Site icon InMarathi

‘दारूच्या’ नशेत केली घोडचूक, हा दारुण पराभव कसा काय झाला, जाणून घ्या…

karancebes battle inmarathi

allthatsinteresting.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात इतक्या काही विचित्र घटना घडतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्यप्राय असते. इतिहासातही अश्या अनेक घटना घडल्या आहेत.

फितुरीमुळे युद्ध हरण्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतील पण स्वतःच्याच सैन्यावर आक्रमण करून शत्रू मैदानात नसतानाही आपल्याच हाताने आपला पराभव करून घेतल्याची घटना सुद्धा इतिहासात घडलेली आहे.

खरं तर ह्यावर विश्वास बसणे कठीण आहे पण ही अशक्यप्राय गोष्ट ऑस्ट्रियन सैन्याने खरी करून दाखवली होती.

आणि हे सगळे घडले त्याचे कारण होते दारू! दारूमुळे नुकसान होते हे जगजाहीर आहे, पण इतके मोठे नुकसान होण्याची ही घटना म्हणजे एकमेवाद्वितियच म्हणायला हवी.

करनसीब्स हे शहर सध्या नैऋत्य रोमानियामधील बानत प्रदेशातील कॅरस-सेवेरिन काऊंटी मध्ये आहे. हे शहर तिमीस व सिब्स नदीचा संगम होतो तेथे वसलेले आहे.

हे शहर पूर्वी हंगेरियन साम्राज्यात होते त्यानंतर ह्या शहरावर ऑटोमन साम्राज्याची सत्ता होती.

 

 

ह्याच ठिकाणी करन्सीब्सचे युद्ध झाले आणि बराच काळ युद्ध चालल्यानंतर ह्या प्रदेशाचा ताबा हॅब्सबर्ग्स म्हणजेच हाऊस ऑफ ऑस्ट्रियाच्या ताब्यात गेला. सप्टेंबर १७८८ मध्ये ऑटोमन सैन्याने करनसीब्स शहरावर आक्रमण केले.

ह्या शहरावर ताबा मिळवण्यासाठी ऑटोमन सैन्य बराच काळ लढा देत होते. त्या भागावर ताबा मिळाल्यानंतर त्यांचा सामना त्यांच्या शत्रूशी म्हणजेच ऑस्ट्रियन सैन्याशी झाला.

पण जेव्हा ऑटोमन सैन्य ऑस्ट्रियन सैन्याला सामोरे गेले तेव्हा ऑस्ट्रियन सैन्याची अवस्था अतिशय दयनीय व विचित्र झाली होती.

दारूच्या अंमलाखाली चुकीचा समज झाल्याने त्यांनी स्वतःच्याच सैन्यातील लोकांवर आक्रमण करून स्वतःची अत्यंत वाईट अवस्था करून घेतली होती.

इतिहासातील हे प्रसिद्ध करनसिब्सचे युद्ध नशेत असलेले ऑस्ट्रियन घुसखोर व ऑस्ट्रियन सैन्य ह्यांच्यात झाले आणि त्यांच्या आपापसातील लढाईमुळे ऑटोमन सैन्याला विनासायासच त्या प्रदेशावर ताबा मिळवता आला.

१७८७ ते १७९१ पर्यंत ऑस्ट्रियन सैन्य आणि नंतर हॅप्सबर्ग सैन्य हे हॅप्सबर्ग -ऑटोमन किंवा ऑस्ट्रो -तुर्की लढाईत बुडालेले होते.

ह्या युद्धाच्या नेतृत्वाची जबाबदारी सम्राट जोसेफ दुसरा ह्याच्यावर होती.

 

 

ह्या युद्धादरम्यान सम्राटाची प्रकृती फारशी बरी नव्हती. ह्याच कारणाने ऑस्ट्रियन सैन्य हे नियोजनाशिवायच युद्धात उतरले होते. ऑस्ट्रियन सैन्यात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता.

