आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारली असून दैनंदिन जीवनात आपण प्रत्यक्ष दुकानात जाऊन अथवा घरपोच सेवा मिळवून अनेक उत्पादन खरेदी करत असतो. आजच्या स्पर्धेच्या युगात जितकं महत्व उत्पादनाला आहे तितकेच महत्व त्याच्या वेष्टनाला देखील असते.
“आकर्षक पॅकेजिंग” हा प्रत्येक उत्पादनाचा अविभाज्य घटक आहे. त्यावर उत्पादकाने संबंधित उत्पादनाविषयी बरीच माहिती दिलेली असते.
अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. काही वेळेस त्यावर असे काही चिन्ह असतात की जे आपल्याला समजत नाहीत. परंतु ग्राहक म्हणून आपल्याला ते माहीत असणे आवश्यक आहे.
कारण वेष्टनावर असणारी ही चिन्हे ग्राहकांना उत्पादनाबद्दल अधिक माहिती समजून देण्यात मदत करतात आणि उत्पादक जे काही दावे करत असतात ते सत्यापित करण्यात आपली मदत करतात.
ग्राहक जेव्हा एखादे उत्पादन विकत घेतो, तेव्हा कुठले उत्पादन घ्यावे याविषयी निर्णय घेतांना ही चिन्हे आपल्याला मदत करतात.
या आकर्षक वेष्टनावर चिन्हेच का वापरतात, कारण ते भाषेच्या अडथळ्यांना पार करतात, उत्पादनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती करून देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
खाद्यान्न उत्पादने आणि उत्पादनात विशिष्ट असे काही घटक वापरले असतील तेव्हा ही चिन्हे नक्कीच समजून घ्या. अशीच काही चिन्हे आणि त्यांचा अर्थ समजून घेऊ.
१.पुनर्वापर / मोबियस लूप
हे चिन्ह असे दर्शविते की या उत्पादनात वापरलेली सामग्री पुन्हा वापर करण्यास सक्षम आहे. आणि हो, याचा अर्थ असा नाही की सदर उत्पादन किंवा साहित्य पुनर्वापर केले गेलेले आहे. या चिन्हात दाखवलेले तीन बाण पुनर्वापर असा अर्थ दर्शवितात.
काही ठिकाणी या चिन्हाचा वापर पुनर्वापर केलेल्या सामग्रीपासून किती टक्के उत्पादन येते हे स्पष्ट करण्यासाठी मध्यभागी आकृतीसह केला जातो.
२. ‘रेजिन आयडेंटिफिकेशन कोड
हे ‘रेजिन आयडेंटिफिकेशन कोड’ आहेत जे उत्पादन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कुठल्या प्रकारचे आहे, ते ओळखण्यास मदत करतात.
खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ साठविण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंच्या बाबतीत ही माहिती जास्त महत्त्वाची आहे.
रेजिन कोडचा वापर १ त ७ दरम्यानच्या संख्येच्या आसपास असलेल्या चिन्हासह दर्शविला जातो.
हे क्रमांक काय दर्शवतात:
१- सदर उत्पादन अथवा त्याचे वेष्टन पॉलीथिलीन टीरेफेथलेट (पीईटी) पासून बनविले आहे. (पेय पदार्थांची बोटे, कप, इतर पॅकेजिंग इ.)
२-उच्च-घनता असलेले पॉलिथिलीन (एचडीपीई) (बाटल्या, कप, दुधाचे तुकडे इ.)
३-पॉलीव्हिनिल क्लोराईड (पीव्हीसी) (पाईप, साइडिंग, तळफरशी इ.)
४- कमी घनता असलेले पॉलीथिलीन (एलडीपीई) (प्लास्टिकची पिशवी, टयूब इ.)
५-पॉलीप्रोपीलिन (पीपी) (ऑटो पार्ट्स, इंडस्ट्रियल फायबर, फूड कंटेनर्स, इत्यादी)
६-पॉलीस्टीरिन (पीएस) (प्लास्टिकची भांडी, स्टिरॉफॉम, कॅफेटेरिया ट्रे इ.)
