' विवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा… – InMarathi

विवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे स्त्रीची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखी नाजूक वगैरे असल्याचा भंपक विचार बाळगणारे अनेक लोक आहेत.

ज्या स्त्रीला बलात्कारासारख्या भयानक अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्या स्त्रीलाच गुन्हेगार समजून समाज तिला जगणे नकोसे करतो. जे खरे गुन्हेगार असतात ते मात्र मोकाट सुटलेले असतात.

एखाद्या अविवाहित मुलीवर असा भयानक प्रसंग ओढवला तर तिचे लग्न होणे जवळजवळ अशक्यच असते. काही महाभाग तर पत्नीवर असा अत्याचार झाला तर तिला सोडून देऊन हात वर करतात.

 

rape-inmarathi

 

काही ठिकाणी तर अत्याचार झालेल्या मुलीचे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याशीच जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. म्हणजेच मुलीची काहीही चूक नसताना तिला आयुष्यभराची शिक्षा देण्यात येते.

मात्र काही ठिकाणी असेही लोक आहेत जे त्या मुलीबरोबर झालेल्या दुर्दैवी घटनेला एक अपघात समजून विसरून जातात आणि त्या मुलीलाही आयुष्यात परत सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून प्रयत्न करतात.

हरयाणातील एक शेतकरी जितेंदर छत्तर ह्यांनी एका बलात्कार पीडितेशी लग्न केले आहे. त्यांची कथा त्यांच्याच शब्दांत –

 

“काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीवर आठ नराधमांनी बलात्कार केला होता. ते नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि त्यांनी ते फोटो सगळीकडे पसरवण्याची धमकी दिली.

त्यांनी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढले आणि ते फोटो सगळीकडे पसरवण्याची धमकी देऊन तब्बल दीड वर्ष ते तिच्यावर अत्याचार करीत राहिले.

 

rape-victim illustration InMarathi

 

जेव्हा हे सगळे घडत होते तेव्हा आमचे लग्न झालेले नव्हते. पण आमचे लग्न ठरले तेव्हा मला सप्टेंबर २०१५ साली तिच्याकडून सगळे कळले.

मी माझ्या आईवडिलांबरोबर तिच्या घरी गेलो, माझ्या आईवडिलांनी ह्या लग्नासाठी परवानगी दिली.

पण नंतर लग्नाच्या आधी आम्हाला भेटता येणार नव्हते. आमच्याकडे परंपरा आहे की लग्नाच्या आधी नवरा नवरी भेटत नाहीत. आमच्या लग्नाला तेव्हा चार महिने अवकाश होता.

आम्ही एखाद दुसऱ्या फोन कॉल वरून एकमेकांच्या संपर्कात होतो. माझ्या छत्तर ह्या गावापासून तिचे गाव तीस किमी लांब आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एक दिवस तिने मला सांगितले की तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे आणि तिने मला माझ्या आईवडिलांसह भेटायला येण्याची विनंती केली.

आम्ही एका आठवड्यानंतर तिच्या घरी गेलो ,तेव्हा तिने आम्हाला सांगितले की,

तिच्यावर आठ नराधमांनी शारीरिक अत्याचार केले आहेत आणि हे सगळे लपवून ठेवून, खोटे बोलून तिला माझ्याशी लग्न करणे योग्य वाटत नव्हते.

तिच्यावर ओढविलेला प्रसंग सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू होते , तिने माझ्याकडे बघून म्हटले की ,

“माझ्याशी लग्न करू नका, मी तुमच्या योग्यतेची नाही.”

हे सगळे ऐकून प्रथम मला धक्का बसला आणि तिच्यासाठी वाईट वाटले.

माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने मला उत्तर दिले की मी जर हिच्याशी लग्न केले नाही तर देव मला कधीच माफ करणार नाही. मी तिला सांगितले की,

“मी तुझ्याशीच लग्न करेन आणि मी तुला वचन देतो की तुला न्याय मिळावा म्हणून मी काहीही करायला तयार आहे.”