ह्याचे दुसरे कारण ह्या सैन्यात ऑस्ट्रियन लोकांशिवाय जर्मनी, झेक रिपब्लिक, फ्रांस, क्रोएशिया, सर्बिया आणि पोलंडची माणसे सुद्धा होती.

ह्या सैन्यात समन्वयाचा पूर्णपणे अभाव होता. तसेच भाषेचा प्रश्न असल्याने वेगवेगळ्या देशांतील लोकांमध्ये व्यवस्थितपणे संवाद होणे कठीण झाले होते.

संवादात एकमेकांच्या भाषांचे भाषांतर करता करता अनेक महत्वाच्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचतच नव्हत्या.

ह्या करनसिब्सच्या युद्धाच्या वेळी ऑस्ट्रियाच्या सैन्याचे ऑटोमन सैन्याशी डॅन्यूब नदीच्या ताब्यावरून युद्ध सुरु होते.

१७ सप्टेंबर १७८८ रोजी काही ऑस्ट्रियन सैन्यातले घुसखोर तुर्की सैनिकांच्या शोधात गस्त घालण्यासाठी गेले.

गस्त घालत असतानाच त्यांना नदीच्या दुसऱ्या तीरावर काही सैनिक छावणी उभारताना दिसले.

त्या सैनिकांनी ऑस्ट्रियन सैनिकांना दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपल्याकडील मद्य पिण्यास आमंत्रण दिले. ह्या सैनिकांनी मजेत हे आमंत्रण स्वीकारले आणि तिथूनच ह्या घोटाळ्याला सुरुवात झाली.

 

 

ह्या लोकांनी मनसोक्त दारू प्यायली. काही वेळानंतर पायदळातील काही सैनिक तेथे आले आणि ह्या सैनिकांनी त्यांनाही आपल्याबरोबर मद्य पिण्याचे आमंत्रण दिले.

जेव्हा त्यातील एका सैनिकाला मद्य देण्यास तिथल्या इतर सैनिकांनी नकार दिला तेव्हा दारूच्या नशेत त्यांच्यात मारामारी सुरू झाली आणि थोड्याच वेळात ह्या मारामारीचे एका लढाईत रूपांतर झाले.

बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या, एकमेकांवर वार करण्यात आले.

करनसिब्स शहरात असलेल्या सैन्यात मात्र असे काही सुरु नव्हते. सगळीकडे शांतता होती आणि तिथले सैनिक डोळ्यात तेल घालून ऑटोमन सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

जेव्हा त्यांनी नदीच्या पलीकडे झाडलेल्या बंदुकीच्या फैरींचा आवाज ऐकला तेव्हा साहजिकच त्यांना वाटले की शत्रू सैन्याने आक्रमण केले आहे व युद्ध सुरु झाले आहे.

त्यांनी “तुर्क! तुर्क!” असे ओरडून एकमेकांना सावध करणे सुरु केले.

इकडे नदीच्या इकडच्या तीरावर दारूच्या नशेत भांडणाऱ्या सैनिकांनी पलीकडून आपल्याच सैन्याचा “तुर्क ! तुर्क!” असा आवाज ऐकला आणि ते पटापट आपल्या सैन्याची मदत करण्यासाठी छावणीत परत गेले.

त्यांना वाटले की आपल्या सैन्याने आपल्याला मदतीसाठी हाक मारली आहे.

अंधारात दुसऱ्या तीरावरून येणारी माणसे ऑस्ट्रियन सैन्याला ओळखू आली नाहीत. त्यांना ते शत्रूचे सैनिक वाटले आणि त्यांनी अंधारातच त्यांच्यावर गोळीबार करणे सुरु केले.

 

 

इकडे ह्या दारूच्या नशेत असलेल्या सैनिकांना असे वाटले की आपल्या छावणीवर तुर्की सैन्याने ताबा मिळवला आहे आणि आता ते आपल्याशी लढायला आलेत.

