भारत सरकारने नानाजी देशमुखांना भारतरत्न का दिलं हा प्रश्न पडला असेल तर हे वाचा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनच्या सिद्धांताला प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य करून हजारो – लाखोचे आयुष्य घडवणाऱ्या एका महान साधकास, एका निस्वार्थ कार्यकर्त्यास आणि स्वयंसेवकाला स्वर्गीय नानाजी देशमुखांना आज मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलं जाणं हा त्यांचा कार्याचा व साधनेचा केला गेलेला एक उचित सन्मान आहे.
नानाजी देशमुखांचे एकूण कार्य हे त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला साजेशे असं आहे.
नानाजी देशमुखांचा जन्म मराठवाड्यातील, त्यांचं नाव होतं चण्डिकादास अमृतराव देशमुख पण प्रेमाने सर्वजण त्यांना नानाजी म्हणायचे. नानजीवर बालपणापासून लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता.
ह्यातून पुढे त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ हेडगेवारांशी आला. नानाजी आणि डॉ हेडगेवारांचे पारिवारिक संबंध होते.
यातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला त्यांनी आरंभ केला. १९४० साली डॉ हेडगेवारांच्या निधनानंतर त्यांनी संघाच्या कामाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यांनी संघशाखेचे जाळे संपूर्ण विदर्भ प्रांतात विस्तारले होते.
नानाजीची कार्याप्रति असलेली श्रद्धा बघता, त्यांना संघ कामाच्या विस्तारासाठी गोरखपूर येथे पाठवण्यात आलं. तिकडे संघाच्या विस्ताराच काम करताना नानाजीना प्रचंड संघर्ष करावा लागला.
नानाजी संघाचे प्रचारक होते. आपल्या सुखवस्तू जीवनाचा त्याग करून त्यांनी आपलं सर्वस्व संघटनेच्या बांधणी वर रचनेसाठी अर्पण केलं होतं. धर्मशाळेत मुक्काम करून त्यांनी त्या परिसरात संघाचे कार्य उभारले होते.
इतकी प्रतिकूल परिस्थिती होती तरीदेखील त्यांनी न डगमगता कार्य केलं.
हक्काच्या निवाऱ्यासाठी त्यांनी बाबा रघुवरदास यांच्याकडे आचारी म्हणून कार्य केलं आणि बघता बघता त्या कार्यच उचित फळ मिळालं. गोरखपूरच्या आसपास तब्बल २५० शाखांचं जाळं नानाजी देशमुखांच्या प्रयत्नातून विणलं गेलं.
संघाचं कार्य करत असतानाच नानाजी पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या संपर्कात आले.
नानाजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्यायजीचं नातं हे वेगळ होतं. पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या “एकात्म मानव दर्शना”च्या सिद्धांताला नानाजींनी प्रत्यक्षात उतरवलं होतं.
नानाजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय हे दीर्घ काळ सोबत कार्यरत होते. त्यात अटल बिहारी वाजपेयीचा देखील समावेश होता.
त्यांनी सोबत संघाच्या विचारांनि प्रेरित असलेल्या पांचजान्य आणि स्वदेश ह्या साप्ताहिक व मासिकाचे संपादन केले. १९४८ वेळी गांधी हत्येनंतर संघावर लादलेली बंदी उठली आणि पुढे जाऊन १९५२ साली जनसंघाची स्थापना करण्यात आली.
जनसंघाच्या एकूण उभारणीत नानाजीचा वाटा खुप मोठा होता. त्यांनी पक्षाची मोट बांधली नाहीतर तर पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या बरोबरीने देशभर पक्षाला एक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलं होतं.
नानाजी हे एक थोर राजकिय तपस्वी होते. त्यांनी निस्वार्थ भावनेने जनसंघाच्या उभारणी करतांना कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक स्वार्थ उरी ठेवले नाही. त्यांनी कुठले पद मिळावे अशी अपेक्षा ही त्यांना कधीच नव्हती.
फक्त संघटना उभारणी ह्या एका कार्यासाठी त्यांनी स्वतला अर्पण करून टाकले होते.
१९७५ साली इंदिराजीनी लावलेल्या आणीबाणीमुळे सबंध देश हादरला होता. संघावर बंदी घालण्यात होती. स्वयंसेवक आणि जनसंघाच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकले जात होते.
