Site icon InMarathi

CA ते गली बॉय मधील ‘एमसी शेर’, सिद्धांतचा प्रेरणादायी प्रवास! 

siddhant gully boy InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“अपना टाइम आयेगा” म्हणत समस्त तरुणाईला रॅपचे वेड लावणाऱ्या गल्ली बॉयची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. ह्यात रणवीर सिंगच्या कामाने, त्यातल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावले आहे. ह्या चित्रपटाची कथा, आलियाचा अभिनय, रणवीरचे “मुराद”शी एकरूप होणे ह्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच फार आवडला.

रणवीर सिंग, आलिया भट ह्यांच्याबरोबरच सिद्धांत चतुर्वेदीनेही ह्या चित्रपटात कमाल केली आहे. त्याचे एमसी शेरचे पात्र लोकांच्या पसंतीस उतरले आहे.

 

 

गल्ली बॉयचा मित्र, गुरु म्हणून एमसी शेरने जो काय जिवंत अभिनय केला आहे तो कौतुकास पात्र आहे. सिद्धांत चतुर्वेदीचे ह्यासाठी सगळीकडे कौतुक होत आहे.

मुरादमधले टॅलेंट, स्पार्क ओळखून त्याला पुढे येण्यासाठी, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणारा एमसी शेर. स्वतः स्ट्रगल करून वर आलेला आणि उत्तम रॅपर असलेला एमसी शेर म्हणून, आपण सिद्धांतच्या जागी दुसऱ्या कुणाचीही कल्पना करू शकत नाही.

ह्या सर्व कौतुकामुळे सिद्धांत स्वतःच अतिशय भारावून गेला आहे. सिद्धांत आता तर अनेक तरुणींचा क्रश झालाय.

इतकेच नव्हे ज्येष्ठ अभिनेते स्वत: अमिताभ बच्चन ह्यांनी वेळ काढून सिद्धांतला त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानिमित्त अभिनंदनपर पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक केले आहे.

 

 

सिद्धांत चतुर्वेदी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे पण तो पाच वर्षांचा असतानाच त्याचे वडील कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. त्याचे वडील सीए असून आई गृहिणी आहे. त्याने मिठीबाई कॉलेज मधून कॉमर्सची पदवी मिळवली आहे.

त्याने मार्शल आर्टस् तसेच वेस्टर्न क्लासिकल डान्सिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने “क्लीन अँड क्लिअर बॉम्बे टाइम्स फ्रेश फेस २०१२” चा ‘किताब पटकावला होता.

त्यानंतर त्याने मॉडेलिंग करणे सुरु केले. ह्या आधी तो अनेक जाहिरातीत झळकला आहे. त्याची कोका कोलाची जाहिरात तुम्ही बघितली असेलच.

अर्थात सिद्धांतला हे यश काही एका रात्रीत आणि सहजासहजी मिळालेले नाही. पंचवीस वर्षीय सिद्धांत एकीकडे सीए होण्यासाठी अभ्यास करताना गेल्या सहा वर्षांपासुन अभिनयात सुद्धा चांगला ब्रेक मिळावा म्हणून कसून प्रयत्न करीत होता.

त्याने त्याच्या आयुष्यातल्या घटना इंस्टाग्रामच्या “ह्यूमन्स ऑफ बॉम्बे” ह्या पेजवर शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या एमसी शेर बद्दल सुद्धा सांगितले आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये सिद्धांत लिहितो की, “माझ्या वडिलांना पहिल्यापासूनच चित्रपटांची खूप आवड आहे. त्यामुळे ते मलासुद्धा त्यांच्याबरोबर दर शुक्रवारी चित्रपट बघायला नेत असत. तिथूनच माझ्याही मनात चित्रपटांविषयी प्रेम तयार झाले.

माझे बाबा सलमान खानची गाणी टेपवर लावत असत आणि त्या गाण्यांवर मी लहानपणी डान्स करत असे. माझाकडे तो शाहरुखचा प्रसिद्ध “Cool” नेकलेस सुद्धा होता.

मला लहानपणापासूनच कलेत जास्त रस होता. मी पहिली कविता लिहिली ती मी शाळेत असताना एका नवव्या वर्गात असलेल्या मुलीसाठी लिहिली होती. अर्थात त्या मुलीने मला नकार दिला, पण मी माझे लिखाण सुरु ठेवले. तेव्हा मला माहिती नव्हते की हे लिखाण मला कुठे घेऊन जाणार आहे.

