आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आधीच्या भागाची लिंक: इस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)
—
१९ जून १९४१. दुसरं महायुद्ध रंगात आलं होतं. अचानक का कोणास ठाऊक पण जोसेफ स्टालिनची लहर फिरली आणि मिखाईल गेरसिमोव, लेव ओशानीन ह्यांची सोव्हिएत आंथ्रोपोलोजिस्ट टीम (मानवविज्ञान) आजच्या उझबेगिस्तानात (तेव्हाचा रशिया) गुर-ए-अमीरला येऊन धडकली! गुर-ए-अमीर म्हणजे जिथे अमीर तैमूर उर्फ तैमूरलंगची कबर होती.
गेरसिमोव मानवविज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. तैमूरचं थडगं खणून त्यांना तैमूरच्या प्रेताचा अभ्यास करण्याचे आदेश होते. तैमूरची कबर पुन्हा खोदूण्याला स्थानिक लोकांनी प्रखर विरोध केला, पण स्टालिन बधला नाही.
तैमूरची कबर तोडून खोदून काढण्यात आली. त्या शाही कबरीमध्ये तैमूर गेली ५३६ वर्षे शांत पहुडला होता. तैमूरच्या अवशेषांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. अभ्यासाअंती गेरसिमोवनी काढलेल्या निष्कर्षांनुसार –
तैमूरची उंची पाच फूट आठ इंच होती. छाती आणि खांदे रुंद होते. तत्कालीन परिस्थितीनुसार तैमूर उंच होता. तैमूरची उजव्या मांडीचे हाड मार लागून जायबंदी झाले असल्याने तैमूर खरोखर लंगडा होता. त्याला उजवा पाय सरळ करता येत नसे.
गेरसिमोवनी तैमूरच्या कवटीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून तैमूरचा चेहरा तयार केला. तैमूरच्या चेहऱ्यात जवळपास गूण मंगोल वंशाचे होते. किंचित बारीक डोळे, वर आलेली गालाची हाडे इत्यादी.
ओशानीनच्या अभ्यासानुसार तैमूरचे कपाळ त्याच्या सर्बियन मंगोल असल्याचे पुरावे देत होते.
तैमूरच्या थडग्यावर जुन्या तुर्की भाषेत “जेव्हा मी मृत्यूलोकातून परत येईन तेव्हा हे जग थरथर कापेल” असे कोरून ठेवल्याचे अढळले. शिवाय तैमूरच्या शवपेटीत “जो कोणी माझिया कबर उघडेल त्याच्यावर माझ्याहून क्रूर आक्रमकाचा हल्ला होईल” असा शाप देखील कोरलेला अढळला!
असं म्हणतात की ह्याच शापानुसार तैमूरची कबर उघडल्यानंतर सोव्हिएत रशियावर हिटलरने operation barbarossa चालू केलं होतं आणि जेव्हा संपूर्ण इस्लामी रितिरिवाजानुसार तैमूरला नोव्हेंबर १९४२ मध्ये पुन्हा दफन करण्यात आलं तेव्हा रशियाने जर्मन फौजांची स्टालिंगार्डच्या लढाईत पराभव केला!
अमीर तैमूर एकूण ६८ वर्षे जगला.
‘अमीर’ बनल्यानंतरच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत तैमूरने आशिया खंडातले चंगेज खानानंतर सर्वात मोठे साम्राज्य बनवले. पूर्वेला दिल्लीत, दक्षिणेला पर्शियात तर पश्चिमेला ऑट्टोमन साम्राज्यात त्याने हाहाकार उडवून दिला.
तैमूरच्या एकूण लष्करी कारकीर्दीवर चंगेज खानाच्या मंगोल युद्धनीतीचा प्रचंड प्रभाव होता. स्वतःला चंगेज खानचा वंशज म्हणवून घेणाऱ्या तैमूरला चंगेजचे तेच जुने मंगोल साम्राज्य पुनर्जीवित करण्याची महत्वाकांक्षा होती.
मंगोल क्रूर होते. कुठल्याही शत्रूला आधी कत्तल करून गर्भगळीत करणे ही त्यांची नीती होती. तैमूर त्याहून दोन पावले पुढे गेला. कत्तल करण्याला त्याने कधी इस्लामचा तर कधी राजकारणाचा आधार घेतला.
