आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पेरू हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्यावरील एक देश आहे. प्राचीन काळापासून या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते.
१६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. त्यामुळे स्पॅनिश भाषा इथे प्रामुख्याने बोलली जाते.
इथे अनेक लहान मुलांचे दफन केलेली एक जागा उत्खननात आढळली आहे. त्यातून जे काही तथ्य समोर येत आहे ते सर्वांसाठी नवीन आहे.
नॅशनल जिओग्राफिकच्या अंकात या उत्खननाबद्दल क्रिस्टीन रोमी यांनी त्याबद्दल जे काही लिहिले आहे ते अंगावर काटा आणणारं आहे पण विचारात पाडणारं देखील आहे.
==
हे ही वाचा : आधी मुलांना जन्म, नंतर लग्न : विचित्र प्रथा जपणा-या या अजब समाजाची गजब कथा
==
ट्रजिलो राष्ट्रीय विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागाचे प्राध्यापक गॅब्रिएल प्रेटो हे तिथे आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. अमेरिकेतील येल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर हे प्राध्यापक वॅनचाको इथे राहतात.
त्यांना या भागाच्या इतिहासाची चांगली जाण आहे. इथे राहून त्यांना ३५०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचे उत्खनन करायचे होते.
मात्र २०११ मध्ये एका स्थानिक पिझ्झाच्या दुकानाच्या मालकाने ही बातमी सर्वांसमोर आणली.
त्यांची मुले परिसरात आसपास खेळात असतांना आजूबाजूच्या कुत्र्यांना जवळील रिकाम्या जागेच्या वाळूमधून मानवी हाडे सापडत होती. ज्याचे प्रमाणही मोठे होते. त्या दुकानदाराने पुरातत्व विभागाकडे चौकशी करण्यासाठी विनंती केली.
प्राध्यापक गॅब्रिएल वास्तव्यास असलेल्या वॅनचाको या शहराच्या जवळच वॅनचाकीटो हे प्राचीन शहर वसलेले होते.
प्रथमदर्शनी प्रा.गॅब्रिएल यांना वाटले की ही साइट फक्त एक विस्मृत स्मशानभूमी होती. पण आच्छादनात व्यवस्थितपणे गुंढाळलेले अनेक मुलांचे अवशेष पुनर्प्राप्त केल्यानंतर रेडिओकार्बनचे विश्लेषण केले गेले आणि ते इसवी सन १४०० ते १४५० दरम्यानचे असल्याचे लक्षात आले.
तेव्हा यावर काम करणाऱ्या अभ्यासकांना हे देखील समजले की इतिहासातील एक अदृश्य पान त्यांच्या हाती लागले आहे.
==
हे ही वाचा : मुघल सल्तनतचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा आपल्या मुलींची लग्न आपल्या नातलगातच लावत असत…
==
२०११ पासून हे उत्खनन सुरु झाले. उत्खननात सामूहिकरीत्या दफन केलेले मानवी अवशेष मिळत असतात. पण या ठिकाणी मिळाले ते इतक्यापुरतंच मर्यादित नाही. या मुलांचा बळी देण्यात आला होता.
उत्खननांत जे काही मिळालं आहे त्यानुसार हे सर्व काही अगदी सुनियोजीतरित्या केलं जात होतं.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जगातील सर्व भागांमध्ये मानवी बळींचा पुरावा सापडला आहे. बळी घेणारे लोक शेकडो संख्येत असतील आणि अनेकदा ते युद्धकैदी, किंवा धार्मिक हिंसाचारात झालेल्या मृत्यूचे बळी ठरतात किंवा नेत्याच्या मृत्यूवर किंवा पवित्र इमारतीच्या बांधकामावर बळी पडतात असे मानले जाते.
हिब्रू बायबल समवेत प्राचीन ग्रंथांमध्ये मानवी बळींचे उल्लेख येतात, परंतु पुरातत्व नोंदींमध्ये मुलांचे सामूहिक बळी दिल्याचे उदाहरणं अगदी तुरळक आहेत.
या उत्खननातून शोध लागेपर्यंत, या भागातील सर्वात मोठी लहान मुलांचा बळी दिलेली जागा आताच्या मेक्सिको सिटी मधील होती. इथे १५ व्या शतकात ४२ मुलांचा बळी दिला गेल्याचा अंदाज बांधता येतो.
इथे आतापर्यंत बळींची संख्या २६९ आहे. जी लहान मुले आहेत. ज्यांचे वय किमान ५ वर्षे ते १४ वर्षांपर्यंत आहे. मुले आणि मुली या दोघांचा यात समावेश आहे. याशिवाय ३ मोठी माणसे आणि ४६६ लामा प्राण्यांचा देखील बळी दिला गेलेला आहे.