 

 

माझे पहिले करिअर ऑप्शन माझ्या बाबांप्रमाणे सीए होणे हेच होते. त्यासाठीच मी अभ्यास केला. अभिनयाचा तर तेव्हा माझ्या डोक्यात विचार देखील नव्हता. मी कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या डोक्यात पहिल्यांदा अभिनयाचा किडा शिरला.

मी कॉलेजच्या ड्रामा टीममध्ये गेलो. तेव्हा मला लक्षात आले की आपल्याला अभिनय करणे आवडतेय! पण माझ्या सीएच्या परीक्षेसाठी मला अभिनय सोडून द्यावा लागला.

माझे कॉलेज आणि क्लास ह्यांचातच माझा सगळं वेळ जायचा, तेव्हा पुरेशी झोप घ्यायला सुद्धा माझ्याकडे वेळ नसायचा. पण आपले शिक्षण आपण पूर्ण केले पाहिजे हे मी माझ्या पक्के ध्यानात ठेवले होते. एकदा जे हातात घेतले ते पूर्ण करायचे हे मी ठरवले होते.

 

 

तर असा अभ्यास करून मी परीक्षा दिली आणि पास झालो. पण रँक मिळायला मला फक्त १५ मार्क कमी पडले.

तुम्ही मला विचारलंत की माझे सगळ्यात मोठे यश कुठले तर मी अभिनयाचे नाव घेणार नाही. अभिनय मी करणार हे मला माहीतच होते पण ती सीएची परीक्षा पास करणे हे माझे सर्वात मोठे यश मी मानतो.

नंतर अंतिम परीक्षेच्या आधी मी माझ्या बाबांकडे अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मागितला. विविध ठिकाणी ऑडिशन देण्यासाठी मी माझ्या मित्रांना बरोबर घेऊन जायचो. माझ्या पहिल्या ऑडिशनमध्ये त्यांनी मला आधी कॅमेऱ्याकडे कसे बघतात हे शिकून घे आणि नंतर परत ये असा सल्ला दिला होता.

 

 

असा माझा स्ट्रगल सुरु झाला. पण माझ्या ह्या सगळ्या प्रवासात माझे बाबा माझ्यासाठी खरे एमसी शेर होते. त्यांनी मला कायम सांगितले की,

“धीर सोडू नकोस. शांत रहा. आणि कधीही स्वतःला कमी लेखू नकोस, कधीही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नकोस. सतत आपले स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न कर. तुझ्या अन्न ,वस्त्र, निवाऱ्याची काळजी करू नकोस. त्यासाठी मी आहे. तू तुला जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रयत्न कर.”

माझ्या बाबांनी कायम मला निवडीचे स्वातंत्र्य दिले. त्यांनी मला स्वप्न बघण्याचे स्वातंत्र्य दिले.

मग चार वर्ष प्रयत्न केल्यावर , भरपूर ऑडिशन्स दिल्यावर, तिथून नकार मिळाल्यावर मला “इनसाईड एज” मध्ये संधी मिळाली. कारण इनसाइड एज बनवणाऱ्यांना जे टॅलेंट हवे होते ते माझ्याकडे होते.

 

 

त्यानंतर इनसाइड एजच्या सक्सेस पार्टीमध्ये झोया अख्तर ह्यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर मी त्या पार्टीत गल्ला गुडीयां ह्या गाण्यावर डान्स देखील केला.

माझ्या नशिबाने त्यांनी मला “गल्ली बॉयच्या ऑडिशनसाठी यायला सांगितले. आणि ह्या रोल मुळे तर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. गल्ली बॉय प्रदर्शित झाल्यानंतर मला स्वतः अमिताभ बच्चन ह्यांनी वेळात वेळ काढून पत्र पाठवले. ते पत्र मी माझ्या बाबांच्या हातात दिले.

माझे बाबा बच्चनसाहेबांचे खूप मोठे चाहते आहेत. ते पत्र मी त्यांच्या हातात दिले तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण होता.

 

 

तेव्हा माझ्या बाबांच्या चेहेऱ्यावरूनच कळत होते की त्यांना किती आनंद झालाय! शेर म्हणून माझी ओळख करून देण्याचा मला कधीही कंटाळा येणार नाही.

आता मी खरंच सिंहासारखी डरकाळी फोडून सांगू शकतो की ,”भाग भाग भाग आया शेर आया शेर!”

सिद्धांत चतुर्वेदीचा फॅन बेस दिवसेंदिवस वाढतोच आहे. भविष्यात तो अश्याच उत्तमोत्तम भूमिका करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करेल ह्यात शंका नाही. सिद्धांतला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version