आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
ह्या जगात दोन प्रकारचे लोक राहतात. एक जे सामान्य लोक असतात ते नुसतीच पोटापाण्यासाठी आयुष्यभर राबतात आणि स्वप्नं फक्त रात्री झोपेत बघायची असतात, दिवसा नोकरी धंदा सोडून स्वप्नांच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही असे मानतात आणि नोकरी व्यवसाय सोडण्याची रिस्क घेऊ शकत नाही असे असतात.
तर दुसरे मात्र जरा वेगळ्या प्रकारातले असतात. हे दुर्मिळ लोक आपल्या स्वप्नांसाठी वाटेल तितके कष्ट करायला तयार असतात. जो घेतला असतो, त्यासाठी ते वाटेत येणाऱ्या अडचणींना न घाबरता, रिस्क घेऊन पुढे जात असतात.
अशीच माणसे आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवतात.
पीयूष गोस्वामी आणि अक्षता शेट्टी हे जोडपे अश्याच दुर्मिळ व्यक्तींमध्ये मोडतात. पीयूष आणि अक्षता हे दोघेही व्यवसायाने इंजिनियर्स आहेत.
खोऱ्याने पैसे कमवायची संधी सोडून, ऐषोआरामाचे जीवन सोडून तरुण वयातच त्यांनी कॉर्पोरेट जॉब सोडून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेण्याचा ध्यास घेतला आहे.
पीयूष आणि अक्षता ह्यांनीही असेच नेहमीच्या “मळलेल्या पायवाटेने” न जाता आपल्यासाठी वेगळा आणि कठीण मार्ग निवडला. २०१३ पासून हे दोघे भारतभर फिरून अत्यंत दुर्गम भागातील लोकांच्या समस्या जगापुढे आणण्याचे काम करीत आहेत.
ह्या भटक्या विमुक्त लोकांचे प्रश्न, समस्या जगापुढे आणून त्यांच्या आयुष्यात काहीतरी सुधारणा व्हावी ह्यासाठी हे जोडपे मनापासून काम करीत आहे.
त्यांच्या ह्या कठीण प्रवासात दोघांनी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचे ठरवले आहे. ह्या प्रवासात दोघांचीही कौशल्ये अगदी एकमेकांना पूरक अशीच आहेत.
अक्षता आपल्या शब्दांतून, लिखाणातून समोरच्याच्या मनाचा ठाव घेते तर पीयूष आपले उत्कृष्ट फोटो टिपण्याचे आणि फिल्म तयार करण्याचे कौशल्य वापरून अक्षताची स्टोरी आणखी प्रभावी बनवतो.
पीयूष उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडच्या चरखरी ह्या गावात जन्माला आला. अकराव्या वर्षापर्यंत तो उत्तर प्रदेश मध्ये राहिला. त्यानंतर १९९६ साली शिक्षणासाठी तो बंगळुरूला आला.
२००८ साली त्याने सुरथकल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलिजी मधून बी टेक केले आणि नंतर ओरॅकल एसएसआय इंडिया ह्या कंपनीत एक वर्ष आठ महिने इतक्या कालावधीसाठी काम केले.
अक्षताचा जन्म बाहरेन ह्या देशात झाला आणि तिथेच ती लहानाची मोठी झाली. ती मूळची कर्नाटकमधील मणिपालची आहे. तीस वर्षांपूर्वी तिचे आईवडील बाहरेनला स्थायिक झाले.
तिचे शालेय शिक्षण तिने बाहरेनमधूनच पूर्ण केले आणि पुढचे शिक्षण तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरथकल येथे घेतले. २००८ साली तिने शिक्षण पूर्ण केले आणि इन्फोसिस मध्ये दोन वर्ष काम केले.
त्यानंतर तिने उपसंपादक म्हणून द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये काम केले. तिला भारतात आल्यानंतर इथले वातावरण प्रचंड आवडले. हे दोघेही एकच कॉलेज मध्ये असल्याने इंजिनियरिंग करताना एकमेकांना भेटले.
आयुष्याचे ध्येय- “रेस्ट ऑफ माय फॅमिली”
२०१३ पासून पीयूष आणि अक्षता भारतात अनेक ठिकाणी फिरले. त्यांनी अंतर्गत भागातील अनेक समुदायांची भेट घेतली व त्यांच्याबद्दल जाणून घेतले. प्रत्येक समुदायाच्या एका वेगळ्या गोष्टीने त्यांना आयुष्याची दिशा दिली.
पीयूष आणि अक्षता ज्यांना ज्यांना भेटले ती त्यांच्यासाठी फक्त काही नावे,काही चेहेरे , काही स्टोरीज नव्हत्या तर त्यांच्यासाठी त्या व्यक्ती म्हणजे त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती होत्या.
