भारतीय लष्कर सिद्धता : फक्त सक्षमच नाही तर अत्यंत घातक आणि महासंहारक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : स्वप्नील श्रोत्री
===
भारत हा अनादिकाळापासून शांतताप्रिय देश होता आणि आहे. मात्र तेव्हाही दुर्बळ नव्हता आणि आजही नाही. जिसके हात मे लाठी, बात उसीकी चलेगी अशा आशयाची एक म्हण आहे.
जागतिक पटलावर जर सक्षम म्हणून उभे राहायचे असेल तर आपले लष्करी सामर्थ्य मजबूत असणे गरजेचे आहे.
इतिहासात जर पाहिले तर आपल्याला ह्याचा प्रत्यय येतो. सिकंदरने लष्करी बळावरआपले सामर्थ्य वाढविले, नेपोलियन बोनापार्टने घोडदळ व युद्धकौशल्याच्या बळावर युरोप पादाक्रांत केला.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना हरविणारा अहमदशाह अब्दाली, आपल्या प्रचंड तोफखान्याच्या बळावर भारतात मुघल सत्तेची पाळेमुळे रुजविणारा झहिरुद्दीन मोहमंद बाबर, अॅडॉल्फ हिटलर, बेनिटो मुसेलिनी अशी अनेक उदाहरणे आहेत.
आजच्या परिस्थितीत हिंदी महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाकिस्तानकडून दररोज होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे भारताला आपली
लष्करी सज्जता कायम राखणे गरजेचे असते.

भारतीय लष्कराचा विचार केला तर भूदल नौदल व वायुदल असे तीन विभाग भारतीय लष्करात आहेत. त्याशिवाय भारत एक अण्वस्त्रधारी
राष्ट्र असून अत्यंत घातक अशी क्षेपणास्त्रे भारत जवळ राखून आहे.
कोणत्याही परिस्थितीत युद्धाचे पारडे फिरवण्याची यांची ताकद असून त्यांच्या क्षमतेचा घेतलेला हा आढावा …
अस्त्र :
हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे रडार विरोधी क्षेपणास्त्र असून हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहे. हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या अस्त्राचा वेग ४ मॅक पेक्षा जास्त असून याचा पल्ला ६० ते ८० किलोमीटर इतका आहे.
के १०० : अस्त्र क्षेपणास्त्राप्रमाणेच हे सुद्धा भारतीय बनावटीचे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात आहे. ३.३
मॅक वेग असलेल्या के १०० चा पल्ला ३०० ते ४०० किलोमीटर इतका आहे.
आकाश: जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या आकाश हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ३० ते ३५ किलोमीटर
तर वेग २.५ ते ३.५ मॅक इतका आहे.

बराक ८ : भारत व इस्त्राईल यांच्या संयुक्त उपक्रमांतून बनवण्यात आलेले हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ह्याची जमिनीवरून हवेत मारा
करण्याची क्षमता आहे. बराक ८ चा वेग २ मॅक तर पल्ला १०० किलोमीटर आहे.
त्रिशूल : भारतीय बनावटीचे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत हल्ला करण्यासाठी बनविण्यात आले आहे. कमी पल्ला असलेले त्रिशूल ९ किलोमीटर पर्यंत लक्ष्याचा भेद करू शकते.
पृथ्वी एअर डिफेन्स : वातावरणाच्या बाहेर जाऊन हल्ला परतवून लावण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र ५ मॅक पेक्षा जास्त वेगाने जाऊ शकते. ८० किलोमीटर पल्ला असलेले भारतीय बनावटीचे हे अस्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी वापरतात.
अॅडव्हान्स एअर डिफेन्स : वातावरणाच्या अंतर्गत आलेला हल्ला परतवून लावण्यासाठी या अस्त्राचा उपयोग होतो. हे संपूर्ण स्वदेशी अस्त्र असून ४.५ मॅक वेगासह ३० किलोमीटरचा पल्ला गाठू शकते.
पृथ्वी डिफेन्स व्हेइकल : जमिनीवरून हवेत मारा करून आलेला हल्ला परतून लावण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. पृथ्वी डिफेन्स व्हेइकल
भारतीय बनावटीचे असून वातावरणाच्या बाहेरील हल्ल्यांसाठी याचा उपयोग करतात. ह्याची क्षमता १२० किलोमीटर पर्यंत आहे.

