Site icon InMarathi

करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले, मात्र दुर्दैवाने ही सौंदर्यवती अल्पायुषी ठरली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

घरातल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे खरं तर ती ह्या क्षेत्रात आली. बालपणापासूनच तिचं मधाळ हास्य आणि नटखट चेहऱ्यामुळे ती रुपेरी पडद्यावर उठून दिसत असे.

तिच्या तारुण्यात तर तिच्या ह्या सुंदर स्मितहास्याचे लाखो लोक चाहते झाले. तिने करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले. पण ही सौंदर्यवती मात्र दुर्दैवाने अल्पायुषी ठरली.

होय! तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. आपण मधुबाला ह्या शापित अप्सरेबद्दलच बोलतोय.

मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. तिने जरी ह्या आयुष्याच्या रंगमंचावरून अकाली एक्झिट घेतली असली तरीही तिच्या सौंदर्याचे व मधाळ हास्याचे आजही लाखो लोक चाहते आहेत.

तिच्यासारखी रूपवान अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दुसरी झाली नाही. निरागस चेहरा, खट्याळ डोळे आणि गोड स्मितहास्य आणि तितक्याच ताकदीचा अभिनय असा सुरेख संगम मधुबालाच्या रूपाने रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाला.

 

 

हे ही वाचा –

===

 

व्हॅलेंटाईन डे च्याच दिवशी ह्या अप्सरेचा वाढदिवस म्हणजे अतिशय सुंदर योगायोगच म्हणावा लागेल. पण प्रेमाच्या महिन्यातच मधुबाला हे जग सोडून गेली.

१९५० सालीच मधुबालाला कळून चुकले होते की तिला हृदयाचा आजार आहे. पण तिने चित्रपटसृष्टीतील लोकांना ह्याबाबत काही कळू दिले नाही.

परंतु जेव्हा तिची तब्येत ढासळायला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांना कळून चुकलेच की ती आजारी आहे. कधी कधी सेटवरच तिची तब्येत बिघडायची.

 

 

जेव्हा ती उपचारांसाठी लंडनला गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करून घेण्याची परवानगी दिली नाही कारण त्या ऑपरेशन दरम्यानच तिचा जीव जाण्याची शक्यता होती. तिला डॉक्टरांनी सांगितले की ती आता जास्तीत जास्त एक वर्ष काढू शकेल.

पण तिने तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढची नऊ वर्षे रसिकांना उत्तमोत्तम चित्रपट दिले. आयुष्याची शेवटची काही वर्षे तिला मनासारखे काम करता आले नाही.

ती आजारीच असायची. पण मृत्यू समोर दिसत असून देखील तिने तिला जमेल तितके काम करून चित्रपटसृष्टी गाजवली.

 

 

१४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीच्या एका पश्तून कुटुंबात मुमताज बेगम जहाँ देहलवी म्हणजेच मधुबालाचा जन्म झाला होता. तिच्या आईवडिलांना तिच्याशिवाय आणखी चार अपत्ये होती.

तिच्या जन्मानंतर एका व्यक्तीने तिच्याबाबतीत असे भविष्य वर्तवले होते की ती तिच्या आयुष्यात खूप ख्याती कमावेल, संपत्ती मिळवेल, पण तिचे आयुष्य अतिशय दु:खी असेल.

ह्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून तिचे वडील अयातुल्लाह खान दिल्लीहून मुंबईला आले. मुंबईत त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांना उपजीविकेसाठी रिक्षा चालवावी लागली. १९४२ पासून मधुबालाने चित्रपटांतून भूमिका करणे सुरु केले.

तेव्हा ती “बेबी मुमताज” नावाने चित्रपटांत काम करीत असे.

हे ही वाचा –

===

 

 

घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिला शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही आणि चित्रपटातून कामे करावी लागली. पण तिने परिस्थितीपुढे हार मानली नाही. वयाच्या १७ व्या वर्षी तिने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. गाडी चालवण्याची तिला विशेष आवड होती.

वयाच्या बाराव्या वर्षीच ती गाडी शिकली होती. पुढे जेव्हाही तिला निवांत वेळ मिळत असे तेव्हा ती लॉन्ग ड्राइव्हला जात असे.

इतकी मोठी अभिनेत्री आणि इतकी सौंदर्यवती असून देखील तिला महागडे कपडे आणि दागिने ह्यात तिला रस नव्हता. ह्यावर पैसे खर्च करणे तिला आवडत नव्हते. लहान लहान गोष्टींतून ती आनंद मिळवत असे.

 

 

मधुबालाने तिच्या अवघ्या ३६ वर्षाच्या आयुष्यात अनेक संस्मरणीय भूमिका केल्या.

तिची तब्येत बरी नसतानाही, मृत्यू समोर दिसतानाही तिने निर्मात्यांचे नुकसान केले नाही व साइन केलेले चित्रपट पूर्ण केले. त्या चित्रपटांत तिला बघताना असे कुठेही जाणवत नाही की ती इतकी आजारी आहे.

तिच्या सौंदर्याची व अभिनयाची जादूच तशी होती की बघणारा हरवून जातो.

मधुबालाला असा आजार होता की तिच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात रक्त तयार होत असे व नंतर तिच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होत असे.