7-इतर प्लास्टिक, जसे ऍक्रेलिक, नायलॉन, पॉली कार्बोनेट आणि पोलिलेक्टिक ऍसिड (पीएलए).
३. स्वच्छतादूत
“कचरा करू नका” हे दर्शविणारा माणूस “tidyman” आपल्याला चांगलाच परिचित आहे. हे चिन्ह वापरून उत्पादक ग्राहकांना संदेश देतात की आमचे उत्पादन वापरल्यावर त्याचे वेष्टन इतर कुठेही न फेकता काळजीपूर्वक कचरापेटीतच टाका.
चांगले नागरिक म्हणून आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे की कचरा इतरत्र कुठेही न टाकता कचरापेटीतच टाकला पाहिजे. नागरिकांना आपल्या जबाबदारीचे स्मरण हा स्वच्छतादूत करून देतो.
४. ऊर्जा कार्यक्षमता लेबल
Bureau of Energy Efficiency यांच्याद्वारे आपण वापरात असलेली ऊर्जा उत्पादने किती कार्यक्षम आहेत, हे दर्शविणारी चिन्हे आपण बघत असतो. ऊर्जा वापर, कार्यक्षमता किंवा ते उपकरण वापरतांना आपला किती खर्च वाचू शकतो हे याठिकाणी दर्शविले जाते.
रेफ्रिजरेटर, एसी, वॉटर हीटर्स, ट्यूब लाइट्स , पंखा यांसारख्या विद्युत उपकरणांवर असे दर्शविले जाते. घरगुती उपकरणावरील ऊर्जा बचतीचे माहितीपत्र ग्राहकांना यासंबंधीची माहिती देऊन ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यात मदत करतात.
लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर ताऱ्यांची संख्या देऊन त्या उत्पादनाचे गुणांकन दर्शवले जाते. अधिक ठळक तारे म्हणजे अधिक ऊर्जा बचत हे माहीत असलेच पाहिजे.
हे गुणांकन नियमित कालावधीनंतर बदलले जाते. तेव्हा हे गुणांकन बघतांना लेबलवर त्याचे वर्ष शोधणे सुद्धा आवश्यक आहे.
५. क्राफ्टमार्क
हे चिन्ह भारतीय हस्तकला दर्शविण्यात मदत करते. लाखो कुशल भारतीय कारागीर हस्तकलेतून आपले कौशल्य दाखवत असतात. अशावेळेस त्यांच्या उत्पादनाचा देखील एक ब्रँड निर्माण व्हावा या दृष्टीकोनातून हे चिन्ह तयार करण्यात आले आहे.
क्राफ्टमार्क हा हस्तकला आणि त्याची गुणवत्ता याची खात्री देतो. ज्यायोगे भारतातील विविध कौशल्य व उत्पादनांचा दुवा साधला जातो.
६. फेअर ट्रेड
फेअर ट्रेडेड मार्क हे जगातील सर्वात व्यापक आणि विश्वसनीयता निर्माण करणारे चिन्ह आहे. शेतकरी व कामगारांसाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या उद्योगांना हे चिन्ह प्रदान केले जाते.
हे उत्पादन निर्माण करतांना सेंद्रिय कच्चा माल वापरला आहे तसेच निर्मिती प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची कुठलीही हानी यामुळे झालेली नाही. तसेच कामगारांना योग्य मोबदला आणि चांगले वातावरण देण्यासाठी उत्पादक कटिबद्ध असल्याची खात्री या चिन्हाद्वारे दर्शविली जाते.
७. बनी लीपिंग
आपण जाणतात की, अनेक प्राणी सौंदर्यप्रसाधनांसाठी होणाऱ्या क्रूर चाचण्यांमध्ये वापरले जातात आणि जवळपास सर्व देश अजूनही या उत्पादनांसाठी प्राणी चाचणीस परवानगी देतात!
असंख्य ससे, डुकरं, उंदीर या चाचणी दरम्यान मरतात.
