आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक तेजस्वी तारा, ज्यांचा अथक परिश्रमामुळे आजचा स्वातंत्र्य भारत अस्तित्वात येऊ शकला आहे. सुभाष बांबूच एकूण आयुष्य हे प्रचंड क्रांतिकार्याने भरलं आहे.
सुभाष बाबू हे प्रचंड तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व होते इतके तत्वनिष्ठ की त्यांनी स्वतःचा तत्वांसाठी महात्मा गांधीसारख्या तत्कालीन भारतीय स्वातंत्र्यता चळवळीचा भीष्म पितामहाशी वैर पत्करलं होतं!
सुभाषचंद्र बोस हे सुरुवातीपासूनच क्रांतिकारी विचारांचे होते, यातूनच त्यांनी १९२८ साली ब्रिटिशांच्या विरोधात दंड उपसत त्यांचा नकळत प्रतिसैन्य तयार करून त्याचं संचलन घडवून आणलं होतं, ज्यामुळे ब्रिटिशांचे धाबे दणाणले होते.
सुभाषबाबूंच्या मनात असलेल्या ब्रिटिश सत्तेच्या रागापोटी त्यांनी स्वातंत्र्यता चळवळीत उडी घेतली.
भारतीय स्वातंत्र्यता चळवळीचा सर्वात प्रमुख घटक म्हणून त्यावेळी राष्ट्रीय सभा अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यरत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषबाबूंनी १९३० साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबरोबर सुभाषबाबूंनी आपलं कौशल्य दाखवलं, त्यांनी बंगाल प्रांतात काँग्रेसजनांचे संघटन मजबूत केले, त्यांचा ह्या कार्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.
सुभाषबाबु हे प्रखर डाव्या विचारांचे नेते होते. त्यांचा समाजवादी संकल्पनांवर प्रचंड विश्वास होता. त्यांचा नेतृत्व कौशल्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये लोकप्रिय होत राहिले.
सुभाष बाबूंची कीर्ती महात्मा गांधीपर्यंत पोहचली होती. पुढे जाऊन सुभाषबाबू आणि महात्मा गांधींची भेट घडून आली.
सुभाषबाबू हे प्रचंड पुरोगामी विचारांचे नेते आणि महात्मा गांधी हे धार्मिक नेते होते परंतु असं असतांना देखील दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रचंड आदरभाव होता.
जवाहरलाल नेहरू ह्यांची सुभाषचंद्र बोसांशी खास मैत्री होती व तेच गांधी व बोस यांच्यातील दुव्याचं काम करीत होते. दोघींवर गांधीचं ममत्व होतं असं म्हटलं जातं.
पुढे जाऊन १९३८ साली गुजरातच्या हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबूंची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
ह्याच अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंना चेअरमन आणि राष्ट्रीय नियोजन समितीचा प्रमुख करण्यात आलं होतं.
सुभाष बाबू काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर मात्र वातावरणात बदल झाला. सुभाषबाबूंनी काँग्रेसमधील गांधीवादाला खिंडार लावत, आक्रमक धोरण राबवायला सुरुवात केली. त्यांनी उग्र स्वरूपात काँग्रेसची भूमिका मांडायला प्राधान्य दिले.
हे पूर्वाश्रमीच्या जहाल गटाचे पुनरुज्जीवन तर नाही ना? असा संभ्रम गांधीजी व त्यांचा समर्थकांचा झाला होता.
त्यामुळे सुभाष बाबूंच्या धोरणांना अंतर्गत विरोध वाढायला सुरुवात झाली होती. महात्मा गांधी ही अप्रत्यक्षरित्या सुभाष बाबूंच्या धोरणांवर टीका करत होते.
सुभाष बाबूंचा आर्थिक विचार हा देखील प्रखर डावा व समाजवादी असल्याने काँग्रेसमध्ये असलेल्या गांधीवादी उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या पचनी पडत नव्हता त्यामुळे त्यांचाविरोधात असलेला असंतोष अजून वाढत गेला.
