' राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्याची “भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर” झालेली बदली चार वेळा रद्द केलीय! – InMarathi

राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्याची “भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर” झालेली बदली चार वेळा रद्द केलीय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी फेरफार आणि भ्रष्टाचार याबद्दल जनसामान्यांच्या संवेदनाच बोथट झालेल्या आहेत. “या सर्व यंत्रणेकडे जायची वेळ नाही आली तरच चांगलं” असं म्हणायची वेळ या यंत्रणेने सामान्य माणसावर आलेली आहे.

दिवसेंदिवस अनेक प्रकारचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस येत असताना भारतात अशी काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे जनतेच्या मनामध्ये कर्तबगारीबद्दल एक आशेचा किरण जागृत आहे.

ज्या अधिकाऱ्यांनी सचोटीने कार्य करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे. आज त्यांच्यापैकीच एका आधिकाऱ्याबद्दल जाणुन घेऊयात.

२००२ मधील आयएफएस बॅचचे हरियाणा मधील संजीव चतुर्वेदी हे नाव त्या अधिकार्‍यांपैकीच एक आहे, ज्यांनी कुठलाही भ्रष्टाचार न करता देशाप्रती आपले कर्तव्य निष्ठेने बजावलेले आहे.

 

sanjeev_inmarathi
AajTak.com

तसेच अनेक प्रकारचे घोटाळे या अधिकाऱ्याने प्रकाशात आणलेले आहेत. संजीव चतुर्वेदी सुरवातीपासूनच माध्यमांच्या प्रकाशझोतामध्ये राहिलेले आहेत. या अधिकाऱ्यांने शक्यतो राजकारण्यांसमोर वाकायला नकारच दिलेला आहे.

हा अधिकारी फक्त तेच करतो जे त्याला योग्य वाटते. त्यांच्या सुरवातीच्या कार्य काळापासून चतुर्वेदीने अवैद्य मार्गाने काम करणार्‍या प्रत्येक घटकावर कारवाई केलेली आहे.

त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक भ्रष्टाचारावर त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मुलाखतीदरम्यान संजीव चतुर्वेदी म्हणाले की,

“पहिल्यांदा माझे डोळे याच भ्रष्ट यंत्रणेने उघडले, जेव्हा मी माझं काम अत्यंत इमानदारीने करताना माझ्या काही वरिष्ठांनी आडकाठी आणली. पण मी माझ्या तत्त्वांवर त्यावेळीही ठाम होतो आजही आहे.

मला या यंत्रणेमध्ये काही गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ लागला. पहिली गोष्ट म्हणजे जर भ्रष्टाचार मुळापासून संपायचा असेल तर पहिले यातील वरिष्ठ अधिकारी पकडले गेले पाहिजेत, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भ्रष्टाचाराच्या एवढ्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत त्यापैकी खूप कमी जणांवर काहीतरी कारवाई होते, आणि यामुळेच खरे गुन्हेगार निर्ढावतात.

 

crime-marathipizza
depositphotos.com

मी स्वतः अनेक खटल्यांची चौकशी केलेली आहे पण जोपर्यंत आपण यंत्रणेला ठणकावून जाब विचारत नाही तोपर्यंत काहीच बदललं जाणार नाही.”

चतुर्वेदी यांनी त्यांच्या कर्तव्य निष्ठेचे फार मोठी किंमत चुकवलेली आहे. त्यांची अनेक वेळेस बदली झालेली आहे.

त्यांनी अनेक तक्रारींवर काम केलेले आहे. उदाहरणार्थ, २००७ मध्ये हरियाणा येथे पोस्टिंग असताना त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक कोटींचा जनकल्याण निधी कुठल्यातरी खाजगी जमिनीवर खर्च होत आहे.

आणि ज्यावेळी त्यांनी या सर्वावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना सस्पेंड करण्यात आल. त्यांच्यावर हरियाणा येथील राज्य शासनाने गुन्हा दाखल केला होता आणि त्यांची बढती पुढील तीन वर्षासाठी नाकारण्यात आली होती.

राष्ट्रपतींनी या प्रकरणात चतुर्वेदी यांच्या बाजूने भूमिका घेतली पण या सर्व गोष्टीला सहा महिने लागले.

