“फिशबेड व्हर्सेस फाल्कन” : जुन्या मिग २१ ने आधुनिक एफ-१६ विमानावर कशी मात केली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
खरे तर मिग -२१ हे विमान कुख्यात आहे कारण ह्या विमानामुळे आपल्या वायुसेनेतील अनेक वैमानिकांचा नाहक जीव गेला आहे. पासष्ट वर्षांपूर्वी डिझाईन करण्यात आलेले हे मिग -२१ अनेक वेळा दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यामुळे आपल्या वायुसेनेतील जवळजवळ ११७ वैमानिकांचे प्राण गेले आहेत.
पण ह्याच मिग-२१ चा ताबा विग कमांडर अभिनंदन वर्थमान ह्यांच्याकडे असताना त्यांनी आपल्या साठ वर्ष जुन्या विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ ह्या आधुनिक विमानाला धूळ चारत पाकिस्तानी वायुसेनेचा हल्ला परतावून लावला.
२७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी दहानंतर पाकिस्तानी वायुसेनेच्या आधुनिक एफ-१६ विमानांनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी भारताची सीमा ओलांडली.
त्यांच्या ह्या ताफ्यात चिनी बनावटीचे जेएफ -१७ आणि खास असलेले मिराज -५ फायटर जेट ही विमाने सुद्धा होती. भारताने बालाकोट,खैबर पख्तुनख्वा येथील जैश -ए- महम्मदच्या लष्करी तळांवर केलेल्या एयर स्ट्राईकचा बदला म्हणून भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. म्हणून त्यांनी एक मोठे “स्ट्राईक पॅकेजच” भारतावर हल्ला करण्यासाठी पाठवले.
पाकिस्तानी वायुसेना नियंत्रण रेषेपासून काही अंतरावर असलेल्या जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातील भीमबर गली ह्या ठिकाणी असलेल्या आपल्या लष्करी मुख्यालयाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात होती.
पण पाकिस्तानी वायुसेनेची हालचाल दिसताच आपल्या वायुसेनेने तात्काळ कृती करत आपल्या श्रीनगर येथील फ्रंटलाईन एयरबेसवर असलेली आपल्या ताफ्यातील सहा मिग-२१ विमाने पाकिस्तानी वायुसेनेच्या बेत हाणून पाडण्यास पाठवली.
विंग कमांडर अभिनंदन ह्यांचे मिग-२१ विमान सुद्धा ह्याच ताफ्यात होते. ह्यासह आपल्या वायुसेनेने मिग-२१ विमानांच्या मदतीला सुखोई -३० एमकेआय, मिराज- २००० व मिग-२९ ह्या दुसऱ्या एयरबेसवर असलेल्या विमानांनाही पाचारण केले.
१९७१ सालानंतर भारत पाकिस्तान मध्ये आत्ता झालेल्या अश्या लढाईत विंग कमांडर अभिनंदन ह्यांनी त्यांच्या सोव्हिएत काळातल्या मिग -२१ विमानाने पाकिस्तानी एफ-१६ विमानाला लॉक करण्यात यश मिळवले व नंतर त्या विमानाला शॉर्ट रेंज Vympel R-73 एयर टू एयर मिसाईलने लक्ष्य केले.
अर्थात इतक्या उंचावर झालेल्या ह्या पंधरा मिनिटांच्या लढ्यात त्यांना कळू शकले नाही की त्या विमानाचे काय झाले पण त्यांनी बेसला रेडिओवर “आर-७३ सिलेक्टेड” असा संदेश पाठवला.
काही सेकंदातच त्यांच्या मिग-२१ विमानावर कुणीतरी हल्ला केला आणि त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
इतिहासात पहिल्यांदाच एखादे एफ-१६ विमान असे हल्ल्यात कोसळले आहे. (निदान त्याबद्दल आजवर तरी कुठलीही नोंद झालेली नाही). ह्या घटनेने जगात सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत असले तरी पाश्चिमात्य डिफेन्स एक्स्पर्टसने मात्र ह्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
योगायोगानेच पंधरा वर्षांपूर्वी मिग-२१ उर्फ फिशबेड ह्या विमानाने आधुनिक अमेरिकन एफ-सिरीज विमानांना एका सरावात पराजित केले होते. ह्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला होता. अमेरिकेची विमाने ही जगात सगळीकडे अजिंक्य म्हणून ओळखली जातात.
