' एकेकाळी स्वतःच्याच देशातल्या अन्यायी प्रमुखाविरुद्ध ‘हा’ खेळाडू ठामपणे उभा होता! – InMarathi

एकेकाळी स्वतःच्याच देशातल्या अन्यायी प्रमुखाविरुद्ध ‘हा’ खेळाडू ठामपणे उभा होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू हेन्री ओलांगा आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण त्याने २००३ मध्ये आपल्याच देशाचे राष्ट्रपती राॅबर्ट मुगाबे यांच्याविरूध्द पहिल्यांदाच सार्वजनिक निषेधाचे पाऊल उचलले होते. का केले त्याने असे? या लेखातून जाणून घेऊया.

हेन्री ओलांगा हा क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे या देशाचे प्रतिनिधीत्व करणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू.

 

henry olonga imarathi
ABC

 

जानेवारी १९९५ मध्ये हरारे येथे पाकिस्तानविरूध्द झालेल्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जवळपास आठ वर्षे तो झिम्बाब्वे संघाकडून क्रिकेट खेळत होता.

दुसरीकडे झिम्बाब्वेमध्ये राॅबर्ट मुगाबे हे राष्ट्रपती होते. ते झिम्बाब्वे आफ्रिकन नॅशनल पार्टीचे नेते होते. स्वातंत्र्यासाठी झालेल्या युध्दानंतर ते आफ्रिकन नागरिकांचे नायक म्हणून समोर आले.

 

rober mugabe inmarathi
al jazeera

 

मुगाबे यांनी तब्बल ३७ वर्षे राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला. पण त्यांनी त्यांच्या देशात राहणाऱ्या गौरवर्णीय अल्पसंख्यांक नागरिकांविरूध्द छापासत्र चालविले होते, तेव्हापासून ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले.

मुगाबे हे प्रभावशाली वक्ते व नेहमीच विवादात राहणारे व्यक्तीमत्त्व ठरले. नागरिकांमध्ये ध्रुवीकरण करणारे राजकीय नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

पण क्रिकेटपटू ओलांगा व राष्ट्रपती मुगाबे यांच्यात वादाची निर्मिती तेव्हा झाली

जेव्हा एका क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वे संघाचा गौरवर्णीय फलंदाज अॅण्डी फ्लावर व कृष्णवर्णीय जलदगती गोलंदाज हेन्री ओलांगा हे झिम्बाब्वेतील “लोकशाहीच्या मृत्यूचा शोक” म्हणून आपल्या हाताच्या दंडावर काळया पट्ट्या बांधून मैदानात उतरले.

१० फेब्रुवारी २००३ ला नामिबीयाविरूध्द झालेला तो सामना होता. त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये वर्णभेदाची आग लागलेली होती.

शेतकऱ्यांवर त्यांच्या वर्णांमुळे अत्याचार होत होते. त्यामुळे हिंसेला वाव मिळत होता.

 

notepad.com

 

अखेर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ओलांगा व फ्लावर यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द केले. ज्यात म्हटले होते की, झिम्बाब्वेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.

“मानवाधिकारांचा येथे सर्रास गैरवापर होत असून तो थांबविण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना एक मूक विनंती करण्यासाठी यापुढे विश्वचषक स्पर्धांमध्ये काळा अंगरखा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही श्रीमंत व गरीब यांच्यातील असमानता आणि मुगाबे परिवाराच्या भुमिकेविरूध्द उभे आहोत.

ज्या गरीब माणसाकडे आज सदरा विकत घेण्यासाठी पैसे नाही, असा गरीब माणूस आम्हाला मुगाबेपेक्षा अधिक आवडेल. कारण मुगाबे हेच त्याच्या गरीबीचे कारण आहेत.

आमच्या या कृतीमुळे आपल्या देशात वैचारिकता आणि प्रतिष्ठा पुर्नप्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी प्रार्थना आम्ही करतो.”

त्या सामन्यात फ्लावरने ३९ धावा केल्या तर ओलांगाने ३ षटकांत केवळ ८ धावा देत चांगले प्रदर्शन केले व झिम्बाब्वेने हा सामना जिंकला.

मात्र ओलांगा व फ्लावर यांनी मांडलेल्या भुमिकेमुळे झिम्बाब्वेमध्ये राजकीय वादळ उठले व तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

 

olanga-and-flower-inmarathi
Indiatimes.com

 

त्यावेळी झिम्बाब्वेच्या माहिती मंत्री जोनाथन मोयो यांनी ओलांगला ‘काळी त्वचा आणि पांढरा मुखवटा’ असा ‘अंकल टाॅम’ संबोधले होते.

