आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या मूळ ठिकाणाहून आपल्याला एका रात्रीत नेसत्या वस्त्रांनिशी कोणी हाकलले आणि आपल्याला जबरदस्तीने स्थलांतर करावे लागले तर? ही कल्पनाच किती अमानुष आणि भयानक आहे. पण असे प्रसंग इतिहासात अनेक वेळा अनेक लोकांवर आले आहेत.
ह्या लोकांसमोर जीव वाचवण्यासाठी स्थलांतर करण्यापलीकडे काहीही पर्यायच नव्हता.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी, काश्मिरी पंडितांवर झालेल्या अमानुष अत्याचारांच्या त्या काळात किंवा इतर अनेक दुर्दैवी घटनांमुळे अनेक लोकांना आपले मूळ ठिकाण सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागले. अशीच एक घटना अमेरिकेत सुद्धा घडली होती.
एकोणिसाव्या शतकात १८३१ ते १८३७ ह्या काळात अमेरिकेत अनेक स्थानिक अमेरिकन लोकांना सरकारने जबरदस्तीने दुसरीकडे स्थलांतर करायला भाग पडले होते.
त्यांच्या मूळ ठिकाणाहून त्यांचे स्थलांतरण आत्ताच्या ओक्लाहोमा ह्या ठिकाणी केले होते. त्यांना हा हजारो किलोमीटरचा प्रवास चक्क पायी करायला लावला. दुर्दैवाची बाब ही की, ह्यात सुमारे ४००० ते ६००० मूळ अमेरिकन (नेटिव्ह अमेरिकन) लोकांचा मृत्यू झाला.
ह्याच दुर्दैवी घटनेला इतिहासात ट्रेल ऑफ टिअर्स म्हणजेच अश्रूंची पाऊलवाट असं म्हटलं जातं.
हे स्थलांतराला तत्कालीन अमेरिकन सरकारने एथनिक क्लिन्सिंगच्या नावाखाली पाठिंबा दिला होता. ह्यात चेरोकी, क्रिक, सेमिनॉल, चिकासॉ व चॉक्टॉ ह्या नेटिव्ह अमेरिकन जमातींना आपले मूळ ठिकाण सोडून स्थलांतर करावे लागले. मिसिसिपी नदीच्या पश्चिम भागात ह्या जमातींना राहावे लागले.
ह्या भागाला इंडियन टेरिटरी असे म्हणतात. १८३० सालच्या इंडियन रिमूव्हल ऍक्टच्या अंतर्गत हे स्थलांतर करण्यात आले.
हा इंडियन रिमूव्हल ऍक्ट अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅकसन ह्यांनी २८ मी १८३० रोजी लागू केला होता.
मार्टिन वॅन ब्यूरेन आणि अँड्र्यू जॅकसन ह्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दक्षिणेकडील मूळ अमेरिकन लोकांनी त्याच्या जमिनी सरकारकडे जमा करून मिसिसीपीच्या पश्चिमेकडील भागात स्थायिक व्हायचे असा हा ऍक्ट होता.
ह्या ऍक्टला दक्षिणेकडील व ईशान्येकडील अमेरिकन लोकांनी भक्कम पाठिंबा दिला पण स्थानिक अमेरिकन जमातींनी ह्या ऍक्टला कडाडून विरोध केला.
व्हिग पार्टीने सुद्धा ह्याचा विरोध केला. चेरोकी लोकांनी एकत्रितपणे ह्या विरोधात लढाही दिला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही आणि त्यांना अमेरिकन सरकारने जबरदस्तीने त्यांच्याच मूळ ठिकाणाहून हाकलून लावले आणि पायी प्रवास करत मिसिसीपीच्या पश्चिमेकडे नेले.
ह्याच घटनेला ट्रेल ऑफ टिअर्स असे नाव दिले गेले.