पण ह्यानंतर १३च दिवसानंतर वायुसेनेने ग्वालियर येथे कोप इंडिया सरावाचे आयोजन केले होते. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २००४ ह्या काळात हा सराव आयोजित करण्यात आला होता.
ह्या सरावादरम्यान भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांनी बलाढ्य अमेरिकन वायुसेनेला ९:१ असे चीत केले होते. ह्यामुळे अमेरिकेला मोठाच धक्का बसला होता.
ग्वालियरला जे घडले त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की रशियन तंत्रज्ञान असलेले साठ वर्षे जुने विमान वापरून आपल्या वायुसेनेच्या वैमानिकांनी आधुनिक एफ-१६ला कशी धूळ चारली!
ग्वालियर मध्ये २००४ साली झालेल्या वायुसेनेच्या सरावात स्पष्ट झालेल्या प्रमुख गोष्टी ह्या आहेत-
१. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांचे नाविन्यपूर्ण कौशल्य
२. जेव्हा उच्च-प्रशिक्षित आणि प्रेरणापूर्ण वैमानिक रशियन जेट्स चालवतात तेव्हा समोरच्यावर पडणारा प्रभाव
३. अमेरिकन वायुसेनेच्या वैमानिकांना मिळणारे अपुरे प्रशिक्षण
पेंटागॉनने भारतीय वायुसेनेचे यश मान्य करण्यास नकार दिला पण अमेरिकन वायुसेनेने मात्र भारतीय वायुसेनेचे कौशल्य मान्य केले.
एव्हिएशन वीक अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या डेव्हिड ए- फलघम ह्यांनी अलास्कास्थित इलमेन्डॉर्फ एयर फोर्स बेसच्या अमेरीकन वायुसेनेच्या तिसऱ्या विंगचे कमांडर असलेल्या कर्नल माईक स्नोडग्रास ह्यांना सांगितले की,
“ह्या सरावात हे स्पष्ट झाले की त्यांच्याकडे अश्या अनेक रणनीती आहेत ज्या आपण अंदाज लावला त्यापेक्षा कित्येक पटींनी आधुनिक आहेत. ते गेम प्लॅनसह येतात. पण तो गेम प्लॅन यशस्वी झाला नाही तर ते त्यांच्या योजनेत बदल करतात.”
अमेरिकन वायुसेनेच्या ताफ्यातल्या सहा एफ-१५ सी ह्या विमानांशी ज्या भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील विमानांची सरावादरम्यान लढत झाली त्याविषयी बोलताना स्नोडग्रास ह्यांनी म्हटले की,
“भारतीय वायुसेनेकडे असलेली सर्वात भयंकर आणि धोकादायक विमाने म्हणजे रशियन बनावटीच्या बेसलाईन मिग-२१ ची सुधारित आवृत्ती असलेले मिग-२१ बायसन आणि रशियन बनावतीचेच सु-३० एमके फ्लॅन्कर ही विमाने आहेत.”
भारतीय वायुसेनेच्या कुशल वैमानिकांबाबत बोलताना युएसएफचे टीम लीडर कर्नल ग्रेग न्यूबेच म्हणाले होते की,”मागच्या दोन आठवड्यात आम्ही जे काही बघितले त्यावरून आम्ही हे नक्कीच सांगू शकतो की भारतीय वायुसेना ही जगातील सर्वोत्तम वायुसेनेच्या अगदी तोडीस तोड आहे.
ज्या वैमानिकावर भारतीय वायुसेनेला तोंड देण्याची वेळ येते आणि तो त्यांना कमी लेखतो त्या वैमानिकाची मला दया येते. कारण जो वैमानिक भारतीय वायुसेनेच्या विरुद्ध उभा ठाकतो, तो सुखरूप परत जाण्याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे.”
