आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन या नावाशी भारतीय संगीतप्रेमी चांगलेच परिचित आहे. त्यांच्या तबलावादनाचे कार्यक्रम असो किंवा जुगलबंदी, त्यांचे तबलावादन ऐकणे हे संगीत रसिकांसाठी ती एक पर्वणीच असते.
पण त्यांच्या या तबलावादनाची भुरळ काही भारतीयांनाच पडली नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत.
आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक सांगितीक कार्यक्रमात भाग घेत त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे.
संगीताचा वारसा घरातच असल्याने लहानपणापासून ते या क्षेत्रात मनापासून रमले. आज त्यांची कीर्ती जगभर पसरली आहे. हिंदुस्थानी संगीत, शास्त्रीय संगीताचे विविध प्रयोग त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले.
पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा मिलाफ असलेले कार्यक्रम भारतीय संगीत जगात पोहोचविण्यात आणि भारतीयांना पाश्चात्य संगीताची ओळख करून देणाऱ्या नावांपैकी झाकीर हुसेन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.
मुंबईत जन्मलेले झाकीर हुसेन आता अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सीस्को येथे वास्तव्यास आहेत.
त्यांच्या पत्नी अँटिनिया या कथक नृत्यांगणा आणि शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुली असून अनिसा ही अमेरिकेत चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावत आहे तर दुसरी मुलगी इसाबेला नृत्य क्षेत्राशी निगडीत आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला नंदिता दास दिग्दर्शित “मंटो” या चित्रपटाचे पार्श्वसंगीत झाकीर हुसेन यांचे आहे.
भारतीय संगीत क्षेत्र आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांच्याशी त्यांची नाळ कायमच जोडलेली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संगीतकारांसोबत काम करून देखील आपले स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम राखले.
अशा या नावाजलेल्या तबलावादक झाकीर हुसेन यांच्याशी निगडीत काही गोष्टी:
१. झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र आहेत. उस्ताद अल्लारखाँ हे तबलावादक होतेच शिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांना संगीत सुद्धा दिले आहे.
सतारवादक पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखाँ यांची जोडी संगीत रसिकांसाठी मेजवानी असे.
२. झाकीर हुसेन यांनी अगदी लहान वयातच वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी पखवाज हे वाद्य वाजवण्यास सांगितले होते.
३. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला “हीट अँड डस्ट” या चित्रपटाला झाकीर हुसेन यांनी संगीत दिले होते तसेच यांत त्यांची प्रमुख भूमिका देखील होती. इस्माईल मर्चंट हे या चित्रपटाचे निर्माते होते.
४. झाकीर हुसेन यांनी इस्माईल मर्चंट यांच्यासोबत अजून दोन चित्रपट केले. “इन कस्टडी” (१९९३) आणि “द मिस्टिक मॅसुअर” (२००१). या दोन्ही चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते.
याशिवाय आंतराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अजून एक मोठे नाव म्हणजे फ्रांसिस कॉपोला!
त्यांच्या अपॉकॅलिप्स नाऊ (१९७९) या चित्रपटातही त्यांचे योगदान होते. व्हिएतनाम युद्धावर आधारित असलेला हा युद्धपट अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला होता.
५. झाकीर हुसेन हे “प्लॅनेट ड्रम” या प्रसिद्ध बँड मध्ये देखील सहभागी होते. मिकी हर्ट, सिकिरू आणि जिओवनी हिडाल्गो यांच्या या बँडने १९९२ चा ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता.
“बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम” या प्रकारातले नामांकन त्यांना लाभले होते. या विभागातला हा पहिलाच ग्रॅमी पुरस्कार होता.
६. १५ वर्षांनी हा बँड पुन्हा एकदा एकत्र आला आणि त्यांनी “ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट” हा अल्बम सादर केला. संगीत विश्वातील ही एक महत्वाची घडामोड होती. २ ऑक्टोबर २००७ ला या अल्बम चे सादरीकरण करण्यात आले.
या अल्बम ने २००९ च्या ग्रॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले. “बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम” या विभागात त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता.
७. अमेरिकेतील सिएटल येथे असलेल्या वॉशिंग्टन विद्यापीठात संगीत शिक्षक म्हणून झाकीर हुसेन यांच्या नावाची शिफारस सितारवादक पंडित रविशंकर यांनी केली होती..
८. भारतीय संगीताची जगाला ओळख करून देण्यात झाकीर हुसेन यांचा वाटा मोठा आहे.
जॅझ फ्युजन आणि जागतिक संगीतात हिंदुस्थानी घराण्याची शैलीचे स्थान निर्माण करत त्यांनी भारतीय संगीताला एक नवीन आयाम दिला.
९. झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००२ मध्ये पदमभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारानेही त्यांना १९९० मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
१०. १९९९ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल एंडॉवमेंट फॉर द आर्ट्सच्या नॅशनल हेरिटेज फेलोशिपने झाकीर हुसेन यांना सन्मानित करण्यात आले. अमेरिकेत पारंपारिक कलाकार म्हणून आणि संगीतकारांना दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले व आपल्या देशाचे नाव उंचविणारे झाकीर हुसेन यांचे हे योगदान पाहून नक्कीच म्हणावेसे वाटते, वाह उस्ताद!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.