पुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
कुप्रसिद्ध इलियास काश्मिरी हा अत्यंत धोकादायक अतिरेकी होता. तो हरकत अल जिहाद अल इस्लामी (Huji ) ह्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता.
भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तो प्रमुख सूत्रधार होता. आणि अल कायदाचा पाकिस्तानमधील ओप्रेशनल लीडर होता.
जगातील मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत त्याचेही नाव होते असा हा धोकादायक दहशतवादी होता.
इलियास काश्मिरी आणि तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ह्यांना पकडण्यासाठी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात नऊ दहशतवादी व इलियास काश्मिरी ठार झाला.
ह्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला डेडलाईन दिली होती. पण तो डेडलाईनचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच अमेरिकेने या हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

ओसामा बीन लादेनला ठार मारल्यानंतर महिन्याभरातच इलियासचा काटा काढण्यास अमेरिकेला यश आले. ह्या इलियास काश्मिरीचा २६/११ च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग होता.
ह्या धोकादायक दहशतवाद्याला पकडण्याचे प्रयत्न अमेरिका अनेक वर्षांपासून करत होती. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने ५० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस देखील जाहीर केले होते.
जगातील सर्वात धोकादायक मनुष्यांपैकी एक म्हणून त्याचे नाव घेतले जात असे. काश्मीर मध्ये त्याने अनेक अतिरेकी कारवाया करून सर्वांना हैराण केले होते.
तसेच अफगाणिस्तानमध्ये रशियाविरुद्ध कारवाया करण्यात सुद्धा त्याचा सक्रिय सहभाग होता. भारतातून तुरुंगातून तो शिताफीने निसटला होता. काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धाड टाकली होती.
ह्याचा बदला म्हणून त्याने त्याच्या माणसांसह एका भारतीय सैन्य अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याचा शिरच्छेद केला आणि नंतर त्या सैन्य अधिकाऱ्याच्या मृतदेहाची विटंबना करत धिंड काढली होती इतका तो क्रूर आणि निर्दयी होता.
२००२ च्या फेब्रुवारी महिन्यात एका भारतीय सैनिकाच्या कापलेल्या शिराची विटंबना करतानाचा त्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला होता. (लिंक)

पुण्यात २००९ साली जर्मन बेकरी मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे त्याचाच हात होता. तसेच देशविदेशात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
तसेच पाकिस्तानच्या कराची मध्ये पाकिस्तानी नौसेनेच्या बेसवर जो हल्ला झाला होता त्यात सुद्धा ह्याचाच हात होता.
ओसामा बीन लादेन नंतर तोच अल कायदाचा प्रमुख बनेल असा अमेरिकेचा कयास होता म्हणूनच तो हाती लागणे महत्वाचे होते. युरोपमधील अनेक मोठ्या शहरांत मुंबई सारखेच हल्ले घडवून आणण्याचा काश्मिरीचा प्लॅन होता.
३ जून २०११ च्या रात्री वझिरीस्तानच्या दक्षिणेला असलेल्या वाना ह्या गावापासून २० किमी लांब अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. अमेरिकेने पहिल्यांदा ड्रोन विमानातून दोन क्षेपणास्त्रे सोडली आणि नंतर थोड्याच वेळात आणखी दोन क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्यात आला.
ह्या हल्ल्यात एकूण नऊ दहशतवादी ठार झाले त्यात इलियास काश्मिरीचाही समावेश होता.
हा हल्ला होण्याच्या दहा दिवस आधीच इलियास काश्मिरी खैबर ह्या दुर्गम भागातून वानामध्ये आला होता. ह्या अतिरेक्यांचा काटा काढण्यासाठी अमेरिका व पाकिस्तान ह्यांनी संयुक्त मोहीम राबवली होती.

अमेरिकेने पाकिस्तानला ह्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी डेडलाईन देखील दिली होती. पण ती डेडलाईन संपण्याच्या आधीच अमेरिकेद्वारे अचानक हा हल्ला करण्यात आला.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला पाकिस्तान मधून गुप्त संदेश मिळाला होता आणि त्या संदेशाद्वारे अमेरिकेला अतिरेक्यांचा ठावठिकाणा सापडला.
सुरुवातीला काश्मिरीचा मृत्यू झाला आहे ह्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही कारण ह्यापूर्वी सुद्धा सप्टेंबर २००९ साली अश्याच एका हल्ल्यात त्याच्या मृत्यूची बातमी आली होती पण तो खोटी ठरली.
त्याने स्वतःच एक मुलाखत देऊन त्याच्या मृत्यूची बातमी ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले. म्हणूनच ह्या वेळी तरी तो खरच ठार झाला का ह्याबद्दल खरी माहिती नव्हती.
अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन ह्यांनी २७ मे २०११ रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबादला अचानक व अनपेक्षित भेट दिली. त्यांनी नागरी सेवा प्रमुखांची तसेच लष्करप्रमुखांची देखील भेट घेतली.
आणि कदाचित त्याच भेटीत ह्या ड्रोन हल्ल्याची योजना आखली जाऊन त्या योजनेची तातडीने अंमलबजावणी झाली असावी.

पाकिस्तानचा उत्तर वझिरीस्तान हा भाग संवेदनशील मानला जातो. ह्याच भागात अनेक दहशतवादी कारवाया चालतात. इथे सतत अस्वस्थ वातावरण असते. ह्याच भागात इलियास काश्मिरी व इतर दहशतवादी आहेत अशी बातमी अमेरिकेपर्यंत पोहोचली आणि तात्काळ ह्या भागावर कारवाई करण्यात आली.
हा सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर इतर दहशतवादी व अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी भेट दिली व इलियास काश्मिरी खरंच ठार झाल्याचे जाहीर केले.
हा हल्ला अतिशय भीषण असल्याने मृतदेहांची स्थिती ओळखण्याच्या पलीकडे झाली होती. म्हणूनच सर्वच मृत अतिरेक्यांच्या शरीरावर तातडीने अंत्यसंस्कार करून त्यांचे दफन करण्यात आले.
अबू हंझाला ह्या हुजीच्या प्रवक्त्याने इलियास काश्मिरीच्या मृत्यूला दुजोरा दिला. ह्या आधी ह्या व्यक्तीने कधीही असे सार्वजनिक विधान केले नव्हते. हुजीचे जे काही संदेश असतील ते तो निनावी प्रसिद्ध करीत असे.
पण इलियास काश्मिरीच्या मृत्यूची बातमी त्याने मीडियाला हाताने लिहून त्याच्या नावासकट फॅक्स केली होती.
जेव्हा काश्मिरीच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली तेव्हा इथल्या स्थानिक लोकांना ह्या सगळ्याची कल्पना आली. तोपर्यंत त्यांचा असा समज होता की अमेरिकेने नेहमीप्रमाणे त्यांचे काहीतरी ऑपरेशन चालवले आहे.

त्यांना कल्पनाच नव्हती की इतका धोकादायक, “मोस्ट वॉन्टेड” दहशतवादी त्यांच्या आजूबाजूला वावरत होता किंवा इतक्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याचा त्यांच्या गावात मृत्यू झाला आहे.
ही सगळी गुप्त कारवाई अचानक झाली होती आणि त्यात काश्मिरीचा मृत्यू हा लादेन प्रमाणेच रहस्यमयरित्या झाला.
अनेक लोकांना आजही लादेन मेलाय हे खरे वाटत नाही. तो पकडला जाऊन त्याला ठार करणे शक्यच नाही असे अनेकांना वाटते, तसेच काश्मिरी सुद्धा खरंच मेलाय ह्यावर सुद्धा अनेकांचा विश्वास बसत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.