Site icon InMarathi

या मुस्लिम पुजाऱ्याने ४० वर्षांच्या अखंड भक्तीने पावन केलंय आसामातील एक ‘शिवमंदिर’!

namaz inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारतात धार्मिक कारणावरून तणावाच्या बातम्या काही नवीन नाही. भारताच्या विविध भागात अशा अनेक दुर्दैवी घटना घडत असतात. स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगतांना इतरांच्या धर्म संस्कृती यांचा कळत-नकळतपणे द्वेष करायला लागल्यानंतर त्यावर टीका करणे, अभद्र भाषेत टिप्पणी करणे, इतरांना कमी लेखणे यांत धर्मवेडी लोक अडकत जातात.

त्यांना यांत कसलेही भान राहत नाही आणि मग स्वतःची पोळी शेकण्यासाठी अशा बाबींना प्रोत्साहन देणारे महाभाग पण काही कमी नाहीत.

परिणामी दोन धर्मात वितुष्ट निर्माण होऊन चांगल्या समाजाची वीण उसवल्याचे कित्येक उदाहरणे आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. बर! यात कित्येक स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे देखील सामील होत असतात. मात्र ही झाली एक बाजू !

भारतात धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी आपल्या परीने योगदान देणार्‍यांची संख्या देखील काही कमी नाही.

 

tribune.com.pk

यासाठी कुठलीही परतफेडीची अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे अनेक जण कुठलाही गवगवा न करता मुकाटपणे काम करतात. हे करत असताना त्यांना त्यांचा धर्म आड येत नाही.

असंच एक उदाहरण म्हणजे आसाम ची राजधानी गुहावटी जवळ असणाऱ्या रंगमहल या गावातल्या हाजी मतिबर रहमान यांचे आहे.

भारताच्या पूर्वेकडे हिंदू धर्मातील शैवपंथाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर भगवान शिव यांची आराधना केली जाते. अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने शिव मंदिरात पूजाअर्चा करताना दिसतात.

रंगमहल हे गाव आसाम मधील कामरूप जिल्ह्यात आहे. ब्रम्हपुत्रेच्या काठावर असलेले रंगमहल गावात असलेल्या शिव मंदिराची  देखभाल  हाजी मतिबर रहमान गेल्या चाळीस वर्षापासून करत आहेत.

शिवाय या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पाचशे वर्षे जुने आहे. या मंदिरात केवळ हिंदूच नाही तर परिसरातील मुस्लिम भाविक देखील येत असतात.

 

ANI

या शिवमंदिरात हिंदू “पूजा” करतात तर मुसलमान “दुवा” मागतात. त्यामुळेच हे मंदिर या परिसरातील नागरिकांना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक वाटते.

येथील लोक या मंदिराविषयी आणि इथल्या धार्मिक सलोखा विषयी आत्मीयतेने बोलतात. त्यांना हे  जुने शिवमंदिर सांभाळणाऱ्या मुस्लिम कुटुंबियांबद्दल आदर आहे.

त्यांच्या या मिळून मिसळून राहण्यामुळे आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सेवाभावी वृत्ती जपण्याच्या स्वभावामुळे लोकांना देखील ते आपलेसे वाटतात.

मतिबर रहमान यांना त्यांच्या शिवभक्ती बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की या भागातील हिंदू मुसलमान सर्वजण भगवान शिवजींना मानतात. त्यांच्याकडे दुवा मागतात.

आमच्या सर्व इच्छा त्यांच्याद्वारी आल्यावर पूर्ण होतात. इतकेच काय त्यांच्या म्हणण्यानुसार  भगवान शिवजी यांना आम्ही  “नानाजी” या नावाने संबोधतो. भगवान शिव आईचे पूर्वज असल्याचे त्यांची श्रद्धा आहे.

 

lalluram.com

अशी सकारात्मक उदाहरणे समाजाला मोठा महत्वाचा संदेश देत असतात. धार्मिक सलोखा हा शांततेकडे वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. सेवाभावी वृत्तीने हाजी मतिबर रहमान हे कार्य मोठ्या निष्ठेने करत आहे.

मात्र या मार्गावर चालणारे ते काही एकटे नाही, काश्मीर खोऱ्यात देखील एक मुसलमान कुटुंब मोठ्या आत्मीयतेने एका शिव मंदिराची देखभाल करत आहेत.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोके चांगलेच वरती काढले होते. त्याची परिणीती काश्मिरी पंडितांना हुसकावून लावल्यात झाली. तेव्हा काश्मिरी पंडितांचे दैवत असलेले भगवान शिवाचे मंदिर ओस पडले.

मात्र मोहम्मद अब्दुल्ला आणि गुलाम हसन यांनी या मंदिराची जबाबदारी घेत रोजच्या पूजाअर्चे पासून सर्व देखभाल करत आहेत.

कश्मीर खोऱ्यात मुस्लिम पुजारी असलेले हे  एकमेव मंदिर आहे. हे मंदिर ९०० वर्षे जुने असून आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक धागा आहे. तेव्हा धार्मिकता बाजूला ठेवली तरी आपल्या संस्कृतीचे जतन केले जात आहे.

 

news18.com

भारताचा शेजारील देश पाकिस्तान हा धार्मिक कट्टरतेसाठी देखील ओळखला जातो. पण तिथेही असेच धार्मिक सलोख्याचे उदाहरण पहायला मिळते.

या ठिकाणी एका चर्चचे देखभाल मुस्लिम कुटुंबीय गेल्या शंभर वर्षांपासून करत आहेत. तीन पिढ्यांपासून ते चर्चची देखभाल करत आहेत. सध्या वाहिद मुराद हे या चर्चची देखभाल करतात.

या धार्मिक सलोखा टिकवणाऱ्या, धर्माच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीची शिकवण देणाऱ्या प्रयत्नांची दखल मात्र आपण घेतली पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version