पण निषेध असूनही फ्लावरने आपल्या संघासाठी क्रिकेट खेळणे सुरू ठेवले तर ओलांगला सहा सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आलं.

त्यानंतर १२ मार्चला विश्वचषकातील सुपर सिक्स सत्रातील केनियाविरूध्दच्या सामन्यासाठी ओलांगची संघात निवड झाली.

त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये राजद्रोहाचा आरोप ठेऊन ओलांगाविरूध्द अटक वाॅरंट जारी करण्यात आला.

त्यावेळी एकूणच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ओलांगाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, फोन व ईमेलव्दारे त्याला धमक्या मिळत होत्या.

शिवाय ओलांगाच्या वडिलांना देखील मुगाबेच्या एका समर्थकाने धमकी दिली होती ज्यात तो म्हणाला होता की तुमच्या मुलाला विश्वचषक स्पर्धा संपण्यापूर्वी झिम्बाब्वेतून बाहेर पडायला सांगा.

या धमक्यांमुळे ओलांगाला तात्पुरते अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते.

 

olanga-inmarathi
thetime.com

 

विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा श्रीलंकेकडून पराभव झाला व स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ओलांगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी ओलांगासह त्याचे कुटूंब फार चिंतेत होते.

काही आठवडयांनंतर लॅशिंग्ज वर्ल्ड इलेव्हनचे अध्यक्ष डेव्हिड फोल्ब यांच्या मदतीने ओलांगा कुटूंबासह युकेमध्ये गेला.

एक दशकभर ओलांगा कोणत्याही देशाचा नागरिक नव्हता पण तो युकेमधील टाॅनटन येथे राहिला. २०१५ मध्ये पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याने युके सोडले व त्याची पत्नी तारा यांचे घर असलेल्या अॅडलेड येथे स्थायिक झाला.

अॅडलेड येथे स्थायिक झाल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना ओलांगा म्हणाला की, मुगाबे यांच्याबद्दल मी केलेली टिप्पणी अपमानास्पद होती. पण ती वेळही तशीच होती.

जर मुगाबेंनी झिम्बाब्वेला निराशेच्या गर्तेत लोटले नसते तर कदाचित मी निषेधाऐवजी त्यांचा आदर केला असता. आपल्या देशाबद्दल विचार करण्याऐवजी मुगाबे यांनी नेहमीच स्वतःचा विचार केला.

 

 

आपली जागा घेण्याकरिता कोणीतरी सल्ला देणे हा नेतृत्वाचा भाग आहे. युवकांनी युवकांसाठी गुंतवणूक केली पाहिजे असे नेल्सन मंडेला म्हणाले होते, असे तो म्हणाला. मुगाबे हे ३७ वर्षे सत्तेत राहूनही लोक त्यांच्यावर नाराज होते.

मी मध्यमवर्गीय कुटूंबातून आलो आहे, त्यामुळे मला निषेध करण्याची गरज नव्हती. माझे जीवन चांगले होते आणि मी पुरेशी कमाई करत होतो. पण जेव्हा मी मुगाबेंचा निषेध केला तेव्हा मी त्या गरीब लोकांचा विचार करीत होतो, असे ओलांगा म्हणाला होता!

शिवाय मुगाबे हे आपल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांशी देखील कधी चांगले वागले नाही, त्यामुळे मी त्यांना आव्हान दिले हे बरोबर आहे का? असा सवाल सुद्धा त्याने विचारला होता!

ओलांगाने आपली कथा इंग्लंड, आॅस्ट्रेलियात तसेच आपल्या सुमारे १० हजार प्रेक्षकांजवळ सांगितली आहे. तसेच तो या कथेवर लघुपटाची निर्मिती करण्यासाठी काम करत आहे.

 

treason-inmarathi
youtube.com

 

झिम्बाब्वेमध्ये काहीतरी चांगले साध्य करण्यासाठी मी निषेध केला व त्यामुळे बरेच काही प्रभावीपणे साध्य झाले असे ओलांगा म्हणत असून आता १० वर्षांनंतर झिम्बाब्वेमध्ये लोकशाही जीवंत आणि चांगली राहिल, अशी अपेक्षा तो व्यक्त करतो.

दरम्यान, झिम्बाब्वेतील मुगाबे यांचे शासन २१ नोव्हेंबर २०१७ ला समाप्त झाले व त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?