Site icon InMarathi

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वैचारिक व राजकीय प्रवास : राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचा इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : संजय लडगे

===

२०१८ साल हे कार्ल मार्क्सचे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने दिवाळी अंकात कार्ल मार्क्स व साम्यवादावर बरेच लेख वाचावयास मिळाले. एकूणच साम्यवादीचां वैचारिक व राजकीय प्रवास पाहून विस्मय वाटावा.

दुसरे महायुद्ध १९३९ मध्ये सुरू होण्यापूर्वी ‘फॅसिस्ट’ हिटलर व ‘साम्यवादी’ स्टालिन या दोघांमध्ये ‘मैत्री करार’ झाला. नंतर हिटलरने पोलंडमध्ये आपल्या फौजा घुसवल्या.

पूर्वेकडून स्टालिनने पोलंडमध्ये फौजा पाठवल्या व दोघांनीही अर्धा-अर्धा पोलंड वाटून घेतला. यावेळेपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसच्या बरोबरीने ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात उतरला होता.

हैद्राबाद संस्थानात निझामाच्या विरुद्ध काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांनी स्वातंत्र्य लढा चालू केला होता.

पुढे हिटलरच्या फौजांनी रशियावर आक्रमण केले. रशिया ही कम्युनिस्टांसाठी पितृभूमी असल्यामुळे व हिटलरने तिच्यावर हल्ला केल्यामुळे दोस्त राष्ट्रांच्या (ब्रिटिश) युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्याची भूमिका भारतीय कम्यु. पक्षाने घेतली.

 

india.com

भारतातील ब्रिटिश सरकारला सहकार्याचा हात पुढे केला व स्वातंत्र्य लढा मागे घेतला. हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ मागे घेऊन निजामाबरोबर मैत्रीची भाषा सुरू केली.

बेचाळीसच्या लढ्याला विरोध केल्यामुळे ब्रिटिश सरकारने कम्यु. पक्षावर असलेली बंदी उठवली. ‘चले जाव’ चळवळीत सहभागी होण्याचे भारतीय कम्यु. पक्षाने नाकारले.

पोलिस अ‍ॅक्शनपूर्वी निजाम आणि कम्युनिस्ट सोयीसाठी जवळ आले होते. कम्यु. पक्षावर पूर्वी घातलेली बंदी निजामाने उठवली आणि निजामाच्या भारतापासून स्वतंत्र होण्याच्या घोषणेला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला.

जेव्हा निजामाचे राज्य संपले, तेव्हा त्याने चोरून आयत केलेल्या शस्त्रांच्या अनेक पेट्या रझाकारांनी उघडल्याच नव्हत्या.

ती शस्त्रे आयतीच कम्युनिस्टांना मिळाली आणि तेलंगणभर दहशतीचे राज्य सुरू झाले. कम्युनिस्टांच्या सशस्त्र बंडाळीचा बिमोड करण्याचे काम भारतीय सेनेला स.पटेल यांनी सांगितले .

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगतच्या काळात भारत हा एक देश नाही, अशी कम्यु. पक्षाची धारणा होती. भाषिक विभाग हे ‘राष्ट्रिक’ (नॅशनॅलिटिज) आहेत आणि त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.

१९४९ साली ‘न्यू टाइम्स’ या सोविएत यूनियनच्या इंग्रजी भाषिक साप्ताहिकात ए. डियाकॉव्ह या लेखकाचा लेख आला होता. त्याने ‘राष्ट्रीय प्रांत’ (नॅशनल प्रॉव्हिन्सेस) असा विलक्षण शब्दप्रयोग वापरला होता.

स्वातंत्र्य मिळून दीड वर्ष झाले होते. निर्वासितांचा प्रश्न बिकट झालेला होता. त्यात पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोर धाडले होते. याची जाणीव न ठेवता भारत सरकारने भाषावार प्रांतरचना केली नाही अशी टीका डियाकॉव्ह याने केली.