Jitender_inmarathi

 

तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी आमच्या लग्नाआधीपासूनच प्रयत्न करणे सुरु केले.

हरियाणामध्ये बलात्कार ही फार मोठी समस्या आहे. हरीचे गाव असलेल्या हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराचे प्रमाण सुद्धा भयावह आहे तरीही ह्या गुन्ह्याबाबत फारशी चर्चा केली जात नाही आणि त्यावर उपाययोजना सुद्धा केल्या जात नाहीत.

आपल्या समाजात आजही बलात्कार हा स्त्रीचाच गुन्हा समजला जातो.

माझ्यासारखा प्रसंग इतर कुठल्याही पुरुषावर आला तर बहुसंख्य पुरुष ते लग्न मोडतात आणि त्या अन्यायग्रस्त स्त्रीला आणखी दु:ख देतात.

बलात्कारित स्त्री ही दुर्दैवाने आजही अपवित्र समजली जाते. हे विचारच किती क्रूर आणि अन्यायकारक आहेत. म्हणूनच हरियाणातील पालकांना आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची कायम काळजी वाटत असते.

माझ्याच गावात मी अनेकदा बघितले की शाळेत जाणाऱ्या मोठ्या वर्गातील मुलींना अनेक पुरुष शाळेबाहेर उभे राहून त्रास देतात. त्यांची छेड काढतात.

पण मुली ह्याची तक्रार पालकांकडे करू शकत नाहीत कारण पालक त्यांचे शिक्षणच बंद करून टाकतात.

हरयाणा रोडवेजच्या बस मध्ये सुद्धा स्त्रियांना असुरक्षित वाटेल असे वर्तन अनेक पुरुष करतात. त्यांना त्रास देतात. ह्या बसेस मधून कॉलेजच्या विद्यार्थिनी प्रवास करतात.

 

molesting Indian bus Inmarathi

 

त्यांचा प्रवास कायम धोकादायकच असतो. म्हणूनच आमच्या गावातील अनेक पालकांनी मुलींचे शिक्षण बंद करून टाकले आहे.

मी स्वत: कॉलेजमध्ये असताना छत्तर ते जिंद प्रवास करायचो आणि मुलींना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल २००४ साली हरियाणा रोडवेजच्या डिस्ट्रिक्ट जनरल मॅनेजरकडे ह्यासंबंधित तक्रार सुद्धा केली.

तसेच फक्त स्त्रियांसाठी वेगळ्या लेडीज स्पेशल बसेस साठी मागणी केली कारण ह्या कारणामुळे मुलींचे शिक्षण बंद होतेय हे बघून मला वाईट वाटत असे.

मुलींना मोकळेपणाने व सुरक्षित प्रवास करता यावा अशी माझी इच्छा होती. त्यानंतर मुलींसाठी एक लेडीज स्पेशल बस सुरु करण्यात आली.

२०१३ साली मी खाप पंचायतीबरोबर काम केले आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी जिंद मधील २४ गावांत प्रयत्न केले. ह्या सगळ्यातून मी खुप काही शिकलो.

मला पूर्वी वाटायचे की दारू, ड्रग्स आणि फास्ट फूड ही बलात्काराची कारणे आहेत.

मी अनेक पत्रकारांना सांगितले की,

बलात्काराच्या समस्येविषयी पुरुषांमध्ये जनजागृती करायला हवी. आपल्या मुलांना नीतिमूल्ये शिकवायला हवीत. स्त्रियांचा आदर करणे शिकवायला हवे जे दुर्दैवाने होत नाही.

 

rape-girl-woman-molestation-marathipizza

 

माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटल्यानंतर दोन आठवड्यांनी मी शपथ घेतली की तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

त्या आठही नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास मी माझ्या होणाऱ्या पत्नीस मदत केली. आम्ही वकील नेमले आणि कोर्टात केस सुरु झाली.

डिसेंबर २०१५ ला आमचे लग्न झाले. त्या दरम्यान माझ्या व तिच्या कुटुंबास अनेक धमक्या मिळाल्या.

