' नामांतर चळवळ ते हिमरु शालीसाठी प्रसिद्ध, टुमदार शहराविषयी काही रंजक गोष्टी.. – InMarathi

नामांतर चळवळ ते हिमरु शालीसाठी प्रसिद्ध, टुमदार शहराविषयी काही रंजक गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर म्हणजे औरंगाबाद. या शहराची एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. म्हणून पर्यटक या शहराला मोठ्या संख्येने भेट देत असतात.

मात्र केवळ ऐतिहासिक शहरच नव्हे तर औद्योगिक केंद्र आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून पण या शहराची ओळख आहे. 

याव्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद मध्ये आहे. तेव्हा औरंगाबादच्या अनेक ज्ञात -अज्ञात पैलूंना स्पर्श करणारा हा लेख….

औरंगाबाद शहराचा इतिहास बघितल्यास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे.

सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये हा परिसर राजतलक किंवा राजतडाग म्हणून ओळखले गेल्याचे उल्लेख आहेत. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.

 

dulatabad-inmarathi
tripsvilla.com

खडकी हे गावचे मूळ नाव होते, पुढे अहमदनगरच्या शाह मुर्तजा निजामचे प्रधान मलिक अंबर यांनी हे शहर वसवले. एक दशकातच, खडकी मोठ्या प्रमाणावर  बदलले आणि आकर्षक शहर म्हणून उदयास आले.

१६२६ मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला. पुढे त्याचा मुलगा फतेह खान यांच्या नावावरून फतेहनगर असे या शहराचे नामकरण झाले.

इ.स. १६३३ मध्ये हे शहर मुघलांच्या ताब्यात आले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खनचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला.

१७०७ मध्ये मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगजेबच्या मृत्यूनंतर लगेचच या शहराचा ताबा इ. स. १७०७ नंतर हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिला. 

मुघल साम्राज्याचा बादशहा इथे राहिल्याने वैभवाच्या खुणा मागे राहणे साहजिकच आले. त्यामुळेच या शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी मोठी रीघ लागलेली असते. केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू आणि बौद्ध संस्कृतीच्या देखील या परिसरात अनेक पाऊलखुणा आहेत.

१) बीबी का मकबरा

 

bibi-ka-maqbara-inmarathi
thinkingparticle.com

बीबी का मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे.

बीबी का मकबरा यांस दख्खनचा ताजमहाल म्हणूनही ओळखले जाते.

मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे.

मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत.

२)  देवगिरी किल्ला

 

devgiri-inmarathi
HuntForSpot.com

हा एक यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरीच्या यादवांचा पराभव करत इ.स. १३०८ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात प्रवेश केला.

पुढे मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. देवगिरी किंवा दौलताबाद किल्ला औरंगाबाद शहरापासून ११ किमी अंतरावर आहे.

३) दरवाजे

 

gates-inmarathi
tripto.com

औरंगाबाद शहर “दरवाजांचे शहर” म्हणून ओळखले जाते. या शहरात ५२ दरवाजे आहेत. अनेक दरवाजांची पडझड झाली असली तरी हे इतिहासकालीन दरवाजे आजही मुघलकालीन वैभवाची साक्ष देतात.

४) वेरूळची लेणी

औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या वेरूळच्या जगप्रसिद्ध लेणी आहेत. या ठिकाणी साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत.

 

ellora-inmarathi
youtube.com

यामध्ये १२ बौद्ध , १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेणीला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.

५) घृष्णेश्वर मंदिर

 

ghrushneshwar-inmarathi
aurangabad.gov.in

हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. वेरूळ लेण्यांजवळच हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. पुन्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

घृसन म्हणजे केशर. पार्वतीदेवी यांच्या चिमटीत असलेले केशर या ठिकाणी पडले आणि त्यापासून शिवलिंग निर्माण झाले. म्हणून हे घृष्णेश्वर मंदिर अशी यामागची आख्यायिका आहे.

६) खुलताबाद/खुलदाबाद

 

khultabad-inmarathi
Mapio.net

हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच याठिकाणी सूफी संत तसेच औरंगजेबची कबर आहे. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

या गावाला ‘रत्‍नापूर’नावाने देखील ओळखले जाते. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो.खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.

भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे.

याव्यतिरिक्त औरंगाबाद आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. औरंगाबाद लेणी ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे.

इ.स.६ वे शतक ते इ.स. ७ वे शतक यादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे. अजून सिद्धार्थ उद्यान, पाणचक्की, सोनेरी महल यांसारखी अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.

औरंगाबाद शहराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाचा वस्त्रप्रकार हे होय. पैठणी या नावाने अद्यापही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.

काळ बदलला तशी हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची बरीच पडझड झाली तरी काही प्रमाणात आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन होत असते.

 

himroo-shawl-inmarathi
visitindia.com

औरंगाबाद हे एक महाराष्ट्रातील महत्वाचे औद्योगिक केंद्र देखील आहे. स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग,  इलेक्ट्रॉनिक वस्तु, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके यांसारखे औद्योगिक कारखाने या शहरात आहेत.

एकाचवेळी १०१ मर्सिडीज वाहनांची खरेदी करण्याचा उपक्रम या शहरात झाला होता. या मागचा उद्देश “हे शहर आता मागे राहिले नसून इतर मोठ्या शहरांसारच्या पंक्तीत आहे” हा संदेश यामार्फत दिला गेला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ ही औरंगाबाद शहरातील दोन विद्यापीठे असून शैक्षणिक दृष्ट्या देखील हे शहर पुढारलेले आहे.

महाराष्ट्रातील अनेक चळवळींचे प्रेरणास्रोत असलेली “नामांतर चळवळीचे” केंद्रस्थान म्हणून औरंगाबाद शहर ज्ञात आहे. 

रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवेने जोडलेले हे शहर सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे.

याशिवाय या शहराचे नामकरण “संभाजीनगर” करण्यात यावे या मागणीमुळे देखील हे शहर आणि शहराचे राजकारण चर्चेत असते.

असे हे विविध रंगाने नटलेले शहर आपल्याला नक्कीच आवडेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?