चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय! कारण वाचा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दर वर्षी प्रमाणेच देशातील महत्वपूर्ण नागरिकांच्या सन्मानार्थ “पद्म पुरस्कारांची” घोषणा करण्यात आली. ह्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका व नानाजी देशमुख ह्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
ह्याशिवाय चार व्यक्तींना पद्मविभूषण, १४ व्यक्तींना पद्मभूषण व ९४ व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ह्यावर्षी पद्मश्री पुरस्काराच्या यादीत एका अशा व्यक्तीचे नाव आहे ज्यांचा व्यवसाय ऐकला तर सर्वसामान्य लोक म्हणतील ह्यांना पद्मश्री देण्याचे कारण काय?
पण त्यांचे कार्य बघितल्यास सर्वांनाच असे वाटेल की ह्या व्यक्तीचा सन्मान तर व्हायलाच हवा आणि त्यांचे कार्य जगापर्यंत पोहोचायलाच हवे. डी. प्रकाश राव हे ओडिशा मधल्या कटक शहरातील एक सर्वसामान्य चहाविक्रेते आहेत.
गेल्या ६७ वर्षांपासून ते चहा विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. आणि हा व्यवसाय करत असतानाच त्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून मोठे कार्य केले आहे व आजही करीत आहेत.
डी.प्रकाश राव हे चहाच्या व्यवसायातून जे काही उत्पन्न मिळेल त्यातील मोठा भाग समाजसेवेसाठी वापरत आहेत. त्यांच्या ह्याच समाजसेवेमुळे कटक शहर व आजूबाजूच्या गावांमधील लोक त्यांचा खूप आदर करतात.
आपल्या व्यवसायातून जे काही उत्पन्न होईल त्यातून ते ७० पेक्षाही अधिक मुलांना शिकवण्याचे महान कार्य करीत आहेत.
जी मुले आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने शिक्षणापासून वंचित राहतात, शाळेत जाऊ शकत नाहीत, अश्या मुलांना शिक्षण देण्याचे मोठे काम डी.प्रकाश राव करीत आहेत.
इतकेच नव्हे तर त्यांच्या लहानश्या झोपडीवजा घरात त्यांनी “आशा आश्वासन” उघडले आहे. ह्याठिकाणी ते बेघर लोकांना आसरा देतात.
डी. प्रकाश राव ह्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर करतातच, शिवाय ते एक शाळा सुद्धा चालवतात. झोपडपट्टीमध्ये किंवा अत्यंत गरीब घरांतील मुलांना ते ह्या शाळेत प्रवेश देऊन मोफत शिक्षण देतात.
डी. प्रकाश राव ह्यांचे कार्य इथेच संपत नाही, तर हातावर पोट असलेल्या आपल्या व्यवसायातून आवर्जून वेळ काढून त्यांच्या शाळेच्या वेळेनंतर ते रोज एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे आजारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करतात, ज्यांचे कोणी नाही अश्या रुग्णांची सेवा देखील करतात.
ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी रोज गरम उकळलेल्या पाण्याची व दुधाची सोय करतात. लोकांची अशी मदत करणे हा डी. प्रकाश राव ह्यांच्या रोजच्या दिनचर्येचाच एक भाग आहे.
कधी गरज लागल्यास ते रुग्णांसाठी रक्तदान देखील करतात. आजवर त्यांनी २१४ पेक्षाही जास्त वेळा रक्तदान केले आहे.
ते सांगतात की,
“वयाच्या १७व्या वर्षी एका आजाराने मी अधू झालो होतो. तेव्हा एका निनावी व्यक्तीने रक्तदान करून माझे प्राण वाचवले. तेव्हाच मी ठरवले की मला जमेल तितक्या वेळेला मी रक्तदान करणार!”
दर वर्षी ते आवर्जून १४ जून ला रक्तदान करतात. कारण १४ जून हा ऑस्ट्रियन बायोलॉजिस्ट कार्ल लॅन्डस्टीनर ह्यांचा जन्मदिवस असतो ज्यांनी विविध ब्लड ग्रुप शोधून काढले.
ह्याशिवाय त्यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच मरणोत्तर देहदान करण्याची त्यांची इच्छा आहे.
डी. प्रकाश राव परिस्थितीमुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पण त्यांचे हिंदी व इंग्रजी चांगले असल्याने ते मुलांना उत्तम प्रकारे शिकवू शकतात.
ह्याशिवाय त्यांना तामिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम, बंगाली ह्या भाषा सुद्धा अवगत आहेत. अंधाराच्या गर्तेत चाचपडणाऱ्या गरीब लहान मुलांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत आणून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या ह्या महान कार्यामुळेच आज डी. प्रकाश राव ह्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बासष्ट वर्षीय देवारपल्ली प्रकाश राव हे वयाच्या नवव्या वर्षांपासून काटकच्या बख्शी बाजारात चहाचं दुकान चालवत आहेत.