“ह्या सरावात, आपल्या स्ट्रायकर्सना कधी आणायचे ह्याबाबतीत त्यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतले. अंतर्गत सुरक्षेसाठी इंटिग्रल सुरक्षेसाठी मिग २१ हे मिग २७च्या फ्लॉगरसह एम्बेड केले गेले.
माहितीच्या देवाणघेवाणीसाठी फ्लॅन्कर्समध्ये डेटा लिंक करण्यात आले होते.
आमची विमाने काय करत आहेत ह्याबद्दल त्यांनी अतिशय चांगले रडार पिक्चर तयार केले होते आणि आपली विमाने कधी रोल इन व रोल आउट करायची, ह्याबाबतीत त्यांनी वेळोवेळो अतिशय चांगले निर्णय घेतले.” असेही ते म्हणाले.
ह्या सगळ्याचे श्रेय अर्थातच भारतीय वायुसेना आपल्या वैमानिकांना जे कठीण प्रशिक्षण देते त्याला जाते.
ह्या सरावाबद्दल लिहिताना एका अग्रगण्य वर्तमानपत्राने लिहिले होते की ,
“अमेरिकन वायुसेनेने नक्कीच भारतीय वायुसेना व त्यांच्या वैमानिकांची योग्यता व कौशल्य कमी लेखून तयारी केली असावी. त्यांना वाटले की भारतीय वायुसेना ही इराकी किंवा इराणी वायुसेनेप्रमाणे आहे.”
“देवानंतर ह्या जगात फक्त अमेरिकाच!” असे अमेरिकन लोकांना व त्यांच्या नेत्यांना असेच ऐकण्याची सवय आहे. पण सरावादरम्यान आपल्या वायुसेनेच्या झालेला पराभव बघून अमेरिकन नेतृत्वाला प्रचंड धक्का बसला. वॉशिंग्टनमध्ये जवळजवळ भूकंपच आला.
अर्थात काही पाश्चिमात्य लोकांनी असेही म्हटले की, “अमेरिकन वायुसेना पूर्ण तयारीनिशी गेली नसल्याने त्यांना ग्वालियरमध्ये धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले.” पण नक्की कशामुळे अमेरिकन वायुसेना ह्या सरावादरम्यान मागे पडली?
पहिले म्हणजे कोप इंडिया २००४ मध्ये भाग घेतलेल्या एफ-१५सी ह्या विमानांमध्ये खरोखरच आधुनिक इलेकट्रोनिकली स्कॅन्ड ऍरे रडार (AESA ) नव्हते. परंतु ते तर भारतीय विमानांमध्येही नव्हते.
दुसरे म्हणजे भारताच्या विनंतीवरून अमेरिकन वायुसेनेने ह्या सरावात ३:१ असा भाग घेण्याचे ठरवले.
म्हणजे अमेरिकेच्या सहा जेट्स विरुद्ध आपल्या १८ जेट्सने लढाई केली. तसेच त्यांच्या BVR (बियॉंड व्हिज्युअल रेंज) मिसाईल न वापरण्याचे अमेरिकेने मान्य केले होते.
ह्यावर जरा विचार केला तर तुमच्याही हे लक्षात येईल की एखाद्या २ आठवड्यांच्या सरावासाठी लक्षावधी रुपये कुठलीही वायुसेना का खर्च करेल?
भारतीय वायुसेना तर अजिबातच असा वायफळ खर्च करणार नाही. तसेच अमेरिकन वायुसेना तरी कशाला फक्त सरावासाठी आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन येईल आणि ते सरावासाठी खर्च करेल?
भारतीय वायुसेनेची पद्धत आणि अमेरिकन वायुसेनेची लढण्याची पद्धत अतिशय वेगवेगळी आहे. भारतीय वायुसेनेने वेगवेगळी विमाने ,भिन्न अल्टीट्यूडस आणि फॉर्मेशन्सचा वापर केला. परंतु अमेरिकन पायलट्सने स्टॅटिक कोल्ड वॉर स्टाइल ग्राउंड कन्ट्रोल्ड इंटरसेप्शनचा वापर केला. त्यामुळे अमेरिकन पायलटला मोकळेपणाने कृती करण्यात अडचण आली.
