आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : आमदार अनिल गोटे
===
आज सकाळी जाॅर्ज फर्नांडीस यांच्या दुःखद निधन झाल्याचे समजले. सर्वाथाने अतिशय प्रामाणिक, स्पष्टवक्ते,सपूर्ण जीवन व्रतस्तभावनेने घालविलेले, तेवढेच निर्भिड माझे जीवश्च, कंठस्त मित्र असंख्य आठवणींचा अमूल्य खजाना सोडून गेलेत.
महिन्यापूर्वीच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटायची ईच्छा व्यक्त केली होती. दुर्दवाने भेट होवू शकली नाही.
श्रीमती इंदिराजींच्या निघृण हत्येनंतर देशातील वातावरणच बदलले होते. भारतीय राजकारणाच्या पटलावर स्वर्गीय राजीव गांधीचा उदय झाला होता. राजीव गांधींना विरोध म्हणजे खलिस्तानांन्याचे समर्थन असेच वातावरण देशभर होते.
अनंतपूर साहेब ठरावाला पाठींबा म्हणजे फुटीर वाद्यांना पाठींबा अशी विचित्र परिस्थिती होती. काॅग्रेसचे सर्वेसर्वा राजीव गांधी एवढ्या एका मुद्यावर विरोधकांना सार्वजनीक स्वरुपात नामोहरम करीत होते.
राजीवजींच्या अश्वमेघाला थांबविण्याची भल्या भल्यांंची हिम्मत होत नव्हती. राजीव गांधींनी देशभर लोंगोवाल करार व अनंतपूर साहेब ठराव यावर विरोधकांंची वाचाच बंद केली होती.
त्या काळात प्रसिध्दी माध्यमे आजच्या ईतकी वेगवान नव्हती. एक दिवशी सकाळी वृत्तपत्र हातात घेतले धक्काच बसला.
जाॅर्ज गरजले! राजीव गांधींचीच बोलती बंद केली. त्यांनी गर्जना केली, “अनंतपूर साहेब काही मुद्दे सोडून आम्हाला मान्य आहे.”
राजीव गांधींनी ठराव वाचाला तर नाहीच पण पाहीला की नाही याचीच मला शंका आहे. अनंतपूर व लोंगोवाल करारातील कुठले कलम त्यांना मान्य नाही हे त्यांनी जाहीर करावे. ते सांगतील त्या ठिकाणी मी चर्चेला व पत्रकार परिषदेला तयार आहे. झाले बोलती बंद !
मी जाॅर्जना विचारले
“इंदिराजींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला भिती नाही वाटली का?”
ते म्हणाले, “सत्य बोलण्याकरीता मी परमेश्वराला सुध्दा घाबरत नाही. मृत्यु हा सत्यच आहे मी मृत्युलाही भीत नाही”.
आजच्या राजकारणातील लबाडी, खोटेपणा, फसवणुक, आपल्याच पक्षाच्या व्यक्तीशी गद्दारी, सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलण्याचा आलेला ताज्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर एवढेच म्हणावेसे वाटते, जाॅर्ज खरेच तुमच्या सारखा एकवचनी पुन्हा जन्माला येणे नाही.
भूक बळी प्रकरणात मी तत्कालीन मंत्री वर्तक यांच्या कानफटीत वाजवल्यानंतर, माझ्या पक्षाचे नेते नाराज झाले.
पण आपण व श्रीमती मृणालताईंनी जाहीरपणे माझ्याबाजूला उभे रहाण्याचे धारिष्ठ्य दाखविले. आॅर्थररोड तुरुंगातून माझ्या सुटकेच्या दिवशी शेकडो सहकार्यांसह आला होतात.
जनसंघाचा पिंड आपण पुर्ण विरोधात पण आपण मला कधी जाणवू दिले नाही.
माझी पत्नी सौ. हेमा व माझ्या आईला भेटण्या करीता पाचव्या गल्लीतील माझ्या घरी आला होतात. सर्व कुटूंबियांची आस्थेने वाचारपूस केली. दिल्लीला मी आलो की, सकाळचा नाश्ता ठरलेलाच असायचा.
सौ हेमाला सांगितलं की, सकाळी नाष्ट्यात कांदा पोहेच हवेत. मी नास्टा घेवून आलो. पहातो तो काय? कारगीलच्या युध्दात प्रत्यक्ष युध्दभूमीवर जावून जवानांना आश्वस्त करणारा निधड्या छातीचा वीर, कारगील युध्द जिंकून देणारा महान सेनाप्रमुख स्वतःचा पायजामा व नेहरु शर्ट, अंडर पॅन्ट, बनियन धूऊन वाळवत बसला होता. आता हे स्वप्न वाटावे !
कार्यकर्ते पाया पडले तर, तुम्हाला चीड यायची. नुसतं खाली वाकून नमस्कार केला तरी राग यायचा. आत्ता असे नेते पैदा झाले की, आपल्या बापाच्या वयाच्या वयोवृध्दांना पाया पडायला लावतात.
एखादा पाया पडला नाही तर कर्तृत्वशून्य नेत्यांना राग येतो. काही नेते असे आहेत की, त्यांना कुणी ओळखतही नाहीत. कालही काही नव्हते. आजही नाहीत. उद्या असणार सुध्दा नाहीत .
त्यांना मागे पुढे गाड्या लागतात. बदोबस्त लागतो. मी आपलं जीवन जवळून पाहीलय !
पाकीस्तानबरोबर कारगील युध्द सुरु असतांना आपण आपल्या बंगल्याच्या प्रवेशाचे मुख्य गेटच काढून फेकून दिले होते.
एवढेच नव्हेतर, रात्री झोपतांनाही आपण आतून दार बंद करुन झोपला नाहीत. दार केवळ ओढून बंद केलेलं! कारगीलचे युध्द सुरु असतांना
आपण परमवीर चक्रविजेत्या अब्दुल हमीदच्या स्मारकाच्या उदघाटनाला आला.
मला तेलगी प्रकरणात अडकविले गेले. विरोधकांनी एका फोटोत आपण असल्याचे निमित्त करुन आपल्यावर टीका केली. आपण ठणकावून सांगीतले,
“मी अनिलला तरुण पणा पासून ओळखतो. प्राण गेला तरी तो असे कृत्य करणार नाही. STOP THIS NONSENSE”
आज आपल्या सर्व आठवणी नजरे समोर दाटून आल्या ! एखाद्या चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर एका मागून एक प्रसंग नजरे समोर येतो. एकच प्रसंग पुन्हा पुन्हा नजरे समोर येतोय..
लोकसभेवर आपण विराट मोर्चा काढला. पोलीसांनी आपणास इतकी मारहाण केली की, आपण मेलात समजून रस्त्यावर बेवारस सोडून दिलं, पण सफदरजंग मधे आपल्या श्वासोश्वासचा पुसटचा आवाज ऐकू आला. आपण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलात.
आपल्याला अश्रूंचा राग यायचा! आता आपण नाहीत. अश्रूही थांबले नाहीत. एका सर्वश्रेष्ठ नेत्याला साश्रू नयनांनी निरोप !
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.