“लामा” हा दक्षिण अमेरिकेत आढळणारे उंट प्राण्याच्या उप जातींपैकी एक प्राणी आहे. हा दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या अँडीज पर्वतावर आढळणारा प्राणी आहे. हे प्राणी त्यांच्या वयाच्या आणि रंगानुसार बळी दिले गेले होते.
गडद तपकिरी आणि फिकट तपकिरी या रंगाचे ते प्राणी होते. तसेच कोणतेही पांढरे किंवा काळा प्राणी बलिदान दिले जात नव्हते.
अभ्यासक हा बळी देण्याचा प्रकार “चिमु” संस्कृती मधील असल्याचे सांगतात. चिमु संस्कृती ही पेरू या देशातील प्राचीन संस्कृती होती.
चिमु संस्कृती शहरातील सध्याच्या त्रुजिलो, पेरूच्या मोचे व्हॅलीतील मोठे महत्वाचे शहर असलेल्या चॅन चॅन शहरासह चिमर येथे केंद्रित होते.
इसवी सन ९०० मध्ये ही संस्कृती मोशे संस्कृतीच्या उत्तरार्धात उदयास आली आणि त्यानंतर १४७० च्या सुमारास या संस्कृतीचा अंत झाला. आधी इन्का साम्राज्य आणि नंतर स्पॅनिश साम्राज्याच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली.
हे उत्खनन सुरु असतांना प्रा. प्रेटो गॅब्रिएल यांनी त्यांच्या विद्यापीठातील जैविक मानवशास्त्रज्ञ आणि फोरेंसिक तज्ज्ञ जॉन वेरानो यांना अधिक संशोधनासाठी बोलावले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या अवशेषांची तपासणी केल्यानंतर, व्हॅरानोने पुष्टी केली की मुलांचे व जनावरांचे एकाच पद्धतीने बळी दिले असून बहुधा त्यांचे हृदय काढून टाकण्यात आले आहे. कदाचित ते समर्पित केले गेले असावे.
बळी देताना असणारा इतर जखमांचा अभाव तसेच चाकूच्या स्थिरतेचे असलेले निशाणं पाहता हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने केले गेले आहे. हा नक्कीच बळी देण्याचा प्रकार आहे.
मग असा बळी देण्याचा प्रकार या चिमु संस्कृती मधील लोकांनी का केला असावा? या प्रश्नाचे उत्तर शोधणे कठीण आहे. एकतर या संस्कृतीविषयी आधीच त्रोटक माहिती उपलब्ध आहे.
पण उत्खननात जे मातीचे थर आढळले आहेत त्यावरून असा एक निष्कर्ष निघतो की, हवामान बदलामुळे तिथे राहणाऱ्या लोकांचे अतोनात नुकसान झाले.
हे हवामान बदल अगदी टोकाचे होते. अति पाऊस आणि उष्णता यामुळे इथले जीवनमान धोक्यात आले होते. परिणामी देवाला साकडे घालून त्याच्यापुढे लहान मुले, प्राणी यांचा बळी देण्यात आला जेणेकरून या संकटातून रहिवाशांची सुटका व्हावी.
==
हे ही वाचा : पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा बंगालमध्ये आजही पाळली जाते!
==
डेपॉल विद्यापीठातील एक मानववंश शास्त्राच्या प्राध्यापक जेन इवा बक्सर, ज्या बालपण आणि बालपणाच्या इतिहासातील तज्ञ् आहेत, ते मान्य करतात की, चिमु संस्कृतीने आपल्या मुलांना देवतांना सादर केल्या जाणाऱ्या सर्वात मौल्यवान देणग्यांपैकी मानले असतील.
“आपण भविष्य आणि त्या सर्व संभाव्य गोष्टींचा त्याग करीत आहोत,” असे त्या लोकांनी देवाला आवाहन केले असेल. अशी कल्पना करता येते.
असे करणे म्हणजे कुठेतरी याद्वारे आपण अलौकिक शक्तींशी संवाद साधत आहोत अशी त्या लोकांची समज होती.
या उत्खनानंतरही अजून जवळच अजून एक जागा सापडली आहे जिथे अशा प्रकारे बळी दिले गेले आहेत. असे निर्दयी कृत्य करून तो समाज नक्की काय मिळवू पाहत होता याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही.
पण असे बळी दिल्याच्या घटनेननंतर पुढील काही वर्षातच चिमु संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचे दिसून येते. त्यांना याची कल्पना आली होती का? हे प्रश्न आपल्याला सतावत राहतील.
कदाचित अजून पुढील काळात या घटनेवर अजून प्रकाश पडेल. काही नवी उत्तरे मिळतील तर काही नवीन प्रश्न उपस्थित होतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.