Site icon InMarathi

देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख आणि व्हीआयपी व्यक्ती ‘या’ आलिशान गाड्या वापरतात!

donald trump feature inmarathi

YouTube

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रोज बसमधून, लोकलमधून गर्दीतून धक्के खात प्रवास करताना किंवा स्वतःच्या वाहनाने सुद्धा जाताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपल्या मनात येतं की मी कुणी खास व्यक्ती झालो तर किती छान होईल?

मला माझ्या मनाप्रमाणे आरामात स्वतःच्या शानदार वाहनाने प्रवास करता येईल.

गर्दीत ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची गरज नाही. मी तर माझे स्वतःचे हेलिकॉप्टर घेईन म्हणजे गर्दीत अडकायलाच नको. असा विचार आपल्या मनात येऊन जातोच.

देशाचे प्रमुख, म्हणजे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष हे तर देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती असतात. ते कुठल्या वाहनाने प्रवास करीत असतील बरं? कायम तर ते हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करीत नाहीत.

जेव्हा जमिनीवरून प्रवास करायचा असतो तेव्हा ते कुठल्या वाहनाने प्रवास करीत असतील?

 

darpanmagazine.com

 

देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती ह्या नात्याने त्यांचे प्रवासाचे वाहन हे तर सामान्य नसेलच, ते खासच असायला हवे.

पहिले म्हणजे ते वाहन सर्व दृष्टीने सुरक्षित असायला हवे आणि दुसरे म्हणजे ते फास्ट असायला हवे, तसेच उत्तम क्वालिटीचे असायला हवे आणि आरामदायक तर असायलाच हवे.

तसेच देशाचे प्रमुख म्हटल्यावर ते वाहन दिसायला सुद्धा शानदार हवे. ह्या सर्व गोष्टी ज्या वाहनात असतील तेच वाहन पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष वापरत असतील.

आज आपण बघूया की आपले पंतप्रधान तसेच इतर राष्ट्रांचे प्रमुख कुठल्या गाडीने प्रवास करतात?

भारताचे पंतप्रधान हे बरीच वर्ष हिंदुस्थान अँबॅसिडर ही गाडी वापरत होते. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना गाड्यांची आवड होती. त्यांना फास्ट गाड्या आवडत असत.

त्यांची अधिकृत गाडी ही हिंदुस्थान अँबॅसिडर होती पण त्यांच्या संग्रही अनेक विविध खास गाड्या होत्या. त्यांच्याकडे रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज बेन्झ ५०० SEL , जोंगा अश्या अनेक गाड्या होत्या.

त्यांना स्वतः गाडी चालवायला आवडत असे. अनेक वेळा त्यांनी त्यांच्या मरून रंगाच्या मॉडिफाइड जीप सी-१७ SWB मधून देशाचा दौरा केला. संसदेत जाताना मात्र ते रेंज रोव्हर व्होग वापरत असत.

 

Cartoq.com

 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे बुलेट आणि ग्रेनेड प्रूफ गाडी वापरणारे पहिले राष्ट्रपती होते. ते मर्सिडीझ बेन्झ एस क्लास लिमोझीन वापरत असत.

त्यांनी मर्सिडीझ बेन्झ W -१४० लिमोझीन ही गाडी अनेक वर्ष वापरली. भारताच्या राष्ट्रपतींच्या गाडीला नंबर प्लेट नसून भारताचे राष्ट्रीय चिन्ह असते.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी बीएमडब्लू 7 सीरिज 760 एल आय ही गाडी वापरण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी देखील ही गाडी काही काळ वापरली.

सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गाडीत काही बदल करण्यात आले. ही गाडी गोळीबार आणि रोडसाइड बॉम्ब ह्यापासून सुरक्षित आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेंज रोव्हर स्पोर्ट्स ही गाडी सुद्धा वापरतात. ही रेंज रोव्हर HSE एसयुव्ही प्रवास करण्यासाठी जास्त आरामदायक आहे म्हणून ते ही गाडी वापरणे पसंत करतात.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ज्या इतर गाड्या तैनात असतात त्या बीएमडब्ल्यू X5 ह्या गाड्या असतात.

 

CarBlogIndia

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे औरुस सिनाट लिमोझीन ही गाडी वापरतात. ह्या आधी ते मर्सिडीज-बेन्झ एस ६०० गार्ड पुलमॅन ही गाडी वापरत होते.

ही गाडी अनेक जीवरक्षक प्रणालींनी परिपूर्ण आहे. तसेच प्रसंगी स्वसंरक्षणासाठी हल्ला करण्याची वेळ आलीच तर त्यादृष्टीने सुद्धा ही गाडी बनवण्यात आली आहे.

फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या मानकांनुसार तयार करण्यात आली आहे. ह्या महाकाय गाडीचे वजन जवळजवळ पाच टन आहे तर ह्या गाडीत 4.4 लिटरचे वी-8 इंजिन आहे.

पूर्वी युएसएसआरचे हे कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी सोव्हिएत बनावटीच्या ZIL-41052 ह्या गाडीने प्रवास करीत असत आणि ह्या ताफ्यात GAZ Chaika ह्या गाड्या सुद्धा होत्या.

