातनी लोक चांगलेच संतापले होते. त्यांचा या सगळ्याला विरोधच होता.

त्यातच महाड गावात एक अफवा उठली की, “तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.”

धर्म धोक्यात आल्याचे सनातन्यांनी सांगत गावभर फिरत हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी तो घोळका आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली.

हा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला.

forwardpress.com

त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता.

त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला.

बाबासाहेबांचा संदेश

या अधिवेशनाला अस्पृश्य स्त्री-पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याला कारणही तसेच होते, यानिमित्ताने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजबांधवांना संदेश दिला की,

“आता अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या बंधनात जगणे सोडले पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आपली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती केली पाहिजे. शिक्षणावर भर देऊन चांगल्या पदाच्या नोकऱ्या मिळवल्या पाहिजे.

आपली राहण्याची व जगण्याची पद्धत सुधारली पाहिजे. सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, तळी यांचा पाण्याच्या वापरासाठी प्रयत्न केला पाहिजे.”

या सत्याग्रहात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता, बाबासाहेबांनी आवाहन केले की आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर बाळगू नये.

wp.com

जसे पुरुषांनी हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत.

आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले.

बाबासाहेबांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. लोकांनी आपल्या पेहरावात बदल केला.

महाड सत्याग्रहानंतर

जरी महाड सत्याग्रह झाला तरी त्याला असलेला सनातन्यांचा विरोध पाहता तळ्यापासून शोषित जनता अजून दूरच होती. सनात्यन्यांनी तळे “शुद्ध” केले होते.

आता पुन्हा तिथे अधिवेशन घेऊन आपला समतेचा हक्क मिळवायचा असा निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा हाती घेतला.

२५ आणि २६ डिसेंबर १९२७ रोजी १) चवदार तळ्याचे हक्काचे पाणी अस्पृश्य जनतेला मिळावे आणि २) हिंदू धर्मातील विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करायचे असा कार्यक्रम घेण्यात आला.

चवदार तळ्यावर जाऊ नये म्हणून न्यायालयाचा तात्पुरता मनाई हुकूम आणत सनातन्यांनी या अधिवेशनाला विरोध केला.

चवदार तळ्याच्या पाण्याची ही न्यायालयीन लढाई पुढे १७ मार्च १९३७ मध्ये पूर्ण झाली आणि अस्पृश्यांना आपला हक्क मिळाला.

musium.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयमी नेतृत्वाचा परिचय करून देणारा हा महाडचा सत्याग्रह शोषित समाजाला आपले अधिकार, आपले हक्क यांचे भान देणारा ठरला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version