Site icon InMarathi

संघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची प्रेमकथाही तितकीच संघर्षमय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

प्रसिद्ध कामगारनेते, उत्तम संसदपटू, पत्रकार आणि भारताचे माज़ी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस ह्यांचे २९ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. गेली अनेक वर्षे ते अल्झायमर्स डिसीजने आजारी होते.

त्या आधी त्यांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाली होती. त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते. ते जनता दल पक्षाचे नेते होते. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात संरक्षण, रेल्वे, उद्योग ह्यांसह अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.

जॉर्ज फर्नांडिस ह्यांचा जन्म ३ जून १९३० रोजी झाला. त्यांचे वडील जॉन जोसेफ फर्नांडिस हे एका खाजगी विमा कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. तर त्यांच्या आई एलिस मार्था फर्नांडिस ह्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या गृहिणी होत्या.

जॉर्ज फर्नांडिस हे सहा भांवडांमध्ये सर्वात थोरले होते. त्यांचे कुटुंब मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन असल्याने त्यांना शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी रोमन कॅथलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले.

 

 

परंतु त्यांच्या डोळ्यासमोरच उद्दिष्ट वेगळे असल्याने त्यांनी हे न करता वयाच्या १९व्या वर्षी मंगलोरमधील वाहतूक आणि हॉटेल व्यवसायात असणाऱ्या कामगारांची संघटना उभारण्याचे काम केले. इथेच त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला.

त्यांनी अत्यंत खडतर सुरुवात करून नंतर ते एक यशस्वी नेते झाले. त्यांचा हा प्रवास संघर्षमय आणि कष्टप्रद होता. म्हणूनच सामान्य माणसाला कायम नेत्यांपर्यंत कुठल्याही आडकाठी शिवाय पोहोचता यावे असा त्यांचा कायम प्रयत्न असायचा.

ते जेव्हा अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते, तेव्हा ते ३ कृष्णा मेनन मार्ग ह्या ठिकाणी वास्तव्याला होते.

त्यांच्या निवासस्थानाचे एक फाटक त्यांनी काढून टाकले होते कारण त्यांना कुणीही सामान्य नागरिक भेटायला आला तर त्याला दारापाशीच अडवले जाणे त्यांना मान्य नव्हते. सामान्य नागरिकांच्या समस्या सहजपणे सुटाव्या असा त्यांचा आग्रह असायचा.

 

 

३० जून २०१० रोजी पाऊस पडत होता, आणि दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या निवासस्थानाची दारे बंद होती. त्या घराबाहेर जया जेटली, मायकल व रिचर्ड फर्नांडिस उभे होते. जॉर्ज ह्यांचे केअर टेकर केडी सिंह ह्यांनी ह्या तिघांना घरात जाण्यापासून रोखले.

जया ह्यांना त्या घरातून त्यांची काही चित्रे आणि पुस्तके घ्यायची होती परंतु केडी सिंह ह्यांनी जयांना सांगितले त्यांना जॉर्ज फर्नांडिस ह्यांना भेटण्याची परवानगी नाही.

२००९ साली लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे जॉर्ज फर्नाडिस ह्यांची अवस्था फारशी बरी नव्हती. त्यांच्याकडे दिल्लीत राहण्यासाठी घर नव्हते. त्यातच त्यांना अल्झायमर्स डिसीजचा त्रास सुरु झालेला होता.

ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्यासाठी भाड्याचे घर शोधणे सुरु केले. ह्यानंतर तीन महिन्यात जॉर्ज राज्यसभेवर निवडून आले आणि ह्या घराच्या संकटातून सुटले.

हे ही वाचा –

४ ऑगस्ट २००९ रोजी अल्झायमर्सने ग्रस्त जॉर्ज फर्नांडिस राज्यसभेत निवडून आल्यानंतर शपथ घेत होते. तेव्हा त्यांच्या शेजारी लैला कबीर उभ्या होत्या. तब्बल २५ वर्षानंतर लैला कबीर जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या आयुष्यात परतल्या होत्या.

ह्याच लैला कबीर ह्यांच्यावर जॉर्ज फर्नांडिस पूर्वी जीव ओवाळून टाकत असत.

