Site icon InMarathi

“ये सर्कस है…” भारतात सर्कस उद्योगाला जन्म देणाऱ्या एका अवलियाची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आजकालच्या लहान मुलांना सर्कसचे तेवढे आकर्षण नाही. पण जे लोक नव्वदीच्या दशकात किंवा त्या आधी जन्मले आहेत त्या लोकांना सर्कशीची मज्जा काय असते ते माहित असेल. सर्कशीतले चित्तथरारक खेळ, त्यातील लोकांच्या कसरती, विविध प्राणी, जादूगाराचे खेळ आणि सर्वांचा आवडता विदूषक ह्यांचे आकर्षण त्या काळात सर्व लहान मुलांना असायचे.

 केव्हा सुट्ट्या लागतात आणि केव्हा सर्कस आपल्या गावात येते ह्याची मुलं वाटच बघत असत. ग्रेट रॉयल सर्कस, अमर सर्कस, ग्रेट बॉंबे सर्कस, राजकमल सर्कस, जम्बो सर्कस ,रँबो सर्कस ह्या काही प्रसिद्ध सर्कस आपण बघितल्या आहेत.

जगभरात लोकांचे मनोरंजन करणारी सर्कस भारतात केव्हा आली? सर्कस उद्योग भारतात कुणी आणला? जगभरात कौतुक होणारी द ग्रेट इंडियन सर्कस केव्हा सुरु झाली? आज जाणून घेऊया.

अनेक लोक असे म्हणतात की सर्कस एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जास्त लोकप्रिय झाली. पहिली भारतीय सर्कस १८८० साली सुरु झाली असे फिलिप एस्टली ह्या प्रसिद्ध ब्रिटिश सर्कस मालकाचे म्हणणे आहे.

 

indulgexpress.com

फिलिप एस्टली ह्यांना फादर ऑफ द मॉडर्न सर्कस असे म्हटले जाते.आपल्या भारतात पहिली सर्कस आणली ती विष्णुपंत छत्रे ह्यांनी! विष्णुपंत छत्रे ह्यांनी द ग्रेट इंडियन सर्कसची निर्मिती केली. ते एक निष्णात घोडेस्वार होते तसेच एक उत्तम गायक सुद्धा होते.

ते कुर्डुवाडीच्या राजाच्या घोड्यांच्या तबेल्याचे प्रमुख होते. ते घोडेस्वारी करता करता उत्तम प्रकारे स्टंट सुद्धा करीत असत. त्याकाळी जगभरात सर्कस हे मनोरंजनाचे उत्तम साधन झाले होते आणि सर्कस लोकप्रिय सुद्धा होत होती.

विष्णुपंत छत्रे हे सांगली जिल्ह्यातील अंकखोप गावचे राहणारे होते. एकदा कुर्डुवाडीचे राजे आणि छत्रे रॉयल इटालियन सर्कस बघण्यासाठी मुंबईत गेले.

ही रॉयल इटालियन सर्कस तेव्हा विश्वदौऱ्यावर असताना भारतात आली होती. या सर्कशीत त्यांनी ज्युसेप कियारीनी ह्यांचा खेळ बघितला. छत्रे ज्युसेप कियारीनीचे कौशल्य बघून खूप प्रभावित झाले.

खेळ संपल्यानंतर त्यांनी व कुर्डुवाडीचे राजे ह्यांनी ज्युसेप कियारीनीचे कौतुक केले. त्यांच्याशी बोलताना कियारीनी उद्दामपणे म्हणाला की

“भारताची अजून तरी स्वतःची सर्कस तयार करण्याची तयारी नाही, भारतात सर्कस तयार व्हायला आणखी कमीत कमी दहा वर्षे लागतील.”

त्याचे हे बोलणे ऐकून विष्णुपंत छत्रेंनी भारतात स्वतःची सर्कस सुरु करण्याचे ठरवले. ह्या कामात त्यांना त्यांच्या पत्नीनेही साथ दिली. त्यांनी ठरवले की ह्या सर्कशीत ते स्वतः मुख्य घोडेस्वार असतील व त्यांच्या पत्नी ट्रॅपीझ आर्टिस्टचे काम करतील तसेच पशूंना प्रशिक्षण देतील.छत्रेंनी आपल्या काही माणसांना एकत्र करून सर्कस सुरु केली. ही भारतातील पहिली सर्कस होती.