आपल्याच सैनिकांना शत्रूचे सैनिक समजून त्यांनी त्या गोळीबाराचे प्रत्युत्तर उलट त्यांच्यावरच गोळीबार करून दिले.

ह्या सगळ्या गोंधळात कुणालातरी चूक कळली असावी म्हणून किंवा गोळीबार थांबावा म्हणून काही जर्मन अधिकाऱ्यांनी “हॉल्ट” म्हणजेच थांबा असे ओरडणे सुरु केले.

परंतु भाषेची अडचण असल्याने जर्मन भाषा अवगत नसलेल्या सैनिकांना असे वाटले की ते सैनिक “अल्लाह अल्लाह” असे ओरडत आहेत.

तुर्की लोक युद्धात असे “अल्लाह अल्लाह” ओरडतात ह्याची ऑस्ट्रियन सैनिकांना कल्पना होती. भाषाच न कळल्यामुळे गैरसमज होऊन हा गोळीबार थांबण्याऐवजी दुप्पट जोमाने सुरु झाला.

अश्या प्रकारे ऑस्ट्रियन छावणीत सगळीकडे गडबड गोंधळ उडाला आणि करनसिब्सचे युद्ध सुरु झाले. मद्य प्यायल्याने हरवलेली शुद्ध, अंधार आणि भाषेची अडचण ह्या सगळ्या कारणांमुळे संपूर्ण ऑस्ट्रियन सैन्य एकमेकांशीच लढू लागले.

रात्र संपता संपता जवळजवळ हजार पेक्षाही जास्त ऑस्ट्रियन सैनिक एकतर जखमी झाले किंवा ठार झाले.

 

 

सकाळ होताच ऑस्ट्रियन लोकांना केवढी मोठी चूक घडली हे लक्षात आले. दुर्दैवाने तेव्हा परिस्थिती सावरण्याच्या पलीकडे गेली होती आणि केवळ काही सैनिकांच्या आपापसातील वादामुळे हजार सैनिकांचा जीव गेला होता.

ह्यामुळे ऑस्ट्रियन सैन्याचे फार मोठे नुकसान झाले.

त्यानंतर दोनच दिवसांत तुर्की सैन्याने ह्या प्रदेशावर आक्रमण केले. त्यांची नियोजनबद्ध योजना निरर्थक ठरली.

जवळजवळ संपूर्ण ऑस्ट्रियन सैन्य काहीही करण्याच्या लायकीचे उरले नाही आणि शहराची सुरक्षाव्यवस्था कोलमडून पडली. त्यामुळे करनसिब्स शहर असुरक्षित झाले व तुर्की लोकांनी अगदी सहज त्यावर ताबा मिळवला.

त्या रात्री नेमके काय घडले हे जवळपास ४० वर्षांनी लोकांपुढे आले.

काही लोकांच्या मते असे काही घडलेच नाही. काही इतिहासकार म्हणतात की असे घडणे शक्यच नाही की एखादे सैन्य आपल्याच सैनिकांना ओळखणार नाही आणि आपापसातच युद्ध करून संपेल.

जे लोक ही घटना खरंच घडली असे मानतात त्यांच्या मते ह्या लढाईबद्दल इतिहासात फारसे बोलले जात नाही कारण आपल्या कृत्याची ऑस्ट्रियन सैन्याला इतकी शरम वाटली की ह्या घटनेबद्दल ते अनेक वर्ष काहीही बोललेच नाहीत.

 

 

आपल्याच सैन्यातील सैनिक ओळखता न येऊन त्यांच्याशीच युद्ध करणे हे खरेच अविश्वसनीय आहे.

पण भरपूर मद्य प्यायलेले लोक ह्या दुनियेत नसतातच. ते भलत्याच जगात पोहोचलेले असतात आणि ते काहीही समज करून घेऊन काहीही कृती करू शकतात हे ही तितकेच खरे आहे.

दारूची नशा अशीच असते जी फक्त नाशच करते!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version