Site icon InMarathi

तथाकथित पुरोगाम्यांमधली वैचारिक घाण बाहेर पडतीये – अमित शहांच्या आजारपणाच्या निमित्ताने

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सभ्य समाजात (म्हणजे तुम्ही आम्ही राहतो तो) कोणी आजारी पडल्यास, त्याने आजारपणातून लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त करायची पद्धत असते. मग तो साधा ताप असो, सर्दी-खोकला असो किंवा कर्करोगासारखा दुर्धर आजार असो.

कारण समोरचा व्यक्ती आपला कितीही नावडता असो, पण त्याचे मरण चिंतण्याची पद्धत आपल्यात नसते.

पण… त्यालाही अपवाद आहेत. आणि ते अपवाद आपल्याच समाजात राहून आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना दररोज उपदेशाचे डोस पाजत असतात, हे आपले दुर्दैव म्हणायचे.

हो, अगदी बरोबर ओळखले तुम्ही, कथित लिबरल, पुरोगामी, फेमिनिस्ट (पक्षी- स्त्रीवादी) अशी मंडळी या अपवादामध्ये मोडतात. त्यामुळे तुमचा अंदाज अगदी बरोबर ठरलेला आहे.

तर झाले असे की, भारतीय जनता पक्षाचे (पुरोगाम्यांच्या लेखी जगातील अतिशय फॅसिस्ट, प्रतिगामी, मनुवादी, ब्राह्मण(ण्य)वादी, पुरुषसत्ताक असा पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला. तशी माहिती स्वत:शहा यांनीच ट्वीटरद्वारे दिली.

आपल्यावर उपचार सुरू असून लवकरच आजारपणातून मी बाहेर पडेल, असे शहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

आणि मग काय, लिबरल, पुरोगामी, फेमिनिस्ट (अर्थात तमाम रमणेबाज) टोळीमध्ये आनंदीआनंद पसरला. त्यांना आकाश ठेंगणे झाले, काहींना तर हत्तीवरून साखर वाटावी की काय, असेही वाटले.

अमित शहा यांना झालेल्या आजारपणातून ते काही आता बरे होत नाहीत, त्यांचा त्यातच मृत्यू व्हावा, अशा खास पुरोगामी, डाव्या पद्धतीच्या सदिच्छ ट्वीटरवर सुरू झाल्या आणि या विकृत मंडळींना आपला व्यक्तीद्वेषाचा कंड शमवून घेण्यास आणखी एक कारण मिळाले.

विशेष म्हणजे यात आघाडीवर होते ते पत्रकार…

द क्विंट या प्रसिद्ध वेबपोर्टलच्या पत्रकार स्तुती मिश्रा यांना झालेला आनंद तर अवर्णनिय असाच होता. 16 जानेवारी रोजी 9 वाजून 51 मिनिटांनी स्तुती यांनी आपल्या आनंदाला वाट मोकळी करून देत म्हटले,

 

 

माणसे स्वाईन फ्लू ने मरतात, बरोबर ?, असा या ट्वीटचा शब्दश: अर्थ आहे.

याचा संदर्भ आहे तो अमित शहा यांना झालेल्या स्वाईन फ्लूसोबत. म्हणजे अमित शहा हे आपल्याला आवडत नाही, त्यांचा मी द्वेष करणार आणि म्हणून त्यांचा मृत्यूच व्हावा, अशी माझी स्वच्छ इच्छा आहे. असे स्तुती यांना म्हणावयाचे आहे.

आपल्या मनातील द्वेष अशा विकृत पातळीवर नेऊन त्याचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याबद्दल पुरोगामी टोळी स्तुती यांचा नक्कीच आदरसत्कार वगैरे करेल, यात कोणतीही शंका नाही.

पण, लोकलाजेस्तव म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा, द क्विंटला कदाचित आपल्या कर्मचाऱ्यांच्या कृत्याची लाज वाटली असावी.