ह्या लोकांबाबत स्टोरी करताना त्यांच्या लक्षात येत गेले की ह्यांच्याबाबत नुसत्याच स्टोरीज करून त्या लोकांच्या आयुष्यात काही सुधारणा होणार नाहीयेत. देशाच्या दृष्टीने ह्या भटक्या विमुक्त लोकांचे अस्तित्वच नाही आणि असले तरी ते फक्त सर्व्हे आणि लोकसंख्येच्या आकडेवारी पुरतेच मर्यादित आहे.
अक्षता म्हणते की,
“आमचे प्रोजेक्ट ‘रेस्ट ऑफ माय फॅमिली” हा जे आपल्या कुटुंबाचा एक मोठा भाग आहेत त्या लोकांशी आपले नाते परत जोडण्याचा एक प्रयत्न आहे. आपल्या ह्या कुटुंबाप्रति आपली काही जबाबदारी आहे ती समजून घेऊन पूर्ण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.”
पीयूष म्हणतो की, “समाजासाठी उपयुक्त अश्या कार्यासाठी कला आणि तत्वज्ञान ह्यांचा कशा प्रकारे संगम केला जाऊ शकतो हे मला जाणून घ्यायचे होते. त्यासाठी मी शोध सुरु केला आणि “रेस्ट ऑफ द फॅमिली” ह्या प्रोजेक्टचा जन्म झाला.
ह्यातून मला मिळणारी मिळकत म्हणजे रोज नव्या लोकांशी जोडले जाणे हीच आहे. जितक्या जास्त व्यक्तींबरोबर माझे नाते जोडले जाते, तितकी माझी श्रीमंती वाढते.
गेली अनेक वर्षे मी ग्रामीण भागात जातो आहे. ज्या ज्या व्यक्तींशी माझी भेट झाली, ज्यांच्याबद्दल मी स्टोरीज केल्या, त्यांच्याशी माझे घट्ट नाते तयार झाले आहे.
हे काम करता करता एक दिवस माझ्या लक्षात आले की ह्या लोकांच्या आयुष्याबद्दल मी एकट्याने नुसत्या स्टोरीज करून त्यांच्या आयुष्यात काहीही सुधारणा होणार नाहीत. मला माझे प्रयत्न अपुरे वाटू लागले आणि मला माहिती होते की मला आणखी काहीतरी करणे आवश्यक आहे.
पण ते काय ह्याचे उत्तर मला ‘रेस्ट ऑफ माय फॅमिली’ मधून सापडले.
ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सामाजिक प्रश्न, ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज, लोकांच्या जीवनातले खरे प्रश्न, वास्तविक जीवन ह्याचे चित्रण करूच, आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचाही प्रयत्न करू.”
२०१० साली ह्या प्रोजेक्टची कल्पना या दोघांच्या डोक्यात आली. आणि त्यानंतरची तीन वर्षे त्या प्रोजेक्टवर ठोस काम करण्यात गेली. ह्या प्रोजेक्टवर काम करता करता पीयूष ने इंडिपेन्डन्ट फोटोग्राफी सुरु केली. काही फिक्शन आणि नॉन फिक्शन चित्रपटांवर देखील काम केले.
ह्या दरम्यान अक्षताने पत्रकारितेवर लक्ष केंद्रित केले. ह्याच काळात त्यांनी त्यांना शक्य होईल तसे ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना भेट देणे सुरु केले.
त्यांच्या स्टोरीज त्यांनी फोटो स्टोरीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आणि त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले. पण केवळ लिहून किंवा फोटो प्रसिद्ध करून ह्या भटक्या विमुक्त लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले.
२१०३ साली दोघांनीही त्यांच्या नोकऱ्या, घर आणि इतर सगळ्याचा त्याग केला आणि “रेस्ट ऑफ माय फॅमिली” ह्या एकमेव ध्येयाकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले. पण त्यांच्या ह्या निर्णयाला त्यांच्या पालकांचा पाठिंबा नव्हता.
आपली मुले ह्या वेगळ्या वाटेचे प्रवासी आहेत ही बाब सर्वसामान्य विचार करणाऱ्या घरात पचनी पडली नाही. परंतु ह्या दोघांनीही हार मानली नाही आणि त्यांचे काम नेटाने सुरु ठेवले.
कधी ना कधी आईवडिलांना त्यांचा उद्देश कळेल आणि ते समजून घेतील अशी आशा दोघांनाही होती. आणि आज दोघांच्याही आईवडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटतो. आज दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.
२०१६ साली त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात नॉन स्टॉप वन इयर ड्राइव्ह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत सुद्धा मिळाली.
तेव्हापासून त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील समुदायांच्या समस्या जगापुढे आणण्याचे काम सुरु केले जे आजतागायत सुरु आहे. ह्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ह्या लोकांबरोबर काही काळ वास्तव्य सुद्धा केले.