निर्भय : संपूर्ण स्वदेशी असलेले हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रधारी असून ते कृझ मिसाईल या प्रकारात मोडते. ह्याचा वेग ०.८ मॅक असून पल्ला १००० ते १५०० किलोमीटर इतका आहे.
ब्रम्होस : जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र म्हणून गणल्या गेलेल्या ब्रम्होस क्षेपणास्त्र ची निर्मिती भारत व रशिया यांनी एकत्रित केली आहे.
अण्वस्त्रधारी असलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर इतकाआहे.
ब्रम्होस २ : ब्रम्होस चेच पुढच्या पिढीचे हे क्षेपणास्त्र असून संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. कृझ मिसाईल या प्रकारात हे क्षेपणास्त्र येत असून ह्याचा वेग ७ मॅक तर पल्ला ३३० किलोमीटर इतकाआहे. ब्रम्होस २ हे भारताचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे.
अग्नी १ : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी १ हे भारतीय बनावटीचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. मध्यम पल्ल्याच्या ह्या
क्षेपणास्त्राचा वेग ७.५ मॅक असून ७०० ते १२५० किलोमीटर पर्यंत हल्ला करण्याची ह्याची क्षमता आहे.
अग्नी २ : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी २ हे सुद्धा भारतीय बनावटीचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. मध्यम पल्ल्याच्या ह्या
क्षेपणास्त्राचा वेग १२ मॅक असून २००० ते ३००० किलोमीटर चा पल्ला आहे.

अग्नी ३ : अग्नी तालिकेतील हे तिसरे क्षेपणास्त्र असून अग्नी १ व अग्नी २ प्रमाणेच हे सुद्धा संपूर्ण भारतीय बनावटीचे व अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र
आहे. ह्याचा पल्ला ३५०० ते ५००० किलोमीटर तर वेग ५ ते ६ मॅक इतका आहे.
अग्नी ४ : अग्नी तालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राचा
पल्ला ३००० ते ४००० किलोमीटर तर वेग ७ मॅक इतका आहे.
पृथ्वी १ : डी. आर. डी. ओ ने विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे हे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. ह्याचा पल्ला १५० किलोमीटर इतका आहे.
पृथ्वी २ : स्वदेशी बनावटीच्या कमी पल्ल्याच्या पृथ्वी २ क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी होतो. हे डी. आर. डी.
ओ ने विकसित केले असून ह्याचा पल्ला ३५० किलोमीटर इतका आहे.
पृथ्वी ३ : पृथ्वी तालिकेतील हे तिसरे स्वदेशी अस्त्र असून याचा पल्ला ३५० ते ६०० किलोमीटर इतका आहे.
धनुष : भारतीय बनावटीच्या धनुष चा उपयोग जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी होतो. याचा पल्ला ३५० ते ६०० किलोमीटर इतका
आहे.
प्रहार ( प्रगती ) : भारतीय बनावटी चे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. २.०३ मॅक वेगासह
१५० किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा भेद प्रहार करू शकते.
शौर्य : डी. आर. डी. ओ ने विकसित केलेले शौर्य हे भारतीय क्षेपणास्त्र अण्वस्त्रधारी असून पृथ्वी तालिके प्रमाणेच जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

मध्यम पल्ल्यासह ७५० ते १९०० किलोमीटरवर पर्यंतचे लक्ष्य ७.५ मॅक वेगाने भेदण्यास शौर्य सक्षम आहे.
सागरिका ( के -१५) : स्वदेशी बनावटीच्या सागरिका क्षेपणास्त्राचा वापर भारतीय नौदलाकडून केला जातो. हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून ह्याचा वापर पाण्यातून पाण्यात, पाण्यातून जमिनीवर, पाण्यातून हवेत मारा करण्यासाठी होतो. सागरिकाचा पल्ला ७०० ते १९० किलोमीटर
असून वेग ७ मॅक पेक्षा अधिक आहे.
के ४ : भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हे दुसरे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून सागरिका प्रमाणेच पाण्यातून कोठेही हल्ला करण्यास सक्षम आहे. ह्याचा पल्ला ३५०० ते ५००० किलोमीटर असून के ४ हे ७ मॅक पेक्षा अधिक वेगवान आहे.
के ५ : के तालिकेतील हे पुढचे क्षेपणास्त्र असून जगातील संहारक अस्त्रात ह्याची गणना होते. भारतीय बनावटीच्या या क्षेपणास्त्राचा पल्ला प्रचंड
मोठा असून ६००० किलोमीटरपर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याचा वेध घेण्यास के ५ सक्षम आहे. ह्याचा वेग ४.५ मॅक इतका आहे.
अश्विन : के तालिकेप्रमाणेच संरचना असलेले अश्विन हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाकडे असून कोठूनही कोठेही हल्ला करण्यास सक्षम आहे.
अश्विन चा वेग ४.५ मॅक तर पल्ला १५० ते २०० किलोमीटर आहे.
नाग : डी. आर. डी. ओ ने विकसित केलेले नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. गाईडेड मिसाईल ह्या प्रकारात मोडणारे नाग चा वेग २३०
मीटर प्रतिसेकंद तर पल्ला ४ किलोमीटर आहे.
हेलिना : नाग प्रमाणेच रचना असलेले हे क्षेपणास्त्र गाईडेड मिसाईल ह्या प्रकारात मोडते. रणगाडा विरोधी ह्यी क्षेपणास्त्राचा वेग २३० मीटर
प्रतिसेकंद तर पल्ला ७ ते ८ किलोमीटर इतका आहे.
अमोघा १ : स्वदेशी बनावटीचे हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून हे सुद्धा गाईडेड मिसाईल या प्रकारात मोडते. ह्याचा वेग २३० मीटर
प्रतिसेकंद तर पल्ला २.८ किलोमीटर इतका आहे.
अग्नी-५ : भारताचे ब्रह्मास्त्र