तसेच अमेरिकन पायलट्सचे प्रशिक्षण हे क्लोज्ड सिस्टीम मध्ये होते.
व्हिएतनाम सोडल्यास अमेरिकेने कायम इराक सारख्या लहान देशांवरच कारवाई केल्याने त्यांच्या वायुसेनेला मोठ्या सैन्याशी लढण्याचा फार अनुभव नाही. कोप इंडिया २००४ च्या अनुभवाने हे लक्षात आले की विमाने महत्वाची आहेतच, पण ती कोण चालवतं हे जास्त महत्वाचे आहे.
पायलट कुशल असेल तर तो त्याच्या जुन्या विमानाने आधुनिक विमानावर विजय मिळवू शकतो. हेच आपल्या विंग कमांडर अभिनंदन ह्यांनी करून दाखवले.
२००५ साली सुद्धा कोप इंडिया झाले. मागच्या वर्षीचा अनुभव बघता ह्यावेळी अमेरिकन वायुसेनेने मिश्र प्रकारची विमाने ह्या सरावात उतरवली. ह्यात दोन टीम होत्या. दोन्ही टीम मध्ये काही अमेरिकन तर काही भारतीय वैमानिक होते.
ह्या सरावादरम्यान अमेरिकेचे एफ-१६ व भारताचे सु-३० एमकेआय ह्यांची लढत जास्त वैशिष्ट्यपूर्ण ठरली . ह्यात सुद्धा भारतीय वायुसेनेचे वैमानिकच वरचढ ठरले.
कोप इंडिया २००५ हा अमेरिकेसाठी वेक अप कॉल ठरला. त्यांना भीती होती मिराज आणि सुखोईची..पण मिग -२१ बायसन हे त्यांच्यासाठी सरप्राईज ठरले. मिग-२१ मध्ये लो रडार व्हिजिबिलिटी, पटकन वळण घेण्याची क्षमता आणि जॅकरॅबिट ऍक्सलरेशन ह्यामुळे हे विमान शत्रुसैन्याला भारी पडते.
तसेच ह्या विमानाची आणखी वैशिष्ट्ये म्हणजे हेल्मेट माउंटेड साईट, हाय ऑफ बोअरसाईट आर ७३ एयर टू एयर मिसाईल्स ह्यामुळे मिग-२१ हे विमान लढतीत चांगला पर्याय ठरते.
अर्थात मिग-२१ हे तितके सुरक्षित सुद्धा नाही. ह्या आधी ह्या विमानात बिघाड झाल्याने आपले अनेक पायलट्स आपण गमावले आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी जी लढत झाली त्यात मिग-२१ च्या मदतीला Sukhoi Su-30s, MiG-29s आणि Mirage-2000 ही विमाने सुद्धा होती.
सुखोईच्या विरुद्ध एफ-१६ टिकू शकत नाही. पाकिस्तानी पायलट्सना ह्याची कल्पना आल्यामुळे ते आल्या पावली पळून गेले. विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिग-२१ ला शक्तिशाली AMRAAM ह्या एयर टू एयर मिसाईलला निकामी करता आले नाही आणि ते कोसळले.
अर्थात त्या आधी अभिनंदन ह्यांनी एफ-१६ विमानाला निकामी करून आपले काम केले होते. ह्याचाच अर्थ असा होतो की विमान कोणते आहे ह्यापेक्षा ह्यापेक्षा ते कोण उडवते आहे हे जास्त महत्वाचे आहे.
पाकिस्तानकडे कितीही आधुनिक विमाने असली तरीही आपल्या वायुसेनेचे कुशल वैमानिक पाकिस्तान्यांना कडवे प्रत्युत्तर देणार ह्यात कुठल्याही भारतीयाने तिळमात्र शंका बाळगू नये.
आपल्या भारतीय पायलट्सचे कौशल्य अमेरिकेने सुद्धा मान्य केले म्हटल्यावर “ये पाकिस्तान क्या चीझ है!”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.