आणि हे अतिरिक्त रक्त जोवर बाहेर काढले जात नाही तोवर तो रक्तस्त्राव होणे थांबत नसे. कधी कधी तर ह्यामुळे तिला श्वास घेणे सुद्धा कठीण होत असे. तिच्या हृदयाला छिद्र होते आणि तिची फुफ्फुसे सुद्धा कमकुवत होती.

 

 

इतक्या दुर्धर आजारात सुद्धा तिने तिला जमेल तसे काम करणे सुरूच ठेवले.

१९५८-५९ साली मधुबाला के आसिफ ह्यांच्या मुघल ए आजम ह्या चित्रपटाचे शूटिंग करत होती तेव्हा तिला चित्रकरणासाठी जैसलमेरला जावे लागले. एरवी ती तब्येतीसाठी केवळ उकळलेले पाणी पीत असे.

पण ह्या जैसलमेरच्या वाळवंटात तिला कधी कधी विहिरीचे दूषित पाणी प्यावे लागायचे. तरीही तिने तब्येतीची तक्रार न करता ही भूमिका उत्तम प्रकारे केली.

 

 

हे ही वाचा –

===

 

ह्या चित्रीकरणात तिला खऱ्या लोखंडाच्या दोरखंडाने बांधले होते पण तिने तब्येत बरी नसतानाही सगळे सहन केले. ती म्हणायची की अनारकलीची भूमिका करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते.

“ती इतकी प्रोफेशनल होती की अतिशय तत्परतेने काम करीत असे. प्रसंगी जेवण नाही झाले तरी चालेल, थर्ड क्लासने प्रवास करावा लागला तरी चालेल पण काम वेळच्यावेळी पूर्ण करण्याचा तिचा आग्रह असायचा”,

असे दिग्दर्शक केदार शर्मा ह्यांनी एकदा सांगितले होते. तिच्या ह्याच कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ती एक महान अभिनेत्री ठरली. अमेरिकेच्या थिएटर आर्टस् ह्या मासिकाने तिला “जगातील सर्वात मोठी अभिनेत्री” म्हणून तिचा गौरव केला होता.

 

 

चित्रपटाचे चित्रीकरण करताना तिला कधी कधी इतका त्रास व्हायचा की तिला श्वास घेणे अवघड व्हायचे, तेव्हा तिला दर चार तासांनी ऑक्सिजन लावावा लागायचा.

पण तरीही तिने तिचा करार पूर्ण करत चित्रपट पूर्ण केले. शेवटच्या काही महिन्यात तर ती इतकी अशक्त झाली होती की जणू हाडांचा सापळाच!

तिचा अखेरचा चित्रपट “चालाक” होता. ह्यात तिच्याबरोबर राज कपूर होते पण तिच्या तब्येतीमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

तिच्या खालावलेल्या तब्येतीमुळे चित्रीकरण अर्ध्यातच थांबवावे लागले.

 

 

तिला बिमल रॉय ह्यांच्या “बिराज बहू” ह्या सिनेमात काम करण्याची खूप इच्छा होती. ती अनेक वेळा बिमल रॉय ह्यांना भेटायला त्यांच्या ऑफिस मध्ये गेली.

पण दुर्दैवाने काही कारणाने बिमल रॉय त्यांच्या ह्या सिनेमासाठी मधुबालाला साइन करू शकले नाहीत आणि मधुबालाची ही इच्छा अर्धवटच राहिली.

शेवटपर्यंत मधुबालाच्या मनात ह्या गोष्टीची खंत राहिली. बिराज बहू हा चित्रपट १९५४ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट शरतचंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या एका बंगाली कादंबरीवर आधारित होता.

 

 

ह्यात कामिनी कौशल ह्यांनी भूमिका केली होती. त्यांच्याबरोबर प्रेमनाथ व दिलीप कुमार ह्यांच्याही भूमिका होत्या.

मधुबालाला विवाहासाठी तीन प्रस्ताव आले होते. भारत भूषण, प्रदीप कुमार व किशोर कुमार ह्यांनी तिला लग्नासाठी विचारले होते. मधुबालाला मृत्यूआधी विवाह करायची इच्छा होती हे किशोर कुमार ह्यांना माहिती होते.

 

 

मधुबाला लंडनहून परत आल्यावर त्यांनी १९६० साली विवाह केला पण किशोर कुमार ह्यांच्या मातापित्यांनी कधीही मधुबालाला सून म्हणून स्वीकारले नाही.

त्यांना असे वाटत होते की किशोर कुमार ह्यांचे पहिले लग्न मधुबालामुळेच मोडले. म्हणून त्यांनी कधीही मधुबालाला स्वीकारले नाही.

 

 

आजारपणामुळे अत्यंत अशक्तपणा आलेल्या मधुबालाला शेवटचे काही महिने खूप त्रास झाला. अखेर ह्या स्वर्गीय अप्सरेने २३ फेब्रुवारी १९६९ साली जगाचा निरोप घेतला.

मधुबालाला “व्हीनस ऑफ द स्क्रीन” म्हटले जात असे. पण तिच्या ह्या आरस्पानी सौंदर्याला अल्पायुष्याचा शाप होता. तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण भारत हळहळला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version