आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
परकीय शक्तींपासून देशाला कायमच धोका असतो. त्यात आपले सख्खे शेजारी-पक्के वैरी पाकिस्तान आणि चीन तर कायमच काही ना काही कारवाई करून आपल्या डोक्याला त्रास देत असतात. अश्या वेळी आपली सशस्त्र दले वेळोवेळी प्राणपणाने हे हल्ले परतावून लावत देशाचे व आपले रक्षण करीत आले आहेत.
पण देशाचे रक्षण करणे हे फक्त सैनिकांचे काम नव्हे तर सामान्य नागरिकांचेही कर्तव्य आहे.
आपण हे कर्तव्य पार पाडत नाही पण ह्या गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने पाकिस्तानी सैनिकांना पाठीला पाय लावून पळून जाण्यास भाग पाडले होते.
आंतरराष्ट्रीय सीमेला लागूनच असलेले चक दुल्मा हे गाव कायम शत्रूच्या निशाणावर आहे. पण ह्या गावच्या लोकांनी एकजुटीने जे शौर्य दाखवले त्यामुळे आजही आपल्याला प्रेरणा मिळते.
ह्या गावात कमी लोक राहत असूनही त्यांनी एकजुटीने पाकिस्तानी सैन्याच्या एका तुकडीला आपली शस्त्रे तशीच टाकून पळून जाण्यास भाग पाडले होते. ते घाबरून आपल्या मशीनगन गावातच टाकून निघून गेले.
भारत पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सीमेलगतच्या गावांना सुद्धा तणावपूर्ण वातावरणात राहावे लागत आहे. पण ह्या गावातल्या लोकांनी ह्यापेक्षाही जास्त तणावपूर्ण आणि भीतीदायक परिस्थितीचा सामना ह्यापूर्वीही केला आहे.
त्यामुळे ह्या परिस्थितीचा त्यांच्यावर विशेष परिणाम झालेला नाही. अगदी युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा ते घाबरून गाव सोडून गेले नाहीत तर शूरपणे गावातच थांबून राहिले.
जम्मूच्या कठुआ ह्या भागात हे चक दुल्मा गाव वसलेले आहे. ह्या गावातले लोक खूप धैर्यवान आहेत. त्यांच्या शौर्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. ह्या गावात राहणारे टोनी शर्मा म्हणतात की,
आमचे जगणे-मरणे जे काही होईल ते ह्या गावातच होईल. आम्ही आमचे गाव सोडून का जायचे? पाकिस्तानच्या लोकांना आम्ही तर मुळीच घाबरत नाही. उलट तेच आम्हा गावकऱ्यांना घाबरून आहेत.
१९७१ साली जे युद्ध झाले, त्या वर्षी त्यांनी त्यांच्या मशीनगन्स गमावल्या आहेत. मला फार तर काही आठवत नाही. तेव्हा मी सात वर्षांचा होतो. पण इतके आठवते की आमच्या गावची सीमा जिथे संपते तिथे बेई नाल्याच्याजवळ पाकिस्तानी सैनिकांनी तळ ठोकला होता.
सरकारने तेव्हा आमच्या सुरक्षेसाठी गावातल्या काही लोकांकडे गन्स दिल्या होत्या. एका दिवशी कुणीतरी आपल्या रायफलमधून हवेत गोळ्या झाडल्या. त्यानंतर दुसऱ्या गावकऱ्याने सुद्धा आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. असे एकमेकांचे ऐकून बऱ्याच लोकांनी हवेतच बंदुकीच्या फैरी झाडल्या.
ह्या गोळ्यांचे आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सुद्धा हवेत काही गोळ्या झाडल्या. त्यामुळे अचानक वातावरण बदलले. लोक उत्तेजित झाले. कोणीही संयम ठेवला नाही. पाकिस्तानवर लोक आधीच चिडलेले होते.
लोकांच्या मनात असंतोष होताच. त्यामुळे त्या भावनेच्या भरात गावातले लोक घोषणा देत पाकिस्तानी सैनिकांच्या तळापाशी गेले. तेव्हा लोकांचा आवेश बघून पाकिस्तानी सैनिक आपल्या मशिनगन तिथेच विसरून पळून गेले होते.”
ह्याच गावात राहणाऱ्या ओंकार शर्मा ह्यांनी सांगितले की,
“मला तर ह्या घटनेची पूर्ण माहिती नाही. मी तेव्हा खूप लहान होतो. पण आमच्या गावातल्या आणि घरातल्या मोठ्या माणसांकडून मी ह्या घटनेबद्दल अनेकदा ऐकले आहे.”
त्यांनी गावातल्या एका ओसाड घराकडे बोट दाखवून सांगितले की,
“ह्या ठिकाणी दोन भाऊ राहत होते. त्यांचा मृत्यू वीस ते तीस वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब हे गाव सोडून जम्मू, सांबा किंवा कठुआ ह्या ठिकाणी निघून गेले. असे म्हणतात की ह्याच दोन भावांनी लोकांना एकत्र करण्याचे मोठे काम केले होते. आजही जेव्हा ह्या घटनेबद्दल कुणी मोठी व्यक्ती सांगते, तेव्हा आमच्या मनात उत्साह संचारतो.
ह्याचीच आठवण ठेवून आम्ही गाव सोडून जात नाही. अर्थात जे लोक इथून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले ते त्यांच्या नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गेले आहेत, घाबरून नव्हे. आणि आम्ही मात्र कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही.”
खेमराज नावाच्या एका व्यक्तीने गावाच्या बाहेर असलेल्या बीएसएफच्या चौकीकडे बघून सांगितले की, “हे सैनिक सुद्धा इथेच आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे लोक आपली ड्युटी पार पडतात. ही सुद्धा आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे आहेत.
हे जवान जर कुठल्याही कठीण परिस्थितीत इथे राहून आपले कर्तव्य पार पाडतात तर मग आपण मागे का हटायचे ? आपण का पळून जायचे? हे तर आमचे गाव आहे. आम्ही इथेच जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो.
गाव सोडून घाबरून पळून जायचे म्हणजे शत्रूला मोकळे रानच करून देण्यासारखे आहे. आज तुम्ही आम्हाला १९६५ आणि १९७१ च्या युद्धाच्या वेळी झालेल्या घटनांबद्दल विचारत आहात.
तेव्हा जर आमच्या लोकांनी गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला असता तर तेव्हा काय झाले हे आज सांगायला कुणी शिल्लकच राहिले नसते.
आज जर आम्ही इथून पळून गेलो, तर आमच्या पुढच्या पिढीला आम्ही कशी शत्रू सैन्याला धूळ चारली हे कसे सांगणार?”
खरेच आहे. ह्या गावातील लोक खरंच आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. असेच आपण देखील आपले कर्तव्य पार पाडले तर शत्रू आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याआधी विचार करेल.
फितूर सुद्धा फितुरी करण्याच्या आधी परिणामांचा विचार करून आपल्या देशावर संकट आणू शकणार नाहीत. ह्या लहानश्या गावच्या लोकांकडून आपण सर्वांनीच प्रेरणा घ्यायला हवी.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.