आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
राजकारणात अगदी लहानात लहान कार्यकर्त्याला मानाचे स्थान मिळाल्याचे क्वचितच ऐकिवात येते. पण निष्ठवंतांना डावलल्याची ओरड मात्र प्रत्येक पक्षात नेहमीच होत असते.
त्यामुळे एखादया शहरात ऑटो रिक्षा चालविणारी व्यक्ती एक दिवस त्याच शहराची प्रथम नागरिक म्हणून ओळखली जाईल, हे प्रथमदर्शनी एक दिवा स्वप्नच वाटते.
पण कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये हेच दिवास्वप्न सत्यात उतरल्याची प्रचिती आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याचा बहुमान एकेकाळी रिक्षा चालकाचे काम करणारे व भाजपचे विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांना मिळाला आहे.
एकंदरीतच त्यांचा हा राजकीय प्रवास कसा राहिला हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
राज्यात मुंबई महापालिकेनंतरची सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेची ओळख आहे. उद्योगनगरीचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे हे शहर. त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने या शहराला प्रत्येकाचीच पसंती असते.
अशा प्रतिष्ठित शहराला लाभलेल्या श्रीमंत महापालिकेत कुठलेही पद मिळविणे सोपे नाही. त्यातच अलीकडे प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, विशेषतः राजकीय क्षेत्रातील स्पर्धेत तरून जात वाटचाल करणे निश्चितपणे आव्हानात्मक झाले आहे.
पण यशस्वीपणे ही वाटचाल करून महापौरपदी राहुल जाधव हे विराजमान झाले. त्यामुळे चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर रिक्षावाला महापौर का नाही?
या प्रश्नाचे उत्तर या निवडीमुळे मिळाले आहे. जाधव हे मूळचे पुणे-चिखलीचे. चिखली गावातील जाधववाडी परिसरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात राहुल यांचा जन्म झाला. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
त्यानंतर त्यांनी १९९६ ते २००३ पर्यंत सहा आसनी ऑटोरिक्षा चालकाचे काम केले.
जाधव यांनी २००६मध्ये स्थानिक नेते माऊली जाधव यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली व तिथून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. राजकारणातील यशाची शिडी म्हणजे निवडणूक.
त्यामुळे अवघ्या सहा वर्षात परिपूर्ण तयारी करून व राजकीय डावपेच समजून घेत जाधव यांनी २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वप्रथम नशीब आजमावले व यशस्वीही ठरले.
चिखली येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे निवडून येत ते प्रथमच नगरसेवक झाले, तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाला खरे बळ मिळाले.
कालांतराने भोसरी येथील भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे ते निष्ठावान समर्थक झाले व २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक २ क मध्ये भाजपतर्फे निवडून येत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले.
भाजपला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते. एव्हाना जाधव यांनी आपले राजकीय वलय निर्माण केले होते, त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव होते पण त्यावेळी महापौर पदाची माळ नितीन काळजे यांच्या गळ्यात पडली.
फेब्रुवारी २०१८ ला जाधव यांना स्थायी समितीचे सदस्य म्हणून संधी मिळाली व अर्थातच ते स्थायी समिती सभापती पदाचे प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आले. पण त्यावेळी सभापतीपदी ममता गायकवाड यांची निवड झाल्याने जाधव नाराज झाले व त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा त्याग केला.
चालू वर्षात त्यांच्या राजकीय महत्वकांक्षेला नशिबाची जोड मिळाली व अखेर ते प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद नाढे यांचा पराभव करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे २५ वे महापौर म्हणून विराजमान झाले.
उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची वर्णी लागली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की,
मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. हे शहर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे असून शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटिबद्ध असेन. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शहराला अधिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहील.
दरम्यान, गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्यबळ नसताना त्यांनी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढविली होती.
त्यामुळे आम्ही देखील या निवडणुकीत उमेदवार दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता साने म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षाचे राहुल जाधव यांना मदत केल्याचा आरोप होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
तत्पूर्वी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अनुपस्थितीत पुणे परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेत महासभा झाली. या महासभेत एकूण १२८ पैकी १२० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
त्यात जाधव यांना ८० तर नाढे यांना ३३ मते मिळाली. ७ अपक्ष सदस्यांनीही जाधव यांना मतदान केले.
विशेष म्हणजे महापौर राहुल जाधव हे महासभेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिल्यानंतर भारतीय जनता पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला होता. महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असला तरी ते सव्वा-सव्वा वर्ष विभागून देत दोन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय झाला असावा.
त्यामुळे तत्कालीन महापौर, उपमहापौर यांनी राजीनामा दिला. परिणामी, पुन्हा निवडणूक होऊन नव्याने महापौर, उपमहापौर निवडण्यात आले. त्यामुळे राजकारणात केवळ प्रस्थापितांनाच न्याय मिळतो, हा समज खोटा ठरल्याचेही यामुळे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड हे शहर उद्योगनगरी म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळे राज्यभरातील कामगार त्याठिकाणी रोजगारासाठी येत असतात. परिणामी, शहराचा विस्तार देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. पण सर्वसामान्य व्यक्ती महत्वपूर्ण पदावर नियुक्त झाल्याने समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळेल, ही अपेक्षा शहरातील नागरिकांना असेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.