तेव्हा त्यांना अनोळखी असून देखील त्या समुदायातील लोकांनी अतिशय प्रेम आणि माया लावली. म्हणूनच त्या लोकांना पीयूष आणि अक्षता आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानतात.
ह्या ड्राइव्हदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची स्टोरी कव्हर केली, कर्नाटकातील देवदासींच्या समस्या समजून घेतल्या. लंबानी समुदायाच्या समस्या जगापुढे आणल्या. त्यांनी नक्षली भागातील आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले आणि भारत बांगलादेश सीमेलगत भागात चालणारी मानवी तस्करी व इतर समस्या सुद्धा कव्हर केल्या आहेत.
२०१५ साली अधिकृतपणे रेस्ट ऑफ माय फॅमिली हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला.ग्रामीण भागातील भटक्या विमुक्त समुदायातील लोकांच्या आयुष्यात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली मदत मिळवून देणे हे ह्या प्रोजेक्टचे मुख्य लक्ष्य होते.
अक्षता आणि पीयूष ला ह्या लोकांच्या स्टोरीज जगापुढे आणण्यापलीकडे जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी ठोस कार्य करण्याची इच्छा आहे.
गेल्या तीन वर्षांत त्यांनी सहा राज्यांतील जवळपास ४०० पेक्षाही जास्त वंचित मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलली आहे. धनुषकोडी येथील मासेमारी करणाऱ्या समुदायासाठी एक बस दिली आहे.
बस्तर येथे ग्रामीण आरोग्य सेवेद्वारे नियमित वैद्यकीय शिबिराची सुविधा उपलब्ध करून दिली. ओडिशा येथे राहणाऱ्या बोन्डा जमातीला वापरण्यासाठी बायोगॅस उपलब्ध करून दिला.त्यासाठी त्यांनी बोन्डा मध्ये असणाऱ्या डोंगराळ भागात बायोगॅस प्लॅन्ट उभारला.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जिथे आर्सेनिक मुळे पाणी प्रदूषित झाले आहे तिथे पेयजल प्रकल्प उपलब्ध करून दिले.
खरथॉन्ग ऑर्गेनिक किसान प्रोड्यूसर कंपनी (केओओएफओ) ची स्थापना करून आसाम मधील दिमा हसओ मधील शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रिय पिकांना योग्य दर मिळवून देण्यात मदत केली.
गेल्या आठ वर्षात पीयूष आणि अक्षता ह्यांनी असे मोठे सामाजिक कार्य तर केलेच ह्याशिवाय त्यांनी “द फॉरगॉटन सॉंग्स कलेक्टिव्ह (TFSC) चीही सुरुवात केली. २०१८ साली सुरु झालेला TFSC हा रेस्ट ऑफ माय फॅमिलीचा आर्टिस्ट कनेक्ट प्रोग्रॅम आहे.
हे एक मल्टीमीडिया आर्ट कलेक्टिव्ह आहे आणि विनायक ह्या इलेक्ट्रॉनिक संगीतकाराच्या साथीने सुरु करण्यात आले आहे. भारतातील हळूहळू नाहीसे होत जाणारे आदिवासी संगीत, लोक संगीत आणि संस्कृती ह्याबद्दल जनजागृती करणे आणि हे सगळे जतन करून ठेवणे हा ह्या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे.
त्यासाठी संगीतकार, व्हिज्युअल आर्टिस्ट, प्रोजेक्शन मॅपिंग आर्टिस्ट्स, चित्रपटनिर्माते व इतर कलाकार ह्यांच्याबरोबर मल्टिमीडिया आर्टिस्ट कोलॅबोरेशन करून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला जाणार आहे.
भारतातील विविध भागातील विविधता असलेले लोकसंगीत जतन करून त्याची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा TFSC चा प्रयत्न आहे.
त्यासाठी म्युझिक रिलिझेस, दृक श्राव्य कार्यक्रम केले जाणार आहेत. त्यांचा पहिला प्रोजेक्ट हा ईशान्य भारतातील बायेत समुदायाचे लोकसंगीत हा असेल. त्यानंतर ते बोन्डा आणि गोंड समुदायाच्या लोकसंगीतावर काम करतील.
अक्षता आणि पीयूष हे जोडपे समाजसेवेबरोबरच आपल्या देशातील प्राचीन कलेचेही जतन करण्याचे मोठे काम करीत आहेत.
त्यांच्या ह्या कार्याला आणि त्यांनाही सलाम! त्यांच्या रेस्ट ऑफ माय फॅमिली ह्या प्रोजेक्टला आणखी आधार मिळाला तर अनेक समुदायाचा विकास होईल. ते सुद्धा देशाच्या इतर नागरिकांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.