त्यांनी लगेच ट्वीट करीत स्तिती मिश्रा यांच्या असंवेदनशिल ट्वीटचा निषेध करीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

त्याचवेळी शहा यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असेही म्हटले. अर्थात बुंद से गयी, वो हौद से नहीं आती…

 

 

आता अशी विकृती दाखविण्यात फेमिनिस्ट म्हणवणाऱ्या व्यक्तीही मागे नाही. एरवी याच व्यक्ती अन्यांना अक्कल शिकवत, पुरोगामीत्वाचे धडे देत गावगन्ना हिंडत असतात, त्याचवेळी मनातील व्यक्तीद्वेषही यथेच्छ व्यक्त करतात.

प्रियांका नामक आणखी एक ट्वीटर सेलिब्रिटी, त्यांनी स्वत:ची ओळख फेमिनिस्ट अशी सांगितली आहे.

आता फेमिनिस्ट म्हटले की महिला हक्कांसदर्भात विचार असणे अपेक्षित आहेत, पण समोरच्याचा मृत्यू होण्यात या फेमिनिस्ट बाईंना कमालीचा रस आहे. आपल्या विकृत ट्वीटमध्ये त्या म्हणतात,

 

स्वाईन फ्लूच्या आजारपणातून बरे न झाल्यास, तुमच्या आत्म्यास कधीही शांती लाभू नये, असे अतिशय उदात्त स्त्रीवादी विचार या बाईंनी व्यक्त केले आहेत. या बाईंच्या ट्वीटर अकाउंटवर एक चक्कर मारली असता त्यांचा विकृतपणा अगदी सविस्तर पहायला मिळाला.

सुनेत्रा चौधरी या एनडीटिव्हीच्या राजकीय संपादक (म्हणजे तसे त्यांच्या ट्वीटरवर नमूद केले आहे). आता एनडीटिव्ही म्हणजे जगातील एकमेव निष्पक्ष वृत्तवाहिनी, जेथे जगातील सर्वांत पुरोगामी असे प्रणॉय रॉय आणि पडदा काळा करून संवेदनशिलतेचा आव आणणारे रविश कुमार कार्यरत आहेत.

२००९ साली या राजकीय संपादक असलेल्या बाईं गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाईन फ्लू झाल्याचे कळल्यावर फार ‘एक्साईट’झाल्या आणि आपली एक्साइटमेंट त्यांनी जगजाहिरही केली.

 

 

पुढे याच यादीत येतात त्या म्हणजे मराठी पुरोगामी(?) विश्वातील प्रसिध्द विदुषी मुग्धा कर्णिक!

आपले श्रेष्ठी इतक्या हिरीरीने या विकृतीचे प्रदर्शन करतायत म्हटल्यावर शांत राहतील त्या मुग्धाताई कसल्या.. त्यांनीही आपल्या लेखणीचे तळपते हत्यार उचलत छानपैकी गरळ ओकली आहे..

 

याच ठिकाणी एका कमेंटला दिलेले उत्तरही कर्णिक यांची वृत्ती उघडी पडणारे आहे.

 

 

पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष शहा, भारतीय जनता पार्टी, त्यांची राजवट यांना विरोध असण्यात काहिही वावगे नाही. विरोधाचे आवाज हे बळकट असायलाच हवे, नाहीतर सत्ताधाऱ्यांवर वचक राहत नाही.

त्यातही पत्रकारांनी तर अधिकच सजग रहावे, अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा असते. पण त्या अपेक्षेचा गैरफायदा घेण्याचे काम पत्रकारितेतील काही मंडळी करीत आहेत.

यांचा एकमेव अजेंडा असतो, नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे अन्य नेते यांच्याविरोधात समाजात आपली विकृती प्रसारित करीत राहणे.

विशेष म्हणजे एरवी कसे वागावे, कसे बोलावे, काय करावे, काय करू नये अशी साधनशुचिता समाजास शिकविण्याता ठेका आपल्याकडेच आहे, अशा अविर्भावात वावरणारी, वातानुकूलीत खोल्यांत बसून काचेच्या उंची चषकांमधून उबदार वातावरणात सोनेरी द्रवाचे घुटके घेणारे पुरोगामी टोळ्यांचे सरदार त्यांच्या पंटर लोकांच्या विकृतीचे अगदी साजूक शब्दात समर्थन करताना आढळतात आणि त्या बदल्यात आपल्या मालकाकडून पोटभर रमणा मिळवितात.

–  युगंधर

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version