जगातील अत्यंत घातक व महासंहारक अस्त्रांपैकी एक असलेले अग्नी ५ हे क्षेपणास्त्र भारतीय बनावटीचे म्हणजेच डी. आर. डी. ओ ने विकसित
केलेले आहे.
प्रचंड प्रमाणात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचा विकास जमिनीवरून जमिनीवर हल्ल्यासाठी केला गेला
आहे. अग्नी-5 हे अंतरखंडीय क्षेपणास्त्र असून अशाप्रकारचे क्षेपणास्त्र अत्यंत तुरळक देशांकडेच आहे.
५००० ते ८००० किलोमीटर पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण आशिया, युरोप व आफ्रिकेचा पूर्व भाग येतो.
मॅक म्हणजे काय ?
मॅक हे आवाजाचा हवेतील वेग मोजणारे एकक असून एक मॅक म्हणजे ३३२ मीटर प्रतिसेकंद किंवा ११९५ किलोमीटर प्रतितास इतके असते.
याशिवाय भारताकडे असलेले अर्जून, टि-९०, टि-७२, अजैय यांसारखे शक्तिशाली रणगाडे, तोफा, तेजस, सुखोई, बोईंग सारखी लढाऊ विमाने, आयएनएस विक्रमादित्य सारखी अजस्त्र लढाऊ युद्धनौका तर आयएनएस चक्र सारखी महासंहारक पाणबूडी भारतीय सामर्थ्यात भरच घालतआहे.
मिलिट्री बॅलन्सच्या अहवालानुसार भारताचे संरक्षण बजेट हे ५२.५ बिलियन डॉलर इतके प्रचंड असून ते जगातील पाचवे मोठे संरक्षण बजेट आहे.
परंतु या सामर्थ्याच्या बळावर भारताने कधीही कोणत्याही राष्ट्राला धमकावण्याचा प्रकार केल्याचे इतिहासात उदाहरण नाही. किंबहुना भारताने अण्वस्त्रांच्या बाबतीत नो फस्ट यूज पॉलिसीचा अवलंब केला आहे. मात्र, अशातच या धोरणावर भारत फेरविचार करत आहे असं दिसतंय.

दुसऱ्या राष्ट्रांच्या अंतर्गत प्रश्नात अमेरिकेसारखी काही राष्ट्रे आपल्या लष्करी बळावर कायमच लुडबुड करीत असतात. मात्र मालदिवमध्ये
अस्थिरता आल्यावर तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने १९९८ ला राबविलेले ऑपरेशन कॅक्टस किंवा लिट्टेच्या विरोधात
लढणाऱ्या श्रीलंकन सरकारच्या मदतीसाठी भारताने १९८७ ला राबविलेले ऑपरेशन विराट, म्यानमारमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा उरी
हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्याच घरात भारतीय सैन्याने केलेला हल्ला हे जगाला विसरून चालणार नाही.
भारत हा अनादीकाळापासून शांतताप्रिय देश होता आणि आहे. मात्र तो तेव्हाही दुर्बळ नव्हता आणि आजही नाही.
भूटानच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आज भारतीय लष्कराच्या खांद्यावर आहे. जगातील अनेक राष्ट्रांबरोबर भारताचा लष्करी सराव असतो तर अनेक राष्ट्रांना भारत लष्करी प्रशिक्षण देतो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आजपर्यंतच्या ६३ शांतीसेना कार्रवाई पैकी ५० पेक्षा जास्त कारवाईमध्ये भारतीय सैन्याने मोलाची भूमिका बजावलेली आहे.
त्यामुळे सतत युद्धाच्या धमक्या देणारा पाकिस्तान व पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताबद्दल मनात वैरभाव ठेवणाऱ्या राष्ट्रांनी यातून धडा घ्यावा एवढीच माफक अपेक्षा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.