अमेरिकेत वसाहत करणाऱ्या युरोपियन गोऱ्या लोकांना तिथल्या स्थानिक लोकांचा अडसर होऊ लागला होता. त्यांनी स्थानिक लोकांच्या जमिनीवर कब्जा मिळवणे सुरु केले होते. त्यांना तिथे स्वत:साठी शेती करायची होती.
ह्या वसाहतवाद्यांनी जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना, अलाबामा आणि फ्लोरिडा येथे आपले राज्य वसवले होते.
त्यावेळी इथले स्थानिक लोक म्हणजे ह्या युरोपियन लोकांना आपली सत्ता अधिक विस्तारण्यात येणारी अडचण वाटत होते. आणि त्यांना ह्या “इंडियन प्रॉब्लेम” वर स्थानिक अमेरिकन लोकांवर नवी अमेरिकन (खरे तर युरोपियन) संस्कृती लादून हा प्रश्न सोडवायचा होता.
ह्या “फाईव्ह सिव्हिलाइझ्ड ट्राइब्स” ना थॉमस जेफरसन ह्यांनी युरोपियन लोकांसारखे व्हावे असे वाटत होते.
त्यांच्या इच्छेप्रमाणे ह्या लोकांनी आपली मूळ अमेरिकन जीवनशैली सोडून देऊन “सभ्य” (म्हणजेच थोडक्यात गोऱ्या युरोपियन लोकांची) जीवनशैली आत्मसात करावी.
१८०० च्या सुरुवातीला अमेरिकन सरकाराने पद्धतशीरपणे स्थानिक अमेरिकन जमातींना आग्नेय प्रदेशातून बाहेर काढून त्या ठिकाणी आपली सत्तां स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले.
इतकी वर्षे चेरोकी, क्रिक, सेमिनॉल, चिकासॉ व चॉक्टॉ ह्या जमाती अमेरिकेच्या आग्नेय प्रदेशात आपापल्या प्रदेशात राहत होत्या आणि त्या त्या प्रदेशावर त्या त्या जमातींची सार्वभौम सत्ता होती.
ही परसंस्कृतीग्रहण म्हणजेच acculturation ची कल्पना सर्वप्रथम जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांनी प्रस्तावित केली होती आणि त्या वेळी चेरोकी व चॉक्टॉ ह्या जमातींनाही हे त्याविषयी तक्रार नव्हती.
अमेरिकन संस्कृतीचे एकत्रीकरण करण्यासाठी म्हणून ह्या स्थानिक इंडियन लोकांना आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तसेच त्यांना इंग्लिश भाषा शिकण्यास व युरोपियन पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जात होते.
जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांची ही कल्पना थॉमस जेफरसन ह्यांनीही उचलून धरली. त्यांनी रेड इंडियन लोकांच्या मूळ स्थानावर त्यांचा मालकी हक्क सन्मानाने मान्य केला आणि ह्या पाच जमातींना मिसिसिपी नदीच्या पूर्वेला राहण्यास संमती दिली.
तसेच त्यांना विनंती करण्यात आली की त्यांनी इतर अमेरिकन लोकांप्रमाणे थोड्या प्रमाणात इतर अमेरिकन लोकांच्या पद्धतींचा व संस्कृतीचा अंगीकार करावा.
जेफरसन ह्यांनी शेतीवर आधारित समाज निर्माण करण्यास प्राधान्य दिले.
पण अँड्रयू जॅकसन ह्यांनी मात्र एकदम उलट पवित्र घेत हा ऍक्ट पास केला त्याप्रमाणे कारवाई करायचे आदेश देत ह्या जमातींना आपल्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे जबरदस्तीने अमानुषपणे स्थलांतरित केले. त्यांना त्यांच्या जमिनी सरकारकडे सुपूर्त करण्याचे आदेश दिले. व त्यांना मिसिसीपीच्या पश्चिम भागात राहण्यास जागा दिली.
ह्या ऍक्टला जॉर्जियामधील लोकांनी पाठिंबा दिला परंतु संसदेतील अनेक सदस्यांनी कडाडून विरोध केला. खूप मोठा वादविवाद झाल्यानंतर अखेर हा ऍक्ट पास झालाच!
