आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रूर ब्रिटिश सरकारच्या अमानुष अत्याचारांचा बदला घेण्यासाठी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनी धाडण्यात आले.
बधिर झालेल्या ब्रिटिश सरकारला त्यांच्या कृत्याबद्दल समज देण्यासाठी त्यांच्या कानाखाली आवाज काढणे गरजेचे होते. तेच आपल्या भारतमातेच्या शूर वीरपुत्रांनी केले.
ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांपैकी एक होते पुण्याचे चापेकर बंधू!
दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चाफेकर ह्या तीन चापेकर बंधूंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : पेटून उठलेल्या क्रांतिकारकाने “जालियानवाला बाग” क्रौर्याचा घेतला होता असा बदला!
==
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चापेकर बंधूंना गुरुस्थानी होते. पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्लेग समितीचा प्रमुख असताना पुण्यात भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. राक्षसाप्रमाणे त्याने जनतेला अमानुष वागणूक दिली.
रँडच्या ह्या अत्याचारावर लोकमान्य टिळक व आगरकरांनी कडक शब्दात टीका केली. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
चापेकर बंधू हे पुण्याजवळील चिंचवड गावात राहत होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती टाकणाऱ्या दामोदर हरी चापेकर ह्यांचा जन्म २४ जून १८६९ रोजी पुण्यातल्या चिंचवड गावात झाला.
त्यांचे वडील हरिपंत चापेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते.
दामोदर चापेकर हे हरिपंतांचे ज्येष्ठ पुत्र होते. बाळकृष्ण चापेकर व वासुदेव चाफेकर हे दामोदर चापेकरांचे धाकटे बंधू होते.
दामोदरपंतांची लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यांचे वडील अत्यंत ज्ञानी व्यक्ती होते त्यामुळे साहजिकच तो ज्ञानाचा वारसा त्यांच्या तिन्ही पुत्रांमध्ये आला होता. लोकमान्य टिळकांना ते गुरु मानत असत, तसेच महर्षी पटवर्धन त्यांचे आदर्श होते.
लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी युवकांचे एक व्यायाम मंडळ तयार केले.
लहानपणापासूनच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविषयी चीड होती. दामोदरपंतांनीच मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला काळे फासून पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून ब्रिटिश सरकारविषयी आपला राग व्यक्त केला होता.
१८९४ सालापासून चापेकर बंधूंनी पुण्यात गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरु केले. ह्या समारोहात ते स्तोत्रांचे पठण करीत असत. १८९७ साली पुण्यात प्लेगने उच्छाद मांडला होता. ह्या रोगाची भयावहता आपल्याकडील लोकांना माहित नव्हती.
ब्रिटिश सरकारने सुरुवातीला प्लेगची साथ सगळीकडे पसरतेय ह्याकडे लक्ष दिले नाही. पण नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी प्लेग निवारणाच्या नावाखाली ब्रिटिश अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देऊन टाकले.
आणि ह्याच विशेष अधिकारांचा फायदा घेत रँड ह्या अधिकाऱ्याने जनतेवर अनन्वित अत्याचार करणे सुरु केले.
प्लेग निवारणाच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना घराबाहेर काढणे , स्त्रियांवर बलात्कार आणि घरातल्या चीजवस्तू उचलून नेणे असे प्रकार गोऱ्या शिपायांनी केले. रँडची माणसे जनतेवर प्लेग पेक्षाही भयानक अत्याचार करू लागली होती.
रँड आणि आयर्स्ट हे दोन ब्रिटिश अधिकारी बूट घालूनच देवळात घुसत असत. प्लेग पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे, त्यांना त्रास देणे हा आपला अधिकार समजत असत. एक दिवस लोकमान्य टिळकांनी चापेकर बंधूंना म्हटले की,
“शिवाजी महाराजांनी कायम अत्याचाराच्या विरोधात लढा दिला. परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करीत आहेत, तेव्हा तुम्ही काय करत आहात?”
हृदयाला भेदणारे टिळकांचे हे शब्द आणि रँडच्या अत्याचारामुळे पिचलेल्या भारतीय जनतेचे अश्रू आणि घाबरलेले चेहेरे बघून चाफेकर बंधू अस्वस्थ झाले. आणि तेव्हापासून चापेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला.
त्यांनी संकल्प केला की ह्या अत्याचार करणाऱ्या दोन्ही इंग्रज अधिकारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. रँड आणि आयर्स्टचा बदला घेण्याची संधी लवकरच चालून आली.
२२ जून १८९७ रोजी पुण्यातल्या गव्हर्मेंट हाऊसमध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त राज्यारोहणाचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार होता.