दिल्लीवर चालून येताना तैमूरने इस्लामचे कारण दाखवून असंख्य लोकांची कत्तल केली असली तरी इतर साम्राज्यांशी लढताना त्याने इस्लाम आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या महत्वाकांक्षेसाठी व्यवस्थित वापरून घेतल्या.
तुर्कीचा ऑट्टोमन सम्राट पहिला बय्यझीद त्याकाळचे सर्वात मोठे इस्लामी राज्य चालवत होता. बय्यझीदला ‘यल्दरम’ म्हणत. तुर्की भाषेत यल्दरम म्हणजे विजेचा लोळ!
बय्यझीदकडे त्या काळातली जगातली सर्वात शक्तिशाली आणि मोठी सेना होती. हंगेरी, स्पेन पर्यंत त्याच्या राज्यांच्या सीमा होत्या. जेरुसलेम ह्या इस्लाम आणि ख्रिस्त दोन्ही धर्मांचे पवित्र स्थळ असणाऱ्या शहरासाठी युरोपीय ख्रिस्ती आणि मध्यआशियायी इस्लामी राजवटीत नेहमी लढाया होत.
बय्यझीदने राज्यविस्तार करून युरोपचा जेरुसलेमशी संपर्कच तोडून टाकला. कोणत्याही युरोपी राजवटीत यल्दरमशी वाकडं घेण्याची ताकद नव्हती.
एकदा बय्यझीद हंगेरीवर चालून गेला असताना चाणाक्ष सेनानी असणाऱ्या तैमूरने संधी साधली आणि त्याच्या तातारी फौजा ऑट्टोमन साम्राज्यावर तुटून पडल्या!
तैमूरची ताकद वाढली असताना तुर्कीतल्या ‘कधी’ राजांनी तैमूरसोबत जाण्याचा निश्चय केला होता. ह्या राजांना बय्यझीदने धमक्या दिल्या होत्या. तैमूर ने हा आपला अपमान आहे असं जाहीर करुन ओट्टोमान साम्राज्यावर जिहाद पुकारला! तैमूरने ऑट्टोमन साम्राज्यातली शहरे उध्वस्त करायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्याने बगदाद जिंकून २० हजार लोकांची मुंडकी छाटली.
तैमूरचं हे वर्तन पाहून चवताळलेला यल्दरम माघारी फिरला. हंगेरीत लढून फौज दमलेली आहे ह्याकडे त्याचं पूर्ण दुर्लक्ष्य झालं आणि अंकाराच्या लढाईत त्याचासंख्येने निम्म्याहून कमी असणाऱ्या तैमूरच्या सैन्याकडून प्रचंड मोठा पराभव झाला.
इस्लामी ऑट्टोमन सेना कर्दळीसारखी कापली गेली. पण पराभव पाहून नसिरुद्दीन तुघलकासारखा बय्यझीद यल्दरम पळाला नाही…तो लढत राहिला आणि तैमूरच्या हाती लागला!
तत्कालीन सर्वात मोठ्या इस्लामी रियासतीचा सुलतान साखळदंडात कैद होऊन समरकंदमध्ये खितपत पडला आणि कैदेत असतानाच मेला!
अंकारामधल्या लढाईनंतर तैमूरने स्वतःला ‘गाझी’ घोषित करून पश्चिमी अनाटोलियामधल्या स्मायरना ह्या शहरात सर्वच्या सर्व ख्रिश्चन धर्मियांची कत्तल केली. मुंडक्यांची ढीग रचले. मुस्लिम इतिहासकार देखील ह्या कृत्याबद्दल तैमूरची निर्भत्सना करतात.
यल्दरमला हारवल्याबद्दल तत्कालीन अरब मुसलमान जरी तैमूरवर नाखूष असले तरी युरोपात तैमूरचे कौतुकच झाले. फ्रांसचा राजा सहावा चार्ल्स आणि इंग्लंडचा राजा चौथा हेन्री ह्यानी तैमूरचे दिलखुलास कौतुक करुन व्यापाराचे आमंत्रण दिले. तैमूरने देखील ते स्वीकारले. ख्रिस्ती राजवटीने तुर्की इस्लामी आक्रमक बय्यझीदपासून वाचवल्याबद्दल युरोपात बरीच वर्षे तैमूर विश्वासू मित्र ठरला.
