चक्क आयफेल टॉवर विकणारा जगातील सर्वात हुशार महाठग!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रॉबरी चित्रपट अर्थात जे चित्रपट चोऱ्या आणि दरोड्यांवर आधारित असतात असे चित्रपट बघायाला खरंच खूप धमाल येते. कारण चित्रपटाच्या गतीसोबत वाढत जाणारा तो थरार आपल्याला स्क्रीनसमोरून क्षणभरासाठी देखील हलु देत नाही.
हॉलीवूड आणि बॉलीवूड मध्ये असे असंख्य अनेक चित्रपट आहेत जे कधीही पहा तुम्हाला कंटाळा येणार नाही.
यापैकी बहुतेक चित्रपट हे सत्य घटनांवर आधारित आहेत. म्हणजे तश्या चोऱ्या, तसे दरोडे पूर्वी काही हुशार महाठगांनी घातलेले आहेत.
अश्याच खऱ्याखुऱ्या आयुष्यातील महाठगांपैकी सर्वात हुशार महाठगाची उपाधी कोणाला द्यायाची झालीच तर ती देता येईल विक्टर ल्युस्टीज याला! कारण या महाशयांनी थेट आयफेल टॉवर विकायला काढला होता.

विक्टर ल्युस्टीजचा जन्म झाला १८९० रोजी ऑस्ट्रिया-हंगेरी मध्ये! त्याने आपली कारकीर्द जणू चोर म्हणूनचं पुढे नेण्याचे ठरवले होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. चोर म्हणजे कोणी आलतू फालतू रस्त्यावरचा चोर नाही तर एक प्रोफेशनल चोर!

विक्टर ल्युस्टीजला अनेक परदेशी भाषांचे ज्ञान होते. ओशन लाईनर्स या बोटीवर त्याने सर्वात प्रथम ठग म्हणून स्वत:च्या ढोंगी जीवनाला सुरुवात केली. या बोटीवरून प्रवास करताना त्याला काही श्रीमंत प्रवाशी आढळून आले. तो त्यांच्याजवळ एक मशीन सारखा दिसणारा बॉक्स घेऊन गेला आणि म्हणाला,
हे मशीन म्हणजे नोटा छापायचे यंत्र आहे. तुमच्या सारख्या श्रीमंत माणसांकडे हे असायलाच हवं. यात १०० डॉलरची एक नोट टाका आणि सहा तासामध्ये हे मशीन १०० डॉलरची नोट कॉपी करून घेईल, मग दुसऱ्या बाजूने नोटा बाहेर पडण्यास सुरुवात होईल.
हे ऐकून त्या श्रीमंत प्रवाश्यांना आनंद झाला. ही मशीन आपल्याला अधिक श्रीमंत बनवू शकते या आशेने त्यांनी त्याकाळी तब्बल ३० हजार डॉलर्स देऊन ती मशीन खरेदी केली. बारा तासांमध्ये मशीनने दोन नोटांची छपाई केली.
परंतु त्यानंतर मात्र मशीनमधून केवळ कोरे कागद बाहेर पडू लागले आणि तेव्हा त्या अतिहुशार श्रीमंतांच्या लक्षात आले की त्यांना फसवले गेले आहे. या १२ तासांमध्ये बोटीतून उतरून विक्टर ल्युस्टीज फार दूर गेला होता, त्यांच्या हातामध्ये कधीही न सापडण्यासाठी!
यानंतरही विक्टर ल्युस्टीजने अनेक कारनामे केले. परंतु १९२५ च्या मध्यात त्याने बजावलेल्या कामगिरीला तोड नव्हती. त्याने चक्क आयफेल टॉवर विकून दाखवला.

१९२५ साली फ्रान्स नुकताच पहिल्या महायुद्धातून सावरला होता. याचवेळेस नवीन शिकार शोधण्यासाठी विक्टर ल्युस्टीज पॅरीस मध्ये हजर झाला.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना एक लेख त्याच्या नजरेत आला. प्रसिद्ध आयफेल टॉवरची देखरेख करणे शहरासाठी किती कठीण झाले आहे आणि त्यामुळे आयफेल टॉवर जास्त काळ टिकण्याची संभावना नाही असा त्या लेखाचा विषय होता.
हा लेख वाचल्यावर विक्टर ल्युस्टीजचे डोके भरभर धावू लागले आणी या संधीचा पुरेपूर फायदा उचलायचा असे त्याने ठरवले. त्याने स्वत:ला एका सरकारी अधिकाऱ्याचे रूप दिले आणि Hotel de Crillon मध्ये सहा भंगार व्यापाऱ्यांसोबत बैठक ठरवली.
हे त्याकाळचे पॅरीसमधील सर्वात प्रतिष्ठीत हॉटेल्सपैकी एक होते. सर्वजण बैठकीला हजर झाल्यावर विक्टर ल्युस्टीजने बोलण्यास सुरुवात केली,