 

livemint.com

भारतीय नागरिकत्व एकसंघ नाही या विचारामुळे कम्यु. पक्षाने पाकिस्तानच्या मागणीचा मुस्लिम लीगलाही मागे टाकील असा जहरी प्रचार केला होता. ही विचारसरणी देशाने स्वीकारली असती तर पाकिस्तान तर झाले होतेच, पण त्या पाठोपाठ अनेक देश निर्माण झाले असते.

भारतातील कम्यु. पक्षाने राष्ट्रिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याच्या धोरणाचा पुरस्कार करून विघटनेची बीजे रोवण्यास हातभार लावला होता.

सोविएत यूनियनचा आपल्याला कायम पाठिंबा राहील या समजुतीत कम्यु. पक्षीय नेते वावरत होते.भारतीय कम्यु. पक्षाचे घातपाताचे धोरण यशस्वी होत आहे, अशी स्टालिनची समजूत नव्हती, हे नंतर उघड झाले.

सामुदायिक शेतीचा स्वीकार केला नाही याबद्दलही डियाकॉव्ह टीका करतो. रशियात सामुदायिक शेतीचे धोरण सक्तीने अंमलात आणले. हजारो खेडी उद्ध्वस्त झाली आणि लाखो लोकांचा बळी गेला. इतके करूनही सोविएत यूनियनचे साम्राज्य नष्ट होईपर्यंत त्यास अन्नधान्याचा प्रश्न सोडवता आला नव्हता.

तेव्हा सामुदायिक शेती हा रामबाण नसून तो आत्मघातक उपाय आहे हे सिद्ध झाले आहे. भारत त्या मोहाच्या आहारी गेला नाही, हे योग्यच झाले.

१९५६ मध्ये कम्यु. पक्षाच्या अधिवेशनात नेहरू सरकारची अनेक धोरणे पुरोगामी आहेत व त्या सरकारला त्याबाबत पाठिंबा दिला पाहिजे असे नवे मूल्यमापन करण्यात आले. काँग्रेस सरकारशी संघर्षाची ‘लाईन’ आता सोडून द्यावयाची होती.

१९५६ पासून चीन आणि भारत यांच्या सरहद्दीवर तणाव निर्माण झाला. पुढे प्रत्यक्ष भारतीय हद्दीत चिनी फौजा आल्या तरीही ते आक्रमण आहे, असे मानायला बहुसंख्य कम्यु. नेते तयार नव्हते.

या आक्रमणाचा धिक्कार करण्याचे धैर्य कम्यु. पक्षाने दाखवले नाही. हळूहळू विविध प्रांतांतले कम्युनिस्ट विभागले गेले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जन्माला आला.

 

zeenews.india.com

आणीबाणीला कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला होता. १७ जानेवारी १९७७ रोजी निवडणुकांची घोषणा झाली. आणीबाणीच्या काळात इंदिरा काँग्रेसबरोबर असलेल्या कम्यु. पक्षाने त्या पक्षाबरोबरच आघाडी करून निवडणूक लढवणे स्वाभाविकच होते.

निवडणूक निकाल काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांचाही सपशेल पराभव करणारे होते. आणीबाणीला पाठिंबा देण्यात चुकले,अशी भावना कम्यु. कार्यकर्त्यात पसरली होती.

पुढे जनता सरकार कोसळले व १९८० साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या. इंदिराबार्इंच्याबरोबर राहून पराभवाचा चटका सहन केलेले इतर कम्यु. नेते मात्र आता इंदिराबार्इंची संगत धरण्याला बिलकूल तयार नव्हते.

पक्षाने बहुमताने काँग्रेसशी सहकार्य न करता विरोधात निवडणुका लढवावयाच्या असा निर्णय घेतला. कम्युनिस्टांचा हाही निर्णय चुकला. इंदिरा काँग्रेसचा प्रचंड विजय झाला. विरोधी पक्षांची दाणादाण झाली आणि तेच दुर्भाग्य कम्युनिस्ट पक्षाच्याही वाट्याला आले.