 

buffalonews.com

ह्यानंतर ह्या द ग्रेट इंडियन सर्कसने संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. १८८४ मध्ये छत्रे आपली सर्कस घेऊन आशियात दौऱ्यासाठी गेले. त्यानंतर त्यांना अमेरिकेत सुद्धा सर्कशीचे खेळ करण्यासाठी आमंत्रण मिळाले.

परंतु छत्रेंना अमेरिकेत फारसा चांगला अनुभव आला नाही व ते निराश होऊन भारतात परतले.

छत्रे व किलेरी कुन्हीकन्नन ज्यांना आज जग फादर ऑफ इंडियन सर्कस म्हणून ओळखतं ह्यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली. अश्याच एका भेटीदरम्यान छत्रेंनी कुन्हीकन्नन ह्यांना त्यांच्या सर्कशीतील कलाकारांना ऍक्रोबॅटीक्सचे ट्रेनिंग देण्याची विनंती केली.

१९०१ साली किलेरी कुन्हीकन्नन ह्यांनी कोल्लम जवळ सर्कस स्कुलचे उद्घाटन केले. ही सर्कस स्कुल संपूर्ण देशात प्रसिद्ध पावली. ह्या सर्कस स्कुल मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी नंतर आपापल्या सर्कस कंपन्या सुरु केल्या.

भारत व इतर सगळीकडे भारतीय सर्कस लोकप्रिय करण्यात कमला थ्री रिंग सर्कसने मोठी भूमिका बजावली आहे. ह्या सर्कसने अगदी लहान टू पोल पासून सुरुवात केली.

नंतर ह्या सर्कशीत १०० कलाकार होते. आणि ही सर्कस गावागावांत जाऊन अनेक चित्तथरारक खेळ दाखवत असे. के दामोदरन ह्यांची ही सर्कस संपूर्ण आशिया खंडात लोकप्रिय झाली.

एक छोटी सुरुवात करून ही सर्कस नंतर अमेरिकन स्टाईल सिक्स पोल थ्री रिंग्स सर्कस झाली.

 

entertainment.howstuffworks.com

भारतीय सर्कसने नंतर यशाची अनेक शिखरे काबीज केली व संपूर्ण जगात नावलौकिक मिळवला. ह्याच लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज भारतीय सर्कस आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

आज भारतात २३ सर्कस कंपन्या आहेत आणि त्यांचे अनेक शहरांत अनेक प्रयोग सतत चालू असतात. ह्या तेवीस सर्कस कंपन्या एका नॅशनल फेडरेशन अंतर्गत एकवटल्या आहेत.

“आता मात्र सिनेमा, टीव्ही आणि विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्याने सर्कसला येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये घट झाली आहे. तसेच सर्कशीचे खेळ सादर करणारे कलाकार मिळणे सुद्धा दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

कारण हे खेळ सादर करण्यासाठी कलाकारांना लहानपणापासून प्रशिक्षण घेणे आवश्यक असते तसेच सततचा सराव आवश्यक असतो. हे आजकाल कमी झाले आहे.

तसेच सर्कसचा खेळ हा धोकादायक समजला जातो. त्यामुळे चांगल्या घरातील लोक तर आपल्या मुलांना ह्या व्यवसायात पाठवत नाहीतच,पण गरीब घरातील लोक सुद्धा भीतीमुळे ह्या खेळाचे प्रशिक्षण आपल्या लहान मुलांना देऊ इच्छित नाहीत” असे एम व्ही शंकरन ह्यांनी सांगितले.

 

 

एम व्ही शंकरन हे भारतातील मोठे सर्कस निर्माते आहेत. जरी सर्कसमध्ये भारतीय कलाकारांची कमतरता जाणवत असली तरी ही उणीव रशियन कलाकार भरून काढतात.

अनेक रशियन कलाकार पूर्वीसारखेच आजही भारतीय सर्कस कंपन्यांत आपली कला दाखवत असतात. ह्या रशियन कलाकारांचे चित्तथरारक खेळ बघण्यास लोक आजही येतात.

भारतीय सर्कसचा विष्णुपंत छत्रेंच्या पहिल्या सर्कसपासून ते आजच्या मोठ्या सर्कसपर्यंतचा हा प्रवास विस्मयकारक आहे.

आज सर्कसमध्ये पहिल्यासारखे प्राणी नसतात, पण विविध प्रकारचे मनोरंजक खेळ असतात, श्वास रोखून धरायला लावतील अश्या ऍक्रोबॅटीक्सच्या कसरती असतात म्हणूनच आजही लहान मुले गावात सर्कस आली की ती बघायला जाण्याचा हट्ट करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version