आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
दर वर्षी प्रमाणे फोर्ब्स ह्या आंतरराष्ट्रीय मीडिया कंपनीने जगातील बिलियानेयर्स म्हणजेच अतिश्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. ह्या यादीत जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांची नावे असतात. ह्या पूर्वी ह्या यादीत बिल गेट्स, वॉरेन बुफे, मार्क झुकेरबर्ग, मुकेश अंबानी ह्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत.
ह्यावर्षीच्या यादीतले सर्वात शॉकिंग नाव एका एकवीस वर्षीय महिलेचे आहे जिने फेसबुकचा मालक असलेल्या मार्क झुकेरबर्गला मागे टाकत ह्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
ही महिला आहे काईली जेनर ! काईली जेनर ही २०१९ सालातील सर्वात श्रीमंत युवा अब्जाधीश ठरली आहे.
२१ वर्षीय काईली ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील ती स्टार आहे. प्रसिद्ध सेलेब्रिटी किम, कोल आणि कोर्टनी कार्दशियन ह्या काईलीच्या सावत्र बहिणी आहेत.
ह्या सर्व बहिणी त्यांच्या सौंदर्यासाठी व फॅशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचे फॅशन लुक्स सतत सगळीकडे प्रसिद्ध होत असतात.
काईली क्रिस्टन जेनर ही अमेरिकन रियालिटी टीव्ही स्टार आहे. १० ऑगस्ट १९९७ रोजी जन्म झालेली काईली जेनर ही एक मॉडेल, व्यावसायिक, सोशलाईट व सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. “किपींग अप विथ द कार्दशियन्स”ह्या टेलिव्हिजन सिरीजमध्ये ती झळकली होती.
तिने तिची काईली कॉस्मेटिक्स नावाची एक सौंदर्यप्रसाधनांची कंपनी सुरु केली आहे. सुरुवातीला ही कंपनी काईली लीप किट्स असे ह्या कंपनीचे नाव होते.
पण २०१५ साली ह्या कंपनीद्वारे लिक्विड लिपस्टिक आणि लीप लायनरचे कलेक्शन आले आणि नंतर २०१६ साली ह्या कंपनीचे नाव बदलून काईली कॉस्मेटिक्स असे ठेवण्यात आले.
२०१२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी काईलीने तिची बहीण केन्डालसह पॅकसन ह्या कपड्यांच्या ब्रँडबरोबर “केन्डाल अँड काईली” ही स्वतःची एक क्लोदिंग लाईन सुरु केली.
२०१५ साली तिने तिची काईली लीप किट्स ही कॉस्मेटिक्स कंपनी सुरु केली. तिने एक मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च केले होते. हे ऍप थोड्याच काळात आयट्यून्स ऍप स्टोअरवर पहिल्या क्रमांकावर पोहोचले.
२०१४ व १५ साली प्रसिद्ध टाइम्स मॅगझीनने जेनर भगिनींना आपल्या “मोस्ट इन्फ्ल्यूएन्शनल टीन्स इन द वर्ल्ड” ह्या यादीत स्थान दिले. जगभरातील सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांवर ह्या भगिनींचा वाढत असलेला प्रभाव व त्यांची तरुणांमधील लोकप्रियता बघता त्यांना ह्या यादीत स्थान मिळाले.
२०१८ पर्यंत काईलीचे जगभरात १२२ मिलियन फॉलोअर्स होते. इंस्टाग्रामवर फॉलो केल्या जाणाऱ्या सर्वात प्रसिद्ध दहा सेलिब्रिटीजमध्ये काईली जेनरचाही नंबर लागतो. भारतीय गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ सुद्धा काईलीला फॉलो करतो.
दिलजीत कायम काईलीच्या फोटोंवर “प्रेमळ” कमेंट्स टाकत असतो. त्याने मागेच काईलीवर असलेले “प्रेम” सोशल मीडियावर जाहीर सुद्धा केले होते.
२०१७ साली काईलीचे नाव फोर्ब्स सेलेब्रिटी हंड्रेड ह्या यादीत सुद्धा समाविष्ट झाले. ह्या यादीत समाविष्ट होणारी ती सर्वात लहान सेलेब्रिटी आहे. २०१७ साली तिने “लाईफ ऑफ काईली” ही स्वतःची सिरीज E! ह्या अमेरिकन चॅनेलवर सुरु केली.
फोर्ब्स मॅगझीनने प्रकाशित केल्याप्रमाणे मार्च २०१९ ला काईली १ बिलियन यूएस डॉलर्सची मालकीण आहे.
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी स्वतःच्या हिमतीवर इतके आर्थिक यश मिळवणारी ती आजवरची सर्वात लहान अब्जाधीश आहे. तिच्या कंपनीची किंमत जवळजवळ ९० कोटी डॉलर म्हणजे ६४ अब्ज रुपये इतकी आहे.
काईलीच्या कंपनीची उत्पादने जगात सगळीकडे लोकप्रिय आहेत. तिच्या कंपनीची उत्पादने अनेक अब्जाधीश आणि हॉलिवूड स्टार्स सुद्धा वापरतात.
‘काईली कॉस्मेटिक्स’ ह्या कंपनीची १००० पेक्षाही जास्त आउटलेट्स आहेत. मागच्या वर्षी ह्या कंपनीने ३९० मिलियन डॉलरचा व्यवसाय केल्याचे सांगितले जाते.
काही काळापूर्वी काईलीचे नाव जगातील सर्वात लहान श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट झाले होते. ह्याच वेळी फोर्ब्स मॅगझीनने तिला त्यांच्या कव्हर पेज वर स्थान दिले होते.
काईलीने २०१७ साली प्रसिद्ध गायक ट्रेव्हिस स्कॉटशी विवाह केला. ह्या दोघांना एक मुलगी असून स्टॉर्मी वेब्स्टर असे तिचे नाव आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्कभाऊ झुकेरबर्ग हे सुद्धा कमी वयात अब्जाधीश झाले होते.
वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी मार्क झुकेरबर्गने अब्जाधीश होण्याची किमया करून दाखवली होती.
पण काईली जेनरने मार्क झुकेरबर्गचा रेकॉर्ड मोडत एकविसाव्या वर्षीच ही झेप घेतली आहे. बहुसंख्य भारतीयांवर इंटरनेटची कृपादृष्टी ठेवणारे जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी ह्या यादीत तेराव्या स्थानावर आहेत.
ऍमेझॉनचे मालक जेफ प्रेस्टन बेझॉस हे ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या मते जेफ १३१ अब्ज डॉलरचे मालक आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी त्यांची कमाई १.९ अब्ज डॉलर्सने वाढली आहे.
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ह्यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर यंगेस्ट बिलियनेयर्सच्या यादीत काईली जेनर प्रथम क्रमांकावर आहे व नॉर्वेजीयन इंडस्ट्रियालिस्ट योहान आंद्रेसन ह्यांची कन्या अलेक्झांड्रा ही ह्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिचीच बहीण कॅथरिना ह्या ह्यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील श्रीमंतांपैकी मुकेश अंबानी ह्या यादीत तेराव्या स्थानावर आहेत व अझीम प्रेमजी हे ३६व्या स्थानावर आहेत.
लक्ष्मी मित्तल ह्यांना ह्या यादीत ९१वे स्थान मिळाले आहे. मार्क झुकेरबर्गला ह्यावर्षी आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ह्यावर्षी त्याने ६२.३ अब्ज डॉलर्स इतकी कमाई केली आहे.
इतके पैसे सामान्य माणसाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाहीत!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.