मार्क्सने त्याचे साम्यवादी तत्त्वज्ञान मांडल्यानंतर पंधरा- वीस वर्षांनंतर युरोपमध्ये औद्योगिक युग आले. मार्क्सचे तत्त्वज्ञान हे ‘मानवी श्रमातून तयार होणार्या संपत्तीच्या कालावर’ बेतलेले होते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हे तत्त्व ‘कालबाह्य’ झाले आहे.

पहिले महायुद्ध अखेरच्या पर्वात असताना रशियात झारशाही मोडकळीस आली आणि लेनिनसारखा कमालीचा निर्धारयुक्त आणि तितकाच निर्घृण नेता लाभून पहिल्या समाजवादी राज्याची स्थापना झाली.

पुढारलेल्या युरोपात क्रांती होईल आणि मागास रशियातील क्रांती नुसती सुस्थिरच होईल असे नव्हे तर ती सुधारेल, सुसंस्कृत होईल असे लेनिनला वाटत होते. तसे काही झाले नाही.

 

iroon.com

युरोपच्या कामगारांना क्रांतीची ओढ नव्हती, त्यांना वेतनवाढ, रजा, बोनस इत्यादी हवे होते. तेव्हा युरोपात क्रांती होण्याचे स्वप्न विरले. तेथील सामान्य लोकांचेही राहणीमान रक्ताचे पाट न वाहवताही सुधारत गेले.

रशियात कारखानदारी वाढली तरी तिची जबर किंमत मानवी आयुष्याचा बळी देऊन वाढली. ती वाढूनही धान्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत अनेक बाबतीत पाश्चिमात्य देशांपुढे हात पसरावे लागले.

अंतराळात जाता येते, पण साधा ब्रेड सहज मिळत नाही, की धान्यही सुलभपणे विकत घेता येत नाही असा समाज निर्माण झाला. लष्करी सामर्थ्यावर त्याने सर्वात अधिक भिस्त ठेवली आणि महासत्ता म्हणून त्याची गणना होऊ लागली.

शेतीपासून साहित्यापर्यंत सर्वच बाबतीत राज्यकर्ते नियम आणि कायदे करू लागले आणि मग केवळ लष्करी सामर्थ्य संपादन करता येऊन शेती आणि साहित्य, यांपैकी काहीच जमले नाही.

परंतु पहिल्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांत मंदी आणि बेकारी आली तेव्हा रशियात फारच मोठे परिवर्तन होत असून त्याचे स्वागत करण्याची वृत्ती बळावली. म्हणून मग तिथे लाखो लोक मरत आहेत आणि असंख्य लोकांचे शिरकाण होऊन सर्व समाजाचे बराकीकरण होत आहे याकडे दुर्लक्ष करण्यात अनेक बुद्धिमंत आणि नामवंत यांची बुद्धी वाया जात होती.

प्रत्येक रशियन कमालीचा राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय अहंकार जपणारा, आक्रमक आहे असे लेनिन म्हणत होता. अशा लोकांतून तयार झलेले नेतृत्व पूर्णतः वेगळे कसे असेल?

स्टालिन हा अस्सल रशियनांचा खरा प्रतिनिधी होता. परदेशांत दीर्घ काळ काढलेला लेनिन नव्हे. स्टालिनने न भूतो न भविष्यति असे अत्याचारांचे पर्व सुरू केले आणि रशियनांनी ते स्वीकारले. पण भारतातील स्वातंत्र्य आणि सुखसोयी यांचा लाभ घेऊन स्टालिनच्या राजवटीचे समर्थन करणारे हे भयंकर भ्रम जपणारे होते किंवा बौद्धिकदृष्ट्या कमालीचे अप्रामाणिक होते.