महात्मा गांधीजी आणि सुभाषबाबूं मधला संवाद जवळ जवळ संपुष्टात आला होता. यात नेहरूं फक्त मध्यस्थाची भूमिका बजावत होते, पुढे ते युरोपला निघून गेल्याने मध्यस्थी करायला कोणी उरलं नव्हतं.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर १९३९ मध्य प्रदेशातील जबलपूर जवळील त्रिपुरी याठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. ह्यावेळी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यात आली होती.
या निवडणुकीत सुभाष बाबू अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात उमेदवार म्हणून गांधी समर्थक गोटाकडून नेहरूंच्या नावाची शिफारस करण्यात आली.
परंतु ते नसल्याने मौलाना आझाद यांच्या नावाचा विचार करण्यात आला, पुढे जाऊन त्यांनी देखील अचानक माघार घेतली मग आंध्र प्रदेशातील कॉंग्रेसचे नेते डॉ सीतारामय्या पट्टाभी यांची शिफारस खुद्द महात्मा गांधींनी केली.
२९ जानेवारी १९३९ ला निवडणूक झाली. ह्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या प्रचंड विरोधानंतर देखील १५७० विरोधात १३७७ असा निसटता विजय सुभाषबाबूंना मिळाला होता.
ते पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडुन आले होते. ह्यावर प्रतिक्रिया देतांना महात्मा गांधींनी म्हटले की
“सुभाषच्या निवडीचा मला आनंद आहे, त्याचे अभिनंदन परंतु मौलाना आझादांप्रमाणे पट्टागीनि माघार घेतली नाही हे महत्त्वाचं आहे, हा सर्वस्वी माझा पराभव आहे..”.
पुढे गांधीजी म्हणाले ” आता सुभाष बाबू त्यांचा मनाप्रमाणे काँग्रेस कमिटीची नियुक्ती करू शकतात..”.
सुभाषबाबूं काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या डाव्या विचारांच्या लोकांची नियुक्ती काँग्रेस कमिटीवर करायला सुरुवात केली आहे ,असा आरोप उजव्या विचारांच्या गांधी समर्थकांनी करायला सुरुवात केली.
पुढे वर्ध्याला काँग्रेसच्या एका शीर्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ज्यात येण्यास सुभाष बाबूंनी आरोग्याचे कारण देत नकार दिला.
त्यांनी पत्राद्वारे गांधीजींना कळवलं होतं की मी उपस्थित राहू शकणार नाही त्यामुळे आपणच काँग्रेस कमिटीचा कारभार पहावा परंतु गांधीजीनि मात्र ह्यातून अलिप्तता साधली.
ह्यातून काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना वाटलं की त्यांची स्वायत्तता सुभाषबाबूंना मंजूर नाही शिवाय त्यांना फक्त त्यांचा विचार चालवायचा आहे, ह्यातून वैचारिक फरफट मोठ्या प्रमाणावर झाली परिणामतः पटेलांसह ११ काँग्रेस कमिटी सदस्यांनी राजीनामा दिला.
पुढे जाऊन काँग्रेसमधून सुभाष बाबूंवर प्रखर राजकीय टीका व्हायला सुरुवात झाली, कोणी त्यांचा उल्लेख बगलेत कांदा बाळगणारा म्हणजे उग्र स्वभावाचा व्यक्ती म्हणून केला, ह्यानंतर हा संघर्ष प्रचंड पराकोटीला गेला.
काँग्रेसच्या एकतेसाठी व आपल्या तत्वांच्या निष्ठतेसाठी सुभाषबाबूंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
पुढे जाऊन त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक ह्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसला समांतर काम उभारलं.
पण ह्या सर्व घटनाक्रमामुळे गांधी – बोस संबंधात कडवटपणा आला तो कायमचा! नेहरू परतल्यावर त्यांनी समेट घडवण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते काही शक्य झालं नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.