विरोधी विचारांच्या सर्व नेत्यांना दडपून टाकायचे कार्य इंदिरा सरकारने चालवले होते. ह्या विरोधात आवाज उठवला जयप्रकाश नारायण यांनी त्यांनि इंदिरा सरकारच्या कारभाराविरोधात लढा उभारला होता.
ह्या लढ्यात नानाजी देशमुख व इतर संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बऱ्याचदा विरोधकांवर पोलिसांकरवी लाठीचार्ज केला जात होता त्यावेळी जयप्रकाश नारायण यांचावर होणारा प्रत्येक वार नानाजींनी स्वतः वर घेतला होता.
नानाजीचे वय त्यावेळी ६० वर्ष होतं. पुढे जनता पक्षाचे सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वात सत्तेत आले.
त्यावेळी बलरामपूर मतदारसंघातून नानाजी देशमुख देखील निवडून आले होते. जनसंघाच्या स्थापनेनंतर त्यांनी लढवलेली ही पहिली निवडणूक होती ज्यात त्यांना यश आले होते.
मोरारजी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. ज्याचा स्वीकार करण्यास नानाजीनि नम्रपणे नकार दिला होता. त्यांनी म्हटलं की माझ्या वयाची साठी ओलांडली आहे, ह्या परिस्थितीत मी मंत्रिपद व राजकीय कार्य करण्यापेक्षा सामजिक कार्याला वेळ देने अपेक्षित आहे.
यातूनच पुढे जाऊन त्यांनी पंडित दीनदयाळ संस्थानची स्थापना केली. ह्या संस्थांनच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.
त्यांनी त्यांचा मतदार संघातील अनेक गावांचा विकास केला. परंतु दुर्दैवाने पुढे जनता पक्षाचे सरकार कोसळले आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. परंतु ह्यामुळे थांबतील ते नानाजी कसले?
उलट राजकीय बदलाने त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
१९८० साली उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशचा सीमेवर असलेल्या अयोध्येच्या असपासच्या प्रदेशात त्यांनी चित्रकूट हा प्रकल्प साकारला होता.
नानाजींनी चित्रकूट प्रकल्पाच्या माध्यमातून ग्राम विकासाचा नवा अध्याय घालून देत पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानव दर्शनातील तत्त्वांच्या आधारावर ग्राम विकास करून दाखवला.
एकेकाळी दुष्काळ ग्रस्त आणि प्रचंड मागास असलेली खेडी पालटली. तिथे रोजगार निर्मिती करून ती खेडी स्वयंपूर्ण बनवली. तसेच तिथे शेतीसाठी उपयुक्त अश्या योजना राबवल्या. आरोग्य व शिक्षण यावर ही लक्ष घालत त्या क्षेत्रात क्रांती घडवली.
तिथला समाज खेडी व वस्त्या ह्या स्वयंपूर्ण झाल्या नाहीत तर त्या देशभरात एक आदर्श मॉडेल म्हणून समोर आल्या आहेत.
याच धरतीवर नानाजींनी बीड जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील गोंड जिल्हा दत्तक घेत त्याठिकाणी १९९१ पासून अनेक विकास प्रकल्प उभे केले आहेत. स्वयंरोजगाराच्या संध्या त्या भागात उपलब्ध करून दिल्या आहेत.
आज दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पामुळे तिथली परिस्थिती पालटली आहे.
१९९७ ला जेव्हा अटलजी सत्तेत आले तेव्हा नानाजीना खासदार करण्यात आले सोबतच त्यांना १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
नानाजींचे दीनदयाळ संस्थानच्या माध्यमातून कार्य सुरूच होते. २७ फेब्रुवारी २०१० रोजी चित्रकूट प्रकल्पाच्या ग्रामीण विद्यापीठात जे भारतातील पहिलं त्या प्रकारच विद्यापीठ आहे, त्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शेवटच्या दिवसांत वयोमानाने त्यांची तब्येत बरीच खालवली होती.
आज ह्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या माणसाचा जीवन गौरव करण्यात आला आहे. जो एक खूप मोठा सन्मान आहे त्या माणसासाठी, त्या माणसाच्या अद्वितीय कार्यासाठी आणि त्याचा प्रखर राष्ट्र आराधनेसाठी..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.