तुम्ही वर्तमानपत्रामधील आयफेल टॉवर विषयीचा लेख वाचलाच असेल. तुम्हाला कल्पना आली असेल की मी इथे तुम्हाला का बोलावलं आहे. एक प्रामाणिक आणि सच्चे भंगार व्यावसायिक या म्हणून या बैठकीला मी तुमची निवड केली आहे.
आयफेल टॉवरचा खर्च आत शहराला झेपेनासा झालं आहे म्हणून आम्हाला तो भंगारात विकायला काढायचा आहे. त्याबद्दलचं चर्चा करण्यासाठी आपण जमलो आहोत.
जोवर आपल्यामध्ये सर्व व्यवहार पूर्ण होत नाही तोवर ही गोष्ट तुम्ही गोपनीय ठेवावी अशी सूचना सरकारकडून मला देण्यात आली आहे.

विक्टर ल्युस्टीज बोलण्यामध्येच समोरच्याला जिंकून घ्यायचा. यावेळेसही सर्व भंगार व्यापारी त्याच्या बोलण्याला भुलले. जो सर्वात जास्त बोली लावेल त्याला आयफेल टॉवर मिळेल अशी अट विक्टर ल्युस्टीजने घातली.
सहापैकी आंद्रे पोईजन नावाच्या एका व्यापाऱ्याने विक्टर ल्युस्टीजला लाच दिली आणि आयफेल टॉवर त्यालाच देण्याची विनंती केली. विक्टर ल्युस्टीजला पैसाच तर हवा होता, त्यामुळे त्याने देखील आयफेल टॉवर आंद्रे पोईजनला दिल्याचे इतर व्यापाऱ्यांना सांगितले आणि व्यवहार पूर्ण केला.
अश्याप्रकारे विक्टर ल्युस्टीजचा दुहेरी फायदा झाला, त्याला टॉवर साठी भलीमोठी रक्कम देखील मिळाली आणि भलीमोठी लाच देखील मिळाली. पैश्यांनी भरलेली बॅग मिळाल्याबरोबर विक्टर ल्युस्टीज ने दुसऱ्याच क्षणाला पॅरीस सोडले.
महिना झाला तरी सरकारकडून आयफेल टॉवर संदर्भात कोणतीही सूचना न आल्याने आंद्रे पोईजन चिंतेत होता.
आपण फसवले गेलोय याची त्याला राहून राहून भीती वाटत होती. महिन्याभाराने विक्टर ल्युस्टीज पुन्हा पॅरीसला आला आणि नवीन भंगार व्यापाऱ्यांना हाताशी धरून त्याने पुन्हा एकदा आयफेल टॉवर विकायचा डाव मांडला.

एका भंगार व्यापाऱ्याला या गोष्टीची शंका आली आणि त्याने थेट पोलिसात तक्रार केली. त्यामुळे विक्टर ल्युस्टीजला दुसऱ्यांदा आयफेल टॉवर विकण्याचा डाव फसला, पण यावेळेस नशिबाने त्याची साथ दिली आणि तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
या घटनेनंतर विक्टर ल्युस्टीज थेट अमेरिकेला पळाला आणि खोट्या नावाखाली तेथे राहू लागला. पण त्याचे फसवणूकीचे कारनामे इथेही थांबले नाहीत.
इथे त्याने अल कॅपेनो या अमेरिकन गँगस्टरला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. एव्हाना जगभर त्याचाविरोधात अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या. पोलीसही त्याचा कसून शोध घेत होते.
अखेर १९३५ साली तो न्युयॉर्क पोलिसांच्या हाती लागला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याला अलकार्टझ आयलँडमधील तुरुंगात पाठवण्यात आले आणि अश्याप्रकारे विक्टर ल्युस्टीजची महाठगी कारकीर्द संपुष्टात आली.

असा हा जगातील सर्वात हुशार महाठग मृत्यूला मात्र फसवू शकला नाही आणि ९ मार्च १९४७ रोजी त्याचा मृत्यू झाला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.