“डे ऑफ व्हिक्टरी”च्या मिल्ट्री परेडमध्ये आजही ह्या गाड्या असतात. बोरिस येल्टसिन ह्या रशियन फेडरेशनच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांनी पहिली विदेशी बनावटीची गाडी वापरली. W140 मर्सिडीझ बेन्झ एस क्लास ही ती गाडी होती.

त्यानंतर मर्सिडीझ बेन्झ W220 आणि नंतर W221 ह्या दोन गाड्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी वापरल्या.

 

youtube.com

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘कॅडिलॅक वन’ ‘बीस्ट’ किंवा ‘लिमोझीन वन’ ही गाडी वापरतात. बीस्ट ह्या नावाला साजेशीच ही गाडी अवाढव्य आणि आक्रमक आहे. पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अनमॉडिफाइड गाड्या वापरत असत.

नंतर फ्रँकलिन रुझवेल्ट ह्यांच्या काळात “सनशाईन स्पेशल” ही पहिली सिक्रेट सर्व्हिस स्टँडर्ड्स नुसार तयार केलेली गाडी वापरण्यात आली.

जॉन एफ केनेडी ह्यांची हत्या होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांच्या गाडीला तेवढी सुरक्षा नव्हती. पण केनेडी ह्यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष सील्ड आणि हत्यारबंद गाड्यांचा वापर करू लागले. २००९-२०१८ पर्यंत स्टेट कारला पाच इंच जाडीचा बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण होते.

माजी राष्ट्राध्यक्षांच्या गाड्या तसेच बदलण्यात आलेल्या गाड्या जेव्हा ताफ्यातून काढून टाकण्यात येतात तेव्हा त्या पूर्णपणे नष्ट केल्या जातात.

ह्याचे कारण असे की राष्ट्राध्यक्षांच्या गाडीच्या खास सुरक्षा व्यवस्थेबद्दल कुणाला कळू नये. सध्याच्या कॅडिलॅक गाडीतील बुलेटप्रूफ खिडकीच्या काचा पाच इंच जाड व गाडीचे दरवाजे ८ इंच जाड आहेत.

ही गाडी 6.4 टन इतकी जड आहे. ह्या गाडीची किंमत 1.6 दशलक्ष डॉलर असल्याचे म्हटले जाते.

 

youtube.com

 

हाँगकी ह्या चिनी बनावटीच्या कारचे उत्पादन सुरु होण्याआधी चीनचे नेते विदेशी बनावटीच्या गाड्या वापरीत असत.

चेअरमन माओ झिडॉंग हे स्टॅलिन ह्यांनी दिलेली बुलेट प्रूफ ZIS-115 ही गाडी वापरत असत.

तर चीनचे पहिले प्रीमिअर झो एनलाई हे आधी GAZ-12 ZIM हे सोव्हिएत बनावटीची लिमोझीन वापरत असत आणि नंतर त्यांनी ZIL-115 ही रशियन लिमोझीन वापरली.

नव्वदीच्या काळात चिनी नेते लहान अंतरासाठी टोयोटा कोस्टर किंवा Hongqi CA630 ही मिनीबस वापरत असत. चीनचे आताचे प्रमुख जिनपिंग हे Hongqi L5 ही लिमोझीन गाडी वापरतात.

ब्रिटनचा राजपरिवार पूर्वीपासूनच लिमोझीन वापरत आला आहे. सम्राट एडवर्ड सप्तम Daimler कंपनीचे मॉडेल्स वापरत असत.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय ह्या ‘बेंटले स्टेट लिमोझीन ही गाडी वापरतात.

ही गाडी बेंटले ह्या कंपनीने खास राणी एलिझाबेथ ह्यांच्यासाठी बनवली आहे. अश्या केवळ दोनच गाड्या बेंटले कंपनीने बनवल्या आहेत. ह्या गाडीत 6.7 लिटरचे ट्वीन टर्बो चार्जर असलेले व्ही-8 इंजिन आहे.

ह्या गाडीची किंमत १५ दशलक्ष डॉलर आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश पंतप्रधान हे जॅग्वार एक्सजे ह्या गाडीने प्रवास करतात. ही गाडी शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असते.

ह्या ताफ्यात लॅन्ड रोव्हर किंवा रेंज रोव्हर ह्या गाड्या सुद्धा असतात.

 

Leithcars.com

 

व्हॅटीकनचे प्रमुख असलेले पोप अनेक गाड्या वापरतात पण त्यातली सगळ्यात प्रसिद्ध आहे पांढरी मर्सिडीज बेन्झ एम क्लास ही एसयूव्ही! पोप ह्यांचा अधिकृत वाहनास पोपमोबिल असे नाव आहे.

जेव्हा पॉप सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये लोकांची भेट घेण्यास जातात तेव्हा ते ओपन टॉप असलेली मर्सिडीझ बेन्झ जी क्लास ही गाडी वापरतात.

अश्या ह्या राष्ट्रप्रमुखांच्या गाड्यांना ऑफिशियल स्टेट कार असे म्हटले जाते. ह्या ऑफिशियल स्टेट कार्स ह्या खास लोकांसाठी खास बनवून घेतल्या जातात.

त्यात अनेक स्पेशल फीचर्स असतात जे आपल्यासारख्या जनसामान्यांना माहित नसतात. आणि ते माहित होऊ नये ह्याची काळजी सुद्धा घेतली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version