Site icon InMarathi

पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग १)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील वर्षी पंतप्रधानांच्या अचानक पाकिस्तानी दौर्यामुळे खरं तर सर्वचजण गोंधळून गेले होते. विरोधी आणि समर्थक दोन्हीही! समर्थन करणारे यांना पाकिस्तानला शिव्या देणारे खरे की पाकिस्तानात जाऊन आलेले खरे यातील संभ्रम अजूनही सोडवता आलेला नाही. विरोधी म्हणवणारांचीही तीच अवस्था आहे. पाकिस्तान हा आतंकवाद्यांना मदत करतो, त्यांनी मदत केलेल्या आतंकवाद्यांनी भारतीय निरपराध लोक मारले जात आहेत – या देशाला कठोर धडा शिकवायला हवा, पाकिस्तानचे तुकडे करायला हवेत, “दुध मांगोगे तो खीर देंगे” वगैरे टाईपचेही विचार पाकिस्तान बाबतीत आपल्या इथे लोकांच्या मनात आहेत.

अर्थात, हे काही चुकीचे नाहीत. पाकिस्तान या देशाने प्रत्यक्ष युद्धात भारताचा पराभव करणे शक्य नाही हे लक्षात घेऊन, आतकंवादास राज्याचे धोरण म्हणून स्विकारलेले आहे. ‘थाउजन्ट कट्स ऑफ इंडिया’ नावाचे हे धोरण बांग्लादेश युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानी सत्ता प्रतिष्ठानाकडून स्विकारण्यात आले होते. पुढे मग याच धोरणानुसार भारतीय पंजाबात खालिस्तान, कश्मीरात आतंकवादी यांना प्रोत्साहन, पाठिंबा व मदत करण्यात आली होती. भारतीय अर्थव्यवस्था लढाईचा हा भार पेलू शकणार नाही आणि तो काश्मीरातून माघार घेईल अशा बालीश आकलनावर हे धोरण आधारलेले होते. याच धोरणानुसार मग भारतीय भूभागात जिथे कुठे अशांतता असेल तिथे त्याला खतपाणी देण्याचे काम सुरु झाले होते. पण भारतीय सरकार यांनी हे सर्व मोडीत काढले.

1989 साली कश्मीरात सुरु झालेली स्वतंत्र चळवळ शांत करण्यात भारताला यश मिळाले होते. याच सुमारास सोव्हिएत विघटनानंतर अमेरिकन मदत कमी झाल्यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थाही कमजोर होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे तेव्हा भारताबरोबरील ही लढाई त्यांना जास्त काळ सुरू ठेवणे शक्य नसल्याचे नवाज शरीफ यांनी हेरुन भारताशी शांतता बोलणी सुरु केली होती.

सर्वप्रथम आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ही बोलणी सुरु झाली होती. “पहिल्यांदा कश्मीर आणि मग बाकी सर्व प्रश्न” अशी पाकिस्तानी भुमिका बदलून सर्व मुद्यांनवर एकाचवेळी चर्चा करण्यास दोन्ही देश तयार झाले होते. गुजराल यांच्या नंतर वाजपेयी यांनी तर ही शांतता चर्चा अजून पुढे नेऊन ते बस घेऊन थेट पाकिस्तानातच पोहचलेले होते. भारत आम्हाला मान्यता देत नाही, भारत आम्हांला गिळकृंत करेल ही पाकिस्तान्यांची भिती वाजपेयी यांनी ‘मिनार ए पाकिस्तान’ इथे जाऊन निराधार असल्याची आणि पाकिस्तानी अस्तित्व आम्ही मानतो याची खात्री करून दिली होती. पण इकडे ज्या वेळी भारतीय आणि पाकिस्तानी पंतप्रधान शांततेच्या वाटाघाटी करत होते त्याचवेळी तिकडे पाकिस्तानी सैनिक करगीलच्या खोर्यातील भारतीय डोंगरावर घुसखोरी करत होते…!

