' अजित धोवालांच्या मुलाचा कारवान मॅगझीन आणि जयराम रमेश यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा – InMarathi

अजित धोवालांच्या मुलाचा कारवान मॅगझीन आणि जयराम रमेश यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१६ जानेवारी २०१९ रोजी इंग्रजीतील “कारवान” या नियतकालिकात शोधपत्रकार कुशल श्रॉफ यांनी विवेक डोभाल यांच्या संदर्भात लेख प्रकाशित केला.

“करांसाठी स्वर्ग” असलेल्या केमन आयलँड्स येथे अस्तित्वात असलेली  हेज फंड कंपनी डोभाल पुत्राची असून याद्वारे अवैधरित्या पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे त्यात लिहिले होते.

 

no-ball-inmatathi
haribhoomi.com

या लेखामुळे मोठी खळबळ उडाली. त्याला आता विवेक डोभाल यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत.

तर याप्रकरणी त्यांनी पटियाला उच्च न्यायालयात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल शोधपत्रकार कुशल श्रॉफ यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला जावा असा अर्ज दिला आहे.

जेव्हा हा मजकूर प्रसिद्ध झाला त्याआधारे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन डोभाल कुटुंबियांवर टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या विरोधातही अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

विवेक डोभाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपण ब्रिटिश नागरिक असून ते स्वतःआणि अमित शर्मा हे GNY Asia चे संस्थापक-संचालक आहेत.

विवेक यांना हा अब्रुनुकसानीचा  खटला दाखल करण्यास भाग पाडण्यात आले आहे कारण आरोपींनी जाणूनबुजून त्यांची बदनामी केली आहे.

त्यांचे वडील अजित डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांना अडचणीत आणण्याच्या हेतूने हे कृत्य केले आहे.

 

ajit-doval-marathipizza03

 

तक्रारीत ते पुढे म्हणतात की,

“प्रकाशित केलेल्या लेखात आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोपींनी तक्रारदारांविरुद्ध (विवेक डोभाल यांच्याविरुद्ध) निराधार आरोप केले आहेत.

त्यामुळे स्वतः अनेक वर्षांपासून कठोर परिश्रमाने कमावलेली प्रतिष्ठा आणि सद्भावनेला ठेच पोहोचली आहे. ज्यामुळे आपले कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

याशिवाय, आरोपींनी आपल्या कंपनीविरुद्ध अनैतिकतेने पैसे कमविण्याचे गंभीर आरोप केले आहेत. जो तक्रारदाराचा कायदेशीर आणि नैतिक व्यवसाय आहे.

कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी हे आरोप केले असून या खोटेपणाबद्दल ते पूर्णपणे जागरुक आहे.”

कॉंग्रेस नेते जयराम रमेश आणि “कारवान” या नियतकालिकाने हेज फंड स्थापनेचा आणि नोटबंदीच्या तारखेच्या आधारावर चुकीचे आरोप केले आहे आणि असे करतांना कुठलाही पुरावा दिला नाही.

 

jayram-ramesh-inmarathi
mynation.com

या लेखाचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसने विवेक डोभाल हे मनी-लॉंडरिंगमध्ये गुंतलेले असल्याचे सांगितले होते.

पुढे विवेक डोभाल यांनी आपले शिक्षण आणि आजवर ज्या ठिकाणी नोकरी केली त्या आर्थिक संस्था, पद, वेतन याची तपशीलवार माहिती दिली आहे. हा तक्ता त्यांची आतापर्यंतची यशस्वी कारकीर्द दाखवतो.

यानंतर त्यांनी आपले भागीदार अमित शर्मा यांच्याशी असलेलया व्यावसायिक संबंधांची सुद्धा माहिती दिली आहे.

यातून असे दिसते की दोघांनी आपली व्यावसायिक कारकीर्द एकाच वेळी सुरु केली आणि ते दोघी एकमेकांच्या व्यावसायिक आयुष्याशी चांगले परिचित आहे.

यानंतर त्यांनी आपल्या हेज फंड कंपनीसंदर्भात खुलासा केला आहे. मोठ्या कारकीर्दीनंतर आपण व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

“कारवान” या नियतकालिकाने लेखात “विशिष्ट कागदपत्रांद्वारे नोटबंदीनंतर लगेच ही कंपनी सुरु केल्याचा दावा केला”. मात्र ही प्रक्रिया २०१३ पासूनच कशी सुरु होती याची तपशीलवार माहिती विवेक डोभाल यांनी दिली आहे.