हा ऍक्ट पास झाल्यानंतर जवळपास दहा हजार नेटिव्ह अमेरिकन लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून पश्चिमेकडे नेण्यात आले.
त्यांच्या ह्या स्थलान्तराला अश्रूंची पाऊलवाट असे नाव देण्यात आले. २७ सप्टेंबर १८३० रोजी अमेरिकन सरकार व चॉक्टॉ जमात ह्यांच्यात समझोत्याचा करार झाला. ह्या करारास ते ट्रीटी ऑफ डान्सिंग रॅबिट असे म्हणतात.
ह्या करारात चॉक्टॉ जमातीतील लोकांना मिसिसीपीच्या पूर्वेला त्यांच्या असलेल्या जमिनी सरकारच्या ताब्यात देण्याच्या बदल्यात काही रक्कम आणि मिसिसीपीच्या पश्चिमेकडे जमिनी देण्यात आल्या.
त्यानंतर २९ डिसेम्बर १८३५ रोजी अमेरिकन सरकार व चेरोकी जमातीमध्ये समझोत्याचा करार झाला. ह्या कराराला द ट्रीटी ऑफ न्यू इकोटा असे म्हणतात कारण हा करार जॉर्जिया राज्यातील न्यू इकोटा येथे झाला. त्यानंतर चेरोकी लोकांना येथून बाहेर काढून स्थलांतरित करण्यात आले.
ज्यांना हे मान्य नव्हते त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले आणि ती दुर्दैवी घटना घडली व हजारो लोकांचा ह्या प्रवासात जीव गेला.
ह्या प्रवासादरम्यान ४,००० लोक कॉलराने आजारी होऊन मरण पावले. आणि शेकडो लोक कुपोषण आणि फेडरल सरकारच्या भ्रष्टाचारामुळे झालेल्या अपघातांना बळी पडले.
हा दुर्दैवी प्रवास करीत जेव्हा चॉक्टॉ लोक त्यांच्या स्थानी पोहोचले तेव्हा त्यांच्या प्रमुखाने अलाबामाच्या एका वर्तमानपत्रात ह्या भयानक प्रवासाचे वर्णन “अश्रूंची व मृत्यूची पाऊलवाट (ट्रेल ऑफ टिअर्स अँड डेथ) असे केले.
सेमिनॉल आणि इतर जमातींनी मात्र ह्या स्थलान्तराला प्रचंड विरोध केला. त्यांना त्यात गुलामांनी सुद्धा साथ दिली. सेमिनॉल व सरकार ह्यांच्यात युद्ध झाले ज्याला सेकण्ड सेमिनॉल वॉर किंवा फ्लोरिडा वॉर असे म्हटले जाते.
हे युद्ध १६५३ ते १८४२ इतकी वर्षं चालले. अखेर सरकारला त्यांच्यापुढे मान झुकवावी लागली आणि त्यांना दक्षिण फ्लोरिडा येथे राहण्यास परवानगी मिळाली.
अर्थात इतके सगळे होईपर्यंत जवळपास ३,००० लोक हा प्रदेश सोडून स्थलांतरित झाले होते. पण काही लोक मात्र चिवट लढा देत तिथेच थांबले व त्यांनी आपला मूळ प्रदेश सोडला नाही.
आज अनेक इतिहासकारांना जॅकसन ह्यांचा हा निर्णय म्हणजे “एथनिक क्लिन्सिंग” चा प्रकार वाटतो.
जॅक्सन ह्यांना मात्र ह्या निर्णयाबद्दल कधीही पश्चाताप झाला नाही. उलट त्यांची अशी धारणा होती की हा निर्णय योग्यच होता. स्थानिक अमेरिकन जमातींना तिथून हलवले नसते तर त्यांचा विनाश झाला असता असे जॅकसन ह्यांचे मत होते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.