पुण्यात प्लेगमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असूनही हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार होता. आणि बरेच युरोपियन लोक कार्यक्रमाला येणार होते. ह्या समारंभाला रँड आणि आयर्स्ट हे दोघेही हजेरी लावणार होते.
दामोदर हरी चापेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण हरी चापेकर व त्यांचे मित्र विनायक रानडे पुण्यातील गणेशखिंडीत जेथे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे संध्याकाळी साडेसात वाजताआपापली रिव्हॉल्वर घेऊन पोहोचले आणि ह्या दोन अधिकाऱ्यांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागले.
गणेशखिंडीपासून थोड्या अंतरावर काळोखात उभे राहून ते संधी मिळण्याची वाट बघू लागले.
मेजवानी संपल्यानंतर रँड त्याच्या गाडीतून परत जाऊ लागला की “गोंद्या आला रे आला” असे म्हणून एकमेकांना सावध करायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवले.
मेजवानी झाल्यानंतर रँड आणि आयर्स्ट बाहेर आले आणि चाफेकरांना “गोंद्या आला रे आला” असा संकेत मिळताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या डोक्यावर पिस्तूल झाडलं.
==
हे ही वाचा : अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!
==
परंतु वासुदेवपंत अजूनही “गोंद्या आला रे आला” अशी आरोळी देतच होते.तेव्हा बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्यावर माणूस कोसळताना बघितले पण तो नेमका आयर्स्ट होता कि रँड हे लक्षात आले नाही.
इकडे वासुदेवपंतांची आरोळी ऐकून दामोदरपंताच्या लक्षात आले रँड समजून दुसऱ्याच अधिकाऱ्याला मारण्यात आले आहे.
तोच त्यांना रँडची गाडी आणि त्यापाठोपाठ गाडीमागे पाळणारे वासुदेवपंत दिसले. त्यांनी अजिबात वेळ न दवडता पिस्तुलाचा चाप ओढला आणि रँडच्या पाठीत गोळी लागून तो बेशुद्ध झाला.
त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तो थोडा शुद्धीवर आला देखील पण त्याला काहीही जबाब देता आला नाही आणि तो ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. चाफेकर बंधू आणि रानडे तेव्हा तिथून निसटण्यात यशस्वी झाले.
आपले दोन अधिकारी असे मारल्या गेल्याचे बघून ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी रँड आणि आयर्स्ट ह्यांच्या खुन्याबद्दल माहिती देणाऱ्याला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. फितुरीमुळे आपल्या देश पारतंत्र्यात गेला, आणि त्याच फितुरीमुळे चाफेकर बंधूना सुद्धा अटक झाली.
गणेश व रामचंद्र द्रविड ह्या दोघांनी चापेकर बंधूंबद्दल सरकारला माहिती दिली. ह्याचा बदला धाकटे वासुदेवपंत ह्यांनी घेतला.
त्यांनी ८ मे १८९९ च्या रात्री पुण्यातल्या खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध केला. दामोदरपंत चाफेकर ह्यांना १८ एप्रिल १८९९ रोजी व बाळकृष्णपंत ह्यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
==
हे ही वाचा : स्वतः लिहिलेली पुस्तके विकून क्रांतीसाठी हत्यारे विकत घेणारा धाडसी क्रांतिकारक
==
ज्यावेळी रँड व आयर्स्ट ह्यांचा वध केला तेव्हा दामोदरपंत केवळ २७ वर्षांचे तर बाळकृष्णपंत केवळ २४ वर्षांचे होते.
ह्या सगळ्यात धाकट्या वासुदेवपंतांनी त्यांना सहकार्य केले व आपल्या थोरल्या बंधूंच्या फाशीचा बदल द्रविड बंधूंकडून घेतला तेव्हा वासुदेवपंत केवळ १८-१९ वर्षांचे होते.
फाशीच्या आधी दामोदरपंतांना लोकमान्य टिळक तुरुंगात भेटायला गेले व तेव्हा त्यांनी दामोदरपंतांना भगवद्गीता दिली.
तीच गीता वाचत ते फाशीला हसत सामोरे गेले. फाशीच्या क्षणी सुद्धा त्यांच्या हातात भगवद्गीता होती. वासुदेवपंतांना सुद्धा १२ मे १८९९ रोजी फाशीची शिक्षा झाली.
चापेकर बंधूंच्या ह्या अतुलनीय त्याग, व शौर्याबद्दल, वाचले तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
धन्य ती भारतभूमी जिने असे वीर सुपुत्र जन्माला घातले, व धन्य ते चाफेकर बंधू ज्यांनी आपल्या मातृभूमीचे पांग फेडले! त्यांच्या या शौर्याला विनम्र अभिवादन!
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.