चतुर्वेदी यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये असं चार वेळेस घडलेलं आहे, की ज्यावेळेसखुद्द राष्ट्रपतींनी त्यांना सस्पेंड होण्यापासून वाचवलेल आहे. असं एका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात खूपच कमी वेळेस घडताना दिसेल.

याबद्दल चतुर्वेदी असं म्हणतात की प्रत्येक वेळी मी अनेक कोटींचा घोटाळा बाहेर काढला की लगेच मला सस्पेंड करण्याचे आदेश राज्य शासन काढत असे.

 

chaturvedi-inmarathi
Indiatimes.com

यातील काही घटना खाली दिलेल्या आहेत

१) हरियाणा वनविभागातील घोटाळा.

२) संजीव तोमर यांच्या आत्महत्येची केस.

३) हरियाणा राज्य शासनाने संजीव चतुर्वेदी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा.

ह्या अधिकाऱ्यावर केलेले आरोप आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या एवढी आहे की याबद्दल “विकिपीडिया” वर एक वेगळे पेज तयार केलेलं आहे.

पण तरीही चतुर्वेदी मात्र नेहमीच या सर्वातून वाचत आलेले आहेत, आणि विरोधाभास म्हणजे २०१५-१६ च्या वार्षिक कार्य काळासाठी आरोग्य मंत्रालयातून त्यांना शुन्य ग्रेडिंग दिलेली होती.

आणि याच वर्षी त्यांना प्रसिद्ध रॅमन मॅगेसेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

no-caste-inmarathi
India.com

टाइम्स ऑफ इंडिया मधील एका रिपोर्टच्या अनुसार त्यांचे निर्भीडपणे एखाद्या गोष्टीवर काम करणे आणि कुणाच्याही दबावाखाली न येता भ्रष्टाचाराला उघडकीस आणणे यामुळेच सामान्य जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली बनलेली आहे.

मुलाखतीदरम्यान संजीव चतुर्वेदी म्हणाले की,

“हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत कठीण आणि खडतर राहिलेला आहे. भरपूर वेळेस मला सस्पेंड करण्यात आलं आहे. अनेक वेळेस माझी बदली झालेली आहे, आणि यंत्रणेविरुद्ध जाऊन काम केल्यामुळे मला मानसिक त्रास खूप प्रमाणात झालेला आहे.”

माझ्यावर १५ खटले न्यायप्रविष्ट आहेत, यामध्ये अनेक खटले उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही प्रविष्ट करण्यात आलेले आहेत. दोन वर्षासाठी माझ्याकडे कुठलाही कारभार देण्यात आलेला नव्हता, पण एवढं सगळं घडत असतानाही माझ्यातील आवाज मला जनतेसाठी काम करण्याचे उत्तेजन मला देत होता.

या सर्व काळामध्ये मला माझ्या सहकाऱ्यांनी केलेले सहकार्य अनमोल आहे, त्यांनीच मला नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे.

मी काही मूलभूत आदर्श नेहमीच पाळत आलेलो आहे, मी कितीही मोठ्या आरोपांखाली दबलेला असलो तरीही मी कधीच माझ्या सहकाऱ्यांना माझ्यामुळे त्रास होईल असे वागलो नाही. यामुळेच त्यांनी मला नेहमीच मदत केलेली आहे.

 

sanjiv-chaturvedi-inmarathi
thewire.in

त्यांच्यामुळेच मला नेहमी ऊर्जा मिळत आलेली आहे. मला नेहमी असं वाटतं की तुमची बदली जरी झालेली असली तरी शेवटी ते तुमचं कर्तव्यच आहे.

प्रत्येक बदली तुमच्या करिअरचा एक भाग असते, त्यामुळे तुमचे कर्तव्य बजावताना कुठलीही कसूर तुम्ही सोडू नये.

जेव्हा मला तरुणांशी बोलण्याची संधी भेटते, त्यांना मी नेहमी हेच सांगतो तुम्ही तुमच्या स्वप्नांशी एकनिष्ठ रहा आणि त्या दृष्टीने मार्ग धुंडाळत रहा.” हा तरुणांसाठी प्रेरणेचा मंत्र देऊन त्यांनी मुलाखत संपवली.

तरुणांसाठी मार्गदर्शक असणारे असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी भारतात क्वचितच आढळतील. अशा या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये अजून संघर्ष येऊ नये एवढीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?