१९७१ साली बांगलादेश एका निर्णायक युद्धात अडकले होते. ह्याच युद्धग्रस्त क्षेत्रात काम करणारे जॉर्ज फर्नाडिस व लैला कबीर कलकत्त्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानाने प्रवास करीत होते.

लैला तेव्हा आपले रेडक्रॉसचे काम संपवून परत येत होत्या तर जॉर्ज आपला राजनैतिक दौरा संपवून दिल्लीला परत येत होते. जॉर्ज त्यावेळी संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष होते.

दोघेही त्यावेळी तरुण होते आणि विमानात शेजारी शेजारीच बसलेले होते. साहजिकच दोघांमध्ये साहित्य, इतिहास, संगीत आणि राजकारण अश्या विषयांवर चर्चा झाली. दिल्लीला पोचल्यावर जॉर्ज ह्यांनी अत्यंत नम्रपणे लैला कबीर ह्यांना घरी सोडून देण्याविषयी विचारले पण लैला ह्यांनी अत्यंत नम्रपणे जॉर्ज ह्यांचा घरी सोडून देण्याचा प्रस्ताव नाकारला.

 

 

जॉर्ज ह्यांच्या मनात लैला कबीर ह्यांच्याविषयी भावना निर्माण झाल्या होत्या तसेच लैला ह्यांना सुद्धा जॉर्ज ह्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊ लागले. दोघेही दिल्लीत वारंवार भेटू लागले. त्यानंतर एकाच महिन्यात जॉर्ज ह्यांनी लैलांच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

ह्यावेळी लैला नाही म्हणू शकल्या नाहीत. लैला कबीर ह्या नेहरूंच्या मंत्रिमंडळात असलेल्या हुमायूं कबीर ह्यांची कन्या होत.

त्यामुळे पुढारलेले विचार असलेल्या त्यांच्या घरातल्यांनी हा प्रेमविवाहाला परवानगी दिली. २२ जुलै १९७१ रोजी जॉर्ज व लैला विवाहबंधनात अडकले व काही काळाने त्यांनी शॉन फर्नांडिस ह्या पुत्राला जन्म दिला.

 

२५ जून १९७५ रोजी जेव्हा भारतात आणीबाणी लागू झाली तेव्हा जॉर्ज व लैला गोपाळपूर येथे सुट्टीसाठी गेले होते. आणीबाणीमुळे ह्या ठिकाणाहूनच ते भूमिगत झाले.

 

त्यानंतर २२ महिने ते लैलांशी कुठलाही संपर्क ठेवू शकले नाहीत. त्या काळात लैला त्यांच्या मुलासह अमेरिकेला गेल्या. आणीबाणी संपल्यानंतर जॉर्ज ह्यांनी लैला ह्यांना अमेरिकेहून परत येण्याची विनंती केली. परंतु इतक्या दिवसांत त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. द टेलिग्राफला त्या वेळी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये लैला म्हणतात की,

“मी अमेरिकेहून परत आले. परंतु तोपर्यंत जॉर्ज राजकारणात एका उंचीवर पोहोचले होते. मी माझ्या मुलाला त्याचे वडील परत मिळवून देण्यासाठी आले होते, परंतु त्याच्या वडिलांनीच काही रस दाखवला नाही. तेव्हापासून आजपर्यंत हातातून सगळं निसटतंच गेलं!”

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली ह्याच वर्षी जॉर्ज व लैला ह्यांचे १३ वर्षांचे नाते तुटायच्या मार्गावर होते. लैला आपल्या मुलासह जॉर्ज ह्यांना सोडून निघून गेल्या.

परंतु जॉर्ज ह्यांच्या मनात लैला ह्यांच्याविषयी ज्या भावना होत्या त्या बदलल्या नाहीत. परंतु दोघेही पुष्कळ वर्ष एकमेकांपासून लांब राहिले.

 

 

ह्या काळात जॉर्ज फर्नांडिस व जया जेटली भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आले होते. उरलेसुरलेही नाते संपवण्यासाठी लैला ह्यांनी जॉर्जना घटस्फोटाची नोटीस पाठवली. परंतु त्याचे उत्तर म्हणून जॉर्ज ह्यांनी लैलांना त्यांच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या पाठवल्या.

