आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
फ्रेडी ओव्हरस्टीगन ही एक डच कम्युनिस्ट क्रांतिकारक होती जिने दुसऱ्या महायुद्धात नेदरलँड्स नाझी सैनिकांच्या तावडीतून सुटण्यासाठी लढा दिला. वयाच्या चौदाव्या वर्षी ती ह्या नाझिंविरुद्धच्या लढ्यात सामील झाली.
फ्रेडीने ट्रूस ह्या आपल्या मोठ्या बहिणीसह डच फितूर आणि नाझी सैनिकांना आपल्या तारुण्याच्या मोहात पाडून भुलवत असे आणि त्यांना धडा शिकवत असे.
तिने असे हनी ट्रॅप मध्ये पकडून अनेक नाझी सैनिकांना यमसदनी धाडले. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही तिने व तिच्या कुटुंबाने ह्या लढ्यात सर्वतोपरी सहकार्य केले.
फ्रेडीच्या आईचा फ्रेडी लहान असतानाच घटस्फोट झाला होता. फ्रेडी, तिची आई व बहीण वेगळे एका लहानश्या घरात राहत होते.
त्यांच्या घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की त्यांना गवताच्या चटईवर झोपावे लागत असे. असे असले तरीही त्यांच्या घरात गरजूंना आश्रय देत असत आणि त्यांना नाझी फौजांपासून लपवून ठेवत असत.
त्यांच्या घरी एक ज्यू जोडपे आश्रयाला होते आणि त्या जोडप्यानेच फ्रेडी व तिच्या बहिणीला युद्धाची कल्पना दिली. एकदा एक व्यक्ती त्यांच्याकडे नाझिंविरुद्ध लढा देण्याबद्दल विचारायला आली तेव्हा फ्रेडी व तिच्या बहिणीनेही होकार दिला व किशोरवयातच ह्या लढ्यात उडी घेतली.
इतक्या लहान मुली क्रांतिकारक असू शकतील अशी पुसटशी शंकाही कुणाला येत नसे म्हणूनच नाझिंविरुद्ध एजन्ट म्हणून काम करण्यासाठी त्या अगदी परफेक्ट होत्या.
फ्रेडीने तिच्या मोठ्या बहिणीसह डायनामाईट लावून पूल आणि रेल्वे ट्रॅक उध्वस्त करण्याचे काम केले. ह्या कामात तिच्याबरोबर हॅनी शाफ्ट नावाची एक किशोरवयीन मुलगी सुद्धा होती.
ह्या तिघींनी अनेक नाझी सैनिकांना गोळ्या घालून ठार मारले तसेच अनेक लहान ज्यू मुलांना देशाबाहेर सुखरूप पोचवण्याचे मोठे कार्य केले.
नाझी सैनिकांना भुलवून, हनी ट्रॅपमध्ये फसवणे हे त्यांनी केलेले सर्वात धोकादायक, जोखमीचे आणि धाडसी काम होते. त्या त्यांच्या टार्गेट्सना एखाद्या बार मध्ये भेटायच्या. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंगवून, आपल्या सौंदर्याची आणि गोड बोलण्याची भुरळ पाडून एकांतात जंगलात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी येण्यास भाग पाडायच्या आणि तिथे गोळ्या घालून त्यांना ठार करायच्या.
व्हाईस नेदरलँड्सला दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: फ्रेडी ओव्हरस्टिगन ह्यांनी असा एक प्रसंग सांगितला आहे.
“एका नाझी सैनिकाला ट्रूस ,माझी बहीण एका उंची, महागड्या बार मध्ये भेटली आणि त्याला बोलण्याने भुलवून एका जंगलात फिरण्यासाठी घेऊन आली. “फिरायला जायचे का ?” असे तिने त्याला विचारले आणि तिच्या रुपाला आणि बोलण्याला भुललेल्या त्याने लगेच होकार दिला.
त्यानंतर त्यांना योगायोगाने कुणीतरी ओळखीचे भेटले, ती व्यक्ती म्हणजे आमच्याचपैकी असलेली एक व्यक्ती होती आणि तो माझ्या बहिणीला म्हणाला,
“तू आत्ता इथे काय करते आहेस? तू ह्यावेळी असे फिरणे बरोबर नाही.”
माझ्या बहिणीने त्या व्यक्तीला सॉरी म्हटले आणि ती व तो नाझी सैनिक परत जाण्यासाठी वळले. थोडे लांब जातात त्या नाझी सैनिकावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या व त्याला ठार मारण्यात आले.त्या सैनिकाला कळले सुद्धा नाही की त्याला कोणी ठार केले.”
हे सगळे करण्यास प्रचंड धाडस लागते. असा लढा देणे सोपे नाही. ह्या लढ्यात काम करताना ह्या दोघी बहिणींना कधी कधी खूप वाईट वाटत असे.
पहिल्यांदा एका नाझी सैनिकास ठार मारल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटले होते आणि त्यांनी खूप वेळ रडून आपले मन हलके केले होते.त्यांना असे वाटले की असे काम करणे योग्य नाही.
“कुणीही असे काम करणे योग्य नाही. एखादी व्यक्ती उलट्या काळजाची, कोत्या मनाची किंवा खरंच गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल तर त्या व्यक्तीसाठी असे वागणे सोपे असते. पण सामान्य व्यक्तीसाठी एखाद्याच जीव घेणे ही भावना प्रचंड त्रासदायक असते. आमच्यासाठी तर हे करणे खूप कठीण आणि दुःखदायक होते.”
असे फ्रेडी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
वॉशिंग्टन पोस्टच्या मते फ्रेडी व त्यांची बहीण ह्या हत्या म्हणजे त्यांच्यावर सोपवलेले एक दायित्व समजत होत्या.
“आम्हाला हे करणे भाग होते. असे वाईट वागणे गरजेचे होते. चांगल्या व्यक्तींना फसवणाऱ्या, त्रास देणाऱ्या व्यक्तींची हत्या करणे हे वाईट असले तरी आवश्यक झाले होते” असे फ्रेडी म्हणतात.
त्यांची सहकारी हॅनी शाफ्ट पकडल्या गेली आणि नाझी सैन्याने तिची हत्या केली. युद्ध संपण्याच्या काही काळ आधी ही घटना घडली. हॅनी शाफ्टच्या हत्येनंतर ती स्त्री क्रांतिकारांसाठी एक आदर्श झाली.
तिची प्रेरणादायक कथा १९८१ सालच्या “द गर्ल विथ द रेड हेअर” ह्या चित्रपटात सांगितली गेली.
युद्धसमाप्तीनंतर ट्रुसने लेखन सुरु केले आणि “नॉट देन ,नॉट नाऊ,नॉट एव्हर” नावाचे तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले.
वॉशिंग्टन पोस्टच्या अनुसार ट्रूस आणि फ्रेडीला २०१४ साली त्यांच्या युद्धातील योगदानाबद्दल नेदरलँड्सच्या पंतप्रधानांनीद मोबिलायझेशन वॉर क्रॉस देऊन सन्मानित केले.
२०१६ साली ट्रूस ह्यांचे निधन झाले. युद्धानंतर फ्रेडी प्रसिद्धीपासून लांब राहिल्या. त्यांनी लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत. ५ सप्टेंबर २०१८ साली वयाच्या ९२व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
फ्रेडी ह्यांनी इतक्या लहान वयात जे धाडस दाखवले ते अतुलनीय आहे. त्याच्या शौर्याच्या कथा आजही नेदरलँड्समध्ये सांगितल्या जातात. फ्रेडी ओव्हरस्टिगन ह्यांना सॅल्यूट!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.