ते आठही लोक श्रीमंत कुटुंबातले आहेत. त्यांचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. ह्या सगळ्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी आमच्या घरी आम्हाला धमकावण्यासाठी वेळोवेळी गुंड पाठवले.

 

goons Inmarathi

 

आम्ही जे पुरावे सादर केले होते ते कोर्टात येऊच दिले नाहीत आणि माझ्याविरुद्ध तीन खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. परंतु तपासात त्या तक्रारी खोट्याच आहेत हे सिद्ध झाले.

ह्या सगळ्यात माझे आईवडील माझ्या व माझ्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले परंतु हा लढा मात्र अत्यंत अवघड होता.

मला सतत धमक्या मिळत होत्या. अनेकदा केस मागे घेण्यासाठी पैश्यांची लालूच सुद्धा दाखवण्यात आली.

जिल्हा न्यायालयात ह्या आरोपींना निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आले तेव्हा मी उच्च न्यायालयात केस दाखल केली. ती केस लढण्यासाठी मला माझ्याकडच्या अनेक गोष्टी विकाव्या लागल्या.

मी माझ्या दोन जमिनी विकून टाकल्या आणि १४ लाख रुपये फी भरली. आम्हाला आमचे गाव सोडून जिंद येथे राहायला जावे लागले कारण तिथून न्यायालय जवळ आहे.

ह्या सगळ्यात आम्ही आमची मन:शांती गमावली आहे. माझ्या पत्नीला अजूनही त्या भयानक घटनेची वाईट स्वप्न पडतात.

तिचे दु:ख तेव्हाच हलके होईल जेव्हा तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळेल.

आता कुठल्याही वकिलावर माझा भरवसा उरलेला नाही. त्यांची फी भरण्यासाठी माझ्याकडे पुरेसा पैसाही नाही. म्हणूनच शेती सोडून मी स्वत: कायद्याचा अभ्यास करतो आहे.

 

jitender-chhatar-inmarathi

 

मी स्वतःला भाग्यवंत समजतो कारण माझे आईवडील माझ्या पाठीशी उभे आहेत. आमच्या भागात आईवडिलांची साथ असल्याशिवाय असे लढे देणे शक्यच नाही.

माझ्या आईवडिलांमुळेच आज गावातील अनेक लोक माझ्या बाजूने उभे आहेत. त्यांनी आणि गावाच्या पंचायतीने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला हे केवळ माझ्या आईवडिलांमुळेच शक्य झाले.

माझ्या पत्नीने सुद्धा आता माझ्याबरोबर कायद्याचा अभ्यास सुरु केला आहे. मी माझ्या कुटुंबासह चंदीगडला स्थायिक होऊन तिथे माझ्या पत्नीसह प्रॅक्टिस करण्याचा विचार करीत आहे.

आम्ही दोघांनीही ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी काम करण्याचे ठरवले आहे.

आमच्या दोन वर्षांचा लहान बाळाला आम्ही हरियाणाच्या पितृसत्ताक आणि रेप कल्चरपासून लांब नेऊन चांगल्या ठिकाणी शाळेत घालून त्याच्यावर चांगले संस्कार करणार आहोत.

 

upbringing of boys Inmarathi

 

मला आशा आहे की ग्रामीण भागात हे चित्र लवकरच बदलेल. स्त्रियांना सुरक्षित आयुष्य जगता येईल. मी व माझी पत्नी ह्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

आम्हाला आशा आहे की आम्हाला आमचा लढा जिंकण्यात नक्की यश मिळेल.”

जितेंदर, तुमच्यासारखी माणसे फार कमी असतात जी आपल्या पत्नीच्या बाजूने खंबीरपणे उभी राहतात.

जगाला आज अश्याच पुरुषांची गरज आहे जे स्त्रियांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे आयुष्य सुरक्षित होण्यासाठी काहीतरी पाऊले उचलतील.

 

कारण जोवर पुरुषांची मानसिकता बदलत नाही, तोवर बदल घडणे अशक्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?