बगदाद आणि दिल्लीत मात्र आजही तैमूरचे नाव फार आदराने घेतले जात नाही. जॉर्जिया, सीरिया, दिल्ली, बगदाद, इजिप्त, तुर्की इत्यादी ३५ लष्करी करावयात तैमूरने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सतरा लाख लोकांची कत्तल केली. त्याकाळच्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ५% हा आकडा होता!
खोरासान, पर्शिया, तुर्की आणि भारतात केलेल्या स्वाऱ्यामधून तैमूरने अनेक गवंडी आणि कारागीर कैद करून समरकंदला नेले आणि तिथे त्याने अनेक भव्य मस्जिदी आणि मकबरे बनवले.
तैमूर कलेचा फारसा चाहता नव्हता पण नव नव्या गोष्टी शिकून घेण्यात त्याचा हातखंडा होता. तैमूर तुर्की, मंगोल आणि पारशी भाषा व्यवस्थित बोलत असे. चंगेज खानचा अजून एक गूण तो शिकला होता, तो म्हणजे तो सैन्यात कर्तबगरीनुसार बढत्या देत असे. जन्मनुसार नाही.
तैमूर कधीही transoxiana चा अधिकृत राजा म्हणवला जाऊ शकला नाही कारण मंगोल परंपरेनुसार फक्त चंगेज खानचा वंशज राजा म्हणवला जाई. तसेच तो एक इस्लामी खलिफा किंवा सुलतान म्हणून देखील इस्लामी परंपरेत बसला नाही.
केवळ ‘कुरायश’ वंशातील माणूसच खलिफा बनू शकत असे. जसे बोर्जीगिन तसेच कुरायश. मोहम्मद पैगंबर कुरायश होते. म्हणूनच दिल्ली आणि पर्शियामधल्या शिरकाणाला त्याने ‘अल्लाहची इच्छा’ म्हणाले होते!
१४०४ मध्ये तैमूरने मंगोलियाच्या युवान राजवटिशी मैत्री करून चीनच्या मिंग राजांवर हल्ला करण्याचा बेत आखला. पण ही योजना तडीस जाऊ शकली नाही. रस्त्यात ओत्रारजवळ १७ फेब्रुवारी १४०५ रोजी तैमूरचा आजारी पडून मृत्यू झाला. तैमूरला नेमका काय आजार झाला होता ते ज्ञात नाही पण अत्यंत बारकाईने सर्व गोष्टी आखून आक्रमण करणारा तैमूर भर हिवाळ्यात चीनवर स्वारी करायला निघाला होता, कदाचित संक्रमित आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा!
आज उझबेगिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रात तैमूरला इस्लामला एकत्रित करणारा योद्धा म्हणून पहिले जाते. बगदाद, बलुचिस्तान, भारत आणि काही तुर्की प्रदेशात त्याला क्रूर आणि नीच आक्रमक म्हणून झिडकारले जाते. युरोप आणि पाश्चात्य देशात देखील तैमूरला धर्मांध आणि क्रूर शासक म्हणून ओळखले जाते.
इतकी कामगिरी करून देखील तैमूर चंगेज खान इतका मोठा कधीच होऊ शकला नाही. धर्माच्या नावाखाली केलेली क्रौर्यकर्मे, इस्लामी रियासतींवरच केलेले हल्ले आणि केवळ शक्तीप्रदर्शन म्हणून केलेली निष्पाप लोकांची बेहिशोबी कत्तल ही त्यामागची कारणे असावीत. शिवाय काळाच्या मानाने चंगेज तैमूरपेक्षा अधिक प्रगत आणि पुरोगामी विचारांचा होता.
काहीही असलं तरी ही तितकीच खरी गोष्ट की चंगेज खाननंतर तैमूरलंगच आशिया खंडातील, कदाचित जगातील सर्वात मोठा आणि यशस्वी योद्धा होता.
(चंगेझ खानाबद्दल एक ३ भागांची मालिका लवकरच घेऊन येत आहोत!)
—
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.