Site icon InMarathi

विजयनगर साम्राज्याचं मूलतत्त्व : सर्वधर्मसमभाव! संझगिरींचा अभ्यासपूर्ण लेख!

vijaynagar-cover-inmarathi

vivacepanorama.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : द्वारकानाथ संझगिरी

===

तुम्ही हंपी पहायला जाणार असाल तर आधी विजयनगरच्या साम्राज्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे, तरच त्या भग्नावशेषातून तुम्ही पूर्वी काय होतं याची कल्पना करू शकाल.

दुर्दैवाने महाराष्ट्रात किंवा वर उत्तरेत मोगल, राजपूत आणि मराठा इतिहासाबद्दल जेवढं बोललं जातं, चर्चा होते, राजकीय नेते वाद घालतात तेवढं विजयनगरच्या साम्राज्याबद्दल बोललं जात नाही.

शाळेत शिकलेल्या या इतिहासानंतर आपण विजयनगरकडे वळून पाहत नाही.

 

historyunderyourfeet.wordpress.com

त्या काळात काही परदेशी प्रवाशांनी जे विजयनगरचं वर्णन केलंय त्यातली दोन-तीन उदाहरणंच मी सांगतो.

इराणच्या शहाने आपल्या अब्दुल रझाक या वकिलाला व्यापाराची बोलणी करायला विजयनगरला पाठवलं होतं. त्याने लिहून ठेवलंय,

‘अशाप्रकारचे नगर पृथ्वी धुंडाळली तरी पाहायला मिळणार नाही. राजाच्या प्रासादाला खेटून रत्नाच्या आणि मोत्यांच्या चार प्रचंड मोठय़ा बाजारपेठा होत्या. जे नागरिक तिथे दिसत त्यांच्या अंगावर सोनं, रत्नं आणि मोत्याचे दागिने दिसत.’

पोएस नावाचा एक पोर्तुगीज प्रवासी विजयनगरात आला होता. कारण तोपर्यंत वास्को द गामा हिंदुस्थानात पोहोचला होता. त्याने म्हटलंय,

‘विजयनगरचा विस्तार रोमएवढा मोठा आहे.’

त्या हंपीच्या अवशेषांमध्ये उभं राहून जर वैभव डोळय़ांसमोर आणायचं असेल, काही धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्याचा इतिहास चाळून मग हंपीला जाण्यात गंमत आहे.

या साम्राज्याची पायाभरणी हरिहर आणि बुक्क या दोन भावंडांनी केली.

पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतं की, परकीय आक्रमकांसमोर न झुकता जे लढले त्यात राणाप्रताप, शिवाजी महाराजांप्रमाणे हरिहर-बुक्कही होते. पण आपल्याला त्यांच्याबद्दल किती ठाऊक आहे?

१३१८ पर्यंत दिल्लीच्या सुलतानाने जवळजवळ दक्षिण प्रांत पादाक्रांत केला होता. एकेकाळी सशक्त वैभवशाली ठरवली गेलेली देवगिरीपासून मलबारपर्यंतची सर्व राज्ये कोसळली.

अशावेळी यादव कुळातल्या संगम नावाच्या एका गृहस्थाचे मुलगे हरिहर आणि बुक्क हे अनागोंदी राजाच्या पदरी होते.

 

petitionmantra.com

काहींच्या मते अनागोंदी हीच रामायणाच्या बालीतली किष्कींधा नगरी.

सुलतानाच्या सैनिकांनी अनागोंदीच्या राजाचा पराभव केला. या हरिहर-बुक्कांना दिल्लीत नेलं. त्यांना बाटवलं.

आता गंमत पहा, ते दोघेही पराक्रमी होते. त्यांचं तेज पाहून महंमद तुघलकने त्यांना पुन्हा दक्षिणेत हिंदूंशीच लढायला पाठवलं.

ते मनाने कधीच मुसलमान झाले नव्हते.

दक्षिणेत आल्यावर त्यांची विद्यारण्य स्वामींशी भेट झाली. त्यांनी संकेश्वरच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना पुन्हा हिंदू करून घेतले. ही त्या काळातली सामाजिक क्रांती होती.

कारण त्या काळातल्या हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे परधर्मात गेलेल्या हिंदू माणसाला पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची बंदी होती.

आपण नंतरच्या काळातही पाहिलंय की, विहिरीत पाव टाकून पोर्तुगीजांनी गावेच्या गावे बाटवली. कुठल्या तरी क्षुद्र रूढीचे बंधन पायात घालून हिंदूंनी स्वतःचीच माणसं दुसऱ्या धर्मात ढकलली होती.

हरिहर-बुक्काने मग नवं सैन्य उभारलं आणि जे सुलतानाचं सैन्य त्यांनी दक्षिण जिंकायला आणले होते त्यांच्यावरच फासे उलटवले.

१३३६ मध्ये हरिहर हा विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला राजा झाला. १५६५ मध्ये हे साम्राज्य कोसळले; पण त्या २२९ वर्षांत चार वंशांनी राज्य केलं.