“द लीपिंग बनी” सौंदर्यप्रसाधनं आणि घरगुती उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे आणि ग्राहकांना याची हमी देते की उत्पादकांनी कोणत्याही उत्पादनाच्या विकासासाठी नवीन प्राणी चाचणी वापरली नाही.
“कॉस्मेशन्स फॉर कॉस्मेटर ऑन कॉन्झ्युमिक्स ऑन कॉस्मेटिक्स” (सीसीआयसी) यांच्याकडून लोगोला परवाना देण्यासाठी परवानगी देण्याआधी कठोर मानदंड पूर्ण केले आहे याची तपासणी केली जाते.
८. इको चिन्ह
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) द्वारा जारी, ECOMARK हे घरगुती आणि इतर ग्राहक उत्पादनांसाठी प्रमाणिकरण आहे. पर्यावरण-अनुकूल उत्पादनांसाठी हे चिन्ह भारतात वापरतात.
हे सुमारे १६ श्रेणींमध्ये अन्न, औषधे, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागद, वंगण, पॅकिंग सामग्री वगैरे इत्यादिंमध्ये जारी केले जात आहे.
ग्राहकांनी अधिक पर्यावरणपूरक उत्पादने खरेदी करावीत यासाठी हे चिन्ह वापरले जाते. हे चिन्ह वापरतांना उत्पादकांनी योग्य ते मापदंड वापरले आहेत की नाही याची कठोर तपासणी केली जाते.
९. पार्टीसिपेटरी गॅरंटी सिस्टम (पीजीएस)
पीजीएस आंतरराष्ट्रीय पातळीवर लागू आहे. ही एक विकेंद्रित सेंद्रिय गुणवत्ता आश्वासन प्रणाली आहे. ग्राहक आणि शेतकरी-निर्माते यांच्या सक्रिय सहभागाद्वारे हे मानांकन लागू आणि नियंत्रित केले जाते.
पीजीएस ऑर्गेनिक कौन्सिलने निश्चित केलेले मानदंड आहेत, जे गुणवत्तेच्या आधारावर चिन्ह म्हणून उत्पादनावर त्याचे लेबल वापरण्याची परवानगी देतात.
१०. जैविक भारत
१ जानेवारी २०१९ रोजी भारत ५० देशांच्या एका गटात सामील झाला जे जैविक उत्पादनांसाठी विशिष्ट चिन्हाचा वापर करून आपले उत्पादन दर्शवतात. जैविक भारत लोगो ही सरकारी प्रमाणपत्र आहे जे सेंद्रिय खाद्य उत्पादनांसाठी वापरले जाते.
सेंद्रिय उत्पादनांच्या वेष्टनावर हे चिन्ह अनिवार्य करण्यात आले आहे अन्यथा कोणतेही सेंद्रिय उत्पादन आयात करता येणार नाही किंवा निर्यात करू शकणार नाही.
११. हलाल प्रमाणित
हलाल प्रमाणीकरण हमी देते की उत्पादने इस्लामिक कायद्याच्या आवश्यकता पूर्ण करतात. हे प्रामुख्याने मांस उत्पादने आणि इतर अन्न उत्पादनांवर जसे दूध, हवाबंद डब्यात भरलेले खाद्यपदार्थ यांच्यावर लागू होते.
हलाल-प्रमाणित उत्पादनांना हलक चिन्हासह चिन्हांकित केले जाते, जे अरबी आणि इंग्रजीमध्ये ‘हलाल’ या शब्दाने दर्शवले आहे.
१२. ग्लोबल ऑर्गेनिक टेक्सटाईल स्टँडर्ड (GOTS)
वस्त्रोदयोगात पर्यावरणीय मानकांचा वापर वाढावा या दृष्टीकोनातून ही संस्था कार्यरत आहे. यांच्यामार्फत आवश्यक ते प्रमाणीकरण केल्यावर हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात येते.
वरील माहिती आपल्याला खरेदी करण्याच्या निर्णयामध्ये नक्कीच मदत करेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.