थोडक्यात नोटबंदी आणि हेज फंड कंपनी स्थापनेचा बादरायण संबंध जोडण्याचा खोडसाळपणा “कारवानच्या लेखात” केला आहे.

हेज फंडात कोणत्या गुंतवणूकदारांनी किती गुंतवणूक केली आहे, त्यांची संपत्ती आणि कोणत्या आधारे गुंतवणूक केली आहे याचे सर्व तपशील सुद्धा तक्रार देतांना सादर केले आहेत.

भारतात मोठा पैसा पाठविल्याचा लेखात उल्लेख आहे त्याला उत्तर देतांना विवेक डोभाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीच्या १५% पेक्षा अधिक (२ कोटी डॉलर्स म्हणजे १४ कोटी रुपये) भारतीय बाजारपेठेत कधीही गुंतवणूक केली गेली नाही.

म्हणजे भारतातून त्या कंपनीत गुंतवणूक झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात कंपनीने भारतात गुंतवणूक देखील केली नाही तर “मनी-लॉंडरिंग” कशी होईल?

कारवान आणि कॉंग्रेसने हेज फंड कंपनी केमन आयलंड्समध्ये का स्थापन केली असा प्रश्न उपस्थित केला होता? त्यावर विवेक डोभाल यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे की,

जेव्हा एखादी हेज फंड कंपनी स्थापन केली जाते तेव्हा व्यावसायिक सल्लागार व्यवसायाच्या दृष्टीने या ठिकाणाची शिफारस करतात.

कारण केमन आयलँड्स भारतात काळा पैशांशी संबंधित म्हणून ओळखले जातात परंतु विकसित जागतिक वित्तीय केंद्रामध्ये अशी परिस्थिती नाही.

केमन आयलंड मध्ये गुंतवणूक निधीसाठी ११,००० हेज फंड उद्योग आहेत आणि जागतिक हेज फंड उद्योगाच्या एकूण मालमत्तेच्या ६०% म्हणजे १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स रकमेचे व्यवहार या ठिकाणाहून होतात.

तेव्हा फंड कंपनी निर्माण करतांना ज्या मानक प्रक्रिया सर्वांकडून पार केल्या जातात त्या सर्व मानक प्रक्रिया पार पाडल्याचा दावा डोभाल यांनी केला आहे.

विवेक डोभाल यांनी, ८३०० कोटी रुपये भारतात आल्याचे “लेखात आणि काँग्रेस यांनी कोणत्या आधारावर सांगितले” याचा खुलासा मागितला आहे.

कारवानच्या लेखात जे लोक विवेक डोभाल यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत तेच शौर्य डोभाल यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत असा एक आरोप केला गेला होता.

त्यावर विवेक डोभाल यांची कंपनी आणि शौर्य डोभाल यांच्या कंपनीतील संबंध २ नियुक्त व्यावसायिक आणि त्यांना लागणारी कार्यालयीन जागा एवढाच मर्यादित असल्याचे सांगितले आहे.

विवेक डोभाल यांनी केलेला खुलासा पाहता आता ही लढाई न्यायालयात लढली जाईल हे स्पष्ट आहे.

 

vivekdoval-inmarathi
haribhoomi-inmarathi

कारवानचे संपादक आणि शोधपत्रकार कुशल श्रॉफ तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांना हा खुलासा मिळेलच. कारण आरोपीला तक्रार दाखल झाल्यावर त्याची प्रत मिळणे हा त्यांचा हक्क आहे.

तेव्हा आता निर्दोष कोण आहे आणि दोषी कोण? हे न्यायालय ठरवेल.

संशयाचं धुकं निर्माण करून त्यावर आपली पोळी शेकण्याचे उद्योग भारतात काही नवे नाहीत, माध्यमं आणि राजकीय पक्ष त्याला चांगलेच सरावले आहेत.

आता सिंगापूर येथे वास्तव्यास असलेल्या विवेक डोभालांकडून आलेल्या “फ्रॉम सिंगापूर विथ लव्ह” नोटिसीला कारवान आणि जयराम रमेश कसे सामोरे जाता ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?