विंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतीय हवाई दलाने सीमा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याने, भारत दहशतवाद मोडून काढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश अवघ्या जगाला दिला.
मात्र यामुळे पाकिस्तान बिथरला असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध विकोपाला गेले आहेत.
त्यातच २७ फेब्रुवारी, बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या जेट विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले.
या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडण्यात आले. मात्र यांत भारताचे मिग-२१ आणि त्याचा वैमानिक हे देखील बेपत्ता झाले.
दुपारपर्यंत भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समाजमाध्यमे, पाकिस्तानी माध्यम आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वार्तांकन यातून समोर आले.
भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ या विमानाला पिटाळून लावताना भारताचं मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे त्या विमानाचे वैमानिक होते.
पाकिस्तानने ज्या पद्धतीने जखमी अवस्थेतील वैमानिकाचे छायाचित्रण करून समाज माध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले हे अपमानजनक असून जिनिव्हा कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन यांनी आज भारतीय वैमानिकाला पाकिस्तानात कसे पकडण्यात आले याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या माहितीनुसार,
बुधवारी सकाळी ८.४५ वाजता पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरच्या भीमबर जिल्ह्यात नियंत्रण रेषेपासून केवळ ७ किमी अंतरावर होरान गावात नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. मात्र यावेळी आकाशात वेगळे काहीतरी घडत होते.
भारत आणि पाकिस्तानची विमाने अगदी एकमेकांजवळ होती.
त्या गावातील एक रहिवासी आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, ५८ वर्षीय मोहम्मद रझाक चौधरी यांनी काळजीपूर्वक पाहिले असता त्यांना लक्षात आले की दोन विमानांना आग लागली होती परंतु त्यांच्यापैकी एकाने नियंत्रण रेषा ओलांडली तर दुसऱ्याला आग लागली आणि ते वेगाने खाली आले.
हे सर्व काही त्यांच्या घराच्या अवघ्या एक किमी अंतरावर घडत होते.
पुढे रझाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जमिनीवर उतरताना एक पॅराशूट पाहिला. ते पॅराशूट व्यवस्थितरित्या जमिनीवर उतरले आणि त्यातून वैमानिक बाहेर आला.
त्या दरम्यान रझाक यांनी गावातील अनेक तरुणांना कॉल केले आणि त्यांना सैन्याच्या कर्मचाऱ्यांचे आगमन होईपर्यंत नष्ट झालेल्या विमानाच्या जवळ जाऊ नये म्हणून सांगत वैमानिकाला पकडण्याचा सल्ला दिला.
वैमानिकाकडे पिस्तूल होती, त्याने युवकांना विचारले की तो भारतात आहे की पाकिस्तानमध्ये. यावर त्या युवकांपैकी एकाने सांगितले की हा भारत आहे.
यावेळी वैमानिकाने काही घोषणा दिल्या आणि त्यानंतर भारतात कुठे असा प्रश्न वैमानिकाने विचारला. यावर, त्याच मुलाने असे उत्तर दिले की ते क्विला आहे.
आता अभिनंदन असे त्याचे नाव युवकांना समजले होते. वैमानिकाने त्यांना सांगितले की त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि त्याला पाणी पिण्याची गरज आहे.
मात्र याचदरम्यान काही भावनिक तरुण, जे नाराजी पचवू शकले नाहीत, त्यांनी पाकिस्तानी सेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तेव्हा विंग कमांडर अभिनंदन यांनी हवेत गोळीबार केला आणि तरुणांनी हातात दगड घेतले.
रझाक यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वैमानिक अर्धा किलोमीटर मागे सरत धावत गेला आणि त्याच्या पिस्तूलाचे टोक मुलांकडे वळवले.
या वेगवान घडामोडी दरम्यान, युवकांना घाबरविण्यासाठी हवेमध्ये आणखी काही गोळीबार केला परंतु त्यांचा काही फायदा झाला नाही.
मग त्यांनी एका लहान तलावात उडी मारली जेथे त्यांनी खिशातून काही कागदपत्रे आणि नकाशे काढली, त्यापैकी काही गिळत आणि इतरांना पाण्याने भिजवत नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मुलांनी वैमानिक अभिनंदनला शस्त्र सोडण्यास सांगितले आणि त्यादरम्यान एका मुलाने त्यांच्या पायावर गोळी मारली, असे रझाक म्हणाले.
शेवटी, वैमानिक बाहेर आला आणि म्हणाला की त्याला मारले जाऊ नये. मुलांनी दोन्ही हाताने त्याला पकडले. त्यापैकी काही जणांनी रागाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर तेथे सैन्य कर्मचारी येऊन पोहोचले आणि त्यांना त्यांच्या ताब्यात घेऊन युवकांच्या रागापासून त्याला वाचवले.
यावेळी अभिनंदन यांनी त्या मुलांनी त्यांना ठार मारले नाही म्हणून ईश्वराचे आभार मानले. वैमानिकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर भिमबर येथे लष्करी वाहनांच्या ताफ्याने सैन्याच्या तळाकडे ते रवाना झाले.
ज्यावेळी भोमार शहराच्या खलील चौकातून हा ताफा गेला, जे होरानपासून सुमारे ५० किमी दूर अंतरावर आहे, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेल्या डझनभर नागरिकांनी सैन्याच्या ताफ्याचे स्वागत केले.
पाकिस्तान आर्मी जिंदाबाद, काश्मीर जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद नारेबाजी करत त्यांनी सैन्याच्या वाहनांवर फुलांचा वर्षाव केला.
काल भारतीय वैमानिक बेपत्ता झाल्यापासून त्या संदर्भात अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. काही माहिती तर आधी पाकिस्तानी सैन्याने दिली आणि नंतर नाकारली सुद्धा आहे.
आधी त्यांच्याकडून दोन वैमानिक ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते साफ खोटे होते.
समाज माध्यमांतून छायाचित्र, चित्रफीत आणि इतर माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रातून समोर आलेली ही माहिती एकमेकांशी पडताळून आपल्याला काही अंदाज बांधता येतील.
मात्र सत्य तेव्हाच समोर येईल जेव्हा भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे सुखरूप भारतात परत येतील.
तोपर्यंत सामान्य जनांच्या प्रार्थना अभिनंदन वर्थमान यांच्या पाठीशी आहेत. त्यांची लवकर आणि सुखरूप सुटका व्हावी याची सारा देश आतुरतेने वाट पाहत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.