नवाज शरीफ यांनी तीन वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना डावलून लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या मुशर्रफ या सैन्यप्रमुखाची ही करामात पुढे करगील युद्ध म्हणून जगप्रसिद्ध आहे. पण या नंतर भारतीय सैनिकांनी शुरपणाने लढून परत एकदा पूर्ण भुभाग आपल्या अधिपत्याखाली आणला आणि अमेरिकेने पाकिस्तानला विनाअट सैन्य माघार घेण्यास लाऊन हे युद्ध संपूष्टात आणले होते.

पण युद्धातील पराभवामुळे पाकिस्तानात राजकीय व लष्करी नेतृत्वात बेबनाव निर्माण झाला होता. या बेबनावातून पुढे पाकिस्तानात मुशर्रफ यांनी सैन्य तख्तपालट करत सत्ता बळकावली आणि शरीफ यांना देशाबाहेर निष्काषित केले होते. पण करगील मधील संघर्षामुळे सुरू झालेली शांतता बोलणी परत एकदा थंडबस्त्यात गेली होती. मुशर्रफ यांनी सत्तेवर आल्यानंतर सुरवातीला आतंकवाद्यांना भरपूर मदत केली. कंधार प्रकरण, संसदेवरील हल्ला, कश्मीरात आतंकवादी हल्ले यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण इतक्यातच 9/11घडले.

अमेरिकेत ट्विन्स टाँवर नामक इमारतीवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तीन हजार लोक मारले गेले. दहशतवादी आता अमेरिकेत पोहचले होते. याचा प्रतिशोध घेण्यासाठी मग अमेरिकेने अफगाणिस्तानावर हल्ला केला आणि यात पाकिस्तानला त्यांच्या भुराजकीय स्थानामुळे जोडीदार म्हणून घेतले. पाकिस्तान मोठ्या नाखुशीने व अमेरिकेन संरक्षण मंत्र्यांची “तुम्ही आमच्या सोबत नसाल तर तुम्ही त्यांच्या सोबत आहात असं आम्ही समजू” अशी धमकी दिल्यामुळे या युद्धात सहभागी झाले होते. यामुळे पाकिस्तानात व त्याच्या सैन्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

“ज्या तालिबान्यांना आपण मदत, प्रशिक्षण, मान्यता दिली. त्यांच्या बरोबरच आता आपण लढायचे” याने पाकिस्तानी कट्टरपंथीही खवळले होते. त्यांनी याला विरोध सुरु केला, पण मुशर्रफ यांनी तिकडे लक्ष नं देता अमेरिकन विमानाना आपले तळ व रस्ते वापरण्याची परवानगी दिली. पश्चिम आघाडीवर युद्ध सुरु झाल्यानंतर पूर्व आघाडीवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज पाकिस्तानला आणि त्याहूनही जास्त अमेरिकेस जाणवली आणि तिने भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता कराराचा आग्रह धरला. तसा करारही झाला आणि यात पाकिस्तानने पहिल्यांदा आमच्या भुभागावरुन आम्ही भारताविरोधात आतंकवाद्यांना मदत करणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. याचबरोबर भारत – पाकिस्तान यांच्यात पडद्यामागेही बोलणी सुरु झाली होती. यात कश्मीरवर बरीचशी प्रगती झाली होती आणि जवळजवळ तो प्रश्न सुटलाच होता असे कश्मीरवरील विशेष भारतीय प्रतिनिधी लांबा यांनी मागील वर्षीच एका मुलाखातीत सांगितले होते. यामुळे कश्मीरातही शांतता प्रस्थापित झाली होती. पण मुशर्रफ हे जोपर्यत सत्तेवर होते तोपर्यंतच हे आश्वासन पाळले गेले.

मुशर्रफ यांच्या नंतर आलेले सैन्य प्रमुख कयानी हे धोरण बदलून टाकले…किंबहुना मुशर्रफ कश्मीरवर तडजोड करू पाहत होते म्हणूनच पाकिस्तानी सत्ताप्रतिष्ठानाने (अभिजन, सैन्य आणि नोकरशाही) त्यांना पदच्यूत केले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. 🙂

(पुढील भाग: मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २) )

आम्ही एक unbiased media portal आहोत, त्यामुळे आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. म्हणजेच, MarathiPizza.com वर विवीध लेखकांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version