आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
अनिल मणीभाई नाईक यांना देशातील दुसरा मोठा नागरी सन्मान पदमविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. अर्थात त्यांनी त्यासाठी तेवढे कर्तृत्व देखील दाखवले आहे. पण त्यांच्या नावाची चर्चा वेगळ्याच कारणासाठी आहे.
त्यांनी आपल्या ५४ वर्षाच्या कारकिर्दीत एकदाही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळेच कंपनीने त्यांना मोबदल्यापोटी १९ कोटी ४० लाख रुपये दिले.
ही रक्कम मोठीच आहे. इतक्या वर्षांच्या सेवेत त्यांनी एकदाही सुट्टी घेऊ नये यावरून त्यांची आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा दिसून येते. तसेच १९ कोटी ४० लाख ही जी रक्कम आहे ती फक्त सुट्टी घेतली नाही त्याचा मोबदला आहे. तेव्हा त्यांचे वेतन किती असेल?
त्यांचे मूळ वेतन आहे ३ कोटी रुपये. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तीवेतन म्हणून मिळणारे रक्कम सुद्धा १ अब्ज रुपयांच्या वरती जाणारी आहे.
तेव्हा सुट्ट्या वाचवून इतका मोबदला मिळायला पगारही तसाच गलेलठ्ठ असायला हवा हे विसरू नका!
हे ही वाचा :
===
एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्मलेले अनिल नाईक यांनी गुजरातच्या वल्लभ विद्यानगर इथल्या बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्याने मुंबईला जाऊन विरेन जे. शाह यांच्या मुकंद आयर्न अँड स्टील वर्क्स लिमिटेडमध्ये सुरुवातीला काम केले.
आपल्या पहिल्या नोकरीच्या अनुभवाबद्दल ते सांगतात, इंग्रजी बोलता येत नसल्याने तिथल्या व्यवस्थापकाने इंग्रजी सुधारण्यास सांगितले होते. म्हणून नाईक यांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर काम करण्यास सुरवात केली.
इथल्या थोड्याच अनुभवानंतर त्यांनी नेस्टर बॉयलर्समध्ये प्रवेश केला, जो पारशी मालकीची कंपनी होती.
नेस्टर बॉयलरमधील त्यांच्या कारकिर्दीला जास्त वाव मिळाला नाही. कंपनीच्या तत्कालीन व्यवस्थापनामध्ये बदल झाला होता. त्या नवीन वातावरणाशी ते समरस होऊ शकले नाही.
अखेर त्यांनी इथल्या नोकरीला देखील रामराम केला, आणि पुन्हा एकदा १९६५ मध्ये ते नोकरीच्या शोधात होते.
हे ही वाचा :
===
१५ मार्च १९६५ रोजी नाईक कनिष्ठ अभियंता म्हणून एल अँड टीमध्ये दाखल झाले. आता त्यांच्या कारकिर्दीला चांगला वाव मिळाला होता. त्यांची कामगिरी उत्तम होती. कंपनी देखील त्यांच्यावर अधिक जबाबदारी द्यायला तयार होती.
एक एक पायरी वर चढत त्यांनी १९८६ मध्ये सरव्यवस्थापक पदाची सूत्रे हातात घेतली. १९९९ मध्ये ते मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक झाले.
आणि २००३ मध्ये त्यांना लार्सन अँड टुब्रो लिमिटेड चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. एका कनिष्ठ अभियंत्यापासून सुरु झालेला हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे.
ऑक्टोबर २०१७ पासून ते लार्सन अँड टुब्रो समूहाचे अध्यक्ष आहेत. २०१८ च्या शेवटी ते निवृत्त झाले असून सध्या ते कार्यकारी अध्यक्ष आहेत.
लार्सन अँड टुब्रो हा समूह किती क्षेत्रात कार्यरत आहे? तर बांधकाम, तेल आणि गॅस प्रकल्पाची बांधणी, ऊर्जा, धातू, हेवी इंजिनीअरिंग, संरक्षण, जहाजबांधणी, विद्युत व्यवसाय, खाणी, पायपिंग, माहिती व तंत्रज्ञान, अवजार निर्मिती, वित्तसंस्था आणि सर्वांना परिचित असलेले क्षेत्र म्हणजे रस्ते निर्मिती आणि मेट्रो वाहतूक इ. यावरून या सर्वांची जबाबदारी असणारे अनिल नाईक म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे हे लक्षात येईल.
==
हे ही वाचा :
===
ही झाली त्यांची व्यावसायिक ओळख. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरात मधील खारेल येथे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था विकसित केली आहे.
याआधी त्यांनी १२५ कोटी रुपये गुजरातमधील आपल्या मूळ गावातील एका हॉस्पिटल साठी देणगी म्हणून दिले आहेत.
ऑगस्ट २०१६ मध्ये, अनिल नाईक यांनी जाहीर केले की, ते आपल्या एकूण उत्पन्नापैकी ७५% उत्पन्न सामाजिक कार्यासाठी देणगी देतील. त्यासाठी त्यांनी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट हे शिक्षणासाठी आणि निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टची स्थापना केली.
याद्वारे गरिबांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळावी असा त्यांचा मानस आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा त्यांना मिळाल्या तर पुढील पिढी खंबीर असेल.
परिणामी जागतिक आव्हानांचा सामना करण्यास ते सज्ज असतील, असा विश्वास ते व्यक्त करतात.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगा गूगल मध्ये कार्यरत आहे तर मुलगी डॉक्टर आहे. दोन्ही जण अमेरिकेतच स्थायिक असून ते परत भारतात येतील की नाही हा त्यांचा निर्णय असेल तसेच निवृत्ती नंतर देखील आपण समाजकार्यात लक्ष देणार असून वैदिक शाळा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ते अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. भारत तसेच कॉर्पोरेट विश्वातील अनेक महत्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
२००९ मध्ये त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर यंदा त्यांना औद्योगिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पदमविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
कुठल्याही औद्योगिक घराण्याची पार्श्वभूमी नसतांना त्यांनी आपल्या अखंड मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश अभूतपूर्वच आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.