Site icon InMarathi

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा ‘बीटिंग रिट्रीट’ हा नेत्रदीपक सोहळा कसा सुरु झाला? वाचा

beating retreat inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. राजपथावरील संचलन असो वा “बीटिंग द रिट्रीट” हा कार्यक्रम, नेहमीच उत्साह निर्माण करणारे असतो.

भारतीय सेनेप्रती असणारी आपुलकी आणि सन्मानामुळे “बीटिंग द रिट्रीट” हा नयनरम्य आणि संगीतमय सोहळा अनेकांना आकर्षित करत असतो.

या कार्यक्रमाचे स्वरूप काय असते, त्याचा इतिहास यांची माहिती जाणून घेण्याची प्रत्येक भारतीयाला उत्सुकता असते. त्याचा लेखाजोगा मांडणारा हा लेख..

“बीटिंग द रिट्रीट”

 

dnaindia.com

 

दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्यानंतर ३ दिवसांनी म्हणजे २९ जानेवारीला ‘बीटिंग द रिट्रीट’ या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होते.

राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत तिन्ही सैन्य दलांचे बँड, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे बॅण्डपथक या कार्यक्रमात सामील होतात.

सूर्यास्ताच्या काही वेळ अगोदर राजधानी नवी दिल्ली मधील विजय चौकात हा दिमाखदार संगीतमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदल राजधानीत आले असते ते परत आपल्या बराकीत जातात.

तो निरोपाचा क्षण हा “बीटिंग द रिट्रीट”च्या स्वरूपात साजरा केला जातो. देशभक्ती, शौर्य, शक्ती, आणि विजय यांचे स्वर या कार्यक्रमात निनादत असतात.

 

india.com

 

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राष्ट्रपती आल्यानंतर राष्ट्रगीताची सुमधुर धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर बिगुल वाजवून बॅण्डपथक येत असल्याची वर्दी दिली जाते.

मग सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाचे बँड यांच्यासह पोलीस दलांचे बँड विविध प्रकारच्या धून सादर करतात. दरवर्षी नवीन धून समाविष्ट करण्यात येतात.

कदम कदम बढाये जा, सारे जहाँ से अच्छा, वंदे मातरम, अबाईड विथ मी यांसारख्या काही धून लोकप्रिय आहेत. यावेळेस बासरी आणि इतर काही वाद्य घेऊन एकट्याने देखील काही धून सादर केल्या जातात.

महात्मा गांधी यांची आवडती धून “वैष्णव जन” ही धून देखील यावेळी सादर केली जाते. “अबाईड विथ मी” हे ख्रिश्चन ईशस्तवन देखील त्यांना प्रिय होते. भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाफ या सोहळ्यात बघायला मिळतो.

 

indiatoday.com

 

बरोबर सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवला जाऊन राष्ट्रगीताची धुन वाजवून कार्यक्रमाची सांगता होते. ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याची धून वाजवत बँड सर्वांचा निरोप घेत संचलन करतात.

त्याचवेळी रायसिनाहिल चा परिसर रोषणाईने उजळून निघतो. हे दृश्य म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

हे  विहंगम दृश्य डोळ्यात साठवत विजय चौकातून प्रमुख अतिथी, इतर माननीय आणि विलक्षण उत्साहाने प्रेरित झालेली जनता परतीच्या प्रवासाकडे निघते.

 

बीटिंग द रिट्रीट चा इतिहास

सैन्य इतिहासात ही परंपरा जुनी आहे. ब्रिटनमध्ये १६ व्या शतकात याची सुरुवात झाली. सूर्यास्ताच्या वेळी सैनिक युद्धभूमीवरून आपल्या शिबीराकडे रवाना होत त्यावेळी बंदुकीची एक गोळी झाडून, ड्रम, पाईप यांसारखे वाद्य वाजवत हा सोहळा पार पाडला जाई.

 

Etemaad.com

 

सैन्याचे मनोबल टिकून राहावे, त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी या प्रकारचे आयोजन केले जाई. कालऔघात त्याचे स्वरूप बदलत गेले. आधी हा सोहळा “वॉच सीटिंग” या नावाने ओळखला जाई.

जगभर सैन्याच्या वाद्यपथकांसह असे कार्यक्रम होत असतात. भारतात याची सुरुवात १९५० ला झाली. म्हणजे अगदी पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून आपली ही परंपरा कायम आहे.

स्वातंत्र्यानंतर ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप प्रथमच भारतात आले होते.

तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ग्रेनेडिअर बटालियन चे मेजर जी. ए. रॉबर्ट्स यांना स्वागत समारोहात काहीतरी सर्जनशील असा कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार रॉबर्ट्स यांनी वाद्यवृंदाची तयारी केली होती. त्यानंतर भारतीय राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ हा बीटिंग द रिट्रीट चा सोहळा होऊ लागला.

 

travelwhistle.com

 

एकप्रकारे ही आपण ब्रिटिशांकडून घेतलेली परंपरा आहे. सुरुवातीला केवळ तिन्ही सैन्य दल यांत सामील होत असत. मात्र २०१६ पासून पोलीस दल देखील यांत सामील करण्यात आले.

त्यामागे कारण असे की, सैन्याइतकीच पोलीस दलांची भूमिका देखील तितकीच महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला.

अशा या दिमाखदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोट्यवधी भारतीय दूरचित्रवाणीवर बघतातच. मात्र हा सोहळा एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version