जॉर्ज ह्यांच्या मनात आजही काय भावना आहेत हे लैला ह्यांना कळले. जॉर्ज व लैला ह्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. ह्यात अनेक उतारचढाव आहेत, भावनांचा कल्लोळ आहे.

लैला ह्यांचा जॉर्ज ह्यांच्या जीवनात पुनःप्रवेश अगदी नाट्यमय पद्धतीने झाला. २००७ साली खूप काळानंतर जॉर्ज आपल्या मुलाला शॉनला भेटले. त्यांची ही भेट अत्यंत भावुक झाली.

२३ वर्षांच्या मोठ्या काळानंतर जॉर्ज आपल्या पत्नीशी फोनवर बोलले. आपल्या वडिलांना इतक्या मोठ्या काळानंतर भेटल्यावर शॉनला आपल्या वडिलांच्या आजारपणाविषयी कळले.

 

 

त्याने हे आपल्या आईला सांगितल्यानंतर लैला ह्यांच्या लक्षात आले की जॉर्ज ह्यांना आता आपली खरी गरज आहे. ह्याच वेळी त्या व त्यांचा मुलगा जॉर्ज ह्यांचा आयुष्यात परतले. २ जानेवारी २०१० रोजी लैला आपल्या मुलगा व सुनेसह जॉर्ज ह्यांच्या घरी आल्या आणि त्या जॉर्ज ह्यांच्या खोलीत जाऊन बाहेरून दार बंद करून घेतले.

खोलीतून बाहेर आल्यावर जॉर्ज ह्यांच्या अंगठ्यावर शाईचा डाग होता. जॉर्ज ह्यांनी पूर्वी जया जेटलींना त्यांची पावर ऑफ ऍटर्नी देऊन ठेवली होती ती लैलांनी आपल्या नावे करून घेतली.

 

 

२००९ च्या निवडणुकी दरम्यान जॉर्ज ह्यांनी त्यांची संपत्ती १३ कोटी असल्याचे जाहीर केले होते. हे पैसे त्यांना बंगलोरची त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून मिळाले होते. ही जमीन जॉर्ज ह्यांच्या आईने त्यांच्यासाठी ठेवली होती.

जॉर्ज यांच्या आईची इच्छा होती की जॉर्ज त्यांच्या म्हातारपणी ह्या जमिनीवर समाज सेवा केंद्र उघडतील.जॉर्ज ह्या जमिनीवर समाजसेवा केंद्र उघडू शकले नाहीत पण ही जमीन त्यांच्या म्हातारपणी त्यांच्या कामी आली.

लोकांच्या मते जॉर्ज ह्यांची संपत्ती ह्याहीपेक्षा जास्त असेल. त्या संपत्तीसाठी लैला ह्यांनी पावर ऑफ ऍटर्नी आपल्या नावे करून घेतली असावी असे जॉर्ज ह्यांचे बंधू रिचर्ड ह्यांचे म्हणणे होते, परंतु शॉन ह्यांनी असे म्हटले की लैला ह्यांनी पावर ऑफ ऍटर्नी आपल्या नावे करून घेतली कारण जॉर्ज ह्यांची संपत्ती त्यांच्याच उपचारांसाठी वापरता यावी हा त्यामागचा हेतू होता.

 

हे ही वाचा –

जया जेटली ह्यांना जॉर्ज फर्नांडिस ह्यांची भेट घेऊ दिली जात नसल्यामुळे जया ह्यांनी लैला कबीर ह्यांच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली. जॉर्ज व जया ३० वर्षांपासून एकत्र होते असे जया जेटलींचे म्हणणे होते.

एप्रिल २०१२ मध्ये दिल्ली हायकोर्टाने ह्या केसचा निर्णय जया जेटली ह्यांच्या विरोधात दिला. जया जेटलींनी नंतर सुप्रीम कोर्टात केस दाखल केली आणि जस्टीस पी सदाशिव ह्यांच्या बेंचने हायकोर्टाचा निर्णय बदलून जया ह्यांच्या बाजूने निर्णय दिला.

जॉर्ज ह्यांच्या ८० व्या वाढदिवशी जो फोटो प्रसारित करण्यात आला त्या फोटोत जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या. कदाचित ह्या प्रेमकथेचा हाच सुवर्णमध्य असावा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version