' कोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं? : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल – InMarathi

कोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं? : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : कॅप्टन स्मिता गायकवाड

===

फर्ग्युसन महाविद्यालयात बी जी कोळसे पाटील सारख्या माणसाला वक्ता म्हणून बोलवल्याच्या बातम्या वाचल्या . फर्ग्युसनची माजी विद्यार्थिनी म्हणून वाईट वाटलं आणि काळजीही !!

माझ्यासाठी फर्ग्युसनची ओळख ही मुक्त आणि विवेकी संस्कृती असलेलं महाविद्यालय अशी होती. “मुलींनी कोणते कपडे घालावे ” असे उपदेशाचे डोस ना कधी प्राध्यापक द्यायचे ना विद्यार्थ्यांमध्ये तसल्या चर्चा असायच्या.

मुलीच्या कपड्यांच्या लांबीवरून तिचे तथाकथित “चारित्र्य” तिथे ठरवले जायचे नाही. कारण फर्ग्युसनच्या संस्कृतीत अशा गोष्टी कधीच नव्हत्या.

फर्ग्युसन culture वेगळं होतं. “होतं ” ह्यासाठी म्हणते कारण सध्या परिस्थिती तशी असण्याची खात्री नाही. त्यामुळे “आहे” म्हणायची हिम्मत नाही.

 

fergusson-inmarathi
Collegedunia.com

फर्ग्युसन मध्ये कोळसे पाटलांसारखा माणूस बोलावला जातो ज्यांच्यावर एका पत्रकार स्त्रीने आरोप केला होता की “वरचं बटन उघडं का ठेवलं म्हणून कोळसेंनी तिची कॉलर पकडली.”

एखाद्या पत्रकार महिलेनं कोणते कपडे कसे घालावे हे सांगणारे कोळसे पाटील कोण? महिलेची कॉलर पकडायची त्यांची हिम्मत कशी होते?

आरोप अजून सिद्ध झाले नाही हा बहाणा कोणाला द्यायचा असेल तर ज्या देशात अशा आरोपावरून एम जे अकबर सारख्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो त्या देशात कोळसे पाटील सारख्या व्यक्तीव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना वक्ता म्हणून मिळू नये?

ह्याला नक्की काय म्हणायचं? स्त्रियांवरच्या लैंगिक छळाबद्दलची (sexual harassment ) उदासीनता की नेहमीप्रमाणे तशी तक्रार करणाऱ्या स्त्रीवर अविश्वास?

ज्या स्त्रीने हे लिहिलं तिच्याविरोधात defamation टाकण्याचे कष्ट कोळसे पाटील ह्यांनी घेतल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. कोळसे पाटील जर खरंच अशा प्रकारात नव्हते तर त्यांनी आजवर ह्या प्रकाराबद्दल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कोणतीच कायदेशीर कारवाई का केली नाही ?

 

bg-kolsepatil-inmarathi
youtube.com

फर्ग्युसन च्या POSH (Prevention of Sexual Harassment) कमिटीचं ह्याबद्दल मत काय? अशा संवेदनशील विषयात POSH कमिटी नी काही मतं मांडली की नाही? कायद्यानुसार गरजेचं आहे किंवा नाही हा मुद्दा माझ्या दृष्टीने दुय्यम आहे.

सामाजिक भान आणि संवेदनशीलता म्हणून त्यांना काही करावसं वाटलं का ह्या प्रकरणात? आणि नसेल वाटलं तर फर्ग्युसनच्या विद्यार्थीनींमध्ये त्यांची विश्वासार्हता कशी टिकणार?

पीडित स्त्रीच्या तक्रारीची वाट न बघता कायद्याच्या compliance पेक्षा दोन पावलं पुढे जावून स्त्रियांसाठी अनुकूल work culture तयार करणाऱ्या संस्था आणि कंपन्या मी पहिल्या आहेत आणि Gender diversity sensitive work culture निर्माण होण्यासाठी स्वतः कामही केलं आहे. त्यामुळे हे प्रश्न मला पडतात.

लैंगिक छळाची तक्रार करायला मुली आणि स्त्रिया पुढे यायला धजावत नाहीत कारण समाजाची त्या स्त्रीला चूक ठरवण्याची वृत्ती ! #MeToo प्रकरणाच्या वेळी माध्यमांमध्ये ह्या विषयाबद्दल असलेली असंवेदनशीलता आणि हेटाळणी पूर्वक टिप्पणी आपण सगळ्यांनी पाहिली.

 

women-tortured-inmarathi
dnaindia.com

वर्षानुवर्षे लैंगिक छळ सोसणाऱ्या स्त्रिया अशा अपमानास्पद हेटाळणीला घाबरून मौन स्वीकारतात. शाब्दिक अश्लील टिप्पणी, स्त्रीच्या संमतीशिवाय तिला केलेला स्पर्श, अश्लील हावभाव तत्सम आणि इत्यादी गोष्टी ह्या sexual harassment मध्ये मोडतात हे अनेकांना ठाऊकही नसतं.

मग जेव्हा काही स्त्रिया त्यातून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवून त्याबद्दल बोलत असतील तर समाज म्हणून आपण त्यांच्यासाठी उभं राहायचं की ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि त्यांना उत्सवमूर्ती म्हणून मिरवायचं?

कोळसे पाटील ह्यांना वक्ता म्हणून बोलवणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या फेसबुकवरच्या जुन्या पोस्ट मी पहिल्या. #MeToo च्या समर्थनार्थ फार प्रामाणिकपणे लिहिलं आहे.

मग कोळसे पाटील सारख्या व्यक्तीला बोलवताना हा प्रामाणिकपणा कुठे जातो?

विचारधारांच्या लढाईत नेतृत्व करणाऱ्या स्त्रियाच जर इतर स्त्रियांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा बळी असा सहजासहजी द्यायला लागल्या तर शोषित स्त्रियांनी कोणाकडे पहायचं? कुठे जायचं न्याय मागायला?

 

women-inmarathi
india.com

आज पीडिता म्हणून तिथे वेगळी कोणी व्यक्ती आहे उद्या तिथे आपण स्वतः किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती पण असू शकतात. तेव्हा आपण समाजाकडून काय अपेक्षा करणार? मग आज समाज म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य नाही का?

अशा गोष्टींमुळे भविष्यात स्त्रिया तक्रारी करण्याची हिम्मत दाखवतील का? म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावू नये ही भीती असते.

सामाजिक प्रश्नांकडे राजकीय किंवा विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे होणारं नुकसान हे राजकीय आणि सामाजिक दोन्ही आहे.

कारण त्यामध्ये राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तर खालावत जातात. त्यामुळे कोळसे पाटील आणि विनोद दुआ ह्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी तोच न्याय विवेक अग्निहोत्री आणि एम जे अकबर ह्यांना लावणं तितकंच गरजेचं असतं आणि अकबर, अग्निहोत्री ह्यांना जाब विचारणाऱ्यांनी कोळसे पाटील आणि दुआ ह्या दोघांनाही जाब विचारणं महत्त्वाचं असतं.

स्त्री-हक्क आणि स्त्री स्वातंत्र्य हे केवळ विरोधकांवर टीका करण्याचं शस्त्र नाही. देशाच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या सामाजिक परिवर्तनाची ती मूलभूत गरज आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?