हरिहरचा संगम वंश, नंतर साळुंक, तुळूक आणि आरविद या चार वंशांनी राज्य केलं. जे वंश बदलले ते अंतर्गत भांडणं आणि जो जिता वो सिकंदर स्टाइलमध्ये.

जर डोक्यात कुठलीही एक प्रणाली किंवा इझम न ठेवता इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येईल की, धर्मापेक्षा स्वतःचं राज्य टिकवणं ही आपापसातील युद्धामधील त्याकाळी प्रमुख प्रेरणा होती. धर्म त्यानंतर येतो.

 

thevintagenews.com

कारण लढाया हिंदू राजांत होत, तशा त्या मुसलमान राजांतही होत. मुसलमानांचं बहामनी राज्य अक्षरशः पाच राज्यांत विभागलं गेलं.

स्वा. सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पानं’ या पुस्तकात म्हटलंय,

मूळ बहामनी मुस्लिम सुलतानशाहीतील कुणीतरी मुस्लिम सरदार प्रबळ होई आणि मूळच्या सुलतानाविरुद्ध बंड करून स्वतःला सुलतान म्हणवून घेई आणि आपलं वेगळं राज्य स्थापन करी.

मुसलमान लोक आपसात लढत नाहीत ही अनेकांची हिंदूंविरुद्ध म्हणून मिरवली जाणारी प्रौढी किती वायफळ आहे याचे ते बहामनी राज्यातील यादवीचं आणखी एक ढळढळीत उदाहरण.

इतकेच नव्हे तर, त्यांच्यातील कलहात काही मुस्लिम सुलतान दुसऱ्या मुस्लिम सुलतानाला हाणून पाडण्यासाठी हिंदूंच्या प्रबळ अशा विजयनगरच्या राज्याचेही सहाय्य घेत. विजयनगरच्या सहाय्यासाठी मुस्लिम सुलतान अनेकदा भीक मागत.’

विजयनगरच्या साम्राज्यात देवराय, कृष्ण देवराय, रामराय असे अनेक राजे होऊन गेले. प्रत्येकाच्या धार्मिक प्रेरणा वेगळय़ा होत्या.

 

hindi.webdunia.com

तिथे विविध देवांची मंदिरं का दिसतात? कारण हिंदू धर्मातले सर्व पंथ तिथे एकत्र नांदत होते.

तसं पाहिलं तर हरिहर-बुक्क शिवाचे उपासक. विरूपाक्ष हे त्यांचे कुलदैवत होतं. पण त्यानंतरची तिन्ही घराणी ही वैष्णव होती. नृसिंह हे त्यांचं दैवत होतं. हिंदुस्थानात नृसिंहाची मंदिरं फार सापडत नाहीत.

त्यांनी नृसिंहाला कुलदैवत का मानलं असावं? त्याबद्दलही अनेक प्रमेये मांडली जातात.

या साम्राज्याच्या आसपास मुस्लिम राजवटी होत्या. त्यांच्यात क्रौर्य होतेच. नरसिंहाचा अवतार हा क्रूरकर्म्यांना थरकाप उडवणारा अवतार आहे.

हिरण्यकश्यपूला शंकराने ‘तुला दिवसा ना रात्री, ना आत ना बाहेर, आकाशात ना पृथ्वीवर, शस्त्राने ना अस्त्राने, पशू वा मनुष्य, कुणीही मारू शकणार नाही’ असा वर दिला होता. म्हणजे जवळपास अमरत्व दिलं होतं.

त्यातून मार्ग काढून विष्णूने नृसिंह अवतार घेतला. संध्याकाळी, उंबऱयावर ओढून, मांडीवर उताणा पाडून, स्वतःच्या नखांनी पोट फाडून मारलं.

म्हणजे राक्षसी जगात जर मान ताठ ठेवून जगायचं असेल तर नृसिंहाची बुद्धिमत्ता आणि पराक्रम हवा ही त्या दैवतामागची प्रेरणा असावी.

 

vivacepanorama.com

तरीही सर्व राजे सहिष्णु असल्यामुळे जैन, ख्रिस्ती आणि मुस्लिम वगैरे धर्मांतील मंडळींना त्यांनी समान वागणूक दिली. त्यांनी मुस्लिमांना मशिदी बांधून दिल्या. अनेक दर्ग्यांना जमिनी इनाम दिल्या.

बार्बीस या पोर्तुगीज प्रवाशाने लिहून ठेवलंय की,

ख्रिस्ती लोकांशीही विजयनगरच्या राजाचे सलोख्याचे संबंध होते. विजयनगरचे राजे अत्यंत परधर्मसहिष्णू होते.

म्हणून हंपी फिरताना हिंदू धर्मातले विविध पंथ, जैन, मुस्लिम वगैरे संस्कृतीच्या खाणाखुणा तिथे जागोजागी दिसतात.

सर्वधर्मसमभाव हे विजय- नगरच्या साम्राज्याचं मूलतत्त्व होतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version