त्यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात सैनिक होते. युद्ध संपल्यावर त्यांच्या वडिलांनी आपल्या उपजीविकेसाठी कटक येथे चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. परंतु ह्या व्यवसायात त्यांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले होते.
त्यामुळे त्यावेळी डी. प्रकाश राव ह्यांनी आपले शिक्षण सोडून वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. आज ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ ते हा व्यवसाय सांभाळत आहेत.
त्यांचा दिवस अगदी पहाटे सुरु होतो. पहाटे चार वाजल्यापासून ते त्यांच्या दुकानात चहाची विक्री सुरु करतात. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत त्यांचा सगळं वेळ ते समाजसेवेत व्यतीत करतात.
ते गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत जातात. त्यांच्या शाळेत ४ ते ९ वयोगटातील मुले शिकतात. आपले शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकले नाही, किमान ह्या लहान मुलांच्या आयुष्यात तरी शिक्षणाचा प्रकाश यावा ह्या उद्देशाने त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणे सुरु केले.
आसपासच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांसाठी जवळपास अशी त्यांना शिक्षण देऊ शकेल अशी शाळा नसल्याचे त्यांना लक्षात आले आणि त्यांनी २००० साली “आशा आश्वासन” ही लहानशी शाळा सुरु केली. तसेच झोपडपट्टीतील लोकांना आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. त्यांच्यात शिक्षणाविषयी जनजागृती केली.
कुठल्याही देणगीची वाट न बघता पदरचे पैसे खर्च करून ह्या मुलांना शिकवण्यासाठी काही शिक्षक नियुक्त केले तसेच स्वतः देखील शिकवणे सुरु केले.
त्यांच्या शाळेत सध्या इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण दिले जाते त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते ह्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळवून देतात. ह्या सगळ्या कार्यात ते आपल्या उत्पन्नापैकी जवळजवळ ५० टक्के भाग खर्च करतात.
ह्या पैश्यांतून ते ह्या मुलांचे शिक्षण, जेवण, आरोग्याची काळजी ह्या सर्वांची जबाबदारी घेतात.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत डी. प्रकाश राव म्हणतात,
“देवाच्या मनात काय असेल ह्याचा आपल्याला थांग लागत नाही. मी लहान असताना मला डॉक्टर व्हायचे होते. नंतर मला एक फुटबॉल खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवायचा होता. परंतु मी मात्र एक चहाविक्रेता झालो. कदाचित, हे सगळे घडायचे असेल म्हणूनच मी आज चहाविक्रेता आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजता मी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करत होतो तेव्हा मला नवी दिल्ली येथून फोन आला आणि फोनवरील अधिकाऱ्यांनी मला ही पद्मश्री पुरस्काराची बातमी दिली. माझ्या प्रयत्नांसाठी मला पद्मश्री पुरस्कार मिळाला ह्याचा मला खूप आनंद आहे.
ह्याने मला समाजासाठी आणखी बरेच काही करण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे. खरे तर आपण सगळेच समाजात खारीचा वाटा उचलू शकतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी स्वत: डी. प्रकाश राव ह्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पंतप्रधान स्वतः त्यांच्या कार्यामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी ओडिशा दौऱ्यादरम्यान डी. प्रकाश राव ह्यांची भेट घेतली. आणि ३० मे २०१८ रोजी “मन की बात” ह्या कार्यक्रमात डी. प्रकाश राव ह्यांच्या विषयी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की,
“आज मला ओडिशास्थित कटक मधील चहा विक्रेत्या डी. प्रकाश राव ह्यांना भेटण्याची संधी मिळाली. ते गेली पाच दशके चहाचा व्यवसाय करीत आहेत. परंतु ते जे कार्य करीत आहेत त्याबद्दल ऐकून आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल.
आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत अश्या ७० मुलांना शिकवण्याचे काम ते करत आहेत. इतकेच नव्हे त्यांच्या लहानश्या घरात त्यांनी बेघर लोकांना आसरा देण्यासाठी “आशा आश्वासन” सुरु केले आहे.”
राव ह्यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी पुढील शिक्षणात देखील नाव काढत आहेत. त्यांच्या शाळेत शिकलेल्या महेश राव ह्या विद्यार्थ्याने २०१३ साली गोव्याला झालेल्या विंड सर्फिंग स्पर्धेत ६ सुवर्णपदके जिंकली आहेत.
डी. प्रकाश राव हे इतकी वर्ष निष्काम कर्मयोगाच्या भावनेने हे कार्य करीत आहेत. त्यांनी आज त्यांचे नाव सार्थ करीत कित्येक मुलांच्या अंधःकारमय जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणला आहे. आज त्यांच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे.
डी. प्रकाश राव ह्यांच्या उज्ज्वल कार्यासाठी त्यांना मानाचा मुजरा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.