Site icon InMarathi

‘कन्हैया कुमार’ काँग्रेससाठी आता अडचण बनतोय का…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : मकरंद मुळे, (पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक)

===

आपुलकीने निमंत्रण देणे,नक्की यायचं असे सांगणे, वाट पहात आहोत असे म्हणणे आणि मग, निमंत्रण नाकारणे, येऊ नका असं करणारी काँग्रेस आणि हा सगळा प्रकार पाहून मूक रहाणारे नयनतारा यांच्या वेळच्या वाजंत्रीवाल्यांच्या निमित्त…) नयनतारा प्रकरणात जे झाले तेच कन्हैयाच्या बाबतीत घडले आहे.

मात्र, इथे थेट काँग्रेस असल्याने त्यावेळी घसाफोड करणारे आता मूग गिळून बसले आहेत.

महात्मा गांधी यांच्या स्मृतिनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसने केले आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसने जेएनयु च्या कन्हैय्या कुमार आणि रशीद यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.

मात्र, आता हे अगत्याचे निमंत्रण कॉंग्रेसने मागे घेतले आहे. त्या दोघांना तुम्ही येऊ नका असे काँग्रेसने सांगितले आहे.

 

network18.com

काँग्रेसने यु-टर्न घेतला आहे. नयनतारा यांच्या बाबतीत नुकतेच असे घडले होते. महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी नयनतारा यांना उदघाटक म्हणून बोलावले होते. त्यानंतर त्यांना येऊ नका असे कळवले गेले.

याचे सगळे खापर भाजप सरकार आणि त्यामुळे आलेली असहिष्णुता, अभिव्यक्तीचा संकोच यावर फोडण्याचा संघटित सेक्युलर प्रयत्न झाला होता.

काही पत्रकारांनी स्वतःला साहित्यिक समजून समेलनावर बहिष्कार टाकला होता. वाहिन्यांनी एकच गदारोळ माजवला होता.

अतिथी अपमान, उदात्त भारतीय संस्कृतीचा अवमान, लज्जास्पद अशी विशेषण लावून हल्लाबोल केला होता. ‘लिबरल एल्गार’ उभा करण्यासाठी कंबर कसली होती.

अंधार, खड्डे असं सर्वत्र असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले जात होते. आता, काय वेगळे घडले आहे ? तर, निमंत्रण नाकारणारी काँग्रेस आहे.

 

en.wikipedia.org

त्यामुळे, नयनतारा विषयात आकांडतांडव करणारे काँग्रेस अडचणीत येईल असे काहीही करणार नाहित. आपल्या ‘आकाला’ प्रश्न विचारण्याचा बाणेदारपणा नयनतारा निमंत्रणावरून बोंबाबोंब करणाऱ्या कंपूत नाही.

खाविंद चरणी ज्यांच्या निष्ठा वर्षानुवर्षे आहेत ते सगळे बुद्धिवंत सोईस्कर मौन बाळगणे स्वाभाविक आहे.

निमंत्रण नाकारण्याची कृती करणारी काँग्रेस असेल तर नेहरू औदार्य गुंडाळून ठेवले जाते, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. नेहरुवाद कधी वापरावा आणि वापरू नये याचे भान असल्याने विविध “वादी” आता आपल्या तलवारी म्यान करून ठेवतील.

लेफ्ट आणि न्यू-लेफ्टच्या थिअरीनुसार काँग्रेसला सगळे गुन्हे माफ आहेत. तनखे, पुख्खे, पुरस्कार, शाली-झुली, पद काँग्रेसने नेहमी ‘उदार’पणे देऊ केले आहे.

त्या मिठाला जागणे म्हणजेच ‘विचारवंत’ होणे असे मानले जाते.कन्हैयाचा उपयोग कदाचित 2019 च्या निवडणूकीत होणार नाही, असे काँगेसला वाटले असेल.

सॉफ्ट हिंदुत्व, उत्तर भारतातील जुनी ‘सवर्ण’ मतपेटी याच्या आड जेएनयुचा कन्हैया येईल अशी भीती काँगेसला वाटली असावी. त्यामुळे अश्या कन्हैयाला निमंत्रण नाकारणे काँग्रेसला औचित्यपूर्ण वाटले असेल.

 

वापरून फेकून देणे हा राजकारणाचा नियम आहे. हा नियम काँग्रेसनेच तयार केलेला आहे. काँग्रेस कधीच औचित्यभंग करत नाही अशी तमाम नेहरुवाद्यांची अंधश्रद्धा आहेच.

मग, कशाला ऊगा चर्चा घडवा असा सुज्ञ विचार करून प्रकरण दाबले जाईल.

मुद्दलात, काँग्रेसची पाठराखण आणि भाजपचा विरोध हाच अजेंडा असल्याने कन्हैय्या, रोहित वेमुल्ला, अखलाख अश्या सगळ्यावर केवळ रान उठवायचे एवढे निश्चित आहे.

निमंत्रण नाकारण्याने महात्मा गांधी यांना काय वाटेल हा प्रश्न विचारला जाणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, रा.स्व.संघ, भाजप, मोदी यांच्याविरोधात भारतभ्रमण करत असलेले तुषार गांधी याविषयी अवाक्षर काढणार नाहित.

दरवर्षी ३० जानेवारीला अगदी आवर्जून गांधी हत्येवरून रा.स्व.संघाला झोडपण्याचा एक कलमी कार्यक्रम न चुकता राबविण्याचे पुरोगामी कर्मकांड होत आहे.

काँग्रेसचे ‘गरिबी हटविणारे’ राज्य यावे आणि आपल्याला ‘अच्छे दिन’ यावेत यासाठी विवेकाची पेरणी करण्याचा आव आणून, विद्वेष रुजवला जात आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version