 

cruxcom.com

एका विशिष्ट विचारसरणीत, एका धर्मग्रंथात जगाचे सर्व आणि सर्व काळचे प्रश्न सोडवून दाखवले आहेत ही कल्पनाच चुकीची आहे. इतिहासाचा प्रवाह ठरलेला असून त्याची दिशा आपल्याला काही ग्रंथांच्या आधारे समजली आहे, या भावनेने रशिया व चीन या देशांचे राज्यकर्ते वागत होते.

पण वर्तमान त्यांच्या हातात नव्हता आणि भविष्य त्यांनी मानले तसे घडले नाही.

या शतकात साम्यवादी समाजरचना निर्माण करण्याच्या आग्रहापायी स्टालिनने दोन कोटी तर माओने तीन कोटी लोक नष्ट केले. तिसरा मार्क्सवादी पोल पॉट. त्याने असेच लाखो लोक बळी दिले.

या शतकातील हा भयंकर संहार होता. ते एक शल्य होते. साम्यवादी तत्त्वज्ञानाच्या दुराग्रहापायी झालेला हा नरसंहार माणुसकीला काळिमा फासणारा होता.

चीनमध्ये जी काही आर्थिक प्रगती होत आहे ती साम्यवादामुळे नसून सरकारी भांडवलशाहीमुळे. तिथेही मार्क्सवाद पराभूत झाला आहे. सत्तर वर्षांहून अधिक काळ बराच मोठा समाज एका भ्रमात वावरत राहावा, हे मानवी बुद्धी किती ‘फसवी’ आहे, याचे द्योतक आहे.

कामगार हा नेहमीच पददलित राहील अशी मार्क्सची ठाम समजूत होती. तसेच जगातील सर्व कामगार एक होतील व वर्गसंघर्ष करतील असेही त्यास वाटत होते.

तसे व्हायचे म्हणजे राष्ट्रवादाचा अवलंब कामगार करणार नाहीत असे होते. पण अनेक तंत्रज्ञानविषयक बदल होऊन उत्पादन प्रक्रिया बदलत गेली आणि विकसित देशातला कामगार हा शेअर भांडवल करायला लागून तो आधुनिक अर्थव्यवहारात भागीदार बनला.

 

Pinterest.com

कामगारांची राष्ट्रवादी भावना कधीच लोपली नाही. यामुळे ब्रिटिश व फ्रेंच कामगारांनी जर्मन कामगारांविरुद्ध दोन युद्धांत भाग घेतला आणि पूर्व युरोपीय देशांतल्या कामगारांचे उठाव रशियाच्या कामगारांतून आलेल्या लाल लष्कराने दडपले.

इराकमध्ये दहा हजार नागरिक युद्धात मरण पावले. पण अमेरिकन कामगारांचा आपल्या सरकारला पाठिंबा होता.

तेव्हा कामगार हा केवळ वर्गीय हितच जपतो आणि सर्व जगातल्या कामगारांशी त्याचे नाते अतूट असते हे गृहीतकृत्यच चुकीचे ठरते. अगोदर कोष्टके बसवून त्यानुसार भाकिते केली तरी प्रत्यक्षात ती उतरतात असे नाही.

थोडक्यात, १९४२ ची चले जाव चळवळीला विरोध, फाळणीचा उघड पुरस्कार, रझाकारानां पाठिंबा, तेलगंणामध्ये सशस्त्र उठाव, १९६२ चे चिनी आक्रमण व कारगिल युद्धाच्या वेळी घेतलेला देशविरोधी पवित्रा, भारत तेरे तुकडे होंगे या जेएनयु मधील घोषणेला मुक संमती, काश्मीर मधील विघटनवादी गटाशी संबंध, नक्षलवादाला पाठिंबा व त्यांच्या हिंसेच समर्थन, ट्रिपल तलाक व पाँलिगामी विषयावर धर्माधं गटाला समर्थन , भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराला विरोध इ.गोष्टी बघितल्या तर भारतीय हितसंबंधांनाच त्यांनी तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version